ऑलिम्पिक: नेमबाज आणि तिरंदाजांची निराशा

ऑलिम्पिक: नेमबाज आणि तिरंदाजांची निराशा

ऑलिम्पिकपूर्व विश्व अजिंक्यपद स्पर्धांमधील गुणसंख्या, क्रमवारी आपल्या नेमबाज, तिरंदाजांना कधीच गाठता आली नाही. त्यामुळे विश्व अजिंक्यपद स्पर्धेची पदके व जागतिक क्रमवारी पोकळ ठरली. या आधीच्या लंडन, रिओ ऑलिम्पिकच्या वेळी देखील असेच घडले होते. अपेक्षा निर्माण करून अखेर त्यांनीही अपेक्षाभंग केला.

दलित कुटुंबाला मारहाणः कलेक्टर, एसपीला निलंबित
अनीताची कहाणी – चोहीकडे नुसतंच पाणी
‘२०१४मध्ये हिंदू कट्टरतावाद्यांची तक्रार नव्हती’

टोकियो ऑलिम्पिकने भारताला आतापर्यंतचे सर्वोत्तम यश दिले. ७ पदके त्यात १ सुवर्ण, २ रौप्य आणि ४ कांस्य पदके. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी पदकांचा हा आकडा १९ पासून १२ ते १४ असा वर्तविला जात होता. मग चुकलं काय? तिरंदाज आणि नेमबाज यांनी साफ निराशा केली. निराशा हा शब्ददेखील अयोग्य आहे. ऑलिम्पिक आधी नेमबाज ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि २ कांस्य पदके मिळविणार असं चित्र रंगविलं गेलं होते.ते चित्र कुणी रेखाटले? मीडियाने… कॉर्पोरेट कंपन्यांनी किवा सरकारने?

प्रसिद्धी माध्यमांचा अंदाज का चुकला? मुळातच आपल्याला नेमबाज सुवर्णपदकांची पदकांची लयलूट करतील असं का वाटले? याचे मुख्य कारण नेमबाजी स्पर्धेचे होणार्या वारेमाप विश्वचषक स्पर्धा.

ऑलिम्पिक दर ४ वर्षांनी होतं. क्रिकेट वर्ल्डकप, फुटबॉल वर्ल्ड कप ४-४ वर्षांनी होतात. या नेमबाजांचे विश्वचषक दरवर्षीच नव्हे तर वर्षात चार-चार वेळा देखील होतात. बरं या वर्ल्ड कपमध्ये किती देश सहभागी असतात? क्रिकेटप्रमाणे अगदी मोजकेच. त्यातही त्या त्या देशांचे आघाडीचे नेमबाज सहभागी असतीलच याची खात्री नाही.

भारतीय नेमबाजांकडून वारेमाप अपेक्षा केली गेली ती या वर्ल्ड कप स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची त्यांनी लयलूट केल्यामुळे. जोडीला राष्ट्रकुल स्पर्धाही आहेत. तेथेही नेमबाजीत फारसे कुणाचे आव्हान नसतेच. आपले नेमबाज तेथूनही खोऱ्याने पदके घेऊन येतात. शिवाय एशियन चॅम्पियनशीप आहेच. या सर्व स्पर्धा जिंकता जिंकता खेळाडूंचे रॅकिंगही एकदम वरचे होऊन जाते. त्या रॅकिंगशी सुसंगत अशी कामगिरी ऑलिम्पिकमध्ये होत नाही. ना ती टोकियो ऑलिम्पिकला झाली; ना रिओ ऑलिम्पिकला, ना लंडन ऑलिम्पिकला. ‘मीडिया’ने उभा केलेला कागदावरच्या कर्तृत्वाचा केवळ फसवा आभास प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये पोकळ ठरतो. जनतेच्या आकांक्षाचा चुराडा होतोच. परंतु सरकारही नेमबाजीसारख्या महागड्या खेळांवर करोडो रुपये, या खेळाडूंच्या प्रशिक्षण, परदेशी प्रशिक्षकांच्या नियुक्त्या, परदेश दौरे आणि स्पर्धांना पाठविणे, यावर खर्च करते. वर्ल्डकप विजेता किंवा पदक विजेता किमान पहिल्या ६ मध्ये, किंवा १० मध्ये तरी असायला हवा.

आपल्या संभाव्य सुवर्णपदक विजेत्यांची टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरी पाहा म्हणजे लक्षात येईल.

भारतीय नेमबाजांची ऑलिम्पिकपूर्वीची कामगिरी आणि प्रत्यक्षात ऑलिम्पिकमधील कामगिरी यात फरक, तफावत का?

प्रतापसिंह तोमर. वय वर्षे २० वीस. ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशनमध्ये २१वा आला. २०२१ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या व तिसऱ्या क्रमांकाच्या कामगिरीच्या तो जवळपासही दिसला नाही. २०२१ला दोहा (कतार) येथे तो तिसरा आला होता. ऑलिम्पिकपूर्वी दिल्लीतील विश्व अजिंक्यपद स्पर्धेत तो पहिला आला होता. येथेच सर्वांची फसगत झाली ऑलिम्पिक तोंडावर आले असतानाकोणत्याही देशाचे संभाव्य विजेते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरत नसतात. दिल्लीतील स्पर्धेतही अनेक उत्तम नेमबाजपटू आले नव्हते.

– – – – – – – – –

१० मीटर एअर पिस्तुलमध्ये अनुभवी अभिषेक वर्मा १७ वा आला. २०१९ मध्ये रिओ व बीजिंगयेथील वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला क्रमांक यंदा दिल्लीतील वर्ल्ड कप स्पर्धेतही अभिषेकने राखला होता. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये माशी शिंकली. तो चक्क १७ व्या स्थानावर फेकला गेला. ही तफावत कशी?

– – – – – – – – –

१९ वर्षीय सौरभ चौधरीची १० मीटर्स एअर पिस्तुल स्पर्धेतील कामगिरी तशी उजवीच म्हणावी लागेल. २०१८ च्या युथ ऑलिम्पिकपासून, एशियन गेम्स, २०२१ च्या नवी दिल्लीतील वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत सौरभने आपली कामगिरी अव्वल क्रमांकाची ठेवली होती. पण ऑलिम्पिक आले. सुवर्णपदक विजेत्या फोरोगीच्या २४४ गुणांच्या तुलनेत सौरभने १३७ गुण ऑलिम्पिक स्पर्धेतील त्याच्या कामगिरीची तफावत दर्शवत होती.

अनुभवी संजीव राजपूत ५० मीटर्स रायफल थ्री पोझिशन या स्पर्धेत ३२ वा आला. तो देखील नवी दिल्लीच्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीच्या जवळपासही नव्हता.

– – – – – – – – –

१० मीटर्स एअर पिस्तुलमध्ये दिव्यांश सिंग पनवारही ३२ वा आला. त्याची सांघिक स्पर्धेची नवी दिल्ली येथील सुवर्ण पदकाची कामगिरी ती त्याला टोकियोत गाठता आली नाही.

त्याच स्पर्धेत महिलांमध्ये अंजुम १५ वी आली. नवी दिल्लीतील २०२१ मधील दुसरा क्रमांक (सांघिक) तिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये राखता आला नाही.

– – – – – – – – –

पुरुषांच्या १० मीटर्स रायफलमध्ये दीपककुमार २६वा आला. २०१८ची एशियन गेम्समधील दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी त्याला टोकियोत नोंदविता आली नाही.

– – – – – – – – –

शॉट गन स्कीटमधील नवी दिल्लीतील विश्वचषक विजेतेपदाच्या कामगिरीचा जवळपासही पोहचू न शकलेला मिराज खान टोकियोत २५ वा आला.

– – – – – – – – –

बराच गाजावाजा जाहिरातबाजी करून टोकियो ऑलिम्पिकला आलेली मनू भाकर सपशेल अपयशी ठरली. १० मीटर्स एअर पिस्तुलमध्ये ती १२ वी तर २५ मीटर्स एअर पिस्तुलमध्ये १५ वी आली. २०१८ ते २०२१ पर्यंत विश्व अजिंक्यपद स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन टोकियो येथे करण्यात मनू भाकरला अपयश आले. पहिल्याच स्पर्धा प्रकारात तिच्या बंदुकीचा लिव्हर तुटला. तेथे सुरू झालेली अपयशाची आणि अपघातांची मालिका अखंडित राहिली. त्या धक्क्यातून ना मनू भाकर सावरली ना सांघिक स्पर्धेत ती भारताला यश देऊ शकली. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेतीमध्ये आणि १५ व्या क्रमांकावर असलेल्या मनू भाकरमधील गुणांची तफावत अवघी ८ गुणांची होती. यावरून स्पर्धा किती चुरशीची होती ते लक्षात येईल. मात्र विश्वचषकापेक्षा ऑलिम्पिक स्पर्धेला अधिक महत्त्व देणाऱ्या अन्य देशांच्या स्पर्धकांनी यावेळी बाजी मारली.

– – – – – – – – –

नवी दिल्लीत २५ मीटर्स पिस्तुल स्पर्धेत सांघिक सुवर्ण व वैयक्तिक पदक येथे पटकावणारी कोल्हापुरची राही सरनोबत ३२व्या क्रमांकावर फेकली गेली.

कोल्हापुरचीच तेजस्विनी सावंत ५० मीटर्स रायफल, थ्री पोझिशनमध्ये ३३ वी आली. नवी दिल्लीतील सांघिक पहिल्या क्रमांकाच्या कामगिरीपर्यंत तिलाही पोहोचता आले नाही याच स्पर्धेत भारताची अंजुम १५वी आली.

यशस्विनी सिंगचीही तीच व्यथा. १० मीटर्स एअर पिस्तुलचे नवी दिल्लीतील विश्वविजेतेपद किंवा ती कामगिरी तिला काही महिन्यानंतरच्या ऑलिम्पिक स्पर्धेत परावर्तीत करता आली नाही. टोकियोला ती १३ वी आली. सांघिकमध्ये (मिश्र) भारताचा क्रमांक १७ वा होता.

– – – – – – – – –

अपूर्वी चंडेलाने १० मीटर्स एअर रायफल मध्ये २०१९ (म्युनिक) व २०१९ नवी दिल्ली येथील वर्ल्ड कप स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवून अपेक्षा वाढविल्या होत्या. टोकियोत अपूर्वी चंडेला ३६ वी आली.पूर्ण अपेक्षा भंग.

– – – – – – – – –

कुस्तीतही अपवाद वगळता निर्भेळ यश असे मिळालेले नाही. एनजीओंचे कुस्तीवरचे वाढते हस्तक्षेप अनेकांच्या नाराजीचे कारण ठरले.

ओ. जी. क्यू. (ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट), जे. एस. डब्ल्यू. (जिंदाल) व टी.ओ.पी.एस. (टारगेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) आदी एनजीओनी भारताच्या खेळाडूंची वाट लावली असे म्हणता येते. त्यामुळे अपेक्षेपेक्षा टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पदके मिळाली नाहीत असा गंभीर आरोप भारतीय कुस्ती महासंघांचे अध्यक्ष ब्रीजभूषण सरन यांनी केला आहे. कुस्तीतील दहिया आणि पुनिया यांची दोन पदके हे आपले सपशेल अपयश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ब्रिज भूषण यांच्या म्हणण्यात काही अंशी तथ्यही आहे. कारण ऑलिम्पिक्स पूर्वतयारीच्या निमित्ताने अनेक “एनजीओ”नी आपापले उखळ पांढरे करून घेतली आहेत. त्या-त्या खेळाच्या संघटना, खरं तर तळागाळातून गुणवत्ता हुडकून त्यांच्यासाठी स्पर्धा भरविण्याचे काम करतात, शिबिरे आयोजित करतात. त्यातील सर्वोत्तम खेळाडू अलगद पळविण्याचे काम अनेक एनजीओ करतात. त्या खेळाडूंनी पदके जिंकली की श्रेय उपटण्याचे कामही यथायोग्य करतात.

कुस्ती महासंघाने आरोप केला आहे की प्रमुख प्रशिक्षक जगमंदरसिंग यांनी मनाई केल्यानंतरही बजरंग पुनिया, अली अलिएव या जून महिन्यात झालेल्या स्पर्धेत उतरले. उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याचा गुडघा दुखावला.

पदकाची आशा असलेल्या विनेश फोगाटने तर महासंघाशी सरळ सरळ वैर स्वीकारले होते. तिने ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये भारतीय महिला कुस्ती खेळाडूंसोबत सराव करण्यास नकार दिला. विनेश थेट हंगेरीहून सराव करून आली होती. ती हंगेरीयन खेळाडूंच्या कळपात राहायची. भारतीय खेळाडूंसोबत राहिल्याने आपल्याला करोना होईल. कारण हे खेळाडू भारतातून आले आहेत अशी भीती तिने व्यक्त केली होती.

भारतीय संघाच्या पुरस्कर्त्यांचा गणवेश घालण्याऐवजी नाईके कंपनीचा गणवेश घातल्याचाही आरोप करून तिच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

हंगेरीमध्ये प्रशिक्षक व्होलर यांच्या पत्नीने विनेशची सरावाची जोडीदार म्हणून भूमिका बजावली होती. त्याबाबतही नाराजी व्यक्त होत आहे. विनेश प्रमाणे सोनमलाही महासंघाने कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघांनेही कुस्ती महासंघाला ह्यांचे स्वत:च्या खेळाडूंवर नियंत्रण का नाही, असा जाब विचारला आहे.

ऑलिम्पिक संघ, खेळाच्या संघटना यांच्यातील वाद अपुरे होते, म्हणून की काय आता एनजीओ आणि अन्य संस्थांची लुडबुडही वाढली आहे. पदक जिंकल्यानंतर तर श्रेय उपटण्यासाठी या सर्वांमध्ये अहमिकाच लागली आहे.

एकूणात नेमबाजांच्या बाबतीत घडलं तेच तिरंदाजीच्या बाबतीतही अनुभवता आले. ऑलिम्पिकपूर्व विश्व अजिंक्यपद स्पर्धांमधील गुणसंख्या, क्रमवारी आपल्या तिरंदाजांना कधीच गाठता आली नाही. त्यामुळे विश्व अजिंक्यपद स्पर्धेची पदके व जागतिक क्रमवारी पोकळ ठरली. या आधीच्या लंडन, रिओ ऑलिम्पिकच्या वेळी देखील असेच घडले होते. अपेक्षा निर्माण करून अखेर त्यांनीही अपेक्षाभंग केला.

नेमबाज आणि तिरंदाज यांच्या ऑलिम्पिकपूर्व कामगिरीचे योग्य मूल्यमापन केले पाहिजे. किंवा आपण एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धेपुरतेच उत्तम आहोत हे मान्य केले पाहिजे. ऑलिम्पिक पदकांचा पाठलाग आणि लक्ष्यांचा पाठलाग करताना खेळाचे अंदाजपत्रक नको त्या खेळांवर वाया जाऊ नये. त्या ऐवजी ग्रासरुट पातळीवर सोई-सुविधा करून त्या त्या विभागातील खेळांना अधिकाधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. ऑलिम्पिक पदक विजेते हे कष्टकरी वर्गातून, श्रमजीवी वर्गातून आले आहेत. हे वारंवार सिद्धही होत आहे. त्या गुणवत्तेचा शोध करण्यावर अधिक निधी खर्च केला गेला पाहिजे. त्यासाठी अधिक अभ्यास करणे व त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवणे गरजेचे आहे. तरच ऑलिम्पिक पदकांची संख्या वाढलेली दिसेल.

विनायक दळवी हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून त्यांनी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे वार्तांकन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: