पवार की ठाकरे : महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे ?

पवार की ठाकरे : महाराष्ट्राची सत्ता कुणाकडे ?

देवेंद्र फडणवीस यांच्या हातून युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता निसटताना दिसत आहे. यातून सत्तेचा लंबक अलगत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या दिशेने झुकू लागला आहे. शिवसेनेला सत्तेत स्थान मिळताना त्यांच्या अस्तित्वावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून धोका राहणार नसल्यास भाजपऐवजी शिवसेना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारू शकते.

फडणवीस यांचे मुख्यमंत्री आणि देशमुखांवर गंभीर आरोप
फडणवीसांच्या विदर्भातच जलयुक्त शिवार अपयशी!
फडणविसांचे अंडरवर्ल्डशी थेट संबंध – मलिक

एक राजकीय घटनाक्रम संपताच, त्यातून दुसऱ्या राजकीय घटना जन्म घेतात. ही आधुनिक लोकशाहीतील सामान्य राजकीय प्रक्रिया आहे. महाराष्ट्रात नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुक निकालाने अशा असंख्य अनुत्तरीत राजकीय घडामोडींना जन्म दिला आहे. या निवडणुका भाजप-शिवसेना युती व काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी या दोन राजकीय गटात लढल्या गेल्या. युतीने निवडणुक बहुमताने जिंकूनही त्यांना सरकार स्थापन करता येत नाही यातच निकालाने निर्माण केलेले राजकीय संघर्ष नव्याने उभे राहत असल्याचे समोर येत आहे.

१९८९ -१९९० च्या दरम्यान भाजप-शिवसेना युतीची सुरवात होत असताना शिवसेना युतीमध्ये मोठा घटक होता जो २०१४च्या विधानसभा निवडणुकांच्या अगोदरपर्यंत जागा लढविताना राहिला होता. २०१४ मधील निवडणुकीत जागांच्या संख्येवरूनच युती तुटलेली होती. निवडणूक संपल्यानंतर राष्ट्रवादीने अचानक भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेने शिवसेनेचे स्थान दुय्यम झाले पण काही काळाने शिवसेनेने त्या सरकारमध्ये दुय्यम स्थान स्वीकारत प्रवेश केला. या घटनेपासून शिवसेनेला युतीतील आपले महत्त्व कमी झाल्याचे कायम वैषम्य वाटत गेले. त्यानंतर सलग पाच वर्षे सरकारमध्ये सहभागी असतानाही संधी मिळेल तेव्हा शिवसेनेने सरकारवर ‘सामना’ या मुखपत्रातून व जाहीरपणेही प्रचंड टीका सुरू ठेवली. वेळोवेळी सरकारची अडवणूक करण्याचाही प्रयत्न केला जात होता. सतत सरकारमधून बाहेर पडण्याचे व राजीनामा देण्याचे इशारे दिले जात होते. यापुढील निवडणुका स्वबळावर लढण्याच्या घोषणा केल्या गेल्या होत्या व तशी तयारी दोन्ही बाजूंनी होत होती.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीतील तणाव जागांबाबत व सत्तेच्या समसमान वाटपाबाबत भाजपकडून दिलेल्या आश्वासनाने कमी झाला. युतीलाही याचा फायदा होत लोकसभेला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. महाराष्ट्रासह देशभरात लोकसभेला ३०३ जागा मिळाल्याने भाजपचा आत्मविश्वास पराकोटीला वाढला होता. यामुळेच लोकसभेला दिलेल्या आश्वासनाची पर्वा न करता भाजपने नव्याने आलेल्या नेत्यांना प्राधान्य देण्याचा व बदललेल्या परिस्थितीचा बहाणा करीत शिवसेनेला समसमान ऐवजी कमी जागा घेण्यास भाग पाढले. शिवसेनेने सुद्धा राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन नाराजीनेच यास तयारी दाखविली होती. हे करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रत्येक वेळी भाजपची अडचण समजून घेणार नाही, हे सांगून आताच्या राजकीय परिस्थितीचे सुतोवाच केले होते.

निवडणूक निकालात भाजपला चांगले यश मिळाले असले तरी हा पक्ष स्वबळाच्या बहुमतापासून ४० जागांनी दूर राहिला आहे. भाजपच्या काही प्रमुख नेत्यांचा पराभव व गेल्या वेळेपेक्षा त्यास १७ जागा कमी मिळालेल्या आहेत. शिवसेनेलाही गेल्या वेळेपेक्षा ७ जागा कमी मिळाल्या असल्या तरी या वेळी भाजपला आपले महत्व दाखवून देण्याची चांगली संधी मिळालेली आहे. भाजपला गेल्या वेळेसारखा या वेळी राष्ट्रवादीचा आधार मिळणे अवघड आहे. निवडणुका वेळी भाजपकडून राष्ट्रवादीतील नेत्यांना आपल्याकडे घेण्याचे जे सत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू होते त्याने ही शक्यता पूर्ण संपलेली आहे. त्याचवेळी या युतीतील सत्तासंघर्षात शरद पवार यावेळी आपले बळ शिवसेनेच्या बाजूने वापरतील अशी परिस्थिती आहे. शिवसेनेला निवडणुकीतील आपली ‘हीच ती वेळ’ ही घोषणा सत्यात आणायची असेल तर त्यांना यावेळी निर्णायक धाडस दाखवावे लागणार आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करताना भाजपने शिवसेनेच्या लोकसभा व विधानसभेतील प्रतिनिधींचा प्याद्यासारखा वापर करून शिवसेना नेतृत्वावर युती करण्यासाठी दबाव आणलेला होता. जर शिवसेना नेतृत्वाने युतीस नकार दिल्यास खासदार व आमदारांना शिवसेनेतून बाहेर पडून भाजप स्वतःच्या तिकिटावर निवडून आणेल असा दबाव शिवसेना नेतृत्वावर भाजपकडून आणला जात होता. याच कारणाने  आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी  शिवसेना नेतृत्व सरकारमध्ये व निवडणुकात युती करताना दुय्यम स्थान स्वीकारून गप्प राहिलेले लक्षात येते. २००५ मध्ये प्रथम नारायण राणे व नंतर राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून भाजप हा युतीमध्ये शिवसेनेवर वर्चस्व ठेवू लागला होता. या संघर्षातूनच शिवसेनेने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेला होता. आजच्या या घडामोडीत हा पाठिंबा शिवसेनेच्या जवळ येण्यास काँग्रेसला उपयुक्त ठरू शकतो.

१९९९ पासून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यातील वर्चस्वाची लढाई भाजपच्या आक्रमक विस्तारवादी राजकारणाने संपवली व त्यांच्यात अस्तित्वाच्या लढाईने ऐक्य साधले गेलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांचा काँग्रेसला आता उपद्रव न होता, आता लाभच होऊ शकतो. महाराष्ट्रातही काँग्रेसचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या विदर्भ, मराठवाड्यातील निम्मा भाग, नंदुरबार, धुळे व पश्चिम महाराष्ट्रातील तसेच मुंबई व इतर ठिकाणचे विधानसभेचे सर्वसाधारण १०० ते १२५ मतदारसंघ तसेच लोकसभेचे १८ ते २० मतदारसंघ जिथे भविष्यात भाजपविरोधी पक्षाबरोबर एकजुटीने काँग्रेस लढल्यास यश प्राप्त होऊ शकते.

काँग्रेसला नेहमीच शरद पवार किंवा शिवसेना यांच्यापेक्षा भाजप हा सर्वात मोठा प्रबळ राजकीय प्रतिस्पर्धी वाटतो. काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकात १४५ पैकी ९५ जागा भाजपविरोधात लढल्या होत्या, मात्र यात त्यांना यापैकी केवळ २० च्या आसपासच जागा जिंकता आल्या. या तुलनेत शिवसेनेविरोधात लढलेल्या जागावर काँग्रेसचे यशाचे प्रमाण चांगले होते. आपल्या प्रबळ राजकीय प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करण्यासाठी काँग्रेस सत्तेत न जाता राष्ट्रवादी व शिवसेना यांना बाहेरून पाठिंबा देऊन मदत करू शकते. काँग्रेसला शिवसेनेस पाठिंबा देण्यास संकोच वाटत असल्यास शिवसेना शरद पवार यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्रीपद व सत्तेत समान वाटा घेत राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्याची अधिक शक्यता नाकारता येत नाही.

राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील व प्रणव मुखर्जी यांना केलेल्या मदतीमुळे काँग्रेस नेतृत्वाला भाजप इतका शिवसेनेबाबत मनात राग असणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या जवळचे मानले जाणारे अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे, संजयमामा शिंदे, रवी राणा, सोबत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना आपल्या बाजूने वळवून भाजपने आपल्या आक्रमकतेने दुसऱ्या राजकीय पक्षांना वेगळ्या पर्यायाच्या शोधासाठी भाग पाडलेले दिसते. खासदार संजय काकडे व सुधीर मुनगंटीवार यांच्या शिवसेनेबाबतच्या आक्रमक वक्तव्याने यामध्ये शिवसेनेला भाजपबाबत अधिकच संशय येण्यास कारण मिळाले आहे. (संजय काकडे यांनी शिवसेनेचे ४५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते, तर सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती शासनाची भीती दाखविली होती.) या गदारोळातच भाजपकडून शिवसेनेशिवाय बहुमत नसताना सरकार स्थापण्याची तयारी केली जाऊ लागल्याने शिवसेनेमध्ये भाजपबद्दलचा अविश्वास अधिक दृढ होताना दिसत आहे.  शिवसेना यातुन अधिकाधिक भाजपपासून दुरावत चालली आहे. शरद पवार हे मुख्यमंत्री होऊन सत्तेवर येणे भाजपला राजकीयदृष्ट्या खूपच नुकसानीचे ठरू शकते. यामुळे भाजप शेवटचा पर्याय म्हणून शिवसेनेचा मुख्यमंत्री मान्य करून शिवसेनेला राष्ट्रवादीबरोबर जाण्यापासून परावृत्त करू शकते का हे पाहावे लागेल. मात्र बदललेल्या राजकीय परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या हातून युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही सत्ता निसटताना दिसत आहे. यातून सत्तेचा लंबक अलगत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या दिशेने झुकू लागला आहे. शिवसेनेला सत्तेत स्थान मिळताना त्यांच्या अस्तित्वावर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडून धोका राहणार नसल्यास भाजपऐवजी शिवसेना राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचे नेतृत्व स्वीकारू शकते.

डॉ. प्रा. प्रमोदकुमार ओलेकर, आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज, आष्टा येथे सहाय्यक प्राध्यापक आणि इतिहास विभागप्रमुख आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: