शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग १

शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग १

‘डॅनिएल डफो’ने १७१९ साली लिहिलेल्या ‘रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा’, या इंग्रजीतील आद्यकादंबरीची जगामध्ये अनेक भाषांमध्ये अनेक रूपांतरणे झाली. फ्रेंच भाषेमध्ये ‘पात्रिक शामुआजो’ने ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, या नावाने २०१२ साली कादंबरी लिहिली. या कादंबरीतील ‘रॉबिन्सन क्रुजो’, हा अतिशय वेगळा आहे. त्याची जीवनमूल्ये आणि जगण्याची आसोशी वेगळी आहे.

व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या डॉ. रखमाबाई
थरारक सामन्यात इंग्लंडने विश्वविजेतेपद पटकावले
महाराणी एलिझाबेथ यांचे पती फिलिप यांचे निधन

“या बेटावर आलो तेव्हा मी स्वत:ला खेकड्यांप्रमाणे चालायला शिकायचा प्रयत्न करायचो, ऑक्टोपसच्या पिल्लांप्रमाणे पाण्यात फिरायला बघायचो आणि डबकातल्या बेडकांप्रमाणे स्तब्ध बसायचे प्रयत्न करायचो…. माझ्या आजूबाजूस असलेल्या सगळ्या प्राण्यांच्या आवाजांना कान देऊन ऐकायचो, त्यांची नक्कल करायला बघायचो पण जेव्हा माझी नजर माझ्यातल्या गैरहजर असलेल्या स्व:त्वावर पडायची, तेव्हा मी सैरभैर व्हायचो….मग हताश बैलाप्रमाणे तोंडातून लाळ गाळत बसायचो…परंतु माझ्यातल्या तुटपुंज्या माणुसकीचा बचाव करण्यासाठी मी ज्वर चढलेल्या भ्रमिष्टाप्रमाणे स्वत:लाच गोष्टी देखील सांगायचो….मला स्व:बद्दल वेगवेगळ्या कथा विणण्यात दिलासा मिळायचा….त्या कथा मी तुटून पडलेल्या जहाजावरील गच्च भिजून आणि पुन्हा सुकून कडकडीत झालेल्या वहीतील पानांवर लिहायचो….त्या कथा या बेटावर माझे जहाज मोडून पडण्याआधी वाचलेल्या आणि माझ्या मनात घर करून बसलेल्या एक दोन पुस्तकांमधीलच असाव्यात…कोण्या दुसऱ्याने लिहिलेली ती पुस्तकेच तर मला इथे या बेटावर पुन्हा लिहायची आहेत, ती पुसायची देखील आहेत… त्यांच्या ओळींमध्ये, शब्दांमध्ये आणि त्यांनी प्रसवलेल्या वास्तवांमध्ये जागा वाढवून त्यात माझ्या घडण्यची गीते रचायची आहेत….. मी कोण आहे, काय बनण्याच्या माझ्या आकांक्षा आहेत हे मी त्यांच्या उसन्या शब्दांशिवाय कसे बरे सांगू शकेन….”

हा उतारा पात्रिक शामुआजो (Patrick Chamoiseau) या लेखकाच्या ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’ (L’empreinte à Crusoé) या फ्रेंच भाषेतील २०१२ साली लिहिलेल्या कादंबरीतील आहेत. जहाज फुटून एका निर्मनुष्य बेटावर वाहत आलेल्या माणसाची ही कथा आहे. मात्र या माणसाला स्मृतिभ्रंशामुळे त्याच्या आधीच्या आयुष्याबाबत काहीच आठवत नाही. आपण कोण, आपले नाव काय याची खबर त्याला नाही. आपल्यासारखे या बेटावर कुणीच नाही ना आपल्याशी कुणी जीव बोलू शकत नाही या खंतेपोटी आणि निर्मनुष्य बेटावर वेडे करणाऱ्या एकटेपणातून हा माणूस आपल्याच विषयीच्या कथा आपल्यालाच सांगत सुटतो.

पात्रिक शामुआजो

पात्रिक शामुआजो

रॉबिन्सन क्रुजो हे पात्र जगाला नवीन नाही. हे पात्र इतके लोकप्रिय आहे की १८ शतकातील साहित्य रसिकांत रॉबिन्सन क्रुजो हे साहित्यातले पात्र नसून, एक खरी व्यक्ती आहे असे वाटत होते. त्याचा जन्म खरं तर डॅनिएल डफो नामक इंग्रजी लेखकाच्या “रॉबिन्सन क्रुजोच्या भन्नाट साहस कथा”, या १७१९ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीमध्ये झाला. (The Life and Strange Surprising Adventures of Robinson Crusoe) रॉबिन्सन क्रुजो ही इंग्रजी भाषेतील आद्य कादंबरी समजली जाते.

डफोच्या या कादंबरीने इंग्रजी वाचकवर्गाला वेडे केले. तीनशे वर्षांनंतर आजही जगभरात लहानांपासून थोरांपर्यंतचे अनेक वाचकांना ही कादंबरी भूरळ पाडते. उदा. इंग्लंड- अमेरिकेत ज्यांना लहानपणी वाचनाची आवड लागलेली असते त्यातील बहुतांश ही कादंबरी एकदा तरी वाचतात. या कादंबरीच्या इंग्रजी भाषेत दोनशे, तर इतर भाषेत किमान सातशे आवृत्या उपलब्ध आहेत. या कादंबरीवर ‘कार्ल मार्क्स’पासून ‘वर्जिनिया वुल्फ’पर्यंत दिग्गजांनी चिंतन केले आहे. अनेक बड्या नेत्यांनी आपल्या भाषणात, लेखनात आणि चर्चांमध्ये क्रुजोचा उल्लेख केला आहे. अशा ऐतिहासिक यश मिळालेल्या कादंबरीचे इंग्रजीत आणि इतर वेगवेगळ्या भाषांमध्ये पुन्हा पुन्हा रुपांतरण होत आले आहे.

या रुपांतरांची संख्या इतकी मोठी आहे, की त्यांच्या अविरत वाहणाऱ्या प्रवाहाला ‘रॉबिन्सनेड’ (Robinsonade) असे नाव देण्यात आले. यांतील काही रुपांतरे स्त्री साहित्यिकांनीही केली व नायकाऐवजी ती कथा निर्मनुष्य बेटावर आलेल्या एका नायिकेविषयी बनवली. आजच्या जगात प्रतिष्ठित मानलेले लेखकही या प्रवाहात पोहण्याच्या मोहापासून सुटलेले नाहीत. नोबेल पुरस्कार प्राप्त डेरेक वॉल्कॉट आणि जॉन मॅक्सवेल कोट्झी यांनीही क्रुजो या कादंबरीचे रुपांतर केले आहे.

इंग्लंडमधील मध्यम वर्गातील घरात जन्माला आलेला क्रुजो आपल्या धमन्यांमघ्ये धावणाऱ्या साहसी रक्ताला रोखू न शकल्याने आपल्या बापाच्या विरोधाला न जुमानता खलाशाचे आयुष्य पत्करतो. जगाला वळसा घातल्यानंतर विविध प्रांतात व्यापार करून आणि अचंबित करणारे साहसी पराक्रम केल्यानंतर क्रुजो गिनिआला आफ्रिकेत पकडलेल्या गुलांमाचा व्यापार करायला निघतो. वाटेत मोठ्या वादळात त्याचे जहाज सापडते व ते फुटून क्रुजो एकटाच उष्ण कटिबंधातील निर्मनुष्य बेटावर पोचतो. त्या बेटावरून बाहेर पडण्याचे त्याचे सर्व प्रयत्न फसतात. या बेटावर आपल्याला एकाकी मरण येईल, तेथील श्वापदे आपला फडशा पाडतील किंवा एकटेपणाने आपल्याला वेड लागेल या भीतीपोटी क्रुजो स्वत:ला मानवी समाजाच्या पुनर्स्थापनेच्या कामाला लावतो.

समाज हा फक्त मानवांच्या समुहाने बनत नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा समाजाचा मुलभूत पाया असतात. डफोच्या क्रुजोला खलाशाच्या आयुष्यात जरुरी असलेल्या कौशल्याखेरीज काहीच माहीत नसते. परंतु स्वत:ला जिवंत ठेवण्यासाठी प्रथम अश्मयुगातील मानवांप्रमाणे प्राण्यांची शिकार करून तो आपली गुजराण करतो. मग हळूहळू शेतीतील काही कला शिकून घेतो. उपयोगी वस्तू तयार करण्याचे कौशल्य अपरिमित कष्टानंतर आणि अनेक अपयशांनंतर शिकून घेतो.

त्याची बेटावरील यशापशये, त्याचे परमेश्वराबरोबरचे स्वगत, आपल्या मनात होणाऱ्या चलबिचलींचे सारे वर्णन तो अत्यंत इमानदारीने व सचोटीने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवतो. या प्रयत्नांमध्ये अनेक वर्षे घालवल्यानंतर एक दिवस इतर बेटांवरील नरभक्षक आदिवासी क्रुजोच्या बेटावर येतात. आपल्याच समुहातील माणसाचा नरबळी देत असताना क्रुजो बळी देऊ केलेल्या माणसाला वाचवतो. शुक्रवारी ही घटना घडल्याने क्रुजो त्या माणसास फ्रायडे हे नाव देतो व त्याला आपल्या हाताखाली काम करण्यास ठेवून घेतो. रानटी अवस्थेत मिळालेल्या फ्रायडेला क्रुजो सुसंस्कृत बनवतो आणि सुनसान बेटावर शेती, व्यापार, उद्योग-धंदे यांची भरभराट जमवून देतो. हा आहे डफोच्या कादंबरीचा आढावा.

या कादंबरीच्या मूळ कथेला फाटे फोडणारी अथवा त्या कथेला तऱ्हेतऱ्हेच्या वेषात सजवणारी असंख्य रुपांतरणे आज उपलब्ध आहेत. डफोची कादंबरी रोचक, रंजक आणि १८ शतकासाठी क्रांतिकारक जरूर आहे आणि त्यामुळेच तशा कथांची चलती आजही आहे. अमेरिकेतील ट्रेजर आयलंड हा तुफान चाललेला रियालिटी शो तसेच टॉम हँक्सचा ‘कास्ट अवे’ हा चित्रपट हे डफोच्या कथानकाचेच काही वंशज. आजकाल एका प्रकारचे आत्मचरित्र चर्चिले गेले, की बहुतांशी प्रसिद्ध लोकांची आत्मचरित्रे ज्या धाटणीने लिहिली जातात, किंवा मोठ्या खेळाडूंच्या आयुष्यावर जसे दळण दळल्यासारखे सिनेमे निघतात तसाच काहीसा हा प्रकार..

मग असे असताना फ्रान्सच्या अधिपत्याखाली असलेल्या मार्टिनिक या छोट्याशा कॅरेबियन बेटावर राहणाऱ्या पात्रिक शामुआजो या लेखकाची ‘क्रुजोच्या पाऊलखुणा’, ही कादंबरी माझ्या प्रबंधासाठी निवडून त्यावर महिनोंमहिने मी काम का करावे?

पहिले कारण म्हणजे डॅनिएल डफोच्या रॉबिन्सन क्रुजोसारखा शामुआजोचा क्रुजो मुळीच नाही. डफोचा क्रुजो वेड लागू नये म्हणून स्वत:ला मरमर कामात गुंतवतो. स्वत:ची तर्कसंगत बुद्धी, ही डफोच्या क्रुजोचे सगळ्यात मोठे भांडवल आहे. तो त्या बुद्धीच्या बळावर, आपल्या अपरिमित कष्टांवर इंग्लंडमधील समाजाचे प्रतिबिंब एका निर्मनुष्य बेटावर उमटवतो. मात्र शामुआजोच्या कादंबरीतील क्रुजो बेटावर येतो, तोच मुळी भ्रमिष्ट बनून! त्याचे मन नवीन जन्माला आलेल्या अर्भकासारखे कोरे आहे. समाज म्हणजे काय, याची कल्पनाच विसरून गेल्यानंतर निर्मनुष्य बेटावर कुठल्या समाजाचे तो पुनर्स्थापन करील? आपण मनुष्य आहोत याची जाणीव त्याला आहे. परंतु मनुष्य म्हणजे नेमके काय? हे त्याला ठाऊक नाही कारण आजूबाजूस एकही मनुष्य नाही आणि जहाजफुटीच्या आधीच्या आयुष्यातल्या व्यक्ती त्याला आठवतही नाहीत. आपले नाव काय, आपण कुठून इथे आलो, याचा शोध तो फुटलेल्या जहाजातून वाहून आलेल्या वस्तूंचे परिक्षण करून घेण्याचा प्रयत्न करतो.

त्या अस्ताव्यस्त पसाऱ्यात त्याला राबिन्सन क्रुजो असे नाव लिहिलेला पट्टा मिळतो. त्या नावावरून हा तर्क काढतो, की आपलेच नाव रॉबिन्सन क्रुजो असावे. आपले नामकरण स्वत:च केल्यानंतर, बेटावर स्वत:ला जिवंत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अथक परिश्रम करतो. परंतु शामुआजोचा नायक आपल्या कादंबरीचे कथन डफोच्या कादंबरीतील नायकाप्रमाणे करत नाही. डफोच्या क्रुजोचे वर्णन त्याच्या कामाला आणि बेटावरील साहसांना चिरस्थायी देण्याच्या उपासनेने पछाडलेले आहे. एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याच्या नोंदवहीत केलेल्या आर्थिक तपशीलांच्या नोंदींप्रमाणे डफोचा नायक आपल्या आयुष्याचे वर्णन करतो. त्याच्या नोंदींमध्ये काय गमावले, काय कमावले, कसे कमावले आणि कशी संकटांवर मात केली यांची गोळाबेरीज आढळते.

स्वत्वाच्या शोधात असलेल्या शामुआजोचा नायक मात्र आपले कथन डफोच्या क्रुजोसारख्या नोंदींनी भरू शकत नाही. किंबहुना ते करण्यासाठी लागणारी स्वतःची स्थिर अशी ओळखच त्याच्याकडे नाही. त्यामुळे तर्कशुद्ध माणसाप्रमाणे एकसंगत कथन करण्याचे कौशल्य देखील त्याच्याकडे नाही. कोळ्याप्रमाणे आपल्या भोवती स्वत:विषयीच्या निरनिराळ्या गोष्टींच्या नाजूक धाग्यांचे जाळे तो गुंफत जातो. त्या जाळ्यांमध्ये वाचकाला अडकवून ठेवतोच, पण त्याची घुसमट होईल इतक्या आवेगाने स्वत:भोवती त्या कथनाचे जाळे विणतो. डफोच्या क्रुजोची व्यापारी भाषा शामुआजोच्या कादंबरीत नष्ट होऊन त्याजागी काव्यात्मक आणि उत्कट भाषेचा जन्म होतो. त्या शैलीतच क्रुजो लिहितो –

“गेले वीस वर्ष मी या बेटावरील वायू आणि साऱ्या भौतिक गोष्टींपासून बनवलेली लेखणी परजत आहे. या लेखणीने मी इथल्या मातीवर ठसे उमटवले, वाऱ्यावरती परागकण पसरवले, पावसाच्या नितळ त्वचेवरती, दालचिनीच्या सुगंधीत सालावरती, पौर्णिमेत चंद्राच्या देखण्या चेहऱ्यावरती नक्षीकाम केले, तसेच माझ्या निद्रेवरती आणि तारवटलेल्या डोळ्यांच्या पापण्यांवरती मी भयाण स्वप्नांची रांगोळीही काढली….आणि जागेपणी मात्र मी हे सारे माझ्या भिजून पुसट झालेल्या वहीवरती खरडले….माझ्या वेदना आणि जाणीवा कधीकधी अक्षरांच्या रुपात वहीवरती उमटतात. ती अक्षरे हीच ती काय माझ्या मनाच्या जागृतपणाची साक्ष देतात….”

आपल्या स्वत्वाची ओळख आपण दुसऱ्यांमार्गे करीत असतो. दुसऱ्यांचे आपल्याविषयीचे असलेले मत, त्याला आपण दिलेला प्रतिसाद, त्यांचे आपल्याबरोबरचे नाते, त्या नात्यांतून आणि संवादातून आपण स्वत:ला शोधत असतो, स्वत:ला जोखत असतो. पण एका निर्मनुष्य बेटावरती आपण स्वत:ला कसे बरे धुंडाळणार?

डफोच्या क्रुजोला स्वत:ची ओळख त्याने तयार केलेल्या वस्तूंमध्ये, जमवलेल्या संपत्तीमध्ये आणि मुख्यत्वे आपल्या दिमतीस हजर असलेल्या आणि आपल्यापेक्षा कमी लेखलेल्या फ्रायडेमध्ये दिसते. स्मृतिभ्रंश झालेल्या शामुआजोच्या नायकाला मात्र स्वत:ची ओळख पटवण्यासाठी सुनसान बेटावरती माणसाच्या आगमनाची वाट बघावी लागते. बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याला समुद्र किनाऱ्यावरील वाळूत एका माणसाची पाऊलखुण दिसते. त्या पाऊलखुणेचा मालक तरी स्वत:ला स्वत:चीच ओळख पटविण्यास मदत करेल, आपण विचार करत असलेल्या भाषेबद्दल सांगेल, तशी भाषा बाहेरील जगात खरंच अस्तित्वात आहे, हे सांगेल आणि आपल्या मनुष्यत्वाची आपल्यायाच खात्री पटवून देईल, या आशेने तो पछाडतो.

त्या पाऊलखुणेच्या मालकाचा शोध घेण्यासाठी तो सारे बेट पिंजतो पण त्याला ती व्यक्ती सहजासहजी मिळत नाही. मात्र या शोधात तो अपिरिचित व्यक्तीच्या प्रेमात पडतो. ती व्यक्तीच आपल्याला आपल्या जीवनाचे सार सांगेल आणि आपल्याला या एकटेपणाच्या कचाट्यातून सोडवेल, या आशेने फणफणलेला क्रुजो त्या व्यक्तींचा शोध घेण्यात यशस्वी होतो का? ती व्यक्ती कोण असते आणि त्यांची प्रेमकहाणी कितपत यशस्वी होते?

हे पुढील भागात…

जाई आपटे, या युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, डेव्हिस इथे फ्रेंच साहित्यात पी. एच्. डी करत आहेत. फ्रेंच भाषेतील साहित्यात प्रतित होणारे मानव आणि निसर्ग/पर्यावरण यांच्यातले संबंध, हा त्यांच्या प्रबंधाचा विषय आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0