निशाण्यावर होते अनिल अंबानी

निशाण्यावर होते अनिल अंबानी

पीगॅसस प्रोजेक्ट: ‘द वायर’ आणि सहकारी माध्यम संस्थांनी लीक झालेल्या डेटाबेसच्या केलेल्या तपासणीत अनिल अंबानी आणि रिलायन्स समूहाच्या अधिकाऱ्यांचे फोन क्रमांक हे पाळत ठेवण्याचे संभाव्य लक्ष्य म्हणून आढळले आहेत.

‘रफालवरील निकाल चौकशीचे सूतोवाच करणारा’
‘राफेल’ नंतर अनिल अंबानींच्या रिलायन्सला २८४ कोटी रुपयांचा नफा
सर्वोच्च न्यायालय आणि राफेल: जर एखाद्या विद्यार्थ्याने परिच्छेद असे उतरवून काढले असते तर?

२०१८ मध्ये, नरेंद्र मोदी सरकारने ३६ राफेल विमाने घेण्याच्या करारावर सही केल्यानंतर दोन वर्षांनी या खरेदीबाबत प्रश्न उपस्थित झाले. सर्वोच्च न्यायालयासमोर देखील एक मोठे आव्हान उभे राहिले होते. भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांतील माध्यमांनी दसॉल्ट एव्हिएशनच्या भारतीय भागीदाराबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित करण्यास सुरवात केली होती. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी या कराराचा कॉर्पोरेट पार्टनर कसा निवडला गेला याबद्दलच्या केलेल्या वक्तव्यामुळेही या वादाला तोंड फुटले होते.

‘पीगॅसस प्रोजेक्ट’तर्फे माध्यम सहयोगींनी विश्लेषण केलेल्या यादीत अनिल अंबानी आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी (एडीए) या ग्रुपच्या एका अधिकाऱ्याशी संबंधीत फोन क्रमांक आढळले आहेत, याची ‘द वायर’तर्फे पुष्टी करण्यात येत आहे.

या यादीमध्ये फोन क्रमांक असण्याचा अर्थ असा नाही, की त्याच्याशी संबंधीत असलेला स्मार्टफोन यशस्वीरित्या हॅक झाला होता. कारण फोनच्या फॉरेन्सिक तपासणीनंतरच हा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. तथापि, हे निश्चितपणे सिद्ध होते की ‘एनएसओ’ ग्रुपच्या भारतातील अज्ञात ग्राहक एजन्सीला हा फोन क्रमांक वापरणार्‍या व्यक्तीमध्ये रुचि होती.

अंबानी यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या कंपनीतील कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख टोनी येसुदासन आणि त्यांची पत्नी यांचे फोन क्रमांक आहेत.

अंबानी सध्या हा फोन क्रमांक वापरत आहेत की नाही याची याची ‘द वायर’ला खात्री नाही. कंपनीचा कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे, ते फॉरेन्सिक चाचणी प्रक्रियेत भाग घेण्याच्या त्यांच्या संमतीबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.

नियामक धोरण आणि मीडियाशी संबंधित प्रकरणांमध्ये अंबानी समूहासाठी संकट मोचक म्हणून मानले जाणारे टोनी यांचा क्रमांक २०१८ साली या यादीमध्ये आला. मात्र २०१९ सालच्या काळामध्ये हा क्रमांक दिसत नाही.

लिक झालेल्या डेटाबेसमध्ये दसॉल्ट एव्हिएशनचे भारतीय प्रतिनिधी वेंकट राव पोसिना, संरक्षण कंपनी साब इंडियाचे माजी प्रमुख इंद्रजीत सियाल, आणि बोईंग इंडियाचे प्रमुख प्रत्युष कुमार यांचे फोन क्रमांक २०१८ आणि २०१९ यांदरम्यान दिसून येतात.

२०१३ मध्ये ‘साब इंडिया’ सोडलेल्या सियाल यांनी ‘द वायर’ला सांगितले, की त्याचे नाव अज्ञात भारतीय एजन्सीच्या वॉच लिस्टमध्ये असण्यामगचे एक कारण म्हणजे ते ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या वरिष्ठ पदाच्या शर्यतीत होते.

या यादीमध्ये संरक्षण विभागांमध्ये काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचे फोन क्रमांकही होते. यांपैकी एक अधिकारी ‘भारतीय संरक्षण लेखा सेवेमध्ये होते आणि दुसरे प्रशांत सुकुल होते, जे सन २०१८ मध्ये संरक्षण मंत्रालयात ऑफसेट विभाग हाताळत होते. यासंदर्भात दोन्ही अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

याबरोबरच फ्रेंच फर्म एनर्जी ईडीएफचे भारतीय प्रमुख हरमनजीत नागी यांचा फोन क्रमांक देखील लीक झालेल्या डेटाबेसमध्ये आहे. याच काळात भारत दौर्‍यावर आलेल्या फ्रान्सचे इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या अधिकृत प्रतिनिधी मंडळात नागी यांचा समावेश होता.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0