पहलू खान प्रकरणात काँग्रेसचे मौन

पहलू खान प्रकरणात काँग्रेसचे मौन

हिंदी भाषिक पट्‌ट्यातील भाजपचे कट्‌टर हिंदुत्ववादी राजकारण पाहता काँग्रेस बचावात्मक पातळीवर गेला आहे. तो स्वत:च्या मानेवर हिंदुत्वाचे भूत घेऊन चालल्याचे दिसत आहे. पहलू खान प्रकरण हे त्या भूतासारखे आहे.

राजस्थानमध्ये सत्ता राखण्याचे प्रयत्न
ड्रायविंग सीट
राजस्थानात स्थानिक निवडणुकीत काँग्रेसचा दमदार विजय

दोन दिवसांपूर्वी राजस्थानमधील काँग्रेस सरकारने पहलू खान व त्याच्या मुलाविरोधात गायीची तस्करी केल्याप्रकरणी चार्जशीट दाखल केली आहे. देशाच्या हिंदी पट्‌ट्यात ज्या पद्धतीने राजकारण बदलत चालले आहे ते पाहून काँग्रेस स्वत:ची रणनीती बदलत आहे, असे या एकूण घटनेवरून म्हणता येते.

लोकसभा निवडणुकांत आपण आपण कोणत्या मुद्द्यावरून हरलो आहोत याची काँग्रेसला जाणीव आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका कशा जिंकलो आहोत हेही काँग्रेसला माहिती आहे.

गोवंशाच्या मुद्द्यावरून देशभर रान माजवल्याने आणि काँग्रेसला हिंदूविरोधी, मुस्लीम अनुययी ठरवण्यात यशस्वी झाल्याने भाजपने निवडणुका जिंकल्या होता. या पार्श्वभूमीवर तथाकथित गोरक्षकांच्या झुंडीना आवर घालण्याच्या दृष्टीने कडक पावले उचलली तर त्याचा फायदा पुन्हा भाजप घेईल, असे काँग्रेसला वाटते. या मुद्द्यावरून भाजप पुन्हा काँग्रेसला हिंदूविरोधी, मुस्लीम अनुययी ठरवत जाईल आणि हे धोके ओळखून काँग्रेसने पहलू खान व त्याच्या मुलावर खटले दाखल केले आहेत. पण आगामी विधानसभेत गोरक्षकांच्या झुंडीला रोखण्यासाठी ५ वर्षाच्या शिक्षेचे विधेयक आणण्याअगोदर गहलोत सरकारने हा खटला दाखल केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. असे करण्याने आपण हिंदुत्वाच्या विरोधात नाही असाही संदेश जनतेमध्ये पसरावा अशी काँग्रेसची रणनीती आहे.

अनेक वर्षे सत्तेत राहून काँग्रेसने निओलिबरल आर्थिक सुधारणा आणून अन्य पक्षांच्या आर्थिक धोरणांची पंचाईत केली आहे. त्यामुळे काँग्रेसेतर पक्ष या धोरणांना डावलून देशाची अर्थव्यवस्था पुढे नेऊ शकत नाही. तसाच प्रकार भाजपच्या हिंदुत्वाबद्दल आहे. भाजपने हिंदुत्वाचे मुद्दे नेहमी आक्रमकपणे हाती घेत अन्य राजकीय पक्षांची कोंडी केली आहे. त्यामुळे भाजपेतर पक्षांना हिंदुत्वाच्या विरोधात थेट भूमिका घेता येत नाही. ही त्यांची वैचारिक अडचण आहे.

दुसरीकडे भाजपने काँग्रेसचे निओलिबरल आर्थिक धोरण जोरकसपणे राबवले आहे. त्यांची धोरणे बड्या कंपन्या, कॉर्पोरेट कंपन्यांच्या हिताची आहेत. या धोरणाच्या आहारी जाऊन भाजपने लहान व्यापारी व स्वदेशी उत्पादकांनाही वाऱ्यावर सोडले आहे.

असा एकूण परिप्रेक्ष्य पाहता काँग्रेस मवाळ हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पहलू खानचे प्रकरण त्यादृष्टीने पाहता येईल. या खटल्यात न्याय मिळेल अशी आशाच नाही.

गेल्या पाच वर्षांत देशभरात अल्पसंख्याकांवर बरेच हल्ले झाले. निष्पापांचे बळी गेले. या कट्‌टरतावादावर काँग्रेसचे उत्तर ‘प्रेमाच्या राजकारणा’चे होते. भारत प्रेमासाठी कटिबद्ध आहे, असे काँग्रेस सतत म्हणत आहे. पण अशी भूमिका घेऊनही हिंदू मते काँग्रेसकडे वळाली नाहीत हे पाहायला पाहिजे.

उलट मध्य प्रदेशात प्रज्ञा ठाकूर व बिहारमध्ये गिरीराज सिंह या कट्‌टर हिंदुत्ववाद्यांना भरभरून मते मिळाल्याचे पाहून काँग्रेसला लक्षात आले की ते हिंदूंची मते वळवू शकलेले नाहीत.

मध्य प्रदेश व राजस्थान विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली खरी पण ते मोठ्या प्रमाणावर मते खेचू शकलेले नाहीत. मध्य प्रदेशातील विजय हा वास्तविक भाजपमधील अंतर्गत बंडाळी व राजकीय असंतोषामुळे काँग्रेसला मिळाला होता. तर राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांच्या व्यक्तीकेंद्री, लहरी राजकारणामुळे काँग्रेसकडे सत्ता आली.

छत्तीसगडमध्ये काँग्रेसची कामगिरी बरी होती. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी पदयात्रा करून राज्य पिंजून काढल्याने तेथे काँग्रेस विजयी झाली.

छत्तीसगड हा काँग्रेससाठी धक्का होता कारण तेथे आपण सत्तेवर येऊ असे त्यांना वाटत नव्हते. छत्तीसगडच्या मतदारांना भाजप नको होती म्हणून काँग्रेस निवडून आली. भाजपला लोक केव्हा कंटाळतात याची काँग्रेस वाट पाहात होती व तसे तेथे घडले. छत्तीसगडमध्ये सध्याच्या सरकारची फारशी चांगली कामगिरी नाही. कोणत्याही नव्या योजना नाहीत.

हिंदी भाषिक पट्‌ट्यातील भाजपचे कट्‌टर हिंदुत्ववादी राजकारण पाहता काँग्रेस बचावात्मक पातळीवर गेला आहे. तो स्वत:च्या मानेवर हिंदुत्वाचे भूत घेऊन चालल्याचे दिसत आहे. पहलू खान प्रकरण हे त्या भूतासारखे आहे. काँग्रेस भाजपच्या अशा राजकारणापुढे असहाय्य व अप्रामाणिक आहे. हा पक्ष सापळ्यात अडकला आहे. पक्षाने राजकीय-सामाजिक-धार्मिक असा आपला संपूर्ण अवकाश संघ परिवाराकडे दिला आहे. त्यामुळे कोणत्या वैचारिक पातळीवर भाजप-संघ परिवाराशी लढायचे या संभ्रमात काँग्रेस आहे.

मागे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना पत्रकार गौरी लंकेश यांची सनातन्यांनी हत्या केली होती. या हत्येची चौकशी करण्याचे आदेश  काँग्रेसने लगेचच दिले होते. त्यावेळी काँग्रेस हिंदुत्ववादासंदर्भात कोणतीही चर्चा करण्यास तयार होती. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीरपणे गौरी लंकेश यांच्याशी आपली मैत्री होती असे म्हटले होेते आणि अनेक ठिकाणी त्यांनी गौरी लंकेश यांच्या कार्याची प्रशंसा केली होती. या आत्मविश्वासामुळे सिद्धरामय्या यांनी लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे असा मुद्दा उपस्थित केला होता.

काँग्रेसने या लोकसभा निवडणुकांत फारशी चांगली कामगिरी केली नसली तरी त्यांचे राजकीय अजेंडे हे नक्कीच भाजपपेक्षा भिन्न आहेत. पण हिंदी भाषिक पट्‌ट्यातले राजकारण त्यांनी समजून घेतले पाहिजे. हिंदी भाषिक पट्‌ट्यातील तीन राज्यांनी भाजपला नुकतेच नाकारले होते. ते नाकारण्यामागची कारणे काँग्रेसने शोधली पाहिजेत. या राज्यातील मतदार सामाजिक मुद्द्यावर भाजपच्या विरोधात गेला होता हेही समजून घेतले पाहिजे. हे लक्षात आल्यावरच काँग्रेस स्वत:च्या कैदेतून बाहेर येईल.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 2