इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी

इम्रान खान सरकारवर अविश्वासाचा ठराव; पक्षात बंडखोरी

पाकिस्तानमधील इम्रान खान सरकार संकटात सापडले असून इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षातील २४ संसद सदस्यांनी सरकारच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करणार असल्याची धमकी दिली आहे.

गेल्या ८ मार्चला देशातील बिघडत चाललेली आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई व पेट्रोलियम पदार्थाच्या वाढत्या किंमतीवरून प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) व पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) १००हून संसद सदस्यांनी सत्तारुढ इम्रान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. आता येत्या २१ मार्च रोजी या अविश्वासाच्या ठरावावर चर्चा सुरू होऊन २८ मार्चला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील २४ सदस्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. या सदस्यांनी इम्रान खान यांना देशासमोरचे प्रश्न मिटवता आले नसल्याचे आरोप केला आहे. राजा रियाज या एका संसद सदस्याने देशातील वाढती महागाई इम्रान खान यांना आटोक्यात आणता आली नाही, असा आरोप केला आहे. तर नूर आलम खान यांनी देशापुढचे अनेक प्रश्न सरकारला सोडवण्यात अपयश आल्याचे म्हटले आहे. आम्ही गॅस टंचाई बाबत प्रश्न संसदेत उपस्थित केले पण सरकारकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे नूर आलम खान यांचे म्हणणे आहे. माझ्याच मतदारसंघात मला जनतेकडून विरोध झेलावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान बंडखोर व असंतुष्ट सदस्यांचा गट इस्लामाबाद येथील सिंध हाऊस येथे वास्तव्यास आल्याची माहिती आहे. सिंध हाऊस हे सिंध सरकारच्या मालकीचे असून ते पाकिस्तान पीपल्स पार्टीकडून चालवले जात आहे. आमच्या येथे जीवाच्या भीतीने हे असंतुष्ट संसद सदस्य राहायला आल्याची माहिती सईद गिलानी या सिंधच्या प्रांतिक मंत्र्याने दिली. तर सत्तारुढ पीटीआय सरकारने आपले संसद सदस्य पीपीपीने मोठ्या प्रमाणात लाच देऊन पळवून नेल्याचा आरोप केला आहे.

गुरुवारी या राजकीय संकटावर मात करण्यासाठी इम्रान खान यांनी तातडीने मंत्रिमंडळ बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सिंध सरकारवर राज्यपाल राजवट लागू करावी अशी पाकिस्तानच्या अंतर्गत मंत्र्यांना केली. नॅशनल असेब्लीमधले खासदार विकत घेण्याचा सिंध सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी तेथील प्रांतिक सरकार बरखास्त केले पाहिजे, असे इम्रान खान यांचे म्हणणे आहे.

इम्नान खान यांनी संभाव्य घटनात्मक पेच उद्बवतील या शंकेवरून कायदेतज्ज्ञांचीही मदत घेण्यास सुरूवात केली आहे. त्याच बरोबर त्यांनी येत्या २७ मार्चला आपल्या पक्षाची सभाही घेण्याची घोषणा केली आहे. या सभेला देशभरातून हजारो कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा आहे. तर या सभेला विरोध म्हणून विरोधकांनी २५ मार्चला आपल्या समर्थकांची सभा बोलावली आहे.

दरम्यान देशातील राजकीय संकट पाहता पाकिस्तानचे लष्कर काय भूमिका घेते यावर सर्वांची नजर लागून राहिली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्याने आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत पण तटस्थता बाळगली जात असल्याची प्रतिक्रिया दिली.

मूळ बातमी

 

 

COMMENTS