गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा; भारताचा विरोध

गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा; भारताचा विरोध

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम गेल्या वर्षी वगळल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात

अदानी कंपन्या कर्जाच्या सापळ्यात अडकण्याचा धोका?
पल्लेदार वाक्ये व पोकळ घोषणा , काँग्रेसची टीका
कोडींगः वाढलेले फॅड व पालकांची दिशाभूल

नवी दिल्लीः जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील ३७० कलम गेल्या वर्षी वगळल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान या प्रांतांना तात्पुरता दर्जा दिला आहे. रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गिलगिट-बाल्टिस्तानच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित भाषणात या दोन प्रदेशांना तात्पुरता प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली. गेली अनेक वर्षे या प्रदेशातील जनतेची ही मागणी होती. तरुणांनाही हेच हवे होते. या प्रदेशाला विकासासाठी आर्थिक पॅकेज देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

दरम्यान, पाकिस्तानच्या या कृतीवर रविवारी भारताने तीव्र निषेध नोंदवत गिलगिट-बाल्टिस्तान या भारताच्या प्रदेशांवर पाकिस्तानने अवैधरित्या कब्जा केला असून तो प्रयत्न लपवण्यासाठी पाकिस्तानने या प्रदेशांना तात्पुरता प्रांताचा दर्जा दिल्याचा आरोप केला आहे.

भारताचे गिलगिट-बाल्टीस्तान प्रदेश पाकिस्तानने अवैधरित्या बळकावले असून, त्यांना तात्पुरता प्रांताचा दर्जा देण्याचा त्यांचा हेतू हा भारताच्या भौगोलिक नकाशातील बदल करण्याचा प्रयत्न आहे, या प्रयत्नांनाच आमचा ठाम विरोध आहे, अशी प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी दिली.

भारताचे जम्मू व काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान हे सर्व प्रदेश कायदेशीर भाग असून १९४७मध्ये भारतीय संघराज्यात जम्मू व काश्मीरचे सामीलीकरण झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशाला कायद्याच्या चौकटीत कोणताही आधार नाही. ते प्रदेश भारताचे आहेत, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानने अवैधरित्या हे प्रदेश ताब्यात घेतले असून त्यांना कायदेशीर करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेतच पण त्या आडून त्या प्रदेशात मानवाधिकार उल्लंघनही केले जात आहे. गेली सात दशके पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशातील नागरिकांचे शोषण केले असून त्यांना स्वातंत्र्यापासून वंचितही ठेवले गेले आहे. पाकिस्तानने या प्रदेशांना अवैधरित्या ताब्यात ठेवण्यापेक्षा ते भारताकडे त्वरित द्यावे, अशीही मागणी भारताने केली आहे.

इम्रानची मोदींवर टीका

आपल्या भाषणात इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. भारतातील मोदी सरकार हिंदुत्वावर विश्वास ठेवत असून या विचारधारेच्या आधारावर ते काश्मीरमधील निर्दोष जनतेचा छळ करत आहेत, असा त्यांनी आरोप केला. पाकिस्तानच्या प्रगती व समृद्धीसाठी मजबूत कायदा-सुव्यवस्थेची गरज असून पाकिस्तानचे लष्कर व न्यायव्यवस्था यांना लक्ष्य केले जात आहे. हे लक्ष्य करणारे मोदींची भाषा बोलत असल्याचा आरोप इम्रान खान यांनी विरोधकांवर केला.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोषणा?

येत्या १५ नोव्हेंबरला गिलगिट-बाल्टिस्तान येथे निवडणुका होत असून त्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूष करण्यासाठी इम्रान खान यांनी घोषणा केल्याचा आरोप पाकिस्तानातील विरोधकांनी केला आहे. असा प्रांताचा दर्जा दिल्याने तेथील जनतेला काय मिळणार आहे, याबद्दल इम्रान खान काही बोलले नाही, याकडे विरोधकांनी लक्ष वेधले.

गिलगिट-बाल्टिस्तान या प्रदेशात सुमारे १५ लाख लोकसंख्या असून हा प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेला भाग म्हणून ओळखला जातो. पण या प्रदेशाला पाकिस्तान, चीन, भारत आणि तजाकिस्तान यांच्या सीमा लागून आहेत.

मूळ बातमी  

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: