कोरोनाने ३ कोटीहून अधिक लोकसंख्या मध्यमवर्गाबाहेर

कोरोनाने ३ कोटीहून अधिक लोकसंख्या मध्यमवर्गाबाहेर

नवी दिल्लीः कोविड-१९च्या महासाथीच्या तडाख्यात भारतातील सुमारे ३ कोटी २० लाख लोकसंख्या मध्यम वर्गाच्या श्रेणीतून बाहेर फेकली गेल्याचा अहवाल अमेरिकास्थित प्यू रिसर्च सेंटरने प्रसिद्ध केला आहे. कोरोना महासाथीत नोकरी जाणे, पगारात कपात होणे, इंधनात १० टक्के दरवाढ, महागाई व व्यवसाय बंद करावा लागल्याने मध्यम वर्गाला तडाखा बसल्याचे प्यू रिसर्चचे म्हणणे आहे. या महासाथीत गरीबांच्या लोकसंख्येत ७ कोटी ५० लाखांची भर पडल्याचेही प्यू सेंटरचे म्हणणे आहे.

कोरोना महासाथीत भारतीय मध्यम वर्गाचे दैनंदिन उत्पन्न जे सरासरी ७०० रु.ते १५०० रुपये (१० ते २० डॉलर दरम्यान) इतके होते, ते घसरले. हे उत्पन्न ३ कोटी २० लाख नागरिकांचे घसरले आहे. चीनशी तुलना करता कोविड महासाथीचा भारतातल्या मध्यम वर्गाला व गरीब वर्गाला अधिक तडाखा बसला आहे, असे प्यू रिसर्चचे म्हणणे आहे.

२०११ ते २०१९ या काळात भारतात ५ कोटी ७० लाख लोकसंख्या मध्यम वर्गात समाविष्ट झाली होती. जागतिक बँकेने २०२०मध्ये भारत व चीनचा आर्थिक विकासदर अनुक्रमे ५.८ टक्के व ५.९ टक्के इतका होईल असा अंदाज वर्तवला होता. पण कोरोना महासाथीमुळे भारताचा विकासदर ९.६ टक्के तर चीनचा विकास दर २ टक्क्याने घसरला होता. आता भारतात कोरोना महासाथीची दुसरी लाट येत असल्याने त्याचा धक्का अर्थव्यवस्थेला बसेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना महासाथीचा फटका चीनच्या मध्यमवर्गाच्या जीवनस्तराला मोठ्या प्रमाणात बसलेला नाही. तेथे १ कोटी नागरिक मध्यम वर्गाच्या बाहेर फेकले गेले आहेत, शिवाय गरीब वर्गावरही मात्र फारसा फरक पडलेला नाही, असे प्यू रिसर्चचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS