‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती

‘ओपन’ व्यापार आणि मानवी प्रगती

ग्लोबलायझेशन किंवा मुक्त व्यापार हा विचार दोन्ही बाजूनी टीकेचा धनी होतोय. डावे लोक मुक्त बाजार हे शोषणाचं हत्यार मानतात. गरीब देशांचं शोषण भांडवलशाही

ट्रम्प यांच्या जनगणनेच्या योजनेमध्ये डेटाच्या गैरवापराची भीती
चीनचा विरोध असतानाही नॅन्सी पॅलोसी यांचा तैवान दौरा यशस्वी
अमेरिकेत जे घडले ते जगाला धोकादायक

ग्लोबलायझेशन किंवा मुक्त व्यापार हा विचार दोन्ही बाजूनी टीकेचा धनी होतोय. डावे लोक मुक्त बाजार हे शोषणाचं हत्यार मानतात. गरीब देशांचं शोषण भांडवलशाही देश मुक्त व्यापाराच्या धोरणानं करतात असा त्यांचा आरोप आहे.

या उलट अमेरिकेसारखे उजवे देश म्हणू लागले आहेत की मुक्त बाजारामुळं चीनसारखे देश अमेरिकेतले रोजगार नष्ट करत आहेत. अमेरिकेचा तर आरोप असाही होता की भारतही अमेरिकेचं शोषण करतो. म्हणजे अमेरिकेच्या मालावर भारत जकात लावतो आणि भारताचा  माल मात्र सवलतीच्या जकातीच्या खाली अमेरिकेत स्वस्तात विकतो.

परिणामी अमेरिकेनं अमेरिका फर्स्ट अशी घोषणा दिली आणि भारतानं आत्मनिर्भर होणार म्हणू लागला. थोडक्यात असं की मुक्त बाजाराच्या धोरणातून बाहेर पडून नियंत्रीत बाजाराचा विचार अमेरिका आणि भारत करू लागले.

काहीसा असाच विचार ब्रिटन करू लागलं आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडलं. एक प्रकारे ते ब्रिटीश आत्मनिर्भरतेचं उदाहरण आहे.

सगळेच देश ग्लोबलायझेशनच्या विरोधात आहेत असं नाही. युरोपातले कित्येक देश अजून आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवण्याच्या बाजूनं आहेत.

साधारणपणे असं दिसतंय की अंतर्गत आर्थिक संकट निर्माण झालं की देश कारणं शोधायला लागतात आणि पटकन ग्लोबलायझेशनवर खापर फोडून मोकळे होतात. इतर कारणं असू शकतील याचा विचार करणं टाळतात.

प्रा. किंबरले क्लॉजिंग ‘ओपन’ या पुस्तकात ग्लोबलायझेशन या कल्पनेचं समर्थन करतात, मुक्त बाजारामुळं विकास होतो असं सांगतात.

प्रा. किंबरले क्लॉजिंग

प्रा. किंबरले क्लॉजिंग

प्रा. क्लॉजिंग फायनान्स आणि टॅक्स या विषयाच्या अभ्यासक आहेत. अमेरिकेतल्या ओरेगनमधल्या रीड कॉलेजमधे त्या शिकवतात.

लेखिकेच्या समोर अर्थातच अमेरिकेचं उदाहरण आहे. ट्रंप यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण अवलंबल्यामुळं हे पुस्तक लिहायला लेखिका उद्युक्त झालेल्या दिसतात.

गेल्या चार वर्षाच्या काळात अमेरिकेतला रोजगार कमी जास्त होत होता, अपेक्षेएवढा वाढत नव्हता. मिशिगन, ओहायो, पेन्ससिल्वानिया इत्यादी ठिकाणी उद्योग बंद पडले होते. चीनमधे पोलाद स्वस्तात निर्माण होत होतं आणि जपान-कोरियात कार स्वस्तात तयार होत होत्या. त्यामुळं अमेरिकेतले पोलाद-कार उद्योग बंद पडू लागले, बेकारी वाढली.

अमेरिकन माणसाच्या सरासरी उत्पन्नातली वाढ स्थिर झाली होती, उत्पन्न वाढत नव्हतं. त्यामुळं गरीबांबरोबरच मध्यम वर्गही गांजला होता, त्याच्या खिशात उरणारा पैसा कमी होत होता.

अमेरिकेत विषमता वाढत होती, मूठभरांच्या हाती ढीगभर पैसा आणि ढीगभरांच्या हातात मूगभर पैसा अशी स्थिती झाली होती.

ट्रंप म्हणू लागले की जागतिक बाजार मुक्त असल्यानं सारं जग अमेरिकेला लुटू लागलंय आणि त्यामुळंच अमेरिकेतला रोजगार कमी होतोय.

लेखिका सांगते की अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेतले दोष मुक्त बाजाराशी संबंधित नाहीत, ते अमेरिकेतल्या अर्थव्यवस्थेमधल्या रचनात्मक त्रुटीमुळं निर्माण झाले आहेत. भांडवल, तंत्रज्ञान आणि माणसं यांची ये-जा कल्पकरीत्या हाताळली तर वरील दोष दूर होऊन अमेरिका प्रगती करेल असं लेखिका सांगतात.

काही उपायही लेखिका सुचवतात. उदा. अमेरिकेतली करपद्धती सदोष आहे असं लेखिका म्हणते. गरीब, मध्यम वर्गीय, कामगार या वर्गासाठी करांची रचना बदलली तर त्यांच्या हाती अधिक उत्पन्न उरेल असं लेखिकेचं म्हणणं आहे.

बाहेरून येणारी माणसं स्थानिकांचा रोजगार ओढून घेतात हे खरं नाही, बाहेरून येणाऱ्या माणसांचा कल्पक उपयोग केला, त्यांचं कसब वाढवलं, त्यांच्या कसबाशी मॅच होणारे उद्योग उभे केले तर त्यातून अमेरिकेची अर्थव्यवस्था अधिक गतीमान होईल असं लेखिकेचं म्हणणं आहे.

अमेरिकन माणसाची उत्पादनक्षमता कमी झाली आहे. नवी तंत्रज्ञानं, उत्पादनं आणि उद्योग यांच्याशी जुळवून घेण्यात अमेरिकन माणूस कमी पडतोय. त्याला योग्य शिक्षणप्रशिक्षण मिळालं, योग्य दिशा मिळाली तर भांडवल, तंत्रज्ञान, वस्तू, निर्मिती प्रक्रिया यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीचा फायदा अमेरिका घेऊ शकेल असं लेखिकेचं म्हणणं आहे.

लेखिकेच्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं अमरिका असली तरी हा विचार जगातल्या सर्वच देशांना लागू पडेल असं लेखिकेचं म्हणणं आहे.

थोडक्यात असं की मुक्त बाजाराचं समर्थन लेखिका करते आहे.

याच शीर्षकाचं, ‘ओपन’, पुस्तक जोहान नॉरबर्ग या स्विडीश लेखकानं लिहिलंय. विषय तोच आहे. मुक्त बाजार समाजाच्या हिताचा आहे असंच लेखक ठासून म्हणतो. मांडणी मात्र वेगळी आहे.

नॉरबर्ग अर्थशास्त्राचे प्राध्यापक नाहीत. ते इतिहासाचे अभ्यासक शिक्षक आहेत. पण त्या बरोबरच ते डॉक्युमेंटरी फिल्माही करतात. ते वॉशिंग्टनमधे शिकवतात, स्वीडन आणि अमेरिका अशी ये-जा करत असतात. वॉशिंग्टन पोस्ट, हफिंग्टन पोस्ट यामधे ते नियमानं लिहित असल्यानं त्यांची शैली, विचार करण्याची पद्धत साधारणपणे पत्रकारी वळणाची आहे. त्यामुळंच त्यांचं प्रस्तुत पुस्तकही म्हटलं तर अभ्यास म्हटलं तर एक मुद्दा हिरीरीनं मांडल्यासारखं आहे.

या पुस्तकाचा भर इतिहासावर आहे. व्यापार आणि समाजांचे आपसातले संबंध वाढल्यामुळंच जगाचा विकास झाला आहे असं लेखक सांगतात.

रोमन साम्राज्य ख्रिस्ती होण्याच्या आधी, इसवी सनापूर्वी, श्रीमंत होतं. भूमध्य सागराच्या आसपासचा सगळा प्रदेश त्या साम्राज्यात होता. रोमन माणूस इजिप्तमधून मका घेत होता, स्पेनमधून ऑलिव मिळवत होता आणि कार्थेजमधून कपडा रंगवायचं द्रव्य मिळवत होता. बाहेरची माणसं बिनधास्त रोममधे येऊ शकत होती, नागरीक होऊ शकत होती. रोमन राजानं ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि इतर धर्मांशी भांडणं सुरु केली, खुलेपणा संपला. तिथून रोमन साम्राज्याची अधोगती सुरु झाली, विकासाला खीळ बसली.

अब्बासीद राजवटीत अरब प्रदेश भरभराटला होता. भारतातून आलेलं गणित आणि पश्चिमेतून आलेलं वैद्यकशास्त्र अरब प्रदेशात सुखात नांदत होतं. अब्बासीद राजवटीच्या उत्तर काळात कर्मठ विचारांनी राज्यव्यवस्थेचा ताबा घेतला आणि बाहेरच्या ज्ञानाला मनाई केली. अब्बासीद साम्राज्याची अवनती सुरु झाली.

जोहान नॉरबर्ग

जोहान नॉरबर्ग

इसवी १५०० ते १७५० या काळात स्पॅनिश राजांनी इनक्विझिशन सुरु केलं आणि मुस्लीम आणि ज्यूंना स्पेनमधून हाकलून दिलं. कसब, व्यापार आणि बुद्धीमत्ता या गोष्टी स्पेनमधून बाद झाल्या. स्पेनची अवनती सुरु झाली.

चीनमधे सोंग घराण्याचं राज्य होतं तेव्हां खुलेपणा होता. पश्चिमेकडून अरब प्रदेशातून आणि दक्षिणेकडं भारतातून विविध कला आणि तंत्रज्ञानं चीनमधे आली. वस्त्रोद्योग भरभराटला, घड्याळाचं तंत्रज्ञान विकसित झालं, कागदी चलन प्रचारात आलं, चीनमधे औद्योगीक क्रांती झाली. पण नंतरच्या मिंग आणि  मांचू घराण्यांच्या सत्तांनी चीनचे दरवाजे बंद केले, चीनचा माल एकतरफी रीतीनं जगभर खपवायचा प्रयत्न केला, बाहेरच्या जगाशी संबंध मर्यादित केला. चीनला अवकळा आली.

लेखक जगातली उदाहरणं देऊन सांगतात की वस्तू, तंत्रज्ञान, प्रक्रिया, भांडवल, माणसं यांची खुली ये-जा झाली तरच जगाचा आर्थिक विकास होतो.

पहिलं पुस्तक आधुनिक अर्थव्यवस्थेचा विचार करतं दुसरं पुस्तक इतिहासाचे दाखले देतं.

निळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.

Open
The Progressive Case for Free Trade, Immigration, and Global Capital
Kimberly Clausing

……

Open
The Story of Human Progress.
Johan Norberg.
Atlantic Books

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: