तत्त्वचिंतन : उपयोग (Use) की उपयोजन (Application)

तत्त्वचिंतन : उपयोग (Use) की उपयोजन (Application)

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १२ - 'तत्त्वचिंतना'च्या, अनुषंगाने एकूण मानवी 'चिंतना'च्या स्वरूपाचा एक भरीव आढावा आपण याधीच्या काही लेखांमध्ये आपण घेतला. या भागात तत्त्वज्ञानाच्या जगण्यातील उपयोजनाच्या समस्येचे स्वरूप शोधण्याचा प्रयत्न केला आहे. तो शोध असल्याने तो अर्थातच कायमस्वरूपी गतिमान, परिवर्तनशील आणि अधिकाधिक प्रागतिक व त्या त्या काळात आधुनिक असणार आहे. “गतिमान, परिवर्तनशील आणि अधिकाधिक प्रागतिक असणे” हा तत्त्वज्ञानाचा ‘स्व-भाव’ आहे. रसेलच्या समग्र चिंतनविश्वाकडे तत्त्वचिंतनात्मक उपयोजनाचे अद्वितीय उदाहरण म्हणून पाहाता येते.

तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान
बर्ट्रंड रसेलचे तत्त्वज्ञानविषयक मत
तत्त्वचिंतनाचे शत्रू : भारतीय दृष्टीकोन

१-

एकदा अशाच एका सायंकालीन काव्यशास्त्रविनोदफेम ‘रिकामटेकड्या’ क्षणाला बादशहा अकबराला प्रश्न पडला की “जगातील सर्वोत्कृष्ट अस्त्र-शस्त्र कोणते?”

सारे जग जिंकून जगाला आश्रय देणाऱ्या, त्याद्वारे जणू खुद्द जगदीश्वरचं बनलेल्या ‘जहाँपनाह’ हुकूमसाहेबांना असा प्रश्न पडावा, याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. बादशहाला नेमके काय उत्तर द्यावे, हे तसे कुणालाच काही सुचेनासे झाले. मग, नेहमीप्रमाणे दरबारी मंडळी गोंधळात पडली. दिग्मूढ झाला दरबार!

परिणामी मराठा धोप, कर्नाटकी धोप, मराठा तलवार, मुगल तलवार, बुर्जे चिलखत, धनुष्यबाण, चामड्याच्या ढाली, शिरस्त्राण, भाले, बर्ची, जमदाड, तोफगोळे, कुलपी गोळे, दांडपट्टा, विविध प्रकारचे बिचवे, कट्यार, वाघनखे, पाण्यावरच्या विटा, तेगा, वाघनखे, समशेर, अग्नीअस्त्रे, अशी अनेक प्रकारचे शस्त्रे, आणि घोडदळ, हत्तीदळ, अगदी दगडधोंडे पर्यंत विविध उत्तरे दिली गेली. बादशहाला यातील एकही उत्तर पसंत पडले नाही. शेवटी बादशहाने बिरबलाला बोलावण्याचे फर्मान सोडले. तोही आधुनिक पुराणकथेच्या नियमानुसार नेहमीप्रमाणे गैरहजर होता! म्हणजेच मालकाची खुशमस्करी करण्याच्या पवित्र प्रथेच्या विरुद्ध जनतेची कामे करण्यात उर्फ सरकारी कामातच बिरबल गुंतलेला होता. ते सरकारी काम सोडून जाणे, त्याला जीवावर आले होते; पण जाणे आवश्यक होते, नाहीतर जीवावर बेतण्याचा प्रसंग येऊ शकत होता. शेवटी जनतेपेक्षा हा ‘सर्वात मोठा साहेब’ (समोसा) महत्वाचा होता.

दरबारात बिरबल पोहोचला, सम्राट अकबराकडे आणि समस्त दरबाराकडे त्याने पाहिले. सगळे काही चिंताग्रस्त अन हवालदिल पाहून त्याला नेहमीप्रमाणे अंदाज आला की बादशाहाने काहीतरी बौद्धिक खोडसाळपणा केला आहे!

अकबराने प्रश्न विचारल्यावर बिरबलाने उत्तर दिले, ‘‘महाराज, सर्वोत्कृष्ट हत्यार इत्यादी असे काहीही नसते. तुम्ही कशाचा वापर कसा करणार त्यावर ते अवलंबून असते. समरप्रसंगात वेळी हाताला जे लागेल तेच अस्त्र सर्वोत्कृष्ट असते.’’

बिरबलाच्या उत्तराने अकबराचे काही समाधान झाले नाही. तो बिरबलाला ‘‘तू हे सिद्ध करून दाखवशील का ?’’

‘‘उद्याच दाखवतो.’’ बिरबल म्हणाला.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अकबर-बिरबल फेरफटका मारण्यासाठी निघाले. ते बाजारात हिंडत होते. काहीवेळ शांततेत गेला. बादशहा आपला जनता संसार अनुभवत चालला होता.

अचानक बाजाराच्या एका दूरवरच्या टोकाला प्रचंड गोंधळ ऐकू आला. बिथरलेला एक हत्ती बाजारपेठेत कुठून तरी आला होता. तो संतापलेला होता. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तू, माणसाना फेकून देत होता. उधळलेला हत्तीला बघून बाजारपेठेत एकच गोंधळ माजला आणि लोक सैरावैरा धावू लागले. हत्ती आता या दोघांच्याच दिशेने येऊ लागला. हत्यारबंद सुरक्षा सैनिकांना काय करावे, काही सुचेनासे झाले.

हत्ती आता काही अंतरावर आला. तो संतापलेल्या अवस्थेत मोडतोड करीत येत होता.

बादशहा अकबर आणि संरक्षक सैनिक भेदरून, बावचळून गेले होते….

अन्…हत्ती एकदमच थेट समोर आला. अकबराला काय करावे तेच कळेना….

बिरबल मात्र शांत होता.

त्याने इकडे तिकडे पाहिले. सहज हातात येईल असे काही दिसत नव्हते. इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला भेदरून उभ्या असलेल्या कुत्र्याच्या पिल्लावर गेली. काहीही विचार न करता बिरबलाने पिल्लाचे मागचे पाय धरून उचलले आणि गरागरा फिरवून हत्तीच्या अंगावर फेकून दिले. केकाटण्याचा विचित्र आवाज करणारे काहीतरी अचानक अंगावर आल्यामुळे हत्ती तिथल्या तिथे बिचकून थांबला. पिल्लू खाली पडले, वाचले आणि केकाटत पळून गेले.

पण गोंधळलेल्या हत्तीने बादशाच्या दिशेने जाणारा आपला मार्ग बदलला. मोकळ्या रस्त्याच्या दिशेने तो नाहीसा झाला.

संकट टळले…

बिरबलाने अकबराकडे पाहिले. अकबराला साक्षात्कार झाला होता!

-२-

वस्तूचा उपयोग (Use) आणि उपयोजन (Application) या दोन कृतीतील अचूक फरक कथेतून उमगतो. उपयोग आणि उपयोजन या दोन्ही फरक करता येण्याजोग्या भिन्न संकल्पना आहेत, त्यांची प्रात्यक्षिके तो फरक नेमकेपणाने व्यक्त करतात. उपयोग आणि उपयोजन या दोन्ही फरक करता आला तरी त्यांना अलग करता येत नाही. (distinguishable but not separable)

तुमच्या हाती जे काही असेल त्याचा त्या क्षणाला कोणता, कसा, कोणत्या नेमक्या क्षणाला आणि किती प्रमाणात वापर करावा, याचे भान येणे हेच ‘अस्सल हत्यार’ असते; तेच तुमचे शस्त्र असते आणि अस्त्रही असते.

शस्त्र म्हणजे दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी निर्माण केलेले हत्यार आणि अस्त्र म्हणजे स्वसंरक्षणासाठी वापरले जाणारी कोणतीही वस्तू. अनेकदा ती प्रचलित शस्त्रे असतात. गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मुलीना तिखटपूड, मिरच्या, तीक्ष्ण पिना, डोळ्यात मारायचे कसकसले फवारे इत्यादी कायम जवळ ठेवण्याचा आणि संकटकाळी वापरण्याचा सल्ला दिला जातो, ती सारी अस्त्रे म्हणता येतील. तरीही ‘संकटकाळी तुमच्याकडे जे काही असेल त्याचे ‘यथार्थ उपयोजन’ बुद्धि शाबूत ठेवून, शांत मनाने करून तुम्ही तुमचे स्वतःचे केलेले संरक्षण म्हणजे अस्त्र’ असे म्हणणे यथार्थ असते.

शस्त्राचा उपयोग करावा कसा याचे शास्त्र असते. शस्त्रांची साधनसामुग्री, निर्मिती पद्धती, अचूक व भेदक वापर क्षमता, देखभाल इत्यादीचे माहितीपुस्तक असते. ते वाचून कोणीही शस्त्राची माहिती घेऊ शकतो, पण त्यांचे उपयोजन केल्याशिवाय सैनिक होणे शक्य नसते. ‘शस्त्र सार्वजनिक असते’, कोणालाही उपलब्ध होऊ शकते, वस्तुनिष्ठ असते. थोड्याशा प्रशिक्षणाने तुम्ही सैनिक होऊ शकता, शस्त्रपारंगत होऊ शकता. म्हणून तर युद्धात एक सैनिक कामी आला की दुसरा सैनिक त्याची जागा घेऊ शकतो (replenishment, not just replacement). येथे ‘नगाला नग’ एवढाच हिशेब असतो.व्यक्तीवैशिष्ठ्य शून्य असते.

तथापि ‘अस्त्र केवळ तुमचे स्वतःचे’ असते, ते व्यक्तिगत व व्यक्तिनिष्ठच असते. ती तुमची खासगी निर्मिती असते. ती निखळ व्यक्तीविशिष्टता असते, जणू तुमचे ते ‘पेटंट’ असते. तिची उपयोजन पद्धती, तिची परिणामकारकता, क्षमता, भेदकता केवळ तुम्हालाच ज्ञात असते. शत्रूचे स्वरूप, त्याची ताकद, त्याची शास्त्रे इत्यादी पाहून तुम्ही तुमच्या अस्त्राचा वापर करु शकता. साधी लवलवीत गवताची काडी ते ‘विषकन्या’ (चर्मचलन) ही देखील तुमची अस्त्रे असू शकतात. आधुनिक काळात ही व्याप्ती मध्यस्थ, संवादक, समुपदेशक अशीही वाढवता येऊ शकते.

-३-

‘विचार करून उपयोग काय?’, “काय करायचं तत्त्वज्ञान घेऊन?”, “काय उपयोग आहे तत्त्वज्ञानाचा?”, “तुझं तत्त्वज्ञान ठेव बाजूला!”, “तत्त्वज्ञान घेऊन काय खायचंय काय?”, किंवा “हे असलं वांझोटं तत्त्वज्ञान काय कामाचं?” अशी शेलकी शेरेबाजी अथवा “जास्त शहाणपणा करु नकोस !” ही दमबाजी नेहमीच ऐकायला येते. कारण, Philosophy म्हणजे ‘शहाणपणाविषयीचे प्रेम’.

“नेहमीच” या शब्दाला किमान अडीच हजार वर्षांचा जागतिक इतिहास आहे. तत्त्वज्ञानाच्या जन्माबरोबरच तत्त्वज्ञानाच्या उपयुक्ततेविषयीचेही प्रश्न निर्माण झाले. सॉक्रेटीसचा ‘विदूषक’ म्हणून उपहास करण्यापासूनच्या प्रसंगापासून ‘चिंतनाचा उपयोग काय?’ हा प्रश्न विचारला गेला.

“विनोदी नाटकांचा जनक” आणि “प्राचीन विनोदी नाटकांचा राजपुत्र” म्हणून ओळखल्या जाणारा प्राचीन ग्रीक नाटककार आणि कवी अॅरिस्टोफेनीस (Aristophanes इ. स. पूर्व ४४६ ते इ. स. पूर्व ३८६) याने जवळपास चाळीस नाटके लिहिली. एखाद्याला हास्यास्पद बनवण्याची त्याची ताकद इतकी भेदक होती की राज्यकर्तेच काय, पण सामान्य लोकही त्याला घाबरून असत! तो तत्कालिन व्यंगचित्रकारच होता.

अॅरिस्टोफेनीस ने त्याच्या प्रहसनात तत्त्वज्ञानाची आणि तत्त्ववेत्त्यांची मोठी खिल्ली उडवली आहे. त्याच्या The Clouds नाटकात सॉक्रेटीसला तो ‘भुरटा चोर, दांभिक आणि शारीरिक वासनेचा भुकेला” म्हणतो. हे नाटक इ. स. पूर्व ४२३ ला कधीतरी झाले. आणि साहजिकच ते पडले…. कारण सॉक्रेटीस तसा नव्हताच. हे चित्रण चुकीचे आहे, हे प्लेटोने सिद्ध केलेच.

गोष्ट सांगतात की एकदा नाटक चालू असताना अथेन्सबाहेरून बरेच प्रतिष्ठित उमराव, राजे, आणि बरेच नाट्यप्रेमी आले होते. त्या प्रेक्षकांमध्ये “हा सॉक्रेटीस कोण?” अशी कुजबुज चालू होती, तेव्हा ‘मीच सॉक्रेटीस” हे त्यांना सुव्यस्थितपणे, ठळकपणे कळावे म्हणून प्रेक्षकात बसलेला सॉक्रेटीस शांतपणे उभा राहिला!

प्रश्न विचारले जाणे, हे बरोबरच आहे, त्यात चुकीचे काही नाही. किंबहुना, प्रश्नार्थक वृत्ती ही “अथातो तत्त्वजिज्ञासा” चे मूळ आहे, तिचा आदरच केला पाहिजे.

पण “कोणता प्रश्न योग्य प्रश्न असतो” किंवा “कोणत्या प्रश्नाला योग्य प्रश्न म्हणावे?” अथवा “योग्य प्रश्न कोणता?” हाच एक मूलभूत योग्य प्रश्न असतो, हेच अनेकदा विसरले जाते. “योग्य प्रश्न कोणता?” हा यक्षप्रश्न ( A sphinx स्फिंक्सप्रश्न) आहे. अर्थातच त्याचे योग्य व यथार्थ उत्तर देता आले नाही तर उत्तर देणाऱ्याचे भविष्य म्हणजेच त्याचा मृत्यू!’ ही वास्तव व भेदक जाणीव भारतीय ‘उपनिषदे’ आणि ‘महाभारत’, ग्रीक “इलियड व ओडेसी” ही महाकाव्ये आणि Yijing (‘यी-जिंग’- The I-Ching) म्हणजे The Book of Changes, The Analects of Confucius सारखी प्राचीन चिनी महाकाव्ये करून देतात. अशी यथार्थ जीवनदायिनी उत्तरे म्हणे युधिष्ठीर, इडिपस (Oedipus) आणि कान्फ्युशियस यांनीच दिली.

तात्त्विक प्रश्न कोणते असतात, हा एक तात्त्विक प्रश्न आहेच. पण पुढे जाऊन “तत्त्वज्ञानाविषयीचा यक्षप्रश्न कोणता?” हाच एक ‘तात्त्विक यक्षप्रश्न’ आहे. तो जर पूर्वप्रश्न मानला तर त्याचे उत्तर शोधणे हा उत्तरप्रश्न आहे. “काय उपयोग (Use) आहे तत्त्वज्ञानाचा?” हा तत्त्वज्ञानाबाबतचा यक्षप्रश्न नसून “तत्त्वज्ञानाचे नेमके उपयोजन (Application) कसे करावे?” हा यक्षप्रश्न आहे, असे आधुनिक परिप्रेक्ष्यातून म्हणणे योग्य ठरते. अचूक, नेमका प्रश्न नेहमीच अचूक व नेमक्या वेळेला विचारला गेला तर आणि तरच पुढे काहीतरी घडू शकते, याचे भान विकसित करणे ही तपश्चर्या असते.

चिंतनाचा उपयोग काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीही चिंतन करण्याची गरज असते. लागते. तेही चिंतन (philosophical contemplation) असते. उपयोग किंवा उपयुक्तता, फलप्राप्ती ह्या संकल्पनांचा विचार करणे, चिंतन करणे आवश्यक आहे.

उपयुक्तता, फलप्राप्ती संदर्भात पाश्चात्य तत्त्वज्ञानात उपयुक्ततावाद किंवा उपयोगितावाद (Utilitarianism) आणि फलवाद किंवा फलप्रामाण्यवाद (Pragmatism) मांडले गेले आहेत. उपयुक्ततावाद हा नैतिक सिद्धांत आहे तर फलप्रामाण्यवाद कृतीच्या सत्यतेचा, युक्ततेचा आणि अनुषंगे फलप्राप्तीविषयक सिद्धांत आहे. त्यांचा अतिशय थोडक्यात परिचय येथे देतो. तथापि त्यांचे निकष खुद्द ‘तत्त्वचिंतन करणे, तत्त्वज्ञान निर्माण करणे’ या बौद्धिक कृतीला लावता येतात, हे दर्शविणे हाच एक मोठा प्रकल्प आहे, यात शंका नाही.

उपयोगितावाद (Utilitarianism)

‘उपयोग/उपयुक्त’ (use), ‘वापर’ (utility) या शब्दांची भुरळ बहुधा प्रत्येकाला पडते. अनुषंगाने ‘उपयोग/उपयुक्त’ (use) शब्दाचा आधार घेऊन ‘जे उपयोगी किंवा उपयुक्त’ आहे त्याविषयीचे विचार म्हणजे ‘उपयुक्ततावाद’ असे म्हंटले जाते. ‘Utility’ म्हणजे usefulness’, म्हणून ‘Utilitarianism’ चे भाषांतर ‘उपयुक्ततावाद’ असे केले जाते.

एकदाच वापरण्याची वस्तू ते एखाद्या माणसाचा वापर करून त्याला बाजूला सारणे किंवा गरज असेल तर पुन्हा संबंध जोडणे, या अर्थाने ‘वापरा आणि फेकून द्या” (use and throw) असे धोरण गेल्या काही वर्षात अधिक ठळक झालेले दिसते. ‘गरज सरो वैद्य मरो’ ही प्राचीन म्हणही त्यातूनच उद्भवलेली आहे. विशेषतः आर्थिक, राजकीय लैंगिक क्षेत्रात किंवा रोजच्या जगण्यातही हे धोरण आढळते. ‘स्वार्थासाठी वापर’ हे मूल्य अशा धोरणात मानले जाते. म्हणजे ‘उपयोग/उपयुक्त’ (use) या शब्दाला संदर्भानुसार अनेक अर्थ प्राप्त होतात.

तत्त्वज्ञानातील ‘Utilitarianism’ या सिद्धांतात utility हा शब्द पारिभाषिक शब्द म्हणून वापरला जातो. त्यामुळे ‘utility’ या पारिभाषिक शब्दाच्या भाषांतरासाठी पारिभाषिकच संज्ञा उपयोगात आणणे योग्य ठरते. त्यासाठी निश्चित करण्यात आलेली संज्ञा आहे ‘उपयोगितावाद’. थोडक्यात, Utilitarianism’ चे तात्त्विक अर्थाचे मराठी भाषांतर ‘उपयुक्ततावाद’ नसून ‘उपयोगितावाद’ असे केलेले आहे. अर्थात ‘उपयुक्ततावाद’ या शीर्षकाने मराठीत काही लेखन झाले आहेच, तेही चूक नाही.

‘उपयोगितावाद’ हा मूलतः नैतिक सिद्धांत आहे. माणसाची कृती योग्य (right) किंवा अयोग्य (wrong) कशी होते, माणसाची ‘कर्तव्यता’ (obligation/duty) कशाने ठरते, याचा विचार करणारा सिद्धांत आहे. ‘कर्तव्य करणे’ हे माणसाचे नैतिक साध्य आहे, असे हा सिद्धांत सांगतो. आणि ‘कर्तव्य कृती’ चे अनेक प्रकार असतात. त्यामुळे उपयोगितावाद सिद्धान्तानुसार मानवी कृत्यांची युक्तायुक्तता अथवा नैतिकता-अनैतिकता कृत्यांच्या परिणामांच्या चांगले-वाईटपणावरून ठरविली जाते.

उपयोगितावादानुसार ‘सुख किंवा स्वार्थ ही एकमेव जीवनाचे ‘साध्य’ आहे, तेच जीवनाचे मूल्य आहे. सुख, हे सुख आहे म्हणूनच माणूस त्यांची इच्छा व्यक्त करतो. साधारणतः कोणतीही वस्तू, व्यक्ति, घटना, पदार्थ त्यांच्यापासून मिळणाच्या सुखामुळे आपण इष्ट मानतो. पण ती सुखाची केवळ साधने आहेत, ते सुख नाहीत. तर, ‘सुख’ ही स्वतःच इष्ट आहे. आपली हवी ती इच्छा पूर्ण झाली की आपल्याला सुख लाभते. सुख हेच मानवी जीवनाचे एकमेवाद्वितीय उपयुक्त, उपयोगी साध्य आहे. “माझे सुख मी मिळविणे, हे माझे कर्तव्य आहे” या मांडणीपासून ते “समाजाच्या सुखासाठी सर्वांनी झटावे, ते प्रत्येकाचे कर्तव्य ठरते” या मांडणीपर्यंत उपयोगितावादाचा विकास १८ व्या आणि १९ व्या शतकात झाला. त्या साऱ्या संबधित सिद्धांतांच्या उपयोगितावादी समूहाला ‘सुखवाद’ (Hedonism) असेही नाव आहे.

हा सुखवादी उपयोगितावाद प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. प्राचीन ग्रीसमधे एपिक्युरस (Epicurus) ने आणि भारतात चार्वाकाने त्या वादाचा पुरस्कार केला होता.

अर्वाचीन काळात जेरेमी बेन्थॅम (१७४८–१८३२), जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–१८७३) व हेन्री सिज्विक (१८३८–१९००) या तीन ब्रिटीश उपयुक्ततावाद्यांनी ‘सुख हेच माणसाचे हित’ असते, हा सिद्धांत निरनिराळ्या रीतींनी मांडला. निसर्गाने माणसाला ‘सुख आणि दुःख’ या धन्यांच्या अधिपत्याखाली ठेवले आहे, असा बेन्थॅमचा मध्यवर्ती सिद्धांत होता. बेन्थॅमच्या मते, व्यक्तीचे सुख, कल्याण यांची वाढ करणारा आणि दुःख-दुरितापासून वाचविणारा वस्तूचा ‘उपयुक्तता’ (Utility) हाच गुणधर्म असतो. हे उपयुक्ततेचे तत्त्व नीती आणि कायदा यांच्या क्षेत्रात ते सर्वांना आधारभूत असते. ते सिद्ध करण्याच्या पलीकडे असते.

बेन्थॅम त्याच्या Introduction to the Principles of Morals and Legislation (१७८९), या ग्रंथात त्याने ही मांडणी केली. त्याचा शिष्य जॉन स्टुअर्ट मिल् याने आपल्या Utilitarianism (१८६३) या छोटेखानी ग्रंथात त्याचा आणखी विस्तार केला. हेन्री सिज्विक यांनी Methods of Ethics (१८७४) या ग्रंथात ‘सार्वत्रिक सुखवाद’ मांडून सिद्धांत कळसाला पोहोचविला. हे तीन ग्रंथ उपयोगितावादाचे अभिजात साहित्य मानले जाते.

फलवाद’ (Pragmatism)

‘फलवाद’ किंवा फलप्रामाण्यवाद (Pragmatism) ही व्यवहारी वृत्तीच्या अमेरिकी मानसिकतेची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिति आहे. Pragmatism हा शब्द चार्लस पिअर्स (Charles Sanders Peirce १८३९ -१९१४) या अमेरिकन तत्त्ववेत्ता आणि गणितीने “How To Make Our Ideas Clear” या त्याच्या लेखांत १८७८ साली प्रथम वापरला. प्राचीन ग्रीक संज्ञा ‘pragma ‘ (व्यवहार) पासून Pragmatism आणि praktikos पासून ‘practice’ and ‘practical’ हे शब्द बनतात.

फलवादाचे उपयोगितावादाशी बरेच साम्य आहे. अनेकदा दोन्ही शब्द समानार्थी वापरले जातात, पण त्यांचे मूळ तात्त्विक अर्थ वेगवेगळे आहेत.

एखाद्या सत्य म्हणून दावा केलेल्या संकल्पनेची अथवा सिद्धांताची सत्यता, युक्ता कशी ठरवायची? तर जी कृती माणसाला यश किंवा अपेक्षित फल देते, ती कृती सत्य मानावी. कृतीचा परिणाम ‘यश’, ‘फलप्राप्ती’ देणारा असेल तर आणि तरच ती कृती सत्य व युक्त समजावी, असे सांगणारा सिद्धांत म्हणजे फलवाद.

पिअर्सच्या “आपल्या कल्पना कशा स्पष्ट कराव्यात” या लेखाच्या शीर्षकानुसार ‘फलवाद’ या शब्दाचा आशय ‘संकल्पनांचा अर्थ निश्चित करण्याची एक पद्धती’ असा होता. त्यानुसार एखादी तात्त्विक संकल्पना किंवा सिद्धान्त मांडताना तिला फलदायी व्यावहारिक बाजू असू शकेल, असे पाहिले पाहिजे. फलवाद एक विचार करण्याची पद्धती आहे, आणि तिचे उद्दिष्ट संकल्पना स्पष्ट करणे हे आहे. विचारवंत मांडत असलेल्या संकल्पनांचा अर्थ नेमका कोणता आहे, याची खात्री करून घेण्याचे ते केवळ तंत्र (Technique) आहे.

पिअर्सच्या मते, वस्तूंच्या ‘ज्या संकल्पना आपण तयार करतो त्यांचे व्यावहारिक परिणाम कोणते आहेत हे लक्षात घ्यावे, आणि नंतर ते परिणाम म्हणजेच त्या वस्तूची समग्र संकल्पना समजावी’ आणि जर ती संकल्पना फलदायी ठरत असेल तर ती सत्य व युक्त समजावी. हे कार्य वैचारिक पातळीवर आधी करायचे असते; त्यासाठी तातडीने कृती करावी, असे नाही.

पिअर्सच्या मते फलवाद दोन पातळीवर समजून घ्यावा लागतो. प्रथम आपण अमूर्त संकल्पना करतो, तिचा अर्थाची कल्पना करतो. मग नंतर तिची सत्यता पारखण्यासाठी कृती करतो. ही प्रक्रिया अशी घडते:

प्रथम आपण संकल्पनांचे अर्थ निश्चित करण्याण्यासाठी आपण त्या संकल्पनेचे संभाव्य परिणाम कोणते आहेत किंवा असू शकतील, याची कल्पना करतो. त्यावेळी परिणाम जाणण्यासाठी आपणांस प्रत्यक्ष कृती करण्याची आवश्यकता नसते. ती संकल्पना यशदायी, फलदायी असावी, अशी आपली इच्छा असते. पण अमूर्त पातळीवर तिच्या फलाची शाश्वती नसते. ती कशी तपासणार?

तर, नंतर त्या संकल्पनेला अपेक्षित असलेल्या कृतींच्यामार्फत आपण ‘सत्ते’ ला, म्हणजे भौतिक-मूर्त जगाला ती संकल्पना ‘लावून’ (apply) पाहातो, ती वास्तवात येईल का आणि अपेक्षित फल देईल का, हे तपासतो. ते तपासण्यासाठी आवश्यक असलेली कृती करतो. जर ती कृती यशदायी ठरली तर ती संकल्पना सत्य समजावी, अन्यथा असत्य समजावी.

पिअर्सच्या केवळ अमूर्त पातळीवर कोणत्याही संकल्पनेची व्याख्या करता येत नाही. मूर्त परिस्थितीत तिला संपूर्ण अर्थ प्राप्त होत असतो. संकल्पनेचा अर्थ आणि सत्यता ठरविण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष कृतीचा निकष लावला पाहिजे. कृती करत असताना संकल्पनांचा अर्थ तयार होत असतो. तो संकल्पनांचा विकास असतो. त्या विकासाच्या प्रक्रियेत संकल्पनांना कृतींच्या व प्रत्यक्ष कार्याच्या संदर्भात कसे अर्थ प्राप्त होत असतात, हे विचारपूर्वकपणे समजून घेणे हे तंत्र म्हणजे फलवाद. संकल्पनेला यशदायी आशय प्राप्त होण्यासाठी त्या संकल्पनेवर वेगवेगळ्या परिस्थितीत प्रयोग करावा लागतो. त्यामुळे संकल्पना अर्थपूर्ण होते.

थोडक्यात, पिअर्स कृती दुय्यम आहे आणि संकल्पना प्रथम आहे. सर्वोच्च आदर्श कृती करणे हा फलवादाचा हेतू नसून कृतीच्या साह्याने विकासाच्या क्रमात संकल्पनांना कृतींच्या व प्रत्यक्ष कार्याच्या संदर्भात कसे अर्थ प्राप्त होत असतात, हे बौद्धिकदृष्ट्या समजून घेणे हा आहे. हा पिअर्सचा ‘बौद्धिक पातळीवरील फलवाद’ होता.

फलवादाची सुरुवात पर्सने जरी अतिशय मर्यादित हेतू ठेवून केली. पण अमेरिकेत विल्यम जेम्स (१८४२-१९१०) व जॉन ड्यूई (१८५९ -१९५२) यांनी व इंग्लंडमध्ये एफ. सी. एस. शिलर (Ferdinand Canning Scott Schiller) याने त्याचे स्वरूप अतिशय व्यावहारिक केले, त्यामुळे हा सिद्धांत फार लोकप्रिय बनला. तिला नीति व धर्म यांच्याबाबत ‘उपयुक्त’ असणारी सत्यविषयक उपपत्ति असे स्वरूप दिले. ‘जी फल देईल ती कृती म्हणजे यशस्वी कृती’ असे ढोबळ स्वरूप मांडले गेले. आणि ती निर्दय व्यावहारिक बनली.

जेम्सच्या मतानुसार जे ‘उपयुक्त’ असते म्हणजेच ‘सत्य’ (true) होय. जे स्वीकारल्याने यश मिळते ते सत्य आणि जे न स्वीकारल्याने अपयश येते ते ‘असत्य’ (false). परिणामी ‘परमेश्वर’ , ‘स्वातंत्र्य’ इत्यादी संकल्पनांना अनुभव देणारे वास्तव असो व नसो, त्या संकल्पना जर उपयुक्त असतील तर सत्य मानाव्यात, असा समज पसरला. (अर्थात जेम्स ईश्वर मानतो, त्याचा ईश्वर माणसाला उपयोगी पडणारा आहे.) पिअर्स संकल्पना फलावर परिणाम कसा करते याचा विचार करतो तर जेम्स परिणाम यशस्वी होईल ना, हेच पाहातो. सत्य मानव निर्मित आहे, असे तो मानतो.

शिलरच्या मते ज्या कल्पना व विश्वास एका व्यक्तीला फलदायी ठरतील त्या दुसऱ्या व्यक्तीला फलदायी ठरेल, असे नाही. एका माणसाला जे अमृत असेल ते दुसऱ्याला विष ठरू शकेल. निकोप प्रकृतीच्या माणसाला जे खाद्य पौष्टिक ठरेल ते आजाऱ्याला घातक ठरू शकेल. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून स्वतःला मानवेल तसा, आपल्या वृत्ति-प्रवृत्तीनुसार, हितानुसार व पिंडानुसार जगाचा अर्थ लावीत असते. म्हणजे प्रत्येक व्यक्त स्वतःस अनुकूल असणारे असे स्वतःपुरते व वैयक्तिक सत्य घडवीत (Creates) असते. जगाच्या येणाऱ्या अनुभवानुसार ती जगाविषयीची व स्वतःची कल्पना व प्रतिमा तयार करीत असते. त्यानुसार अनुभवांना आकार देऊन त्यांचा अर्थ लावीत असते. सहाजिकच जितकी माणसे तितकी जगे आणि तितकी विविध प्रकारची सत्येही असतात. तरिही असंख्य व्यक्तींना एकाच आणि साधारण व सामाइक समाजजीवनात जगावयाचे असल्याने विविधता सांभाळूनही त्यांना सर्वांना साधारण व सामाइक सार्वजनिक कल्पना, सत्ये आणि प्रमाणे ठरवून ती स्वीकारावीच लागतात.

शिलरच्या मते, त्यातूनच म्हणजे केवळ व्यावहारिक आणि फलवादी हेतूनेच ‘सार्वजनिक सत्य’ (Public Truth) निर्माण होते. जोपर्यंत एखादे सत्य लोकांना जगण्यास साहाय्यक, पोषक आणि मार्गदर्शक ठरते तोपर्यंतच ते सत्य राहू शकते व स्वीकारले जाऊ शकते.जेव्हा एखादे सत्य केवळ काही थोड्या व्यक्तींनाच लाभदायक न ठरता मोठ्या प्रमाणावर अनेकांना लाभदायक व उपयुक्त ठरते तेव्हा अधिक लोकांकडून सामाजिक पातळीवर त्याचा स्वीकार होऊन ते सार्वजनिकही ( Public ) बनून स्वीकृत होते, आणि असे नवे समाजोपयोगी, समाजहितकारक सत्य संपूर्ण समाज स्वीकारतो; आणि असा मनुष्य दूरदृष्टीचा , प्रतिभावंत नेता आणि प्रेषितही समजला जाऊ शकतो. या संदर्भात त्याचे एक अप्रकाशित व्याख्यान Flowers in the Desert अतिशय लोकप्रिय झाले आहे.

शिलरच्या दृष्टीने फलवाद हा मानवतावादाचेच नवे अभियोजन आहे. ‘माणूस हाच सर्व वस्तूंचा मानदंड आहे’ या प्राचीन उक्तीच्या आधारे त्याने त्याचा फलवाद मांडला.

शिलरच्या दृष्टीने फलवाद हा मानवतावादाचेच नवे अभियोजन आहे. ‘माणूस हाच सर्व वस्तूंचा मानदंड आहे’ या प्राचीन उक्तीच्या आधारे त्याने त्याचा फलवाद मांडला.

जॉन ड्युईने “अन्वेषण” (inquiry) किंवा “चौकशी” संकल्पना मांडली. एखादी समस्या आपल्यापुढे आहे, असे आहे म्हणणे याचा अर्थ ती परिस्थिती कोणत्या तरी प्रकारे असमाधानकारक असते. ती असमाधानकारकता काढून टाकण्यासाठी तिचा सखोल तार्किक तपास करावा लागतो. ते ‘अन्वेषण’ असते. त्या असमाधानकारक परिस्थितीची पुनर्रचना करून तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करणे हे चौकशीचे उद्दिष्ट असते. अन्वेषण करून त्या परिस्थितीचे तिच्या घटकांत वेगळे परस्परसंबंध स्थापित करून, तिच्यात गर्भित असलेल्या शक्यतांचा विकास करून, चौकशी तिचे समाधानकारक परिस्थितीत परिवर्तन करावे लागते.

समस्या विज्ञान, कला, नीती, समाजकारण किंवा व्यक्तीचे जीवन अशी कोणत्याही क्षेत्रातील असली अन्वेषणाचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती सारखीच असतात. ‘चौकशी’ ही बौद्धिक कृती असते आणि तिचे फलित अधिक समाधानकारक, सुसंगत, सुस्पष्ट, सुरचित, जिच्यातील उणिवा भरून काढल्या आहेत अशी परिस्थिती निर्माण होण्यात असते. ह्या नव्या रचनेला ड्यूई ‘सत्य’ म्हणतो. “सत्य म्हणजे ‘प्रमाणित प्रतिपादन (warranted assertion)’ ” अशी सत्याची व्याख्या ड्युई देतो. ([Warranted assertion] is preferred to the terms belief and knowledge [because] it is free from the ambiguity of these latter terms, and it involves reference to inquiry as that which warrants assertion. When knowledge is taken as a general abstract term related to inquiry in the abstract, it means “warranted assertibility.”) ही नवी रचना संकल्पना, विधाने, अभ्युपगम या रुपात मांडली जातात. त्यांना ड्युई ‘साधने’ (Instruments) म्हणतो. म्हणून ड्यूई आपल्या भूमिकेला ‘साधनवाद’ (Instrumentalism) म्हणतो.

अर्थात् पिअर्सला फलवादाची ही रूपे पसंत नव्हती, म्हणून त्याच्या स्वतःच्या सिद्धांताला ‘pragmaticism’ असे नवीन नाव दिले.

तत्त्वज्ञानातील एक पंथ किंवा आंदोलन म्हणून फलप्रामाण्यवाद ओसरला आहे. त्याचीच जागा आता जणूकाही “उपयोजनवाद’ ने घेतली आहे.

-४-

विसाव्या शतकाच्या आधुनिक किंवा खरे तर उत्तराधुनिक कालखंडात तत्त्वज्ञानात तत्त्वज्ञानाच्या उपयुक्तेविषयी नव्याने उपस्थित केला गेलेला यक्षप्रश्न म्हणजे “तत्त्वज्ञानाचे नेमके उपयोजन (Application) कसे करावे?” याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु.

या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून अर्थातच होत आले आहेत. अॅरिस्टॉटलच्या मते तत्त्वज्ञान ‘उपयोगी’च असते तर विसाव्या शतकातील विदुषी आणि प्रसिद्ध स्त्रीवादी व ‘मानवी प्रजननफलन आणि भ्रूणविकासशास्त्र कायदा १९९०’ ची कर्ती ब्रिटीश तत्त्ववेत्ती मेरी वॉरनॉक (Mary Warnock १४ एप्रिल १९२४—२० मार्च २०१९) हिच्या मते, समग्र तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र हे नेहमी उपयोजितच असते. त्यांच्या मते, तत्त्वज्ञान हे अखंड वस्त्र असून ते पिढ्यानपिढ्या अनेकांनी विणत आणले आहे. विणणाऱ्या लोकांत जसे तत्त्ववेत्ते, विचारवंत, वैज्ञानिक ही विशेषाधिकार असणारी मंडळी आहेत, तशीच सर्वसामान्य माणसेही आहेत. यात सर्वसामान्यजनांचा सहभाग महत्त्वाचा व मौलिक असतो, हा प्राचीन वस्तुपाठ आहे. त्यांच्या मते, “तत्त्वज्ञान हा एक अतिशय उच्च दर्जाचा पण सर्वसामान्य तऱ्हेचा शोध आहे. तो असा खेळ आहे की, यात कुणीही, अगणित माणसे भाग घेऊ शकतात”

भारतात प्राचीन काळापासून चिंतनाचा उपयोग की उपयोजन हा प्रश्न वादग्रस्तच आहे. एकतर मुळात चिंतनक्षेत्र सर्वसामान्य बहुजनांसाठी खुले नव्हते. ते खुले असण्याचा काळ कदाचित उपनिषद काळ असावा. दर्शनांच्या बंदिस्त रचनेनंतर आणि मनुस्मृती, धर्मशास्त्रे इत्यादी रचली गेल्यानंतर चिंतनक्षेत्रावर जणू CCTV लावले गेले. ते प्रतिबंधित क्षेत्र बनले. पण ग्रीक चिंतनाची सुरुवातच बाजारपेठेतून झाली. ती सॉक्रेटीसने केली. भारतात तत्त्वचिंतनाची कुचेष्टा झालीच नाही, कारण कुचेष्टा करण्याची संधी मिळावी, असे मुळात ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेले नव्हते. शंबूक इत्यादी निवडक प्रयत्नकर्त्यांचे राजकीय खूनच झाले. सामाजिक कुचेष्टा होण्याची संधी साधारणतः १९६० नंतर लोकांना मिळाली, कारण एकूण शिक्षणच चेष्टेचा विषय झाले होते. त्यात तत्त्वज्ञानाचे भारतीय विद्यापीठांमधील अभ्यासक्रम भारतीय वेदांत आणि पाश्चात्य वेदांत म्हणजे प्लेटो, हेगेल, ब्रॅडली इत्यादी चैतन्यवादी स्वरूपाचे मुख्यतः आध्यात्मिक समजले जाणारे होते. नीतिशास्त्र असले तरी नैतिक जीवन म्हणजे धार्मिक जीवन अशी मांडणी असल्याने भारतीय समाजात नवे प्रश्न तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात उपस्थित केलेच गेले नाहीत. हे सारे अभ्यासक्रम रोजी-रोटी अथवा ‘करियर’ साठी नव्हते.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकही अगदीच पठडीबंद आणि झापडबंद असल्याने ते विद्यार्थ्यांना नवे काही देऊच शकत नव्हते. शिवाय सारे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असे, मराठी माध्यम अगदीच गेल्या १९८० पासून सुरु झाले. पण मूलतः इंग्रजीच कच्चे असल्याने कुणीतरी तयार केलेल्या मराठीतील ‘टिपणे’ हाच ज्ञानाचा मोठ्ठा स्रोत होता. (आजही परिस्थिती फारशी स्पृहणीय नाही!) तत्त्वज्ञानाला विद्यार्थी मिळविण्यासाठी तत्त्वज्ञानाचे महत्व ‘उपयोजना’ च्या परिभाषेत समजावून सांगणे अध्यापक मंडळीनाच काय पण तत्त्ववेत्त्या ही शक्य झाले नाही, आणि आजही होत नाही, हे दुर्दैवाने खरे आहे.

ही गेल्या काही वर्षांमधील ग्रामीण भागातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि तत्वज्ञानाची अवस्था होती, असे नव्हे तर विकसित समजल्या जाणाऱ्या शहरी भागातही हेच चित्र होते आणि आजही आहे! तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आणि विचारवंत मे. पुं. रेगे त्यांच्या “माझी तत्त्वज्ञानाची वाटचाल” या आत्मकथनात तत्त्वज्ञानाच्या शहरी प्राध्यापकांची करुणावस्था कथन केली आहे. ते म्हणतात, ” बी . ए . च्या वर्गात असताना आणखी एक गोष्ट झाली. अमेरिकन तत्त्ववेत्ता राल्फ बार्टन पेरी (Ralph Barton Perry) यांचा निसर्गवाद (Naturalism), रसेल – प्रणीत नववास्तववाद (New Realism), सांतायनाप्रणीत चिकित्सक वास्तववाद (Critical Realism), विल्यम जेम्स (William James), जॉन ड्यूई (John Dewey) यांनी प्रतिपादिलेला ‘प्रॅग्मॅटिझम’ (Pragmatism) इत्यादी विषय शिकविण्यासाठी जे व्याख्याते होते त्यांना त्याच्यातले काही कळत नव्हते, ही गोष्ट केवळ एका व्याख्यानाच्या अवधीत स्पष्ट झाली. त्यांची अवस्था केविलवाणी होती. आम्ही विद्यार्थी सभ्य होतो. तेव्हा आम्ही त्यांच्या वर्गात सहनशीलतेने बसत होतो. पण आपण स्वतःच स्वतंत्रपणे वाचून समजून घेतले पाहिजे ही गोष्ट स्पष्ट झाली.(तत्त्वज्ञानाच्या आजकालच्या प्राध्यापकांची तयारी कच्ची असते अशी तक्रार कधीकधी करण्यात येते. तिच्यात तथ्य असेल तर एका जुन्या परंपरेचे ते पाईक आहेत असे म्हणावे लागेल.) कमकुवत शिक्षकांमुळे तत्त्वज्ञानात्मक लिखाण वाचण्यात स्वायत्तता आली. एम्. ए. च्या अभ्यासक्रमात आम्हाला दोन तत्त्ववेत्ते विशेष अभ्यासासाठी निवडावे लागत…प्लेटो आम्हाला शिकवायला कोणी होते असे आठवत नाही. कांट शिकविणारे जे शिक्षक होते त्यांच्या एका वर्गात बसल्यानंतर पुढे बसण्यात अर्थ नाही हे स्पष्ट होत होते…” हे चित्र आहे १९४० च्या दरम्यानचे!

रेगे निरीक्षण नोंदवतात तसे ही ‘त्या जुन्या परंपरेचे पाईक’ आजही अतिशय भक्तिभावाने काम निष्ठापूर्वक करत आहेत.

हे १९४० च्या दरम्यानचे चित्रही आजही तसेच रंगीतसंगीत आहे, ह्यात शंका नाही. उदाहरणार्थ, साहित्यिक प्रवीण बांदेकरांच्या ‘चाळेगत’ या २००९ साली प्रकाशित झालेल्या कादंबरीत तत्त्वज्ञानाचे अध्यापक-प्राध्यापक काय सांगत असत त्याचे उत्तम वर्णन आहे: “ तू मुळात आधी फिलॉसॉफीसारखा जगावरन ओवाळून टाकलेला विषय काय म्हणून घेतलेलास ? मल्हारने एकदा विचारल्यावर डीवायू म्हणालेला, जल्ल्या त्या भिकारचोट प्रोफेसरांचं डिपार्टमेंट चालवायूसाठीच रे ! तेव्हा कुठे काय कलत होतं, काय घेतल्याव काय होतं ते? खेड्यांतली आम्ही गावंढळ पोरं. घरातनं मार्गदर्शन वगैरे ह्या बाबतीत मिलायचा काय प्रश्नच नाय व्हता. पोरगा फुल पॅन्ट घालून कालेजात जातोय ह्याच केवढं आपूर्वायचं. मी तं ग्रॅज्युएट व्हणारा पैलाच आमच्या घराण्यातला. अशा परिस्थितीत साहजिकच प्राध्यापक म्हंजे देव वाटायचे. ते जां काय सांगतील तां सगलां अत्यंत भक्तिभावानं आयुकून घ्यायाचां. आणि भारावून जावून त्यांच्या आगेमागे करत ऱ्हायचा. कोण कोण काय काय सांगत असायचे. तेंचं सारक्यांसारक्यां तेच तेच आयूकून मग प्लेटो – अॅरिस्टॉटलनंतर आपणच, असां कायतरी भाबडेपणानं वाटायचा. पण त्या रांडेच्या प्राध्यापकांची ही नेहमीची युक्ती होती, हे आम्हाला कुठे म्हायती होतां? त्यांनी बरोबर आम्हाला गंडवलांनी. आमाला नेमकं हेरून, आमच्यात उद्याच्या तत्त्वचिंतकाचे किंवा लेखकाचे गुण कसे आहेत, शिवाय पुण्यात हावून एमेबिमे केल्यावर त्या अमक्यातमज्या बॅचच्या कुलकर्ण्याप्रमाणे प्राध्यापकाच्या नोकरीचा चान्स कसा गावू शकतो; असं कुठल्यापण जरा बऱ्यापैकी वाचनाची आवड असणाऱ्या पोराचं स्वप्न दाखवून हे घोंगड तसं पद्धतीशीरपणे आमच्या गळ्यात अडकवलांनी. थोडक्यात काय, आपला मंग्या म्हणतो तसं जल्लां, खाचीत गावलां आणि गाढवाक् झव्ला, असां झालां आमचां ! (चाळेगत, पान १३६).

-५-

‘उपयोग की उपयोजन’ ह्या वादातून ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ (Applied Philosophy) हा तत्त्वज्ञानाचा नवा चिंतनप्रांत उदयास आला. आज उपयोजित तत्त्वज्ञानाच्या सात संकल्पना मूलभूत समजल्या जातात. एका अर्थाने ‘तत्त्वज्ञान म्हणजे काय’ या विषयीचे ते विद्यमान समकालात नेमकेपणाने मांडलेले मौलिक दृष्टिकोन आहेत. उदाहरणार्थ, राष्ट्राचा प्रमुख नागरिकांना कायदेशीररीत्या चुकीची, असत्य माहिती का देऊ पाहातो, याची चर्चा ‘समकालउचित संकल्पना’ (The Relevance concept of Applied Philosophy) करते. या तत्त्वज्ञानाचे स्वरूप समजावून घेणे, हे रसेलच्या तत्त्वज्ञानाचे आणि त्याच्या समग्र लेखनाचे आकलन होण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरेल. केवळ रसेलच नव्हे तर आजचे समकालिन राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक प्रश्न व त्यांच्या उपाययोजनांकडे जाण्याचा एक ज्ञानात्मक दिशादर्शक मार्ग उपलब्ध होऊ शकेल.

ह्या ‘उपयोजित तत्त्वज्ञान’ संकल्पनेचे स्वरूप आणि रसेलच्या विचारविश्वाच्या संदर्भात त्याचे ‘उपयोजन’ पुढील भागात पाहू.

लेखक तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

(‘मुक्त–संवाद’, १५ फेब्रुवारी २०२२ च्या अंकात प्रकाशित झालेल्या लेखाचा पुनर्लिखित विस्तृत आणि संपादित लेख.)

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0