अहिंसा मार्गे एकजुटीचा लढा आणि गांधीवादाशी बांधिलकी

अहिंसा मार्गे एकजुटीचा लढा आणि गांधीवादाशी बांधिलकी

मोदी सरकार शेतकऱ्यांपुढे इतक्या सहजासहजी झुकलेले नाही. देशाच्या विविध भागात कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर सातत्याने आंदोलने केल्यानंतर अखेर सरकारला ते मागे घेण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रिहाना, ग्रेटाचे एक ट्विट व हादरले सरकार
दिल्ली-उ. प्रदेश सीमेवर आंदोलक-पोलिसांमध्ये तणाव
धुमसता पंजाब

नवी दिल्लीः गेले वर्षभर दिल्लीच्या सीमांवर वादग्रस्त ३ शेती कायद्यांच्याविरोधात लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार ३ शेती कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली व देशातील राजकारण पालटले. शेतकर्यांच्या एकजुटीला यश आले. या आंदोलनात ७००हून अधिक शेतकर्यांनी आपले प्राण गमावले. शेकडो शेतकरी सरकारच्या दडपशाहीने जखमी झाले. पण सरकारने या आंदोलनाकडे कधीही सहानुभूतीपूर्वक पाहिले नाही. आंदोलनाला जोर चढत असताना सरकारमधील मंत्री, भाजपचे नेते, संघ परिवारातील नेते हे आंदोलन देशद्रोही, पाकिस्तान-खलिस्तानच्या मदतीने सुरू असल्याचे आरोप करत राहिले. देशभरातला बहुसंख्य मीडिया सरकारच्या बाजूने उभा राहिला. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी पक्क्या बांधकामाचे अडथळे, तारा उभ्या केल्या. रस्त्यांवर खिळे मारले, ते बंद केले.

एवढे आव्हान असताना देशभरातील हजारो शेतकरी, आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे कूच करत राहिले. हिवाळा, उन्हाळा, पावसाळ्याची तमा न बाळगता सामान्य शेतकरी, त्यांची मुले, कुटुंबातील महिला, वयोवृद्ध यांनी हे आंदोलन सतत जिवंत, धगधगत ठेवले. दिल्लीच्या सिंघू, टिकरी व गाजीपूर सीमांनी देशाचे नव्हे तर जगाचे लक्ष वेधले.

हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने सर्व प्रकारचे प्रयत्न केले. शेतकर्यांविरोधात पोलिस बळाचा यथेच्छ वापर केला. अनेक शेतकर्यांची डोकी फोडली. शेकडोंना अटक केली, अश्रुधुराच्या शेकडो फैरी झाडल्या. समाजकंटकांना आंदोलनस्थळी घुसवून त्यांच्याकडून शांतता भंग करण्याचे प्रयत्न केले. शेतकरी दिल्लीत घुसू नये म्हणून रस्तेही खंदकांसारखे खोदले, रस्त्यावर कंटेनर उभे करून ठेवले. हजारो पोलिस तैनात केले.

तरीही शेतकर्यांचा धीर कमी झाला नाही, त्यांचा निग्रह दिवसेंदिवस अधिक वाढत गेला. आंदोलनात फुट पाडण्याचे, आंदोलन चिरडण्याचे सरकारचे सर्व उपाय अपयशी ठरले, अनेक युक्त्या फसल्या. न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलन फोडण्याचे प्रयत्न झाले तेही अपयशी ठरले.

भारताच्या इतिहासात नोंद घेतली जाईल अशा या आंदोलनाची वर्षभरातील छायाचित्रे द वायर मराठीच्या वाचकांसाठी देत आहोत. ही छायाचित्रे दमनशाहीविरोधात उभ्या राहणार्या सामान्य शेतकरी, त्याच्या कुटुंबाची कहाणी आहे. ही छायाचित्रे म. गांधींनी आखून दिलेल्या अहिंसा तत्वाशी बांधिलकी सांगणारी आहेत. हे आंदोलन प्रामुख्याने अहिंसक होते. आंदोलक अखेरपर्यंत गांधीवादाशी प्रामाणिक राहिले म्हणून दमनकारी सत्तेला त्यांच्यापुढे झुकावे लागले.

 

 

 

 

 

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: