राहुल गांधींना जाहीर पत्र

राहुल गांधींना जाहीर पत्र

आपल्या देशाच्या इतिहासातला कठीण काळ सध्या आहे. गोलमाल बोलणे, अपप्रचार, गोष्टी तोडून मोडून सांगणे आणि निखालस खोटेपणाच्या या काळात सत्याचा उतारा हवा आहे.

आकड्या पलिकडचा विजय !
अटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद
देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे?

प्रिय श्री. राहुल गांधी,

तुम्ही मला कदाचित ओळखणार नाही, तीस वर्षांपूर्वी १९८८ मध्ये आपली अगदीच ओझरती भेट झाली होती. नवी दिल्ली मधल्या सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून तुम्ही काही काळ होतात तेव्हा आपण भेटलो होतो. मी त्याच कॉलेजचा तुम्हाला एक वर्ष सिनिअर विद्यार्थी. आपण अगदीच थोडंसं बोललो होतो. कॉलेजच्या आवारात एका मोठ्या झाडाखाली तुम्ही तुमच्या मित्रांच्या आणि अंगरक्षकांच्या गराड्यात बसला होतात. मला जाणवत होतं की तुम्ही त्या वातावरणात अतिशय अस्वस्थ होता. आजूबाजूचा प्रत्येक जण तुमच्याकडे बघत होता, सगळा माहोल काहीसा अवघडलेला, त्यामुळे मीही तेव्हा आपल्यातला संवाद थोडक्यातच आटोपता घेतला. (या उलट माझा वर्गमित्र. तुम्ही ज्युनिअर असल्यामुळे तुमच्याकडून गाणं गाऊन घेतलं होतं आणि दुसऱ्या दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या मुख्य पानावर तुमच्याबरोबर त्याचा फोटोही छापून आला होता.)

त्यानंतर थोड्याच वर्षांनी, तुमच्या वडिलांची, भारताच्या सहाव्या पंतप्रधानाची हत्या झाली. मी त्यांची अंतयात्रा कधीही विसरू शकत नाही. मला आठवतंय, तुम्ही अचानक तुमच्या गाडीतून बाहेर पडला होतात आणि तुमच्या वडिलांचे शव वाहून नेणाऱ्या गाडीबरोबर जवळपास एक किलोमीटर चालत होतात. तुम्ही तसं का केलंत हे मला तेव्हा समजलं नाही पण १९९१च्या उन्हाळ्याच्या त्या दिवशी गंभीर वातावरणात आमचं अंतःकरण तुमच्याकडे धाव घेत होतं.

दोन दशके उलटून गेली. युपीए दोनचा कार्यकाल संपत आला होता. एकीकडे नरेंद्र मोदी नावाचा तारा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर वर चढत होता आणि दुसरीकडे ट्रोल यंत्रणांनी तुम्हाला नामोहरम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरु केले होते. अत्यंत हीन अभिरुचीचे विनोद आणि टोपण नावे देऊन तुम्हाला अपमानित केले जाऊ लागले. (खरं सांगायचं तर, अर्णब गोस्वामी बरोबरची मुलाखत लाजिरवाणी होती आणि तिच्या राष्ट्रीय प्रसारणामुळे तुमच्या प्रतिमेला तडे गेले.)

मला मात्र त्याचवेळी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाची बसवर लावलेली जाहिरात आठवत आहे. त्यात लिहिलं होतं, ‘मी नाही, आपण सर्व’. प्रामाणिकपणे सांगतो, मला ती जाहिरात आवडली होती. ज्यावेळी देशात सर्वत्र फक्त मोदींचा चेहरा दिसत होता आणि त्यांच्या अविचारी गर्वातिरेकाने भरलेली ‘अब की बार मोदी सरकार’ ही घोषणा सर्वत्र झळकत होती त्यावेळी सहज, मानवी मूल्य जपणारी आणि एकीच्या बाळाला अधोरेखित करणारी जाहिरात बघून खरंच बरं वाटलं होतं. अर्थात तुमच्या संदेशाचा मतितार्थ मोदींच्या व्यक्तिमत्वाने भारावलेल्या निष्ठावंतांच्या गदारोळात वाहून गेला आणि तुमच्या पक्षाला निव्वळ ४४ जागांवर समाधान मानण्याची वेळ आली.

काँग्रेस पार्टीचे ‘मी नाही, आपण सर्व’ पोस्टर

मला माहित असलेल्या बहुतेकांनी त्यावेळी तुम्हाला आणि तुमच्या पार्टीला मोडीत काढलं होतं. (यश आणि अपयशाच्या मानसिकतेचा अभ्यासक म्हणून त्यावेळी तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल काय वाटलं होतं हे जाणून घ्यायची मला खरोखर उत्सुकता आहे.) पण राजकारण ही चमत्कारिक गोष्ट असते. कुणी विचारही केला नव्हता कि निव्वळ चारच वर्षात आजच्या काळातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या तीन राज्यात चुरशीची लढत देऊन तुम्ही तुमच्या पक्षासाठी विजय खेचून आणाल. कालपर्यंत ज्यांनी तुमचा उपहास केला त्या दैनिकांनी अक्षरश: एका रात्रीत तुमच्या नेतृत्व गुणांबद्दल आणि क्षमतांबद्दल गोडवे गायला सुरुवात केली. पण नेतृत्वाच्या निरनिराळ्या व्याख्या करता येतात. गेल्या काही वर्षात ‘कणखर नेतृत्व’ म्हणजे कुणाचीही पर्वा न करणारे आणि स्वतःच्याच तोऱ्यात असणारे मोदी असं समीकरण बनलेलं आहे. पण या प्रकारच्या नेतृत्वाने भारताचे खूप नुकसान झाले आहे. आता वेळ आली आहे वेगळ्या प्रकारच्या नेतृत्वाने पुढे येण्याची – करुणा, नम्रता, लवचिकता आणि धाडस असलेल्या नेतृत्वाने आता पुढे यायला हवं आहे.

श्री. गांधी, मला तुमच्यातल्या करुणेबाबत शंका नाही. तुम्ही कधीही आयुष्यात गरिबीचा सामना केलेला नाही, पण उपेक्षितांची काळजी तुमच्या मनात नेहमी असते यावर माझा विश्वास आहे. मी तुम्हाला अनेकदा दलितांबरोबर जेवताना, विद्यार्थ्यांशी बोलताना, शिक्षकांना धीर देताना आणि शेतकऱ्यांचं म्हणणं प्रामाणिकपणे समजून घेताना बघितलेलं आहे. गरिबातल्या गरिबाला जवळ घेताना तुम्ही कधीही मागेपुढे पाहत नाही हेही मी बघितलं आहे. (आपले पंतप्रधान पूर्णपणे उलट गोष्ट करताना दिसतात. ते नेहमी परदेशी नेतृत्वांना किंवा श्रीमंतातल्या श्रीमंतांना मिठ्या मारताना दिसतात.)

नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना अलिंगन देताना, Credit: Reuters

तुमच्या विचारातल्या लवचिकतेबद्दलही माझ्या मनात कुठलीही शंका नाही. वर्षानुवर्षे तुमच्या विरोधकांकडून तुम्हाला ‘पप्पू’, ‘शेहजादा’, ‘नामदार’, ‘राहुलबाबा’ अशा कितीतरी नावांनी संबोधण्यात आलं. अशी सगळी दूषणं वर्षानुवर्षे ऐकत राहणं आणि तरीही शांत, संयमी राहत स्वतःची विनोद बुद्धी शाबूत राखणं ही सोपी गोष्ट नाही. तुमची प्रतिमा अपरिपक्व, घराणेशाहीचा दावेदार, हौशी आणि अनिच्छुक म्हणून सातत्याने रंगवली गेली. कर्नाटक, छत्तीसगड, राजस्थान आणि प्रबळ मध्यप्रदेशात सत्ता स्थापन करताना तुमचा प्रवास कडक भाषेतील निंदा, तिरस्कार, संशय यांनी बरबटलेला होता. तरीही तो पार करून तुम्ही सत्ता स्थापन केलीत. अपयशी ठरल्यानंतर पुन्हा एकदा तितक्याच ताकदीने उभं राहण्याच्या तुमच्या क्षमतेला पैकीच्या पैकी मार्क!

नम्रतेचा विचार करता, तुमच्या व्यक्तिमत्वातली सहजता, साधेपणा आम्हाला भावतो. कदाचित तुम्ही कधीही सध्याच्या आघाडीच्या नेत्याच्या घणाघाती वक्तृत्वासारखे कौशल्य विकसित करू शकणार नाही, पण ते ठीके. काव्यात्मक शब्दांचे फुलोरे आम्ही चिकार ऐकले आहेत ज्याला काहीही अर्थ नसतो. पुढे पुढे न करता नम्रपणे, सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येकातल्या सर्वोत्तमाचा वापर करून जो काम करू शकेल असा नेता आता आम्हाला हवाय.

निरनिराळ्या संदर्भात तुम्ही अतिशय धैर्याने वागला आहात. उघड उघड देशातल्या सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींची नावं घेण्याचं धाडस भले भले दाखवत नाहीत. पण अनेक प्रसंगात तुम्ही अनेकांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पण हे सगळं मांडत असताना मला हेही आवर्जून म्हणावं लागेल कि आतला आवाज ऐकत अजून धाडसाने काम करण्याची गरज आहे. मी असा एक नागरिक आहे ज्याने या देशाचे बारा पंतप्रधान बघितले आहेत. (अर्थात तुमची आजी आणि मोरारजी देसाई यांच्या कार्यकालात मी खूप लहान होतो हेही मी मान्य करतो.) म्हणूनच मी अनेक भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून बोलतोय. आणि मला असं वाटतं की खरोखरच आपल्या निष्ठांना काही अर्थ आहे का असा प्रश्न पडावा अशी आज परिस्थिती आहे.

२०१९च्या पूर्वसंध्येला चारित्र्य म्हणजे काय, सार्वजनिक जीवनात संवाद आणि नैतिकता राहिली आहे का? ज्यांच्या शब्दकोशात साधनशुचिता हा शब्दच नाही, ज्यांची नैतिक तत्त्वं हवी तशी वाकणारी आणि विवादास्पद आहेत असे राजकीय नेतेच आमच्या नशिबात आहेत का? हे प्रश्न माझ्यासकट अनेकांच्या मनात घोळत आहेत. (ग्रावचो मार्क्स म्हणतो त्याप्रमाणे, “माझी काही तत्त्वं आहेत, पण तुम्हाला ती आवडली नाहीत तर माझ्याकडे दुसरी तत्त्वं आहेत”.)

नरेंद्र मोदींकडून आम्हाला विशेष अपेक्षा नाहीत. पाच वर्ष छाती बडवत मारलेल्या पोकळ बढाया, अंगावर येणारी स्वतःचीच जाहिरात, आणि अत्यंत फसव्या गोष्टींचा आम्हाला कंटाळा आला आहे. आमचा अपेक्षाभंग झाला आहे. पण त्याचबरोबर श्रीयुत गांधी आम्हाला तुमच्याकडून जरा जास्त अपेक्षा आहेत कारण गोपाळकृष्ण गोखले, दादाभाई नौरोजी, मौलाना अबुल कलाम, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारख्या दिग्गजांनी ज्या काँग्रेस पक्षाची धुरा उचलली त्या पक्षाचे तुम्ही ८८वे अध्यक्ष आहात.

नैतिक धैर्य असलेल्या नेत्याची आता आम्हाला नितांत गरज आहे. आपल्या देशाच्या इतिहासातला कठीण काळ सध्या आहे. गोलमाल बोलणे, अपप्रचार, गोष्टी तोडून मोडून सांगणे आणि निखालस खोटेपणाच्या या काळात सत्याचा उतारा हवा आहे.सूर्यप्रकाश हा सगळ्यात चांगला जंतुनाशक असतो. प्रामाणिकपणामुळे अनेक सांधे पुन्हा जोडले जाऊ शकतात. निखळ प्रामाणिकपणा आणि सत्याचा आवाज तुमचा असेल का?

जर या देशाचे नागरिक म्हणून आम्ही तुमच्या पक्षाला आमचे बहुमोल मत देणार असू तर या आमच्या निर्णयाचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. बीजेपीने आमचा प्रचंड अपेक्षाभंग केला आहे पण काँग्रेसचाही कार्यकालही गौरवशाली होता असे नाही. हे सगळंच बदलण्याची संधी तुम्हाला आहे. उदाहरणार्थ, जातीय दंगलींच्या सावल्या त्यांच्या डोक्याभोवती नाचत असतानाही मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कलमनाथ यांची निवड का केलीत हे आम्हाला स्पष्ट करून सांगण्याची संधी तुमच्याकडे आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत! आमच्यापैकी अनेकांसाठी या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आम्ही या गोष्टीचा विचार करतो.

त्याचप्रमाणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांविषयी तुमचे काय धोरण आहे हे ही आम्हाला समजून घ्यायचे आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स अँड छत्तीसगड इलेक्शन वॉचनुसार छत्तीसगडमध्ये अलिकडे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये उभे राहिलेल्या ज्या उमेदवारांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मान्य केली आहे अशा  ७२ उमेदवारांपैकी १८ काँग्रेसचे तर सहा बीजेपीचे आहेत. माणूस त्याच्या संगतीने ओळखला जाते असं म्हणतात, त्याचप्रमाणे संगतही व्यक्तीने ओळखली जाते.

त्यानंतर मुद्दा येतो निवडणूक निधीचा. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचा निवडणूक निधी कारभार (देणगीदारांच्या तपशीलांसकट) स्वच्छ आणि पारदर्शी असावा आणि माहिती अधिकारांच्या अंतर्गत सर्व नागरिकांसाठी खुला असावा यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? खाजगी देणगीदार, विशेष हितसंबंधी गट आणि राजकीय पक्ष यांच्यातल्या दुष्ट हातमिळवणीमुळे लोकशाहीची तोडफोड होत असते हे आपण सगळेच जाणतो.

श्रीयुत गांधी, कृपया लक्षात घ्या, आमची फसवणूक होते आणि आम्हाला गृहीत धरलं जातं. या गोष्टींचा आता आम्हा भारतातल्या नागरिकांना कंटाळा आला आहे. आत्ता राजकीय हुशारीची नव्हे तर सशक्त चारित्र्याची गरज आहे.राजकीय स्वार्थाच्या वेदीवर तत्त्वे बलिदान झालेली पाहून आम्ही थकलो आहोत. त्याचप्रमाणे या देशातील ७० टक्केसाधन संपत्तीवर नियंत्रणठेवणाऱ्या १ टक्के लोकांचे हितसंबंध जपण्यासाठीजनतेचे सामाजिक हित बाजूला सारले जाताना बघूनही आम्ही वैतागलो आहोत.

२०१९ मध्ये काय होईल मला माहित नाही. तुम्ही पंतप्रधान व्हाल की नाही हेही मला ठाऊक नाही. पण काहीही होवो, आत्ता, याक्षणीमात्र काहीही झाले तरी योग्य असेल तेच करण्याचा ध्यास घेतलात तर याच कंटाळलेल्या नागरिकांच्या हृदयात आणि या देशाच्या इतिहासात आपले स्थान निर्माण करण्याची संधी तुम्हाला आहे. हे वाचायला साधं वाटतं पण आमच्या वेदनादायी प्रश्नाची उत्तरं शोधणं खरंच साधंच आहे. सोपं नाही, पण साधं. डग्लस मॅकार्थर यांनी अगदी समर्पकपणे म्हटलंच आहे, “शेवटचं पण तरीही तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमच्या विचारांवर निष्ठा ठेवा. गोष्टी धैर्याने त्यांच्या शेवटापर्यंत न्या. धाडसी माणसांच्या विरोधात जग सतत षडयंत्र रचत असते. हा खूप जुना आणि अविरत चालणारा संघर्ष आहे.एका बाजूला गर्दी डरकाळ्या फोडत असते तर दुसरीकडे असतो आपल्या विवेकाचा आवाज.”

गर्दीला कितीही वेगळा, शांत वाटला तरीही आज आपल्याला विवेकाचा आवाज ऐकणाऱ्या नेत्याची गरज आहे. तोच तोच देखावा पुन्हा पुन्हा उभा करणाऱ्या नरेंद्र मोदींवरून देशाच्या नजारा तुमच्याकडे वळल्या आहेत. सारा देश तुम्ही काय करताय याकडे बारकाईने बघतो आहे. अशावेळी तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचे आहे.

हिम्मत करून म्हणतोय, नेशन वुड लाईक टू नो!

मनःपूर्वक शुभेच्छा!

एक भारतीय नागरिक

रोहित कुमार सायकोमॅट्रिक्स आणि सकारात्मक मानसशास्त्र यांची पार्श्वभूमी असलेले शिक्षणतज्ञ आहेत. माध्यमिक शाळांमधील किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांबरोबर भावनिक बुद्धिमत्ता या विषयात ते काम करतात. त्याच प्रमाणे समवयीन विद्यार्थ्यांमधील दादागिरीला आळा घालण्यासाठी शाळांना मदत करतात.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0