‘जब वी मेट’मधील गीत, आदित्यला म्हणते, "तू तर आयुष्याकडे गंभीरपणे बघितले होतेस त्याचा काय उपयोग झाला? तरी देखील प्रॉब्लेममध्ये सापडलास ना? पुढे काय होणार हे कोणालाच हातात नसते. अशावेळी माझे मन मला जे सांगते, तेच मी करते.
तुमच्याकडे ‘जगण्याचा परवाना’ आहे का ? असे कोणी विचारले तर ..
आपण म्हणू हा काय वेडेपणा आहे! गाडी चालवण्यासाठी परवाना लागतो. ते ठीक आहे पण ‘जगण्याचा परवाना’?
प्रिया कुमार यांचे ‘License To Live’ नावाचे पुस्तक आहे. त्यात काल्पनिक कथेव्दारा ही नवीन संकल्पना मांडलेली आहे. कथेतील प्रियाकडे परिश्रमाने मिळवलेलं यश, पैसा, नावलौकिक सर्व असते तरी सुद्धा आतून काहीतरी उणीव, कमी भासत असते. प्रिया एका ‘आयुष्य बदलवणाऱ्या’ कार्यशाळेत सहभागी होते. त्यात तिला आठ दिवस निरनिराळ्या ठिकाणच्या प्रवासास पाठवले जाते.
या अभूतपूर्व प्रवासात प्रियाचे आयुष्य बदलून जाते. त्यात होणाऱ्या प्रवासात स्वतःभोवतीची चौकट तुटायला सुरवात होते. स्वतःचा खरा शोध घेऊन, पाठीवरील, मनावरील भूत, भविष्याचे जड ओझं फेकून, अंतर्मनातील क्लिष्ट गुंतागुंतीतुन मोकळा श्वास घ्यायची प्रक्रिया होते. वर्तमानात जगण्याची प्रगल्भता येते.
आयुष्यारुपी गाडीच्या ड्राइव्हर सीटवर स्वतः बसून स्टेअरिंग व्हीलची जबाबदारी स्वतः घेतल्यावर हा ‘जगण्याचा परवाना’ आपोआपच मिळतो. त्यामुळे जगण्याचे मार्ग सुखकर, बहारदार भासतात आणि आपण ‘आनंदयात्री’ होऊन जातो. ही या पुस्तकाची रूपरेषा.
या पुस्तकाची संकल्पना अधिक सुस्पष्ट करण्यासाठी उदाहरणादाखल चित्रपटातील जगण्याचा परवाना जवळ बाळगून ‘आनंद यात्री’ असलेल्या काही व्यक्तितेखा आठवल्या. या व्यक्तिरेखा आयुष्याचे वेगळे तत्वज्ञान अगदी हसत- खेळत सांगतात. निखळ करमणुकीतून आपले दृष्टिकोन बदलायला लावण्याची ताकद या व्यक्तिरेखांमध्ये आहे. त्याच प्रमाणे उदाहरणासाठी घेतलेल्या व्यक्तिरेखाचा वेगवेगळ्या कारणाने प्रवास सुरू असतो.
आयुष्य प्रवाही आहे हे दर्शवतात..
‘जब वी मेट‘ मधील गीत (करीना कपूर) नावाची अफलातून व्यक्तिरेखा आठवा. ‘अपने आपकी फेव्हरेट हूँ’ म्हणणारी, सतत उत्साही, बडबड करणारी गीत सहजरित्या आनंदी जगण्याचे फंडे सांगत असते. सुखी कसे व्हायचे? याचे २१मंत्र ती सांगत बसत नाही. तिची आख्खी व्यक्तिरेखाचं जगणं शिकवत असते. नैराश्यात गेलेल्या आदित्यला तिच्या उल्हसित, प्रफुल्लित सहवासात ‘जगण्याचा परवाना’ मिळतो.
जगताना आपल्या मनासारखं जगता येत नाही किंवा निर्णय घेता येत नाही याची खंत जवळपास सर्वाना असते. तिच्या बेधडक निर्णय घेण्याबद्दल आदित्य ( शाहिद कपूर) म्हणतो, “ज्या पद्धतीने तू आयुष्य हाताळते आहे, त्याचे परिणाम काय होतील हे तुला कळतं का? आयुष्य म्हणजे नुसते हसणे- खेळणे, मज्जा करणे नाहीये. जरा आयुष्याकडे गांभीर्याने बघ.”
गीत म्हणते, “तू तर आयुष्याकडे गंभीरपणे बघितले होतेस त्याचा काय उपयोग झाला? तरी देखील प्रॉब्लेममध्ये सापडलास ना? पुढे काय होणार हे कोणालाच हातात नसते. अशावेळी माझे मन मला जे सांगते, तेच मी करते. उद्या उठून मी कोणाला दोष देत बसणार नाही की माझे आयुष्य तुमच्यामुळे बरबाद झाले. आयुष्य जसं असेल, त्याबाबत हे तर निश्चित माहिती असेल की हे माझ्यामुळे आहे.”
गीतचे हे उत्तर म्हणजे स्वतःच्या निर्णयाची जबाबदारी स्वतः घेणं म्हणजे नेमकं काय ते सांगणारे.
प्रवासात एका ठिकाणी गीत – आदित्य नदीच्या बांधावर गप्पा मारत असताना, नदीत उडी मारायची कल्पना गीत बोलून दाखवते. तेव्हा तो म्हणतो की तू कधी मानसोपचार तज्ज्ञाला( सायकायट्रिस्टला) दाखवले आहेस का? तुला त्याच्या मदतीची गरज आहे. त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गीत आदित्यसह पाण्यात धडामदिशी उडी घेते. या धडाम उडीने, पाण्याच्या स्पर्शाने आदित्यला नंतर खूप हलकं, मोकळे वाटतं..
तो हसत म्हणतो, “तुला मानसिक उपचारांची गरज आहे.”
अनिश्चितता, अनामिक दडपण सतत आपल्यावर असते. त्याला समोर जाण्याची आपली इच्छा नसते. त्यामुळे आपण एकतर भूतकाळात नाहीतर भविष्यकाळात रमत असतो. पुढ्यात असलेल्या क्षणात झोकून देणे गरजेचे.
नदीत उडी म्हणजे ‘क्षणस्थ होणे’.
मनातली अनाठायी भीती जवळ बाळगून तुम्ही समुद्रात माशासारखे पोहू शकत नाही. कमजोर व्यक्तीला समुद्र माफ करत नसतो. तसेच वर्तमान आपल्याला माफ करत नाही.
नदीत उडी मारण्याच्या आधी गीत म्हणते, “अशी संधी परत मिळायची नाही.” सुरक्षित आयुष्य जगणाऱ्यांना गीतचे असे जगणे हे ‘नॉर्मल’ कसे वाटेल?
पुढच्या क्षणाची अनिश्चितता हाच जगण्यातील थरार. रोजच्या कंटाळवाण्या आयुष्यात तेच, तेच घडत असते. आपण ही जगण्याला तोच, तोच प्रतिसाद देत असतो. एका बाजूला भविष्याबद्दलची भीतीयुक्त उत्सुकता असते आणि त्याच वेळी सुरक्षित आयुष्याची घडी मात्र बिघडायला नको असते.
काही लोकं आपल्या दिनक्रमात, आयुष्यात जरा सुद्धा काही इकडे तिकडे झालं तर बिथरतात. ठराविक वर्तुळाचे ते आजीव सभासद असतात. कधी अचानक यांना परिस्थिती वर्तुळाबाहेर फेकते, तेव्हा त्यांना ते पेलवत नाही.
‘चलो दिल्ली’तील कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्चपदी असलेली मिहिका (लारा दत्ता) या वर्तुळाची आदी. चुकीचे प्लेन घेतल्याने जयपूर ते दिल्ली असा गाडीने प्रवास करावा लागतो. तो प्रवास सरळपणे होत नाही. त्यात तिची भेट होते, अघळपघळ वागणाऱ्या मनु गुप्ता (विनय पाठक) या व्यक्तीशी. मिहिकासाठी हा प्रवास अतिशय तापदायक असतो. मिहिका अनेक गैरसोयींमुळे वैतागत, कुरकुरत असते, तर मनू लहान मुलासारखा बागडत असतो, सर्वांशी बडबड करणारा, शिष्टाचाराचा गंध नसलेला, कुठेही नाक खुपसणारा, त्यामुळे गोंधळ वाढवून ठेवणारा एक अतरंगी नमुना. काहीही झालं तरी ‘कौनसी बडी बात हो गयी जी!’ असे म्हणून हसून त्या कठीण गोष्टीचे गांभीर्य घालवणारा. प्रवासात मनु, मिहिकाच्या शिष्टाचारी, परीटघडी जगण्याची पार वाट लावतो. सतत मिळणाऱ्या नव्या धक्क्यामुळे, त्याकडे सहजतेने बघणाऱ्या मनु भाईसाहबमुळे मिहिकाला पण जगणे ‘कौनसी बड़ी बात है जी’ वाटू लागते..
माणूस चौकटीत स्वतःला एकाच जागी अडकवतो. ‘भाकरी का
करपली?, पानं का सडली?, घोडा का अडला? न फिरवल्यामुळे. आयुष्य निरस का वाटतं? चौकट न मोडल्यामुळे…
धाब्यावर सूर्योदय बघत असताना मनु विचारतो, “इतकं काय बघत आहात?
ती म्हणते, “असा सुंदर सूर्योदय मी कधीच बघितला नव्हता.
तो म्हणतो, “त्यात काय तो रोज उगवतो!”
तेव्हा ती म्हणते, “पण त्याच्या सुंदर असण्याची जाणीव रोज होत नसते.’’
कौनसी बड़ी बात हो गयी जी’ हा तकीया कलाम असणाऱ्या हसऱ्या, बडबड्या मनूच्या आयुष्याची एक दुःखाची बाजू असते, याचा शेवटपर्यंत थांगपत्ता लागत नाही. ‘तुम इतना क्यू मुस्कुरा रही हो…’ वाले बळजबरीचे हास्य नसते. आतून स्वीकारलेल्या दुःखाचे रूपांतर दिलखुलास, निर्मळ हास्यात झालेले असते.. दुःखालाही तो ‘कौनसी बड़ी बात हो गयी’ म्हणतो.
दुःखाला, संकटाला सामोरे गेल्यावर त्याची तीव्रता कमी होते. काही गोष्टी अटळ आहेत, त्या बरोबर घेऊन चालावे लागते.
स्वतःला आनंदी होण्याचा उत्तम उपाय म्हणजे दुसऱ्यांना आनंदी करणे. आणि दुसऱ्यांना आनंदी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वतः आनंदी असणे.
असाच ‘जगण्याचा परवाना’ असलेला वर्तमानात जाणारा आनंदी जीव म्हणजे मनू गुप्ता.
भूतकाळ वर्तमानाची मुस्कटदाबी करत असतो…प्रवासात नुसत्या फुफ्फुसांलाचं नाही तर मनाला ही मोकळी, शुद्ध हवा मिळते. आतल्या जखमा या हवेने कोरड्या व्हायला लागतात.
‘हाय-वे’तील वीराचे (आलिया भट्ट) अपघाताने अपहरण होते. घरात तिच्या लग्नाची तयारी सुरू असताना, आपल्या भावी नवऱ्याला रात्री भेटते ते बंदिस्त घरात तिला घुसमटायला होत म्हणून मोकळी हवा खाण्यासाठी. तेव्हा तिचं अपहरण होतं. महाबीरला (रणदीप हुडा) कल्पनाही नसते की किती मोठ्या हस्तीची मुलगी आहे ते!
आणि मग सुरू होतो एक मोठा प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम … अगदी थोड्या अवधीत वीराला हा सर्व प्रवास आवडायला लागतो. ती एका ठिकाणी म्हणते की ‘अरे हे असं मी कधी बघितलं नव्हतं. आम्ही फिरायला गेलो तर बंदिस्त कारमधून, बंदिस्त हॉटेलमध्ये..’
ती बेफान होऊन ही मोकळी हवा पित सुटते.. लहानपणापासूनची एक जखम, ती अक्षरशः तोंड दाबून सहन करत असते. वीराचे एक ‘अंकल’ तिला इंपोर्टेड चॉकलेट देऊन, ‘मेरी प्यारी सुंदर गुडीया’ म्हणत, बाथरूममध्ये नेऊन तिचा लैंगिक छळ करत असतात. तिचे ओरडणे बाहेर जाऊ नये म्हणून तिचे तोंड हाताने दाबून ठेवत असे. हे सर्व ती आपल्या आईला सांगते. पण आईसुद्धा ‘शूsss कुठे बोलू नकोस.’ असे सांगते. त्यामुळे वीराला बंदिस्त जागा सहन होत नसते. अनेक वर्षे दबलेले हुंदके बाहेर पडतात ते अनोळखी महाबीरसमोर.
घरात सतत शहाणी, गुणी, संस्कारी मुलगी म्हणून ओळखली जाणाऱ्या
वीराची ओळख आतापर्यंत दबलेली. गीत, मनुभाईसाहब सारखा महाबीर बडबडा नाही. पण त्यांच्याकडे आश्वासक ऊब असते. वीराचा आतला प्रवास तिचा स्वतःचा असला तरी वीरा वेल होऊन महाबीरसारख्या वटवृक्षाला बिलगते.
ती म्हणते, “तू मला जिथून आणलं, मी तिकडे परत जाऊ इच्छित नाही. जिथे घेऊन चालला आहेस, तिकडे पोहचण्याची इच्छा नाही. पण हा जो रस्ता आहे ना, तो खूप छान आहे. मला वाटतं की हा रस्ता कधीच संपू नये..”
स्वतःशी परिचय होईपर्यंत तिला नकळत देत असलेल्या स्वतःच्या वेगळ्या प्रतिक्रियांबाबत आश्चर्य वाटत असते. स्व-ओळ्ख नसण्याइतकं दुर्दैव कुठले असेल? लादलेल्या रूपापासून सुटका करतांना ती स्वतःशीच बडबडत असते. विस्तीर्ण माळावर एकटी असतांना ती स्वतःला विचारते, “हाय वीरा कैसी हो यार?
त्यावर वेळ घेऊन म्हणते, “सोचकर बताती हूँ…”
आणि मोकळ्या आकाशाखाली हात पसरवून पहुडते. निसर्गाइतका मोठा समुपदेशक दुसरा कोणी नाही!
खरं तर इतके वर्ष वीराच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘अपहरण’ होऊन ती कैदेत असते. तिथून सुटका तर महाबीर करतो. आणि मोकळ्या वातावरणात ‘जगण्याचा परवाना’ तिला बहाल करतो.
प्रवासात आपण पुढे पुढे जात असतो आणि झाडे, टेकड्या, नद्या सर्व मागे मागे जात असतात. काही गोष्टी मागे पडल्याशिवाय पुढे जाता येत नसते.
‘क्वीन‘ चित्रपटात आपले लग्न मोडल्यामुळे भयंकर धक्का बसलेली राणी (कंगना रनौत) एकटीच हनिमूनला निघते. पण या वेडगळ निर्णयामुळे तिचा आतून बाहेरून कायापालट होतो. लहानपणापासून आयफेल टॉवर बघण्याची इच्छा असलेल्या राणीला, तो एकटीने बघतांना रडू कोसळते. ती त्याच्यापासून दूर पळत सुटते. पॅरिसच्या कोणत्याही भागात गेलं तरी त्याचं दर्शन होत राहाते. ते दर्शन तिला पेलवत नसते.
जे सोसत नाही असले, तू दुःख मला का द्यावे ?
परदेशी आपल्या घरचे माणूस जसे भेटावे.. (ग्रेस)
आयुष्यात आलेल्या एकटेपणामुळे स्वतःकडे आतून बघण्याची संधी तिला मिळते. जगण्यातील सुदृढ मोकळेपणा या प्रवासात ती अनुभवते या प्रवासात तिच्या संस्कारी, सुरक्षित जगाला सुरुंग लागतो. बाहेरील जगाविषयीचा बागुलबुवा मुलगी म्हणून तिच्या मनात असतो. राणीला मुलांच्याबरोबर रूम शेअर करायला लागते तेव्हा ती संकुचित विचारांच्या डबक्यात गटांगळ्या खायला लागते. त्याच धडपडीत जगण्याचा अफाट समुद्र तिला सापडतो.
परिकथेच्या जगात अडकलेल्या राणीला वेगळ्या जगाची ओळख होते. तेव्हा ती राजकुमाराच्या प्रतीक्षेत बाळगून ठेवलेला सिंड्रेलाचा एक बूट बेफिकीरीने भिरकावून देते. पायांना सिंड्रेलाच्या बुटांत बसण्याच्या सक्तीतून मोकळं करते. अनवाणी पायाने मोकळ्या अंगणात मुक्त बागडते.
शेवटी आपल्या प्रियकराला, विजयला मिठी मारून ‘थँक्स’ म्हणते. त्याने नकार दिला नसता तर तिचा हा स्व-प्रवास झाला नसता. संकटातून मिळालेल्या संधीमुळे ‘जगण्याचा परवाना’ तिला मिळतो.
विजयचा निरोप घेऊन आत्मविश्वासाने राणी आपल्या घरी जायला निघते…
या आणि अशा बऱ्याच ‘आनंदयात्री’ व्यक्तिरेखा आपल्याला भेटतात असतात आणि शिकवून जातात.
‘जगण्याच्या परवानाचे’ महत्त्व पटवून सांगतात.
कोणत्याही स्वरूपाचा प्रवास हा काही ना काही शिकवत असतो. पायाने, शरीराने केलेला प्रवास मिरवता येतो, थेट दाखवता येतो….
मनाने, बुद्धीने, स्वप्नांनी केलेला प्रवास हा जास्त सशक्त, सजग ठरतो…
मंजिल मिल ही जायेगी एक दिन, भटकते-भटकते ही सही । गुमराह तो वो है, जो घर से निकले ही नहीं ॥
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म निर्मात्या व दिग्दर्शक आहेत.
COMMENTS