वंचितांचा साहित्यसंगर पेटविणारा जननायक

वंचितांचा साहित्यसंगर पेटविणारा जननायक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज १०२ वी जयंती. अण्णाभाऊंचा साहित्याचा पैस फार व्यापक व वैश्विक होता. जगभरात त्यांच्या साहित्याचा चाहता वर्ग दिसून येतो. अण्णाभाऊ केवळ सांगण्यापुरते कॉम्रेड नव्हते, तर वंचित-नाहीरे वर्गाचे जीवनतत्त्वज्ञानाची रोवणी व पेरणी आपल्या कलेमधून सातत्याने करणारे ते कुशल शब्दशिल्पकार होते. त्यांनी आपली जमीन कधी सोडली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते आपल्या जमिनीवर पाय रोवून कलेची आराधना करीत राहिले.

मेघालयात काँग्रेसला खिंडार; १२ आमदार तृणमूलमध्ये दाखल
ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांचे निधन: बकिंगहॅम पॅलेस
‘तिसऱ्या लाटेचा धोका आहेच, नियमांचे पालन हवे’

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केव्हाचेच जागतिक साहित्यप्रांतात प्रविष्ट झालेले आहे. जरी मराठी साहित्याने त्यांच्या साहित्याची घोर उपेक्षा केली असली तरीही मराठी साहित्यप्रांतात आपल्या उत्तुंग प्रतिभेची नाममुद्रा अण्णाभाऊंनी आपल्या प्रज्ञाप्रतिभेने ठाशीवपणे मुद्रांकित केलेली आहे. त्यांच्या वाङ्मयीन प्रतिभेची उपेक्षा होण्याचे कारण एकतर ते जातव्यवस्थेतील अगदी खालच्या पायरीवरील मांग आणि त्यातही कम्युनिस्ट म्हणून आणि त्यांचं लेखन हे प्रचारकी असल्याचे दावे करून मुद्दाम त्यांच्या लेखनाविषयी गैरसमज पसरविण्यात आले.

साहित्यातील असले गलिच्छ राजकारण लेखक कवींच्या जिवंतपणीच त्यांचा मृत्यू (प्रतिभेचा) जाहीर करणारे असतात. अण्णाभाऊंच्या संदर्भातही तेच झाले. त्यांची गाजलेली शाहिरी-पोवाडे, कथा-कादंबर्‍या, प्रवासवर्णन आदी विपुल लेखनाचे कौतुक तर सोडाच साधा उल्लेखही केला गेला नाही. वाङ्मयामध्ये एवढे बरे, की माणसाने निर्मिलेल्या शब्दांना मारता येत नाही, सरणावर ठेवता येत नाही वा फासावर टांगता येत नाही. शब्दांचं आयुष्य अपूर्व अमर्याद आणि सनातन असतं. शब्दांची ऊर्जाशक्ती ही रडार-रणगाडे, तोफांतील बारुदापेक्षाही शक्तीशाली असते. म्हणून जगभरातील सत्तासूत्रांना शब्दांचं भय जास्त वाटत आलेलं आहे. त्यांचा माणसापेक्षाही शब्दांच्या हालचालीवर अधिक जागता पाहारा राहिलेला आहे. याचे दाखले इतिहासात भरपूर मिळतात. वर्तमान पर्यावरणही या वास्तवाला अपवाद नाही.

जागतिक साहित्यप्रांतात अण्णाभाऊंच्या साहित्याची नोंद ही प्रेरणादायी घटना आहे. अलिकडे मराठीतील प्रथितयश कादंबरीकार-लेखक विश्वास पाटील यांच्या ‘अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान’ या ग्रंथात फकिराची बंडखोरी अधोरेखित करताना हॉवर्ड फास्ट या अमेरिकी लेखकाने १९५१ साली लिहिलेल्या ‘स्पार्टाकस’ या कादंबरीची आठवण करून देतात, तसेच भारतीय पातळीवरच्या साहित्यिक मुन्शी प्रेमचंद, शरद्श्चंद्र चटर्जी, महाश्वेतादेवी, विमल मित्र, संतोषकुमार घोष या लेखकांनी व्यवस्थेने नाकारलेल्या समुहांविषयी जे लेखन केले, त्याच तोडीचे लेखन अण्णाभाऊंनी कसे केले आहे, हे अचूकपणे मांडले आहे.

अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यात केवळ कल्पनेचे तारे तोडले नाही. त्यांच्या लेखनाला वास्तवाची भक्कम भूमी होती. त्यांच्या लेखनाची नाळ सभोवतालच्या वास्तवाशी घट्ट असल्याने त्यांच्या लेखनातील तपशील हे ऐतिहासिक दस्तावेजाप्रमाणे दलित-वंचितांच्या जगण्यातील सत्याचा पाठपुरावा करते. वानगीदाखल त्यांच्या ‘फकिरा’, ‘माकडीचा माळ’, ‘उपकाराची फेड’, ‘स्मशानातील सोनं’, ‘सापळा’, ‘वैजयंता’ या कथा-कादंबर्‍यांमधून तत्कालीन वास्तवाची जणू दृकश्राव्य चित्रफित उभी करण्यासाठीच आपल्या समर्थ प्रतिभेचे सामर्थ्य अण्णाभाऊंनी पणाला लावल्याचे दिसून येते.

अण्णाभाऊंच्या प्रातिभचक्षूतील समाज हा कष्टकरी, श्रमकरी, शोषित-पीडित शहरात राहणारा तसेच गावखेड्यात राहणारा आहे. तो जगण्याच्या सर्व प्रकारच्या सुखसुविधांपासून दूर, रोजच्या रोजीरोटीसाठी घाम गाळणारा, त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणे हेच त्याचे भागधेय आणि जगण्याचे तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान आणि संघर्षमूल्य अण्णाभाऊंच्या लेखनाचा गाभा ठरले आणि मग ‘फकिरा’, ‘माकडीचा माळ’ अशा संपन्न कलाकृती जन्मास आल्या.

अण्णाभाऊंचे सारे नातलग, भाऊबंद आणि महार-मांगवाड्यातील माणसांना दिवसातून तीनवेळा पाटलाच्या वाड्यावर जाऊन हजेरी लावणे सक्तीचे होते. कारण १९२५च्या ब्रिटिश कायद्याने मांग जातीला गुन्हेगार जमात म्हणून घोषित केलेले होते, आणि उपेक्षित मांग-महार जातीतील ‘फकिरा’- ‘सत्तू भोसले’-‘सावळा’ यांसारख्या बहाद्दरांचे ब्रिटिश सरकारने हजेरीद्वारे, त्यांच्या हालचालीबरोबर त्यांचे जगणेही नियंत्रित केलेले होते. मांगमहार वस्तीवर होणार्‍या जुलमांची स्थितीगती अण्णाभाऊंनी ऐकली, पाहिली आणि अनुभवलेली होती.

‘फकिरा’ हा अण्णाभाऊंचा नात्याने मामा लागत होता. अण्णाभाऊ आपल्या बालपणीची एक आठवण सांगतात, “मी अगदी पाळण्यात असताना फकिरा सुरती रुपयांच्या दोन ओंजळी माझ्यावर उधळून गेला होता. मी त्याला कसा विसरणार?” ब्रिटिश अंमलात फकिराने कासेगावातील एका ठिकाणी ब्रिटिशांच्या छावणीमधील शिपायांच्या राहुट्या पेटवून ते ठाणे ताब्यात घेण्याचा धाडसी प्रयत्न केला होता. भीषण दुष्काळात उपासमारीने महारमांगांची वस्ती निर्वंश होऊ नये म्हणून फकिरा आपल्या साथीदारांसह, एका इसमाच्या (चौदा गावाच्या जमिनी हडप करून अतिश्रीमंत झालेल्या) घरची धान्याची रास लुटतो, वस्तीत आणून सर्वांना समान वाटतो. या दरोड्याचा छडा लावण्यासाठी सातार्‍याहून ब्रिटिशांची पथके येतात आणि  फकिरासह त्याच्या साथीदारांना कैद होते.

अण्णाभाऊंचा अरसपरस विदारक वास्तवाने गजबजलेला होता. पिढ्यांपिढ्यापासून झोपड्याझोपड्यात वास करीत असलेले दैन्य-दारिद्र्य,  भीषण दुष्काळ, तापसरीची महामारी, जातीभेदाच्या विखाराने करपलेली गरीब-भाबडी माणसं ब्रिटिशांचे जुलमी साम्राज्य, जे वस्तीतल्या पोराबाळांना, म्हातार्‍यांना दिवसातून तीनदा हजेरी लावण्याचा सक्तीचा कायदा लादतात आणि त्याचबरोबर मांगामहाराच्या घरात ताज्या भाकरीचा वास आल्यास त्यांनी चोरी केली असा गुन्हा दाखल करतात.

अशा भीषण आणि बिकट परिस्थितीत माणसातील माणूसपण कायम राखण्यासाठी आणि सन्मानाने जगता यावे यासाठी वस्तीतील वीरपुरुष शर्थीची झुंज देतात. ही सारी माणसं आणि त्यांच्या घडामोडी अण्णाभाऊंच्या अंतस्थः वेदनेची सामग्री होती. जी त्यांच्या अतिसंवेदनशील मनाला सारख्या धडका देत होती, आणि अण्णाभाऊंच्या मनाला सारखा प्रश्न विचारीत होती या गरीब दुबळ्या जीवांनी कोणता गुन्हा केला? अण्णाभाऊ या सतावणार्‍या प्रश्नांची अंतस्थः लढाई लेखणीच्या धारदार अस्त्रांनी आयुष्यभर लढत राहिले.

ब्रिटिश साम्राज्याशी झुंज देणारा अण्णाभाऊंचा बंडखोर ‘फकिरा’ आज विश्वसाहित्यप्रांतात अजरामर झाला आहे. अण्णाभाऊंच्या ‘स्मशानातील सोनं’ या कथेला भारतीय वाङ्मयात तोड नाही. वंचित-नाही-रे वर्गाच्या भूक-दारिद्र्यावर लिहिल्या गेलेल्या विश्वकथासाहित्याच्या मुकुटातील ‘स्मशानातील सोनं’ ही कथा मूल्यवान हिरा आहे, असे विधान केल्यास अतिशयोक्तीचे होणार नाही.

अण्णाभाऊंनी आपल्या प्रतिभा सामर्थ्याने कथा-कादंबर्‍यातील पात्रांना चिरंजीवित्व प्रदान केले. ‘फकिरा’ वारणाकाठच्या सत्तूला (सत्तू भोसले हा महार जातीचा, सैन्यातून आलेला व समाजावरील अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारणारा वाघ) उमा चौघुल्याच्या कचाट्यातून सोडवितो तेव्हा सत्तू फकिराला मिठी मारून म्हणतो, “नाईक! तुम्ही आला म्हणून सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कैक आयाबहिणी हा सारा वारणाकाठ दुवा देईल.”  फकिरा बेडसगावच्या सरकारी खजिन्यावर दरोडा घालतो तेव्हा तिथल्या खजिन्याचा रखवालदार रघुबामण आपल्या बायकापोरींच्या अब्रुसाठी तडफडतो तेव्हा फकिरा रघुबामणाच्या बायकोला म्हणतो, “आई ! थांब, खजिना न्हेणार आहे. तुम्हास्नी ओरबाडाय मी आलो न्हाय. कारण अब्रू खाऊन उपाशी माणसं जगत नसत्यात. जावा आपल्या घरात बसा.”

फकिराची बंडखोरी, त्याची नैतिकता अण्णाभाऊंनी अतिशय कलात्मकतेने व लालित्याने अधोरेखित केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कथा-कादंबर्‍यांतील ‘वैजयंता’, ‘चित्रा’, ‘चंदन’, ‘आवडी’ यांसारख्या कलाकृतीतील दारिद्र्यात रुतलेल्या, व्यवस्थेने जायबंदी केलेल्या अगणित स्त्रियांचा जगण्यासाठीचा आणि स्वतःच्या शीलरक्षणासाठीचा विलक्षण संघर्ष मनाला सुन्न करीत स्त्रीजीवनाचे एक विक्राळ, अभावग्रस्त असे अनोखे विश्व उभे करते.

‘मुंबईची लावणी’ हे शाहिरी वाङ्मयातील अण्णाभाऊंच्या प्रतिभेने साकारलेलं एक अप्रतिम शिल्प आहे. उपहासगर्भतेच्या उत्कट लावण्याने मढलेली ही लावणी काळजाचा ठाव घेत मुंबईच्या गर्भश्रीमंत गर्भातील कष्टकर्‍यांच्या दयनियतेचे भीषण चित्र चित्रित करीत बथ्थड, पढीक मनांना भानावर आणते.

“मुंबईत उंचावरी । मलबार हिल इंद्रपुरी ।

कुबेराची वस्ती तिथे सुख भोगती ।

परळात राहणारे । रात्रंदिन राबणारे ।

मिळेल ते खाऊनी घाम गाळती ।”

(मुंबईची लावणी)

मुंबईवर आजवर चितारल्या गेलेल्या कवनांपैकी अण्णाभाऊंची ही लावणी आजच्या वर्तमानातही मुंबईचं सत्य उजागर करणारी सिद्ध होते.

‘माकडीचा माळ’ ही इथल्या विषम समाजव्यवस्थेच्या शोषक चेहर्‍याचं हुबेहूब चित्र साकारणारी अण्णाभाऊंची प्रतिकात्मक आविष्काराची कादंबरी आहे. स्वातंत्र्यानंतरही देशाच्या मुख्य प्रवाहापासून कोसोदूर असलेल्या विदारक, अगतिक, असहाय अशा वास्तव जीवनाचा प्रत्यय येतो. गावाच्या बाहेर अगदी दूर- माकडवाले, तुरेवाले, भानामतीवाले, नंदीबैलवाले, सापवाले, डवरी, डोंबारी, गोसावी – अशा भटक्यांच्या अठरापगड जातींची माणसं माकडीच्या माळ्यावर एकत्र जमलेली. ही माणसं प्रस्थापित गावाला आपली कधीच वाटत नाही. ती आपल्या समाजाची आपल्या देशाचीही वाटत नाही. ती परकी(य) वाटतात. अशी ही गावाने नाकारलेली, ठोकरलेली, सुरक्षित आणि संपन्न जगण्यापासून कायमच वंचित राहिलेली भणंग माणसं. यांना या प्रस्थापितांनी अव्हेरले असले तरी ते गावावर जीव लावतात. ‘गावाला चार दिवस सुगीचे येवोत, गाव धनधान्याने संपन्न होवो’, अशी मंगल कामना करतात. आणि गावाच्या सुगीतले चार दाणे आपल्या पदरात पडो यासाठी गावावर अवलंबून असलेली ही माणसं- ‘गावाचं भलं तर आपलं भलं’- असं समानतेचं तत्त्वज्ञान जोपासतात. परंतु गावप्रमुख सत्ताप्रमुख या भणंग माणसांच्या जत्रेला आपल्या टाचेखाली ठेवतो. या सर्ववंचित माणसांजवळ जे जे सत्यम, शिवम्, सुंदरम् असेल ते सर्व गावप्रमुख आपल्या हक्काचं समजतो, नव्हे ते माझ्याच मालकीचं आहे अशा अधिकारानं ओरबाडून घेतो. किंबहुना या भणंग माणसांनी ते स्वखुषीने स्वहस्ते गावप्रमुखाला अर्पित करावं असा दंडक या भणंग माणसांना पाळावा लागतो. आजचे समाजवास्तव याहून वेगळे नाही.

आयुष्याच्या उत्तरार्धात अण्णाभाऊंची नाळ बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाशी जुळल्याचे अनेक संदर्भ त्यांच्या लेखनात आढळून येतात. ‘सापळा’, ‘उपकाराची फेड’ या कथा तसेच ‘फकिरा’ या कादंबरीतून आंबेडकरी तत्त्वज्ञानाची प्रतिती दृगोचर होते.

फकिरा तीव्र स्वरात आपल्या सवंगड्यांना म्हणतो – “मेलेलं मेंढरू आगीला भीत न्हाय… …उद्या मरायचं, त्ये आज मरू या! पन जरा मानसावानी नि हिमतीनं! पंत म्हनीत, एक राजा हतं झाला.. त्यो राजा म्हनत व्हता, शेळी म्हूनशान शंभर वर्स जगन्यापरास वाघ हूनशान एक दिस जगावं. आनी त्येच खरं हाय. वाघच होऊ या नि वाघासारखं मरू या!” – हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना गुलामीविरुद्ध बंड करण्याचं तत्त्वज्ञानाची अण्णाभाऊ ‘फकिरा’त अत्यंत सूचकपणे पेरणी करतात.

अण्णाभाऊंनी आपल्या कथा-कादंबर्‍यांतून निर्मिलेलं भाषेतील लालित्य, नादमाधुर्य आणि माणुसपणाचं तत्त्वज्ञान हे सर्व एकूण मराठी कथा-कादंबर्‍यांच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस सिद्ध होतात. वानगीदाखल काही दाखले पाहता येईल –

“मांगांची आणि महारांची ती दोनशे घंरं त्या काटेरी निवडुंगाच्या कड्यात गांगरून बसली होती. गंभीर शांतता नांदत होती. वार्‍याच्या झपाट्यानं ते निवडूंग करकरत होतं. जणू काही वातावरण दाणेच खात बसलं होतं. मध्येच एखादं धुबड धुत्कार करून भीतीला उठवीत होतं. तिथं माणसाचं अस्तित्व नि शब्द त्या काट्यात रांगत होते.”

“मांगवाड्यात मनं भुईसपाट झाली होती. राहीबाई, राधा, फकिरा, साधू यांच्या डोळ्यांपुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं. त्यांची गावकी आक्रोश करीत होती. कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता. किंवा बुडून मरणार होता.”

“मुरा, सहदेव, तायनू महार हे कर्ते पुरुष धान्य वाटीत होते. बुट्या पळत होत्या. मांगामहारांच्या घरात एक वेगळा आनंद पैदा झाला होता. कित्येक दिवस निपचीत पडलेली जाती जीव आल्याप्रमाणं घरघरत होती. थंड चुलींना उबारा आला होता. किती तरी दिवसांनी आज प्रथमच तवे जाळ खाऊन तापत होते.”

“निरभ्र आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. चांदण्यांचा रूपेरी रस त्या विशाल वनराजीवर ओसंडत होता. ती किर्र झाडी शांत भासत होती आणि तो महाराष्ट्राचा बंडखोर आत्मा सह्याद्री अचल बसला होता. आज युगानुयुगं त्यानं कैक बंडखोरांना त्या एका जागी अचल बसूनच अमोल साहाय्य केलं होतं. तो देशभक्तांचा अग्रणी, तो मराठी शाहिरांचा स्फूर्तिदाता आज जणू फकिराचा शब्द न् शब्द ऐकत होता आणि गालांत हसत होता. त्यानंच कैक देशभक्तांना आपल्या कुशीत जागा दिली होती आणि कैक बलाढ्य पुंडांना, आक्रमकांना गारद केलं होतं. तो महाराष्ट्राचा कुलदैवत सह्यगिरी आज भलताच शांत नि गंभीर भासत होता.”

“माझ्या पोटात बाळ हाय. मला मारू नगा. मी मरेन. मी परत हात लावनार न्हाय ऽच्च!”

महारणीच्या त्या किंकाळीनं सत्तूचं काळीज पेटलं. तोच चौघूला पुढ जाऊन म्हणाला,

“वराडतीस? मग वरडच तर–”

“…मांग खून करीत न्हाय. मानसं मारून आमचं प्वाट भरत न्हाय. उलट मानसं जगावी, त्येंनी शेती पिकवावी आन आम्ही शेंडागोंडा आनून जगावं असंच आमास्नी वाटतं!”

“एक दाना गैर वाटू नगा.” फकिरा म्हणाला, डाव घ्या आनि डावीनं सारखं वाटा. एक दाना एका मानसाला एक दिवस जगवील, ह्ये इसरू नगा!”

“मी सरळ तमाशा करीन नि सरळ जाईन. दुसरं मला मान्य नाही. तमाशा म्हणजे माझ्या देहाचं नग्न प्रदर्शन नव्हे! जनतेची मालकी माझ्या कलेवर-शरीरावर नाही!”

“मी गरीब आईची लेक, तमाशावालीची मुलगी म्हणून मी तुझी शेज सजवलीच पाहिजे, ही तुझी अघोरी इच्छा मला मान्य नव्हती. त्या इच्छेसाठीच तू हा असा माणसातून उठून जनावरात जमा झालास!”

“निखार्‍याच्या राशीत सोन्याची किंमत निश्चित होत असते.”

“माणूस पेरलं तर माणूस उगवतं…”

अण्णाभाऊंचा पैस फार व्यापक व वैश्विक होता. जगभरात त्यांच्या साहित्याचा चाहता वर्ग दिसून येतो. अण्णाभाऊ केवळ सांगण्यापुरते कॉम्रेड नव्हते, तर वंचित-नाहीरे वर्गाचे जीवनतत्त्वज्ञानाची रोवणी व पेरणी आपल्या कलेमधून सातत्याने करणारे ते कुशल शब्दशिल्पकार होते. त्यांनी आपली जमीन कधी सोडली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते आपल्या जमिनीवर पाय रोवून कलेची आराधना करीत राहिले. सिनेसृष्टीतील गीतकार शैलेंद्र, ए. के.  हंगल, बलराज साहनी, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलावंतांसोबत त्यांचे निकटचे व मैत्रीचे संबंध होते. नर्गिस तर त्यांना आपला मोठा भाऊ मानायची.

कलेच्या प्रांतात आपल्या शब्दांच्या आयुधांचा उपयोग करून महाराष्ट्रदेशीच्या सुजलाम् सुफलामतेची स्वप्ने पाहणार्‍या एवढ्या मोठ्या उंचीच्या कलावंताची महाराष्ट्रातील जात्यांध-धर्मांध साहित्यिकांनी-समीक्षकांनी अक्षम्य हेळसांड केली, उपेक्षा केली. याच्यासारखा करंटेपणा दुसरा नाही. असे असले तरीही आज सार्‍या विश्वात हा लाल तारा आपले निळे आकाश कवेत घेऊन आपले –  “जग बदल घालुनी घाव । सांगुनी गेले मला भीमराव ॥” कवण सिद्धास नेतोच आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0