पँडोरा पेपर्सः सचिन, अनिल अंबानी, जॅकीची करचुकवेगिरी

पँडोरा पेपर्सः सचिन, अनिल अंबानी, जॅकीची करचुकवेगिरी

७ वर्षांपूर्वी जगातील धनाढ्य, गर्भश्रीमंत, राजकीय नेते, सेलेब्रिटी, खेळाडू, व्यावसायिक यांच्या करचोरीचा पर्दाफाश करणारा पनामा पेपर्स घोटाळा बाहेर आला होता. या घोटाळ्यानंतर आता ‘पँडोरा पेपर्स’ हा करचोरीचा नवा घोटाळा इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेशन जर्नालिस्ट (आयसीआयजे)च्या मदतीने उघडकीस आला आहे. या करचोरी प्रकरणात भारतातील बडे उद्योगपती, खेळाडू, व्यापारी व सेलेब्रिटींची नावे उघड झाली आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्त खेळाडू व भारत रत्न पुरस्काराने सन्मानित सचिन तेंडुलकर यांच्यासह बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मुजुमदार शॉ, काँग्रेसचे दिवंगत नेते सतीश शर्मा, हीरे व्यापारी नीरव मोदी, उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्यासह ३०० भारतीयांची नावे आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पँडोरो पेपर्स उघडकीस आणण्यामागे ११७ देशातील १५० मीडिया संस्था व ६००हून अधिक पत्रकारांची मदत झाली आहे. या सर्वांनी १.१९ कोटीहून अधिक गोपनीय कागदपत्रे तपासून प्रत्येक देशातील करचुकवेगिरी करणार्या बड्यांची नावे उघडकीस आणली आहे.

या गोपनीय कागदपत्रांनुसार व्हर्जिन आयलंड, सायप्रस यासारख्या देशांतल्या १४ सेवा पुरवठा कंपन्यांच्या माध्यमातून २९ हजार कंपन्या व ट्रस्ट स्थापन करण्यात आले आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून करचुकवेगिरी या बड्या मंडळींकडून झाली आहे.

करचुकवण्यासाठी धनाढ्य मंडळींकडून व्हर्जिन आयलंड, सायप्रस सारख्या ‘टॅक्स हेवन’ देशात गुंतवणूक केली जाते. या देशांमध्ये गुंतवणुकीवर कर लागू नसल्याने मोठ्या प्रमाणात काळा पैसा तेथे गुंतवला जातो. हे देश परदेशी नागरिक, उद्योगपती, सेलिब्रिटी, गुंतवणुकदार यांना आपल्या देशात गुंतवणूक करावी यासाठी सवलती देत असतात.

इंडियन एक्प्रेसनुसार रिलायन्स एडीए ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी व त्यांच्या कंपनीमधील काही अधिकार्यांनी टॅक्स हेवन देशांमध्ये २००७ ते २०१० दरम्यान किमान १८ कंपन्या उघडल्या असून त्यातील ७ कंपन्यांमध्ये कमीत कमी १.३ अब्ज डॉलरची उलाढाल दिसून आलेली आहे.

ही माहिती यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे की, फेब्रुवारी २०२०मध्ये लंडनमधील एका न्यायालयात एका प्रकरणात अनिल अंबानी यांनी आपले उत्पन्न शून्य रुपये असल्याचे सांगितले. अनिल अंबानी यांच्यावर चीनच्या तीन सरकारी बँकांनी खटले दाखल केले आहेत. या प्रकरणात अनिल अंबानी यांच्या ऑफशोर कंपन्यांबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. पण अनिल अंबानी यांनी आपल्यावरचे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणी नंतर न्यायालयाने अंबानी यांनी चिनी बँकांचे थकवलेले ७१.६ कोटी डॉलर रक्कम चुकवण्याचे आदेश दिले होते. पण अनिल अंबानी यांनी आपल्याकडे कोणतीही संपत्ती नसल्याचा पुन्हा दावा केला होता. आता पँडोरा पेपर्सनुसार अनिल अंबानी यांच्या परदेशात अनेक कंपन्या असल्याचे दिसून आले आहे.

पँडोरो पेपर्समध्ये क्रिकेटपटू व राज्यसभेचे माजी खासदार सचिन तेंडुलकर यांचेही नाव आले आहे. सचिन त्यांची पत्नी अंजली तेंडुलकर व सासरे आनंद मेहता हे ब्रिटीश व्हर्जिन आयलंडमधील सास इंटरनॅशल लिमिटेड या कंपनीचे मालक व संचालक असल्याचे उघडकीस आले आहे.

पनामा पेपर्सचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तीन महिन्यांनी जुलै २०१६ मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली. पँडोरा पेपर्समध्ये सासचा उल्लेख २००७ सालचा असल्याचे दिसून आले आहे. कंपनी बंद करताना शेअरधारकांना त्यांचा हिस्सा वाटण्यात आला. त्यानुसार सचिन तेंडुलकर यांच्याकडे ८,५६,७०२ डॉलर, अंजली तेंडुलकर यांच्याकडे १३,७५,७१४ डॉलर व आनंद मेहता यांच्याकडे ४,५३,०८२ डॉलर किंमतीचे शेअर होते.

यानुसार सास इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या एका शेअरची किंमत ९६ हजार डॉलर होती. १० ऑगस्ट २००७मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. त्यावेळी कंपनीने ९० शेअर विक्रीसाठी काढले होते. त्यावर असे लक्षात येते की एकूण शेअरचे मूल्य ६० कोटी रुपये होते.

बायोटेक्नॉलॉजी एंटरप्राइज बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मुजुमदार यांचे ब्रिटिश नागरिक असलेले पती जॉन मॅकलम मार्शल शॉ यांनी एका व्यक्तीबरोबर एक ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे करचुकवेगिरी केल्याचा आरोप आहे. गेल्या जुलै महिन्यात सेबीने एलेग्रो कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिक शेअर खरेदी केल्या प्रकरणात बंगळुरुस्थित कुणाल अशोक कश्यप यांना एक वर्षासाठी शेअर बाजारात व्यवसाय करण्यास मनाई केली होती. कश्यप यांनी गैरमार्गाने २४.६८ लाख रुपये कमावल्याचा सेबीचा आरोप होता. त्याच बरोबर सेबीने बायोकॉनवर इनसायडर ट्रेडिंग केल्याचा ठपका ठेवत १० लाख रु.चा दंडही ठोठावला होता. कश्यप हे बायोकॉनशी संबंधित असल्याचे पँडोरा पेपर्सचे म्हणणे आहे.

मूळ बातमी

COMMENTS