पाचोळा : सामान्य माणसाची शोकात्मिका

पाचोळा : सामान्य माणसाची शोकात्मिका

काही वर्षांपूर्वी मराठी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक व चरित्रकार गो. मा. पवार यांनी ‘पाचोळा’ या कादंबरीचे विस्तृत समीक्षण केले होते. ते समीक्षण ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी देत आहोत.

भौतिकशास्त्र नोबेलः हवामान बदलातील व्यामिश्रतेचा शोध
‘माध्यान्ह भोजन’ कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन १ हजार
बिहारमध्ये सीबीआयचे तपास संशयास्पदच!

आज आपण कोणत्याही ग्रामीण कादंबरीचा विचार करताना तिच्या ‘ग्रामीणत्वा’कडे खास लक्ष पुरवीत नाही. एके काळी ग्रामीण जीवनाबद्दल नागर वाचकांचे असणारे कुतूहल पूर्ण करण्यासाठी ग्रामीण कथात्मक वाङ्मय लिहिले जात होते. ग्रामीण जीवनाचे उदात्तीकरण बोधाच्या हेतूने केले जात होते. ग्रामीण जीवनातील परंपराप्रेम, विविध निष्ठा, वंशपरंपरागत वैरे, निरागसपणा, रंगेलपणा, रगेलपणा इत्यादी गोष्टींची चित्रे रंजनाच्या हेतूने काढली जात होती. सुदैवाने आजचा वाचक- निदान चोखंदळ वाचक तरी ग्रामीण कथात्मक वाङ्मयातील ग्रामीणत्वाकडे एक अपरिहार्य सहचारी विशेष एवढ्याच दृष्टीने पाहतो. ग्रामीण लेखक कोणता जीवनानुभव अर्थपूर्णपणे कलात्मक पातळीवर चित्रित करतो हे पाहण्याची दृष्टी आज प्राधान्याने आढळते.

प्रा. रा. रं. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या आटोपशीर कादंबरीला एका चांगल्या शोकात्मिकेचा आकार प्राप्त झालेला आहे. एका ग्रामीण परिसरात घढणाऱ्या कथेचे चित्र येथे येते. या ग्रामीण जीवनात भव्यतेला, पराक्रमाला, ऐश्वर्याला अवसर नाही. इथले जीवन लौकिक दृष्टीने तरी खुजे आहे. माणसे मर्यादित ताकदीची. त्यांच्या इच्छा-आकांक्षा अल्पशा हेवेदावे क्षुद्र, स्पर्धा संकुचित क्षेत्रातील; परंतु इथले जीवन अखेर मानवी जीवन आहे. सनातन अशा प्रेम, वात्सल्य, अहंकार इ. मानवी भावनांचा आविष्कार जसा इथे होतो तसाच मानवी जीवनातील शोकात्म जीवनकलहाचाही होतो. ग्रामीण जीवन जगणाऱ्या सामान्य व्यक्तीचे चित्रण बोराडे यांनी या कादंबरीत केले आहे खरे, परंतु हे करीत असताना मूलभूत स्वरूपाच्या मानवी जीवनातील समस्येचे (human situation चे) आकलन त्यांनी कलात्मक पातळीवर नेले आहे व आपल्या कथेला शोकात्मिकेचा घाट प्राप्त करून दिला आहे. म्हणून प्रस्तुत कादंबरीचा विचार करताना तीमधून कोणता शोकात्म जीवनानुभव कलात्मकपणे प्रकट होतो याचा शोध घेणे अगत्याचे ठरते.

या कादंबरीत जी शोकात्मिका चित्रित होते ती कोणा अलौकिक पराक्रमी वीराची नाही. ही शोकात्मिका लौकिकदृष्ट्या तरी सामान्य असणाऱ्या एका व्यक्तीची – एका कुटुंबाची आहे. सामान्याची शोकात्मिका असल्याने तिची कलात्मक परिणामकारकता जशी कमी होत नाही तशीच तिची विश्वात्मकताही कमी होत नाही. ही शोकात्मिका एकट्या गंगारामची- भानाच्या बापाची नाही.

वेगाने विनाशाकडे जाणारा गंगाराम आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबाचीही दुर्दशा करतो. ही एका कुटुंबाची दुःखकथा आहे.

या शोकात्मिकेची वीण साधली गेली आहे ती मुख्यतः गंगाराम शिंपी व गरह यांच्या विरोधात्म ताणाचे चित्रण करून यात आणखी एक विरोधात्म ताण निर्माण होतो तो गंगाराम व त्याचा मुलगा माना यांमध्ये व्यावसायिक क्षेत्रात गंगाराम व गरड यांच्यामध्ये, तर कुटुंबात गंगाराम व माना यांमध्ये असा ताण निर्माण होतो. या ताणाचे चित्रण प्रत्ययकारी आणि अर्थपूर्ण बनते ते भानाच्या आईच्या निवेदनामुळे.

रा. रं . बोराडे

रा. रं . बोराडे

भानाची आई ही आपले दारिद्र्य, आपल्या मर्यादा यांची जाणीव असलेली, त्यांचा स्वीकार केलेली अशी दाखविली आहे. जे चाललं होतं त्यात ‘बरं चाल्लं व्हतं. कुनाचं एक नव्हतं का दोन न्हवतं म्हणून समाधान मानणारी. कुणाचा झगडा ओढवून घ्यायची कल्पनाही तिला सहन होत नव्हती. निदान गरडासारख्या दुष्ट, खडूस आणि ताकदवान माणसाचा. ‘गावातल्या भल्या भल्या लोकांना त्येनं हात दावलाया. आपुन तर काय, निव्वळ पाचुळ्यावनी.’ आपले ‘पाचोळापण’ मान्य करून परिस्थितीशी मिळते-जुळते घ्यावे, बलिष्ठांशी लवून नमून बागावे अशी तिची वृत्ती. अशी अतिसामान्य असणारी भानाची आई. तीच निवेदन करीत असल्यामुळे एरवी सामान्य असलेल्या गंगाराममधील वेगळेपणाचा प्रत्यय येऊ शकतो व या जीवनचरित्राला अर्थपूर्णता प्राप्त होऊ शकते.

भानाचा बाप एक सामान्य शिंपी आहे. ‘फेसन’ माहीत नसलेला, मोठाढ काम करणारा. घरची गरिबी असूनही कुणाचे एवढे कापड राहिले तर ते परत करण्याचा प्रामाणिकपणा त्याच्या ठिकाणी आहे. बायको रोजगार करून संसारास मदत करणारी या अकुशल, दरिद्री, सामान्य माणसाला स्वाभिमान मात्र आहे. गंगाराम त्याच्या बायकोप्रमाणे आपले पाचोळापण मान्य करीत नाही. पड खायची त्याची तयारी नसते. गरड ही गावातील बलाढ्य, आपमतलबी, निर्दय असामी. आपले दुबळेपण लक्षात न घेता गरडासारख्या प्रचंड उद्दाम ताकतीशी तो झुंज घेतो. वाटेल ते पणाला लावतो. एका प्रचंड शक्तीबरोबर एका दुबळ्याचा हा असमान लढा आहे. त्यात त्याची, त्याच्या कुटुंबाची वाताहात होते, याचे शोकात्म चित्रण बोराडे यांनी रेखाटले आहे.

हे चित्रण करताना गंगारामला कादंबरीकाराने नायक म्हणून दाखविले नाही, की सामान्यातील असामान्यपण डोळ्यांत भरावे अशा रीतीनेही त्याचे चित्रण केलेले नाही. शोकात्मिकेचे रूप देण्यासाठी नायकाचा उत्तुंगपणा, त्याची एकांतिक मूल्यनिष्ठा, त्याची उदात्तता यांचेही चित्रण केले नाही. एकाकीपणे गंगाराम त्याच्या गुणवैशिष्ट्यांनी डोळ्यांत भरावा असा कोठेच प्रयत्न नाही. म्हणूनच ही कथा जीवनाचे स्वाभाविक, सहज रूप धारण करते. ती एकटया गंगारामची कथा न राहता एका कुटुंबाची कथा असते.

‘दंड घाला धोतराला म्हणून गरडाचा पोरगां गंगारामच्या पुढे ‘मिसनी’ वर धोतर फेकतो. या घटनेपासून गंगाराम व गरड यांच्या संघर्षाला प्रारंभ होतो. या दोघांमधील संघर्षाचे चित्र लेखकाने वैशिष्ट्यपूर्ण रीतीने केले आहे. गरडाचे प्रत्यक्ष चित्रण कादंबरीत कोठेच येत नाही. त्याची जाणीव होते ती त्याचा उर्मट मुलगा व कुचाळखोर मिसनवाला या प्रतिनिधींच्या द्वारा आणि त्याच्या निर्बय कृतीद्वारा गरडाचे अस्तित्व कादंबरीभर आपल्याला जाणवत राहते, परंतु ते अप्रत्यक्षपणे. म्हणून गरडाला अदृश्य, निर्घृण व शक्तिमान अशा नियतीचे रूप आपोआप प्राप्त होते. आपल्याला प्रत्यक्ष दिसतो तो ईर्ष्या बाळगणारा, झटके घेणारा, तडफडणारा गंगाराम. त्याची दुबळीक आपल्याला जाणवत राहते व त्यामुळेच या जीवनचरित्राला एक प्रकारची अर्थपूर्णता प्राप्त होते. या पहिल्या घटनेपासूनच कथानकाला जी गतिमानता प्राप्त होते ती गंगारामच्या अंतापर्यंत टिकून राहते. गंगाराम जे जे करायला प्रवृत्त होतो त्यांतून अन्य तणाव निर्माण होतात. तो कुठेच तडजोड करायला तयार नसत. गरड ‘मिसन’ आणणार हे कळल्यावर भानाची आई हादरते. गरडाकडे जाऊन मिळते घ्यावे असे ती गंगारामला सुचविते. आपले काही चुकलेच नाही तर त्याच्याकडे जायचे कशाला, असे म्हणून तो तडजोड नाकारतो. मिसनवाला गावात येतो. ‘चोळी पेशालिस्ट, चोळी भाद्दर’ म्हणून तो गंगारामची खोड काढतो. गंगाराम त्याच्याशी भांडण करतो. ‘एक तो तरी गावात राहील नाही तर मी तरी’ असे ठरवतो. नव्या मिसनवाल्याशी मुकाबला करण्यासाठी, भानाला शिवणकाम शिकविण्यासाठी लातूरला पाठविण्याचा निश्चय करतो. शाळेत पहिला नंबर असणारा, शिकण्याची आवड असलेला भाना बापाच्या निर्णयाने दुखावतो. शिवणकाम शिकण्याची त्याची इच्छा नसते. आईच्या रदबदलीमुळे तो जातो. मात्र आता भाना बदलतो. गंगाराम आणि भाना यांच्यामधील विरोधाचा दुसरा ताण निर्माण होतो व जीवनचरित्र अधिक गुंतागुंतीचे बनत जाते.

हा दुसरा ताण निर्माण करताना भानाचे व्यक्तिचित्रण लेखकाने शोकात्मिकेचा प्रत्यय येईल व मानवी मनातील गुंतागुंत प्रत्ययाला येईल अशा तऱ्हेने केले आहे. भाना चौदा-पंधरा वर्षांचा पौगंडावस्थेतील मुलगा दाखविला आहे. तो आईशी लिप्त आहे. तिचे ऐकतो, तिला मानतो. म्हणून पुढच्या घटना शक्य होतात. त्याच्या पौगंडावस्थेमुळेच तो जेव्हा बापाकडून दुखावला जातो. तेव्हा त्याच्या विरोधाला एक प्रकारचा थंड कणखरपणा येतो. लातूरचा मिसनवाला जेव्हा त्याला आईवरून शिवी देतो तेव्हा तो दुखावतो, रागावतो व परत येतो. गंगाराम मात्र उलट भानालाच रागावतो. आईच्या सांगण्यामुळे तो लातूरला जातो खरा, परंतु तो तिथे राहत नाही. गंगारामला बातमी कळते की त्याला गरडाच्या मुलाची संगत लागली आहे. प्रत्यक्ष शत्रूच्या मुलाशी आपल्या मुलाने मैत्री करावी हा गंगारामवर फार कठोर प्रहार होतो. त्याच्या मनात मुलाबद्दल विरोधाची भावना निर्माण होते. त्या दोघांमधील विरोध तीव्रतर होतो. गंगाराम व गरड यांच्यामधील विरोधाला त्याच्याशी समांतर व काही प्रमाणात समरूप असणाऱ्या या नव्या विरोधात्मक ताणाची जोड मिळते.

आता आपला मुलगा आपल्याला मेला असे समजून गंगाराम एकाकीपणे गरडाशी झुंज देण्याची तयारी करतो. भाना घरी परत येतो खरा, परंतु त्याची दखल घेण्याची गंगारामची तयारी नसते. त्या दोघांमध्ये एक प्रकारचे शत्रुत्व निर्माण झालेले असते.

मिसनवाल्याला गावातून उडवायचे असा निश्चय करून गंगाराम स्वतःच शिवणकाम शिकण्यासाठी लातूरला जातो. गरडाकडून त्याचा पाठलाग चालूच असतो. लातूरचा मिसनवाला- गरडाच्या मिसनवाल्याचा मित्र – त्याचे पैसे बुडवितो म्हणून गंगाराम त्याच्याशी मारामारी करतो. पोलीस त्याला पकडून नेतात. भानाची आई गंगारामला गावाकडे घेऊन येते, परंतु तो गावाकडे परततो तो आपली मिसन लातूरला घेऊन जाण्याच्या इराद्याने गावी येऊन दुकानात पाहतो. मिसनीचे ‘डोके’ चोरीला गेलेले असते. हा त्याच्यावर आणखी एक आघात. हा गरडाचा प्रताप आहे हे स्पष्ट दिसत असूनही पुराव्याच्या अभावी तो गरडावर फिर्याद करू शकत नाही. त्याच्या जिवाची तडफड चाललेली असते. बायकोने सुचविल्याप्रमाणे दुसरा धंदा करण्याची त्याची तयारी नसते. गरडाशी झुंज घेण्याची त्याची जिद्द कमी होत नाही. ‘या गरडानं लई वाटोळं केलं माजं, पर म्या बी आसा म्हागं न्हाई हटायचा. एका सालात म्या नाही नवी मिसन आनली तर तोंड नाई दावायचा.’ गरडाचे नाव सोडायची त्याची तयारी नसते. ‘आता कसा सुटंल ग गरड? लई खोल रुतून बसलाया. म्या मरंन तवाच सुटंल आता गरड’ तो लातूरला जातो तो नवी मिसन घेण्याला पैसे मिळविण्यासाठी. रात्रंदिवस काम करतो. चुरमुन्यावर दिवस काढतो, प्रकृतीची आबाळ करतो. अखेर घरी परततो तो आजारी पडून खंगलेल्या अवस्थेत.

अंथरुणाशी खिळलेल्या गंगाराममध्ये आता गरडाशी झुंज घेण्याची ताकद उरलेली नसते. एक प्रकारे गरडाच्या झुंजीत तो पराभूत झालेला असतो. आता आपण जगणार नाही असे तो वारंवार उद्गारतो. खरे म्हणजे त्याला जगण्याची आशा उरलेली नव्हती असे म्हणण्यापेक्षा त्याची जीवनावरची आसक्तीच नष्ट झालेली असते. पराभूतपणे त्याला जगायचे नसते, असेच जाणवत राहते, तो राग लपवून ठरतो. औषध घेतो की नाही हेही कळत नाही.

गरडाशी त्याची चाललेली झुंज संपल्यासारखी दिसत असली तरी खरे म्हणजे संपलेली नसते. भानाशी त्याने वैर धरलेले आहेच. तो मानामध्ये गरडाला पाहतो. भाना घरात असलेलाही त्याला खपत नाही. कोळ्याचा जयराम आपल्या मुलीच्या संबंधात भानाबद्दल तक्रार घेऊन येतो. ‘घरात स्वायला अन्न नाही आन् तुला असले धंदे सुचायलेत का?’ असे जेव्हा गंगाराम मानाला डाफरतो तेव्हा तो उलट उत्तर देऊन आईच्या गरोदरपणाचा उल्लेख करतो. गंगारामचा सारा कोंडलेला क्षोभ उसळतो आणि आपल्या दुबळ्या शरीरातली सारी शक्ती एकवटून तो भानाला लाथा-बुक्क्यांनी मारतो. त्याच्या रोगी शरीराला आणि स्वचलेल्या मनाला हे सहन होत नाही. सकाळी भानाची आई जेव्हा पाहते तेव्हा रक्त ओकून गतप्राण झालेला गंगाराम तिला दिसतो. त्याची झुंज संपलेली असते.

मूल्यहीन परंतु बलाढ्य अशा शक्तीशी लढणाऱ्या दुबळ्याचा विनाश हा अपरिहार्यपणे असाच होणार, अशी शोकात्म जाणीव या कादंबरीतून प्रत्ययाला येते. दुबळ्या माणसाने स्वतःला काही स्वत्व आहे, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे असे समजू नये. माणसाचे माणूस म्हणून काही सारखे मूल्य आहे असे सामान्याने, दुबळ्याने समजू नये. बलाढ्यासमोर तरी त्याने आपल्याला काही स्वतंत्र अस्तित्व आहे असे दाखवू नये. स्वाभिमानाची जपणूक करणे ही चैन सामान्याला परवडण्याजोगी नव्हे. बलाढ्यासमोर त्याने आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा लोप करून टाकला पाहिजे, नाहीतर त्याच्या आयुष्याची परवड झाल्यावाचून राहत नाही, या प्रकारची शोकात्म अशी जाणीव ही कथा आपल्याला देते. या जाणिवेमुळे एक प्रकारची विश्वात्मकता तिला प्राप्त होते. सामान्याची शोकात्मिका कलात्मकपणे प्रत्ययाला आणून देण्याचे सामर्थ्य या कादंबरीमध्ये आहे.

हा शोकात्म प्रत्यय देण्यासाठी म्हणून गंगारामला लेखकाने हीरो म्हणून चित्रित केले नाही, की छोटा हीरो बनविले नाही. गंगाराम हा सामान्य माणूस आहे. तो सामान्य माणसाच्या गुंतागुंतीसह, त्याच्या वैगुण्यांसह चित्रित केला गेला आहे. या सामान्य माणसाच्या ठिकाणी वेगळेपणा एवढाच, की त्याला स्वाभिमान आहे. लोकांनी आपल्याला कसे वागवावे याबद्दलच्या त्याच्या अपेक्षा आहेत. त्याच्या स्वाभिमानामुळे अपमान झाल्याच्या जाणिवेतून तो ईर्ष्याला पेटतो.

या ईष्येने तो आंधळा होतो, स्वार्थी होतो. आपल्या हिताचा, आपल्या मुलाच्या भवितव्याचा, बायकोच्या भावनेचा विचार कमालीच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे तो करू शकत नाही. नैराश्याने तो आत्मक्लेश करून घेतो. आत्मक्लेशाचे रूपांतर परक्लेशांतही होते. तो कुटुंबाचा छळ करतो, नेणत्या मुलीला निर्दयपणे मारतो, मुलाकडे मुलगा म्हणून पाहत नाही, एवढे त्याचे वृत्त्यंतर होते.

ग्रामीण जीवनातील तपशिलाचे खास असे चित्रण करण्याचा सोस बोराडे यांनी दाखविला नाही. तेथील निसर्गाचे वगैरे चित्रण त्यांनी केले नाही. हे करणे त्यांच्या दृष्टीने अप्रस्तुत होते. गंगारामची व त्याच्या कुटुंबाची कथा चित्रित करण्यावरच त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले. माळ्याची सरू, यसवंत, आडत्या ही पात्रे डोकावून जातात ती गरड, गंगाराम वा भाना यांच्याबद्दल माहिती देण्यापुरतीच. गंगाराम, भाना व भानाची आई यांच्या मनातील तणावांचे चित्र रेखाटूनच त्यांनी आपली कथा साकार केली आहे. त्यामुळे कथेला बांधेसूद आकार आलेला आहे.

कथेचे निवेदन लेखकाने कथेतील एका पात्राच्या – भानाच्या आईच्या तोंडून केलेले आहे. संपूर्ण निवेदन ग्रामीण भाषेत तर आहेच, परंतु एका स्त्रीमनाने केलेले हे निवेदन आहे. या निवेदनाला ग्रामीण स्त्रीमनाची वैशिष्ट्ये सहजपणे प्राप्त होतात हे महत्त्वाचे नाही, तर कथेत समाविष्ट असणारी ही व्यक्ती एका विशिष्ट दृष्टीने व वृत्तीची असल्यामुळे जीवनाचा शोकात्म अनुभव प्रकट करण्याच्या दृष्टीनेही तिचे निवेदन अर्थपूर्ण ठरते. भानाची आई ही स्वतःचे व्यक्तित्व जिने विलोपून टाकले आहे, आपले ‘पाचोळा’ पण जिने सहजपणे मान्य केले आहे अशी अतिसामान्य बाई आहे. ती आपल्या दृष्टीतून आणि वृत्तीतून गंगारामकडे पाहते व निवेदन करते. म्हणून एरवी सामान्य असलेल्या गंगाराममधील वेगळेपणाचा ठळक असा प्रत्यय येऊ शकतो. ती आपल्या नवऱ्याशी व मुलाशी भावनेने बद्ध आहे. तिचे सुख, भविष्य त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणून गंगाराम व गरड, गंगाराम व भाना यांच्यामधील ताणांचे चित्र बारकाईने येऊ शकते.

मराठी ग्रामीण कादंबरीने आता ग्रामीणतेची कक्षा ओलांडली आहे. चित्रण करण्याच्या दृष्टीने अवघड असलेले अर्थपूर्ण जीवनानुभव कलात्मकपणे प्रकट करण्याचे सामर्थ्य आता तिच्या ठिकाणी आलेले आहे, याचीच साक्ष प्रा. बोराडे यांच्या ‘पाचोळा’ या कादंबरीतून पटते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0