हार्दिक पटेल यांचा गुजरात काँग्रेसचा राजीनामा

हार्दिक पटेल यांचा गुजरात काँग्रेसचा राजीनामा

अहमदाबाद/नवी दिल्लीः गुजरातमधील काँग्रेस राज्याच्या हितविरोधी असल्याचा आरोप करत गुजरात राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी र

कर्नाटकात भाजपमुळे जेडीएसकडे विधान परिषद अध्यक्षपद
‘भारतविरोधी घोषणा दिल्याने पाकिस्तानात जा म्हणालो’
पक्ष सहकार्याने कट रचलाः भाजप नेत्या पामेलाचा आरोप

अहमदाबाद/नवी दिल्लीः गुजरातमधील काँग्रेस राज्याच्या हितविरोधी असल्याचा आरोप करत गुजरात राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी राजीनामा दिला. हार्दिक पटेल यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवला तसेच त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही दिला.

गुजरातमध्ये येत्या डिसेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होत असून हार्दिक पटेल हे भाजपमध्ये सामील होतील असे अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेले दोन महिने ते भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात होते व त्यांना पक्षात घेण्याविषयी भाजपचे केंद्रीय नेतृत्व तयार असल्याचे एनडीटीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

पक्षाचा राजीनामा देताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्ष गुजरातविरोधी असल्याची टीका करत काँग्रेस फक्त विरोधाचे राजकारण करत असून स्वतःला सक्षम विरोधी पक्ष प्रस्थापित करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला. पक्ष सोडण्याच्या माझ्या निर्णयाचे माझे सहकारी व गुजरातची जनता स्वागत करेल, गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सकारात्मक काम करू असे ट्विट त्यांनी केले आहे.

हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर आणखी काही गंभीर आरोपही केले आहेत. काँग्रेसने सीएए, जीएसटी, अयोध्या व ३७० कलम या मुद्द्यांची सोडवणूक करण्यापेक्षा त्याच्यामध्ये खोडा घालण्यात प्रयत्न खर्च केले. प्रत्येक राज्यातल्या जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. मी जेव्हा गुजरात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी गुजरातसंबंधित मुद्द्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा हे नेते आपल्या मोबाइल फोन व अन्य मुद्द्यांवर मग्न असतात. देश कठीण परिस्थितीत असताना काँग्रेसचे नेते परदेशात होते. त्यातून असे वाटते की काँग्रेसच्या नेतृत्वाला गुजरातमध्ये स्वारस्य नाही. काँग्रेसने अनेक तरुण नेत्यांच्या विश्वासाला तडा दिला. जेव्हा राज्यात दौऱ्यावर वरिष्ठ नेते येतात तेव्हा लोकांशी संपर्क साधण्यापेक्षा त्यांना चिकन सँड़विच कसे देता येईल याचा विचार राज्यातले काँग्रेस नेते करतात, असे आरोप हार्दिक पटेल यांनी केले आहेत.

महिन्याभरापूर्वीपासून पटेल नाराज

महिन्याभरापूर्वी गुजरात काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीवर हार्दिक पटेल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. आपल्याला पक्षाने दूर ठेवले असून आपल्यातील नेतृत्व क्षमतांचा उपयोग करण्यास काँग्रेस उत्सुक नसल्याचा आरोप पटेल यांनी केला होता. गेल्या विधानसभा निवडणुकांत पाटीदार आंदोलनाचा फायदा काँग्रेसला झाला होता, याची आठवण हार्दिक पटेल यांनी पक्षाला करून दिली होती.

गुजरात काँग्रेसकडून लोकप्रिय पाटीदार नेते नरेश पटेल यांना प्रवेश दिला जात नाही, त्यावरून काँग्रेसमध्ये हार्दिक पटेल गट कमालीचा नाराज झाला होता. ती नाराजी व्यक्त करण्यासाठी हार्दिक पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेश पटेल यांना काँग्रेसप्रवेश देण्यासंदर्भात ज्या प्रकारची चर्चा ऐकायला मिळत आहे, ती पाहता हा पटेल समुदायाचा अवमान होत असून गेली दोन वर्षे नरेश पटेल यांच्या काँग्रेसप्रवेशाबाबत हायकमांडाच्या नेतृत्वाखाली असलेल्या स्थानिक नेतृत्वाकडून निर्णय घेतला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. नरेश पटेल यांना त्वरित पक्ष प्रवेश द्यावा अशीही त्यांनी मागणी केली होती.

२०१५च्या गुजरातमधील पाटीदार आंदोलनामुळे काँग्रेसला स्थानिक स्वराज संस्था निवडणुकांत चांगल्या जागा मिळाल्या होत्या. परिणामी २०१७च्या गुजरात विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला १८२ पैकी ७७ जागा मिळवत्या आल्या होत्या. पण त्यानंतर पुढे काय झाले असा सवाल करत हार्दिक पटेल यांनी २०१७नंतर पक्षाने आपला उपयोग करून घेतला नाही. आपल्याला पक्षात महत्त्व मिळाल्यास पक्षातील काही नेत्यांना पुढच्या ५-१० वर्षांनी हार्दिक पटेल त्यांच्यामध्ये आड येईल असे वाटत असल्याचे म्हटले होते.

हार्दिक पटेल यांच्या या एकूण नाराजीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी नरेश पटेल यांच्या काँग्रेसप्रवेशाचे पक्ष स्वागत करत असल्याचे सांगितले होते. चेंडू आता नरेश पटेल यांच्याकडे असून त्यांनीच यावर आता निर्णय घ्यावा. त्यांच्या काँग्रेसप्रवेशासाठी आम्हीच त्यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली होती, आता अंतिम निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे, अशी ठाकोर यांनी प्रतिक्रिया दिली होती. या नंतरही नरेश पटेल यांच्याकडून काँग्रेस प्रवेशाच्या कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत.

मूळ वृत्त

 

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0