इन्शाअल्लाह

इन्शाअल्लाह

दारिद्र्यात पिचत असलेली मुस्लीम वस्ती. एके दिवशी ती वस्ती ढवळून निघाली. वस्तीतल्या पोरांची धरपकड झाली. जुनैद घरी आलाच नाही, पकडलेल्या पोरांमध्येही तो नव्हता. कॉलेजमध्ये शिकणारा सरळ मुलगा! अभ्यासू, कविताप्रेमी! का झालं असं? त्या शहरातले हिंदू-मुस्लीम नेते, कार्यकर्ते, राजकारणी या सर्वांना चित्रित करणारी अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाअल्लाह’ ही कादंबरी नुकतीच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली. या कादंबरीतल्या एका प्रकरणातील काही अंश..

राज्यघटनेच्या निर्मितीची व्यापक चर्चा
‘मायलेकी-बापलेकी’
टोनी मॉरिसन : वेदनेचं महाकाव्य लिहिणारी लेखिका

मुसलमानांच्या बायका आणि हिंदूंच्या बायका यांना एकाच मापात का तोलायचं, हेच त्याला कळत नव्हतं.

‘‘नदिम, घरातनं बाहेर काढलेली बाई वेगळी नसतेच रे. तुमच्यातली असो किंवा आमच्यातली. शिकलेली असो वा अडाणी. ती टाकलेलीच असते. सासर तुटल्यावर माहेरची दारं उघडतातंच असं नाही बाबा. म्हणून किमान कायद्याचं पाठबळ तरी हवं तिला.’’ तिच्या आवाजातली तळमळ फातिमाला जाणवली. जमिलाचा नवरा तिला टाकून गेलेला. नीनाचा उपरवाला घेऊन गेला. मुमताजचा धडधाकट असला तरी सासर्याच्या घरची रोटी तोडत बसलेला. कामचुकार, व्यसनी. आणि आपला असा अपाहिज… असून नसल्यासारखा. औरत जातीला काय भोगावं लागतं, ते तिलाच कळतं. नदिमला नाही कळणार.

औरतजातीच्या दु:खाची ओळख लागतंच नाही या मरदजातीला. एक कानून औरतच्या बाजूनं नाही. खाज भागेस्तोवर ओरपणार. रस्सा ओरपतात तसं. भूक भागली की हाडूक चघळून टाकावं तसं टाकणार. दुसरी आणणार. कधीकधी वाटतं, का बांधून घ्यायचं या नवर्यांना. घरातनं काढलं की यांच्या हवसेची, वासनांची नऊ महिने पोटात वाढवलेली गाठोडी कडेवर घेऊन भाईर पडायचं. ना इस्टेटीत वाटा. ना त्याच्या जिंदगीत काही जागा. फातिमाच्या नजरेत बायकांची दु:खं तरळू लागली. बिड्या वळून वळून बोटाला सूज आली, तरी शिकायत करायची कुणाकडे? आब्बाजानच्या घरातली एक खोली दिली नाही भावानं. बिमार नवर्याला घेऊन कुठे जाईल बहीण, असाबी खयाल नाही आला त्याच्या मनात. आमच्या मरदजातीचीच नियत खोटी. तिला वाटून गेलं.

पण फातिमाच्या मनाचं हे आक्रंदन नदिमच्या कानामनापर्यंत पोहोचतच नव्हतं. त्याला मजहबची चिंता होती. औरतजातीला काय, टिपं गाळत बसायचीच खोड. आणि या अशा औरतजातीला एक एक आमिष दाखवत बहकवण्याचे खेळ चालूच होते. कधी मशिदीत जायला द्या म्हणून मोर्चा, तर कधी बुरखा नको म्हणून. तीन तलाकच्या तर मागेच लागलेत हे लोक. का हे ढवळाढवळ करतात? त्याला राग येत होता. याआधी मरद आणि औरते कधी असे बसून गप्पाही मारत नव्हते. आपण घट्ट राहून मुकाबला करायला हवा. हाणून पाडायला हवा हा डाव.

पण फातिमाचा वाढलेला श्वास आणि जमिलाचे शिवलेले ओठ झुल्फीला सगळी दास्तान सांगत होते. सदियोंसे सुनी दास्तान… पण अगदी ताजी जख्म असावी तशी भळभळताना दिसत होती त्यांच्या काळजातून. त्याच्या तोंडून नकळत शब्द उमटलेच. ‘‘हमारे औरतांकी हालात सुदारनेका आचींगा तो हमको बी बोलना चाहिये के ये कानून लाव.”

आता नदिमचं डोकंच फिरलं. ‘‘हौर हमारा कानून? क्या करनेका वो? आँ?” तो उठलाच. या लोकांत बसणंही त्याला हराम वाटू लागलं. त्यानं झुल्फीकडे बोट दाखवत इशाराच दिला. शरियतला हात लावला तर खबरदार, असेच त्याचे डोळे जणू सांगत होते. जाता जाता तो वळला. आणि त्यानं स्पष्टच केलं. आमच्या औरतलोकांचं काय करायचं, ते आम्ही बघू. त्यांना जित्तसुद्दा गाडू. ‘‘भाईरवालोंको इसमे पडनेका जरूरत नई.” आणि तो निघून गेला.

झुल्फी फिकटसं हसला. त्याला वाटलं, अजून काय गाडणार? समोर बसलेल्या फातिमा, जमिला, मुमताज, आपा… रूढी, परंपरांच्या अंधारात गाडल्याच गेल्यात की. त्यानं सरळ कय्यूम, अकबर्याला विचारलं की ही ज्यादती नाही का? नवरा जसं ठेवेल तसं राहायचं, तो मेला तर सासरच्यांकडे पडून राहायचं पायपुसण्यासारखं. त्यानं नवर्यानं टाकल्यावरचं चित्र त्यांच्यासमोर उभं केलं. आपल्यापण बहिणी कुणाच्या तरी घरात शादी करून गेल्यात. त्या माघारी आल्यावर काय करतो आपण? कय्यूमला पटत होतं. आपला बडा भाई भाभीला फारच छळतो. बिचारी. हा सटकू काय बोलून बसेल म्हणून त्याचा मार खात राहते. अकबर्याच्या बहिणीला माघारी धाडलं होतं. अम्मीनं दामादचे पाय धरून, नाक घासून तलाक वाचवला होता. झुल्फीच्या एकेका शब्दानं त्यांच्या मनात विचारांचे तरंग उमटू लागले. पण त्याचबरोबर आपल्या कायद्याला हात घातला; उद्या आपल्या मजहबला, आपल्या इस्लामला हात घालतील अशी भीतीही त्यांच्या मनाचा तळ ढवळून काढत होती.

या विचारांच्या तरंगांपेक्षा ते ढवळणं अधिक जोरकस होतं.

जिंदगीचं काय, ती कशीतरी किनार्याला लागतेच.

थोडावेळ बसून एकेक जण निघून गेला. पण जाताना मनात एक अस्वस्थता घेऊन गेला.

मुमताजही ‘‘औरतांकी जिंदगी ऐसीच आसतीया” म्हणत उठली. घराघरांत आसलेच मरद होते. यात इतकं बोलण्यासारखं काय होतं, हेच तिला कळत नव्हतं. फातिमाला नवर्याला भरवायचं होतं म्हणून ती उठली. विडी वळायची आणि विडीसारखं जळत राहायचं, यापरीस होतं तरी काय तिच्या जिंदगानीत?

रात्री कामं उरकून जमिलानं पाठ टेकली खरी पण झुल्फीच्या आवाजातला दर्द तिला परेशान करत होता. असाही मर्द असतो? औरतजातीच्या काळजाचे ठोके ऐकू येणारा? तिच्या वाट्याला आलेल्या मर्दात आब्बू होते. त्यांना आम्मीचा दर्द ऐकू आला नाही. मग तिचा शौहर. त्याला कधी तिचा दर्द ऐकू गेला नाही. जुनैद जलमला, तेव्हा एकदाच खोलीत आला आणि त्यानं त्याचे पाय फाकवून खात्री करून घेतली. आपण लडकी जनली नाही याची. मग शराबच्या अड्ड्यावर पीत बसला दोस्तांसंगट खुशीत. आपल्या पोटातल्या कळा तर सोडाच, आपल्या गुरासारख्या चिखा तरी कुठं कानावर पडल्या त्याच्या. तिच्या मनात विचारांच्या लाटा उसळत राहिल्या.

हा पोरगा काय बोलतो, मला कळत नाही. कुणाला काय शिकवतो, पता नही. कुणाला फितवतो का बहकवतो, मैं नहीं जानती. पण माझ्या ओठांपाशी अडवून धरलेले हुंदके आणि पापण्यांच्या आत दडवलेले आसू याच्यापर्यंत पोचतात. मी याला इथे यायला बंदी करणार नाही. कानूनबिनून कळत नाही आपल्याला. पण असा औरतजातीचं दुखणं जाननेवाला मरद कानून लिहायला बसला असता, तर आमची जिंदगी अशी दोजख होऊन पडली नसती.

पुढले दहा दिवस समान नागरी कायद्याच्या मुद्द्यानं शहर बर्यापैकी ढवळून निघालं. अर्थात त्याची व्याप्ती चर्चाबिर्चांपुरतीच राहिली. धरण्याचा दिवस जसा जसा जवळ येत गेला, वर्तमानपत्रात दोन्ही बाजूंनी लेख येऊ लागले. लोकांतल्या चर्चा ऐकून झुल्फीला जाणवलं; हिंदूंना वाटतं, हा कायदा म्हणजे मुसलमानांचे चाललेले लाड बंद करायचा रामबाण उपाय आहे. या कायद्यामुळे मुसलमानांच्या वाढत्या संख्येला आळा बसेल. आणि मुसलमानांना तर हा कायदा म्हणजे आपल्या मुसक्या बांधायचा डाव आहे, असं वाटतंय…शब्बीरचाचांनी तशाच गोष्टी मांडायला सुरुवातही केली होती. या धरण्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी एक पत्रक काढलं होतं. त्यावर सह्या घ्यायला सुरुवात केली होती. मशिदीच्या बाहेर उभं राहून नदिम आणि इतर लोकांना सह्या मागत होते. लोकही सह्या देत होते, अंगठे उठवत होते.

मोहल्ल्यातही नदिमनं सह्या गोळा केल्या होत्या. अकबर्या गॅरेजमधून हे सगळं बघत होता. नदिम सह्या गोळा करून त्याच्याजवळ आला, तसा त्यानं चहा मागवला. मग पोटगी दिली पाहिजे अशी मागणी आहे का, ते हळूच विचारून घेतलं. अकबर्याची बहीण कधीही नवर्याच्या घरातनं परत माघारी येईल, अशी स्थिती होती. ती आली दोन पोरांना घेऊन तर त्याचं कंबरडंच मोडून जाणार होतं. नदिमनं समजवून सांगायला सुरुवात केली. त्याच्या मते पोटगी देण्याचा कानून नाही, हे चांगलंच होतं. पोटगी मिळते म्हणून बाकी धर्मांतल्या बाया भसाभस घटस्फोट घेतात. पोटगी मिळाली नाही तर कसं होणार आपलं या भीतीनं आपल्याकडे घटस्फोट कमी होतात, हे त्यानं सांगितलं. पोटगीचं बळ मिळालं, तर औरतजात डोक्यावर चढून बसते, हेही निरीक्षण नोंदवलं.

पण अकबर्याच्या मनात वेगळाच मुद्दा होता. बाई घटस्फोट मागत नाही, पण पुरुष देतात ना बळजबरीनं! त्याच्या मामूनं आपल्या बेगमला एका पोस्टकार्डावर तलाक दिला होता. फुफालाही एका सकाळी उठून चाचानं गाडीत बसवलं होतं आणि गाडी हलली, तसं तीनदा ‘तलाक’ म्हणून पिछा छुडवला होता. बिचारीनं कमरेवरच्या पोरासकट धावत्या बसमधून उडी घेतली होती.

दरम्यान मुमताजही येऊन उभी राहिली होती. नदिम तिलाही समजावू लागला. अकबर्याला नीट मांडता येत नव्हतं, पण सगळ्या बायकांचं दु:ख एकच असतं, तर मग कानून का वेगळा? हा प्रश्न त्याला छळत होता. ‘‘कौन बोल्या सबका कानून एक हय? शिख लोगा हाथमे कृपाण रखतई. दाढी, पगडी डालतईच ना?” जैन मुनींना असलेली नग्न राहण्याची अनुमती. तो पोपटासारखा बोलत होता. मुमताजला बाकी काही कळत नसलं तरी नदिमवर यकिन होता तिचा. अकबर्याला मात्र बहिणीची चिंता होती. रोज भीतीच्या वरवंट्याखाली दडपल्या जाणार्या बहिणीला उद्या टाकून दिलं तर पोटगी तरी मिळेल. तसं झालं तर केवढा तरी आधार मिळेल, असं त्याला वाटत होतं. हा कानून आणणारा कुणीही असो, त्याच्या दृष्टीनं मसिहाच असणार होता. मजहब की बहिणीची जिंदगी या साध्या प्रश्नात त्याला बहिणीची भलाईच महत्त्वाची होती.

अकबर्या हलत नाही, हे पाहून नदिमनं शेवटचा मुद्दा काढला. ‘‘मत कर सही. मत कर. कल मुसलमान का कुच नई रहींगा.” उद्या सगळ्यांना एकच कानून. म्हणजे सगळ्यांना मेल्यावर जाळायचं. दफन करायचं नाही असं कायद्यात असल्याचं तो म्हणाला, तसा मुमताजच्या अंगावर सर्रकन काटाच आला. आधीच कोण जाणे कुठल्या गुनाहापायी जिंदगीची माती होऊन बसली होती. आता किस्मतमध्ये दफनसुदीक नाही? तिनं ‘‘ला, इधर ला” म्हणत कागद घेतला आणि आपला अंगठा उठवला. ‘‘मिट्टी डाली ऐसे कानूनपर” म्हणत ती निघूनही गेली.

अकबर्या तसाच शांत उभा राहिला. मजहब आणि फरमान यांचं महत्त्व त्याला वाटत होतंच. पण बहिणीच्या पाठीवरचे ते चटके, वळ, दामादजीसमोर नाक घासणारी अम्मी आणि बेबस, लाचार उभे आब्बू या सगळ्याची याद येऊन त्याचा हात उचलतच नव्हता. भयाचा एक मोठा डोंगरच मनात उभा राहिला होता. ते म्हणत होते, आगे बढ. पण हातांनी जणू बगावत पुकारलेली. तो तसाच उभा राहिला. मग मनाची हार झाली. आणि तो नदिमकडे पाहून म्हणाला, ‘‘मय नही करूंगा नदिम. खुदाहाफीज.” आणि तो वळून कामाला लागला.

धरण्याचं कवित्व दोन-एक दिवस चाललं. मिडियालाही वेगळे मुद्दे मिळाल्यानं ते तिकडे बिझी झाले.

इन्शाअल्लाह
अभिराम भडकमकर
राजहंस प्रकाशन
पृष्ठेः ३२१
किंमतः ३५० रु.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: