पाकिस्तानमुळे भारतीय विमानकंपन्यांना ५४९ कोटींचा तोटा

पाकिस्तानमुळे भारतीय विमानकंपन्यांना ५४९ कोटींचा तोटा

एकट्या एअर इंडियाचाच तोटा ४९१ कोटी रुपयांचा!

एअर इंडियाची थकबाकी चुकवावी; केंद्राचे आदेश
एअर इंडिया, भारत पेट्रोलियमची विक्री : सीतारामन
केरळमध्ये विमान रनवेवरून दरीत कोसळले;१६ ठार

पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हद्दीतून जाण्यास बंदी घातल्यामुळे भारतीय विमानकंपन्यांना ५४८.९३ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ३ जुलै रोजी राज्यसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात हे सांगितले आहे.

२७ फेब्रुवारी २०१९ पासून पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द भारताकरिता बंद करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचा किती तोटा होत आहे असा प्रश्न शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विचारला होता. राजनैतिक मार्गांनी या समस्येवर तोडगा काढण्याचा भारत सरकारचा विचार आहे का याबाबत त्यांना उत्तर हवे होते.

२६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. तेव्हापासून त्यांनी ११ हवाई मार्गांमधील केवळ दोन मार्ग पुन्हा खुले केले आहेत, जे दोन्ही मार्ग दक्षिण पाकिस्तानमधून जातात. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार त्यापैकी एक मार्ग अरबी समुद्रावरून कराची, हिंगोल, ग्वादार मार्गे पश्चिमेगामी मार्ग आहे तर दुसरा कराची, बादिन मार्गे गुजरातमधील अहमदाबादकडे जाणारा पूर्वगामी मार्ग आहे. बाकी मार्ग बंद असल्यामुळे उत्तर भारतातून पश्चिमेकडे जाणाऱ्या विमानांना सर्वाधिक फटका बसला आहे.

हवाई हल्ला आणि त्यानंतर २७ फेब्रुवारीला दोन्ही देशांमधील हवाई चकमकीनंतर दोन देशांमधील तणाव वाढत गेल्यानंतर भारतानेही आपली हवाई हद्द बंद केली होती. मात्र ३१ मे रोजी भारतीय हवाई दलाने सर्व तात्पुरती बंधने मागे घेतल्याची घोषणा केली होती. मात्र जोपर्यंत पाकिस्तान त्याला प्रतिसाद देऊन त्यांची हवाई हद्द पूर्णपणे खुली करत नाही तोपर्यंत भारतीय व्यावसायिक विमान कंपन्यांना त्याचा काही फायदा होणार नाही.

पुरी यांनी दिलेले भारताच्या विमानकंपन्यांना झालेल्या तोट्याचे आकडे असे आहेत:

विमान कंपनी तोटा (कोटी रुपयांमध्ये)
एअर इंडिया (२ जुलै, २०१९ पर्यंत) ४९१
इंडिगो (३१ मे, २०१९ पर्यंत) २५.१
स्पाईसजेट (२० जून, २०१९ पर्यंत) ३०.७३
गो एअर (२० जून, २०१९ पर्यंत) २.१

पाकिस्तानने आपली हवाई हद्द पुन्हा खुली करणे हा त्यांचा निर्णय असणार आहे आणि त्यांनी घातलेली ही बंदी हा एकतर्फी निर्णय आहे असे पुरी म्हणाले.

पाकिस्तानच्या या कृतीमुळे भारतातील देशांतर्गत प्रवासी वाहतूक बाजारपेठेतील सर्वात मोठी कंपनी इंडिगोला त्यांच्या दिल्ली ते इस्तंबूल या थेट फ्लाईट सुरू करणे शक्य झालेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये बिश्केक येथे गेले तेव्हा त्यांच्या फ्लाईटला बंद असलेल्या पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाऊ द्यावे अशी विनंती भारताने पाकिस्तानला केली होती. पाकिस्तानने ते मान्यही केले होते – मात्र मोदी यांनी नंतर ओमान आणि इराणमार्गे जाणाऱ्या अन्य मार्गाची निवड केली.

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार पाकिस्तानलाही त्यांच्या या बंदीमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. त्यांच्या हवाई हद्दीच्या वापरासाठी या रोजच्या जवळजवळ ४०० फ्लाईटकडून त्यांना जे शुल्क मिळाले असते ते त्यांनी गमावले आहे.

(पीटीआयकडून मिळालेल्या माहितीवरून)

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0