पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार

पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार

“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केल्याबद्दल” रवीश कुमार यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

एनडीटीव्ही इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार शुक्रवारी जाहीर झाला. नोबेल पारितोषकाची आशियाई आवृत्ती समजल्या जाणारा हा पुरस्कार या वर्षी पाच जणांना देण्यात येणार आहे. रवीश कुमार हे त्यातील एक विजेते आहेत.

पुरस्काराच्या मानपत्रानुसार, एनडीटीव्ही इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी संपादक असलेले चव्वेचाळीस वर्षे वयाचे रवीश कुमार हे देशातील सर्वात प्रभावी टीव्ही पत्रकारांपैकी एक आहेत. “तुम्ही लोकांचा आवाज बनला असाल, तर तुम्ही पत्रकार असता,” असेही त्यात म्हटले आहे.

एनडीटीव्हीच्या एका बातमीनुसार, या मानपत्रात कुमार यांचे वर्णन धारदार आणि ज्ञानसंपन्न अँकर असे करण्यात आले आहे.

बिहारमधील जितवापूर गावात जन्मलेले कुमार हे १९९६ पासून एनडीटीव्हीमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा पत्रकारितेतील प्रवास प्रत्यक्ष फील्डमधल्या कामापासून झाला आहे.

एनडीटीव्हीने भारतातील ४२ कोटी हिंदी भाषी लोकांसाठी २४ तास हिंदी बातम्यांचे चॅनल, एनडीटीव्ही इंडिया सुरू केल्यानंतर त्यांना त्यांचा स्वतःचा रोजचा शो मिळाला, ‘प्राइम टाइम’.

या प्राइम टाइम बद्दल पुरस्काराचे मानपत्र म्हणते, कुमार यांचा ‘प्राइम टाइम’ हा कार्यक्रम वास्तव जीवनातील, सामान्य लोकांच्या फारशी प्रसिद्धी न मिळणाऱ्या समस्यांवर बोलतो. “ते लोक-केंद्रित पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या न्यूजरूमला ते ‘लोकांची न्यूजरूम’ म्हणतात.” मात्र ते ज्या प्रकारच्या पत्रकारितेचे प्रतिनिधित्व करतात ते त्यांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण आहे.

“जीवनाच्या प्रत्येक बाबीत हस्तक्षेप करणारे राज्यशासन, कट्टर वातावरण, ट्रोल आणि ‘फेक न्यूज’चे प्रसारक या गोष्टींनी धोक्यात आलेल्या प्रसारमाध्यमातील वातावरणात, आणि जिथे बाजारातील रेटिंगच्या स्पर्धेमुळे ‘प्रसारमाध्यमातील चमकदार व्यक्तिमत्त्वे’,‘चतकोर वार्तापत्रांतल्या चतकोर बातम्या’, आणि ‘प्रेक्षकांना खूश करणारी सनसनाटी वार्तांकने’ यांनाच जास्त किंमत दिली जाते, अशा ठिकाणी रवीश हे सौम्य, संतुलित, तथ्यांवर आधारित पत्रकारितेची व्यावसायिक मूल्ये व्यवहारात उतरवण्याचा आग्रह धरण्यात अग्रेसर आहेत,” असे त्यात म्हटले आहे.

त्यांच्या कार्यक्रमांमध्ये वर्तमान सामाजिक समस्यांचा विषय घेतला जातो, त्यावर गंभीर संशोधन केले जाते; आणि नंतर सर्व बाजूंचा विचार करणाऱ्या चर्चांद्वारे त्या समस्यांचे सादरीकरण केले जाते.

रवीश कुमार गरीब जनतेबरोबर सहज संवाद साधतात, भरपूर प्रवास करतात आणि त्यांच्या प्रेक्षकांबरोबर संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करतात. ते त्यातून कार्यक्रमासाठीचे विषय आणि कहाण्याही मिळवतात.

पुरस्काराचे मानपत्र म्हणते, २०१९च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करताना विश्वस्तमंडळाने त्यांची उच्च दर्जाच्या व्यावसायिक, नैतिक पत्रकारितेप्रती असलेली अविचल बांधिलकी; सत्य, सचोटी आणि स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहण्यातले नैतिक धैर्य; आणि आवाज नसलेल्यांना पुरेसा आणि आदरपूर्वक आवाज देऊन, सत्तेच्या समोर शांतपणे तरीही धैर्याने सत्य मांडूनच पत्रकारिता लोकशाहीला पुढे नेण्याचे आपले सर्वात उच्च ध्येय साध्य करत असते हा त्यांचा विश्वास या सर्वांचा गौरव केला आहे.

२०१९ च्या रेमन मॅगसेसे पुरस्काराचे आणखी चार विजेते आहेत म्यानमार येथील को स्वे विन, थायलंड येथील अंगखाना नीलापैजित, फिलिपिन्स येथील रेमुंडो पुजान्ते चायाब्याब आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग-की.

१९५७ मध्ये सुरू झालेला रेमन मॅगसेसे पुरस्कार हा आशियातील सर्वोच्च पुरस्कार आहे. फिलिपीन्सच्या तिसऱ्या अध्यक्षांच्या नावाने तो दिला जातो. या नेत्याप्रमाणेच निःस्वार्थ सेवा आणि लोकांच्या जीवनात कायापालट घडवून आणणारे प्रभावी काम करणाऱ्या आशियामधील व्यक्तींना तो देण्यात येतो.

COMMENTS