महाराष्ट्रातील घुबडः रात्रीचे शिलेदार…..

महाराष्ट्रातील घुबडः रात्रीचे शिलेदार…..

आंतरराष्ट्रीय घुबड जागरुकता दिवस हा दरवर्षी ४ ऑगस्ट रोजी जगभरात साजरा केला जातो. घुबड या पक्ष्याविषयी जनमानसात जनजागृती व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

भारतीय संस्कृतीमध्ये घुबड या पक्ष्याला लक्ष्मीच्या वाहनाचा सन्मान दिला आहे. पण, या पक्ष्याला अंधश्रद्धेने घेरल्याने घुबड संकटात सापडले आहे. निसर्ग साखळीतील महत्त्वाचा दुवा असलेल्या या पक्ष्याचा अधिवास संपुष्टात येत असून काळ्या जादूमुळे मोठ्या प्रमाणात त्याची तस्करी होत आहे. राज्यात आणि देशात घुबडांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण जाती वास्तव्यास आहेत, मात्र, यातील काही अस्तित्वाची लढाई लढत आहेत. घुबडांनी त्यांच्या रहस्यमय आणि शहाणपणाने आपल्याला पूर्वीपासून मोहीत केले आहे. लोककथा, दंतकथा आणि भौतिक संपत्तीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व नेहमीच लोक समाजात करतात.

विविध आंतरराष्ट्रीय संस्कृतींमध्ये त्यांचे महत्त्व असूनही आपण अनेकदा घुबडांना अनावधनाने इजा करतो. “अमेरिकन बर्ड कॉन्सर्व्हन्सी अँड पार्टनर्स रन फ्लाइट” या संस्थेने असे सूचित केले आहे की जगभरात घुबडांच्या एक तृतीयांश किंवा अधिक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक स्तरावर घुबड जागरूकता दिवस केवळ घुबडांसाठी कृतज्ञता म्हणून साजरा करत नाही, तर या विलक्षण पक्ष्याचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी व्यक्ती, संस्था कसे सामील होऊ शकतात याबद्दल आपल्या समुदायाला शिक्षित करतात.

घुबड हे निशाचार रात्रीच्या वेळी शिकार करणारे शिकारी पक्षी आहेत. त्यांना विशेषत: मोठी डोकी लहान शेपटी असतात. जगभरात घुबडांच्या २०० हून अधिक प्रजाती आढळतात. ‘ब्लॅकिस्टन फिश आउल’ हे जगातील सर्वांत मोठे घुबड मानले जाते. युरोप, आशिया आणि उत्तर आफ्रिकेत ही घुबडे आढळतात. ‘एल्फ आउल’ हे जगातील सर्वांत लहान घुबड मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळते. भारतात घुबडाच्या ३८ प्रजाती तसेच ५९ उपप्रजाती पाहायला मिळतात. यातील ५० टक्के घुबड महाराष्ट्रात आढळतात. भारतात ‘युरेशियन घुबड’ सर्वात मोठे आणि ‘कॉलर घुबड’ सर्वात लहान घुबड आढळते. महाराष्ट्रात विविध अधिवासात  घुबडांची नोंद झाली आहे. अधिवासानुसार घुबडांचे प्रकार बदलतात. केवळ भारतात आढळणारी रक्तलोचन घुबड आणि वन पिंगळा ही दोन्ही प्रदेशनिष्ठ घुबड महाराष्ट्रात सापडतात. पश्चिम घाटात कबरं वन घुबड, मत्स्य घुबड, बहिरी घुबड, तपकिरी वन घुबड, पट्टेरी रान पिंगळा, हुमा घुबड, शिंगळा अशी विविध प्रकारची घुबडे बघायला मिळतात. शहराजवळ मुख्यतः गव्हाणी घुबड, पिंगळा वास्तव्यास असतात. तसेच, माळ घुबड, शिंगळा, तांबूस शिंगळा हे पक्षी स्थलांतरासाठी आपल्याकडे येतात. कोकणात देवराई जंगलात आढळणारा बुबुक घुबड देखील काहीसा दुर्मीळ आहे. घुबडांचे विशेष डोळे असतात. त्यांची दुर्बिणीसारखी दृष्टी असते. घुबड मागे पाहण्यासाठी डोके हलवतात ते २७०च्या कमानीतून डोके फिरवू शकतात. निशाचर असल्याने घुबडाचे डोळे अत्यंत विशिष्ट असतात. ज्यामुळे ते कमीतकमी प्रकाशात स्पष्टपणे पाहू शकतात.  घुबडांच्या उड्डाणाविषयी देखील वैशिष्ट्य आहे. त्यांची ध्वनीविरहित उड्डाण असते. बहुतेक घुबड त्यांच्या विशेष पंखाच्या संरचनेमुळे नीरव उडतात. त्यांच्या प्राथमिक किंवा उड्डाणाच्या पंखांना कंघी धार असते. हे पंख हवा कापताना आवाज दाबते. या पंखांच्या पृष्ठभागावर मलमली रचना असते जी फिरत्या पंखांमुळे निर्माण घेणारा आवाज शोषून घेते. त्यामुळे घुबड उडताना देखील त्यांच्या पंखाचा आवाज येत नाही. जमिनीवर वावरणारे उंदीर आणि इतर लहान प्राण्यांच्या हालचालींचा वेध घेऊन ते अचूक भक्ष्य पकडतात. शेताच्या बांधावर रात्री पहारा देणारी घुबडे शेतकऱ्यांचे मित्रच असतात. घुबडे लहान सस्तन प्राणी खातात. घुबडे स्वत: घरटे बांधत नाहीत. झाडांच्या ढोलीमध्ये, गुहेच्या किंवा उंच कड्यांच्या कपारीत राहतात घरटे करतात.

मानवी वस्तीत वावरणारा गव्हाणी घुबड

हे घुबड पक्षी एकेकटे अथवा जोडीने वावरतात. जुन्या वापरात नसलेल्या इमारती अथवा त्यांचे पडके अवशेष हे त्यांची वस्तीस्थान, मानवी वस्तीपासून याची फारकत करणे अशक्यच. वापरांत नसलेल्या ओसाड इमारती, शहरे, आणि प्राचीन किल्ले व त्यांचे पडके अवशेष या ठिकाणी त्यांची वस्ती असतेच असते. हा पक्षी पूर्णपणे निशाचर आहे. दिवसाचा सर्व काळ ते ताठ उभे राहून एखाद्या काळोख्या ठिकाणी (ढोलीत इ.) डुलक्या घेत असतात. संध्याकाळ झाली की घशातल्या घशात बसक्या आवाजातली किंचाळी देत बाहेर पडतात व गुपचूपपणे, एखाद्या भूतासारखी फेरी मारतात व उंदीर वा तत्सम प्राण्याची शिकार करतात. हे पक्षी मोठ्या प्रमाणात उंदरांची शिकार करतात.

शृंगी घुबड

हे घुबड  दिसायला साधारणत: मासेमार घुबडासारखे दिसते. परंतु हे घुबड हमखास ओळखण्याची खूण म्हणजे त्याचे पिसांनी पूर्ण झाकले गेलेले पाय ही होय. नर-मादी एकसारखेच दिसतात. जंगलमय खडकाळ दऱ्या किंवा सावली असणाऱ्या वनरायांमध्ये हे पक्षी एकेकटे अथवा जोडीने दिसतात. हा पक्षी मुख्यतः निशाचर आहे. तो विपुल झाडी असलेल्या पण खुल्या व पीक घेतल्या जाणाऱ्या प्रदेशांत राहतो; दाट जंगलाचा प्रदेश तो टाळतो. याची आवडती वस्तीस्थाने म्हणजे झुडूपाच्छादित खडकाळ टेकड्या आणि दऱ्या, तसेच नद्यांचे व ओढ्यांचे उतार असलेले काठ, तो दिवसभर एखाद्या झुडूपात किंवा वरील बाजूने पुढे आलेल्या खडकाच्या सावलीत बसून किंवा खेड्याजवळील जुन्यापुराण्या आंब्याच्या किंवा तत्सम एखाद्या झाडाच्या सावलीत बसून काढतो. खोलवरून निघणारा, घुमणारा बू-बो असा, मोठा नसला तरी कानांत घुसणारा त्याचा आवाज असतो. लहानसहान सस्तन प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, कधी कधी मोठ्या आकाराचे कीटक, मासे आणि खेकडे खातात. पूर्ण वाढ झालेल्या एका मोराला, मारल्याची घटना पाहाण्यात आली आहे. शेतातील उंदीर व तत्सम प्राणी यांचा मोठ्या प्रमाणावर नाश करणारा हा पक्षी माणसाचा मदतनीस आहे. सातारा जिल्ह्यातील किरकसाल भागात पक्षीनिरीक्षण करताना या घुबडांची वीणच्या ठिकाणाची मी नोंद घेतली आहे.

अंधश्रद्धेचे दुष्टचक्र

काही राज्यांमध्ये घुबड हे महालक्ष्मी देवीचे वाहन असल्याचे मानले जाते. नवरात्रात, तसेच देवीच्या पूजेच्या वेळी घुबडाची पूजा करण्याचीही परंपरा आहे. मंगळसूत्रामध्येही घुबडांचे पेंडंट घालण्याची प्रथा काही ठिकाणी आहे. पण, महाराष्ट्रासह काही राज्यांत घुबडाला अशुभ पक्षी म्हणतात, त्याच्याशी अनेक आख्यायिकाही जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर्शनही घेण्यास लोक इच्छुक नसतात. काळ्या जादूसाठी घुबडाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. घुबडाच्या विविध अवयवांचा वापर काळ्या जादूसाठी केला जातो. दिवाळीच्या काळात अशा अंधश्रद्धांना ऊत येतो. या काळात अनेकदा घुबडांचा बळी दिला जातो. पट्टेरी पिंगळा, गव्हाणी घुबड, तपकिरी वन घुबड, वनपिंगळा, चट्टेरी वन घुबड, ठिपकेदार वनपिंगळा आदी घुबडांचा यात सर्वाधिक समावेश आहे. घुबडाची पिसे, कान, त्यांचे पंजे, हृदय, रक्त, डोळे, चोच, अंड्यांचे कवच, हाडे ते अगदी त्याच्या डोक्यापर्यंत सगळ्या गोष्टींचा वापर अंधश्रद्धा जोपासणाऱ्या विधींमध्ये केला जातो. वेगवेगळ्या प्रकारच्या घुबडांची तस्करी करणारे मोठे जाळे महाराष्ट्रातही सक्रिय आहे. झाडांच्या ढोलीवर नजर ठेवून लोक रात्रीच्या वेळी घुबडांची पिल्ले पळवतात. आत्तापर्यंत घुबडांची चोरी होती, हेदेखील अनेकांना माहिती नव्हते. अभ्यासकांनी ही माहिती पुढे आणली. आतंरराष्ट्रीय स्तरावरही घुबडांच्या तस्करांचे जाळे पसरलेले आहे.  वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार हा गुन्हा असून घुबडांचे संरक्षण व्हावे यासाठी गतवर्षी ४ ऑगस्ट २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय घुबड जनजागृती दिनानिमित्त भारतातील घुबडांची माहिती देणारे पोस्टर नुकतेच ट्रॅफिक आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया या संस्थांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आले. परिसंस्थेत संतुलन राखण्यात घुबडाचा महत्त्वाचा वाटा आहे. घुबड हे उंदरांवर नियंत्रण ठेवते. तरीही हा पक्षी अंधश्रद्धा, तिरस्कार, गैरसमज याचा बळी ठरतो. या पक्ष्याबाबत योग्य माहिती समाजात दिली तर याला आळा बसेल.

अधिवास धोक्यात

घुबडांच्या अनेक प्रजातींचा अधिवास आज धोक्यात आलेला आहे. वेगाने नष्ट होत असलेली माळराने, गवताळ प्रदेश, गावालगतच्या रिकाम्या जागांवर मानवी अतिक्रमण वाढत आहे. गावाच्या वेशीवर ढोली असलेली मोठ्या झाडांची कत्तल होत आहे, त्यामुळे घुबडांचा अधिवास धोक्यात आला आहे. शहरातील खाद्याची उपलब्धता कमी झाल्याने काही प्रकारच्या घुबडांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. घुबडाच्या व त्याच्या अधिवासाच्या  संरक्षणासाठी महत्वाची पाऊले उचलणे गरजेचे बनले आहे.

चिन्मय प्रकाश सावंत जैवविविधता अभ्यासक आहेत.

पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास खालील फॉर्म भरा.

फोटो सौजन्य: सुभद्रा देवी

COMMENTS