फडणवीसांचे समाधान, राष्ट्रवादीचा कार्यक्रम

फडणवीसांचे समाधान, राष्ट्रवादीचा कार्यक्रम

कोणतीही पोटनिवडणुक ही साधारणपणे सहानभूतीच्या लाटेवर लढवली जाते. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही पोटनिवड

भाजप नेत्याच्या गोशाळेत शेकडो गायी मृत
गतवैभवाच्या ‘उलट्या’ खुणा
केरळात ई. श्रीधरन भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

कोणतीही पोटनिवडणुक ही साधारणपणे सहानभूतीच्या लाटेवर लढवली जाते. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने ही पोटनिवडणुक झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे भालके यांच्या कुटुंबातील कोणाही एका व्यक्तीस उमेदवारी देण्यात येणार होती. येथे भालके हेच विजयी होणार असा अंदाज असताना भाजपच्या समाधान आवताडे यांनी विजय मिळवीत हा अंदाज खोटा ठरवला.

आजपर्यंत  गोपीनाथ मुंडे आणि अन्य काही नेत्यांच्या निधनानंतर तेथे बिनविरोध निवडणूक घेण्याचा अलिखित प्रघात आहे. महाराष्ट्रामधील सुसंस्कृत आणि सुदृढ लोकशाहीचे हे एक उत्तम दर्शन आहे. भारत भालके यांच्या निधनानंतर तेथील निवडणूक वास्तविक बिनविरोध होणे अपेक्षित होते. पण इथे मात्र राष्ट्रवादीची डिप्लोमसी कमी पडली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुसंवाद साधण्यात राष्ट्रवादीचेचे प्रदेश नेतृत्व अपयशी ठरले.

या अत्यंत प्रतिष्ठेच्या मतदारसंघात भाजपने उमेदवार देताना काही राजकीय खेळी केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी विचारपूर्वक समाधान औताडे यांना उमेदवारी देताना तेथील अंतर्गत सर्व गट-तट यांना एकत्र आणले. एकमेकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या परिचारक आणि मोहिते- पाटील गट यांना एकत्र आणले. तसेच आवताडे यांच्या सारखा सर्व बाजूनी तगडा उमेदवार देण्यात आला. ही फडणवीस यांची यशस्वी राजकीय खेळी मानली जाते. आवताडे हे व्यवसायाने मोठे काँट्रॅक्टर. त्यांची सुमारे पाच हजार कोटी रु.ची कामे सर्वत्र सुरू आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वेळी आवताडे यांनी अपक्ष निवडणूक लढवताना ५२ हजार मते मिळविली होती. जी त्यांची हक्काची होती आणि त्याला जोड मिळाली ती भाजपच्या पारंपरिक मतांची.

कमालीचे चातुर्य आणि राजकीय गोळाबेरीज करण्यात देवेंद्र फडणवीस यशस्वी ठरले. पंढरपूर शहर आणि तालुका तसेच मंगळवेढा तालुक्यातील भाजप अंतर्गत सर्व गटांना एकत्र आणून ती सर्व ताकद त्यांनी आवताडे यांच्या मागे उभी केली. योग्य  राजकीय व्यवस्थापन करताना फडणवीस यांनी सर्व तटबंदी भक्कम करून ठेवल्या होत्या.

याउलट राष्ट्रवादीची स्थिती होती. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार हे थोडे अति आत्मविश्वासात होते. त्यामुळे त्यांना ही निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. खात्री लायक माहिती नुसार देवेंद्र फडणवीस हे निवडणूक बिनविरोध करण्यास राजी होते पण त्यांची एकच अट होती ती म्हणजे उमेदवारी ही भारत भालके यांच्या पत्नीला देण्यात यावी. पण राष्ट्रवादीने हे अमान्य करताना भारत भालके यांचे पुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली. त्याचवेळी समाधान आवताडे हेही अगदी शेवटच्या दिवसा पर्यंत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. पण आयत्या वेळी फडणवीस यांनी आवताडे यांना आपल्याकडून खेचले. खरे तर हा फडणवीस यांचा मास्टर स्ट्रोक होता. जो जयंत पाटील अथवा अजित पवार यांना लक्षात येईपर्यंत वेळ निघून गेली होती. भालके यांना मानणारा मोठा जनसमाज हा पंढरपूर तालुक्यात आहे. पण पंढरपूर शहर आणि विशेषतः मंगळवेढा या महत्त्वाच्या  ठिकाणी त्यांची ताकद कमी होती. राष्ट्रवादीने मंगळवेढा शहर आणि तालुक्यात संपर्क अभियान राबवले पण त्यालाही मर्यादा होत्या. तसेच पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य समन्वय साधण्यात जयंत पाटील आणि अजित पवार हे अपयशी ठरले. महाविकास आघाडीमधील अन्य दोन म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस यांचे मतदान कितपत झाले आहे याबाबत संशय आहे. कारण समाधान आवताडे हे सर्वांशी पहिल्यापासून चांगले संबंध ठेवण्यात आघाडीवर होते. भगीरथ भालके यांच्या तुलनेत समाधान आवताडे हे सर्वच दृष्टीने म्हणजे आर्थिक बाजूने तगडे होते. अर्थात याचा निश्चित फायदा  आवताडे यांना झाला. त्यातच आम्हीच विजयी होणार हा घातकी अतिआत्मविश्वास राष्ट्रवादीला नडला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हे राजकीय खेळी करण्यात माहीर मानले जातात. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम हे त्यांचे अस्त्र नेहमीच प्रभावी ठरले आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी नियोजन बद्ध आणि राजकीय खेळी करत अत्यंत चतुराईने जयंत पाटील आणि राष्ट्रवादी यांचाच करेक्ट कार्यक्रम करून पंढरीमध्ये जोरदार धक्का दिला आहे. हा निकाल राज्याच्या पुढील राजकीय खेळीमध्ये परिणाम करणार हे निश्चित.

अतुल माने, ज्येष्ठ पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0