प्लेटोची गुहा आणि आंखो देखी

प्लेटोची गुहा आणि आंखो देखी

आपल्या समोर सोयीच्या प्रतिमांच्या सावल्या नाचवल्या जातात. जाहिराती, बातम्यांपासून, धर्म, राजकारण, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात अशा सावल्या आपल्याला दाखविल्या जातात आपण त्या सावल्यांनाच सत्य समजतो. एक आत्मग्लानी आपल्या मेंदूला चढवण्याचे काम या सावल्या करत असतात.

मराठा समाज आणि नेतृत्वाच्या प्रश्नांची मांडणी करणारा ग्रंथ
पत्रकार खशोगींची हत्या सलमान यांच्या आदेशानुसार  
मेवानी यांना जामीन मंजूर पण दुसऱ्या गुन्ह्याखाली अटक

प्लेटो या विचारवंताने एका रूपक कथेतून एक तत्वज्ञान मांडले आहे. एका गुहेत जन्मापासून बंदिवान असलेली काही माणसं असतात. त्या गुहेच्या एका बाजूला कायम एक शेकोटी पेटलेली असायची. त्या प्रकाशात त्यांना झाड, फुलं, पक्षी अशा काही आकृत्यांच्या सावल्या दाखवल्या जात असे. लोकांना त्या सावल्या आणि ही गुहा हे म्हणजेच जग आहे इतकेच ठाऊक होते.

एक दिवस त्यांच्यातील एक माणूस निसटून गुहेबाहेर येतो. सुरवातीला प्रखर उन्हामुळे त्याचे डोळे दिपतात आणि त्याला काहीही दिसत नाही. थोड्या वेळाने उन्हात डोळे सरावल्यावर त्याला दिसते की गुहेच्या बाहेर एक सुंदर जग आहे. काळ्या सावल्या नाहीतर रंग, रूप, गंध असलेल्या खऱ्याखुऱ्या गोष्टी आणि स्वच्छ सूर्यप्रकाश, चंद्र – तारे हे सर्व तो आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघतो, अनुभवतो. तो आपल्या साथीदारांना हे सर्व सांगायला परत गुहेत जातो. उजेडातून अंधारात जाताना त्याच्या डोळ्यांना त्रास होतो. धडपडत पोचल्यावर तो आपल्या साथीदारांना बाहेरच्या जगाचे वर्णन करतो. त्याला वेड लागलय, असा त्याचा साथीदारांचा समज होतो.

ही कथा विविध गोष्टींसाठी लागू होते. पण अगदी आपण सजगतेने बघणं, पाहणं या विषयासाठी गृहीत धरली तर आजकाल जगण्यातचं मुळी प्रतिमांच्या पडछायांचा भयंकर शिरकाव झाला आहे. आपल्या समोर सतत अशा भासमान गोष्टींचा मारा होत असतो. मूळ प्रतिमांच्या शोधाचा अट्टाहास करण्याचा वेळ कोणाकडे आहे? जे त्याबद्दलची आग्रह धरतात. त्यांना वेड ठरवले जाते. ही तर पूर्वापार चालत आलेली प्रवृत्ती  आहे.

२०१४ ला प्लेटोच्या गोष्टीतला माणूस बाऊजीच्या रूपात ‘आखों देखी’ या चित्रपटाद्वारे परत एकदा नव्या स्वरूपात आपल्या समोर आला. जगण्यातील पृष्ठभागाचा भुसभुशीतपणा आणि आपल्या नजरेसमोर नाचवल्या जाणाऱ्या सावल्यांबद्दलचा साक्षात्कार हा चित्रपट आपल्याला करून देतो. ‘आखों देखी’च्या साध्या वाटणाऱ्या कथानकात गहिरा अर्थ दडलेला आहे.

बाऊजी हे मध्यमवर्गीय एकत्रित कुटूंबाचे प्रमुख असतात. जुन्या दिल्लीच्या एका गल्लीत राहणाऱ्या कुटूंबात वादळ निर्माण होते ते मुलीचे प्रेमप्रकरण समजल्यामुळे. गल्लीतील पुजाऱ्याचा मुलगा घरी येऊन तिखट-मीठ लावून मुलांबद्दलची माहिती पुरवतो. दुसऱ्या दिवशी भावाला, पुजाऱ्याचा मुलाला व काही लोकांना घेऊन बाऊजी त्या मुलाला समज द्यायला जातात. त्यातील दोन जण आपला हात थोडा साफ करून घेतात. बाऊजी आपल्या संयमी स्वभावानुसार सौम्य शब्दात मुलाला समजावून घरी येतात. ही एक घटना बाऊजीच्या जगण्याला कलाटणी देणारी ठरते. त्यांच्या लक्षात येत की त्या मुलाबद्दल जी माहिती कळाली होती, त्यापेक्षा तो मुलगा खूप वेगळा होता. म्हणजे आपल्याला एक सावली दाखवली गेली, मुर्खांसारखा दुसऱ्याने दाखविलेल्या छबिवर आपण विश्वास ठेवला. या विचाराने बाऊजीच्या मनात वादळ निर्माण होते. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करतात.

“ मैंने फैसला कर लिया है। मेरा सच मेरे अनुभव का सच होगा। आज से मैं हर उस बात को मनाने से इनकार कर दूँगा जो मैंने खुद देखा या सुना न हो। हर बात पे सवाल करूँगा, हर चीज को दुबारा देखूँगा, सुनूँगा, जानूँगा। अपनी नजर के तराजू से तोलूँगा।कोई भी चीज जिसको मैंने जिया न हो, उसको अपने मुँह से नही निकालूँगा। जो कुछ भी गलत मुझे सिखाया गया है या गलत तरीके से सिखाया गया है, वो सब भुला दूँगा। एकदम टोटला, सच्चा होगा, अच्छा होगा,सब कुछ नया होगा। जो देखूँगा उस पर ही विश्वास करूँगा।“

बघणे, पाहणे ही एक फक्त क्रिया नसून आपण बघितलेल्या गोष्टीचे, अनुभवाचे मूल्यमापन मेंदूत परस्पर होत असते. प्लेटोच्या गुहेतील माणूस किंवा बाऊजी यांना अभिप्रेत असलेलं बघणं, पाहणं हे वास्तविकता समजून घेणारे आहे. बाऊजीच्या बघण्याला अध्यात्मिक जोड असली तरी ते बऱ्याच अंशी मानसशास्त्रीय देखील आहे. आपण बघतो म्हणजे नेमकं काय करतो? जे समोर आहे त्याला सत्य मानतो.

अकबराने एकदा बिरबलाला विचारले की खरं आणि खोटं यात किती फरक आहे?’ बिरबलाने उत्तर दिलं की, ‘चार बोटं. कानानं ऐकलेलं खोटं असू शकते, डोळ्यानं पाहिलेलं खरं असते’.

त्या काळी बिरबलाचे उत्तर बरोबर गृहीत धरले गेले तरी प्रगत मानसशास्त्र आणि मेंदूवरील होणारे संशोधन बिरबलाच्या या उत्तराला चूक म्हणेल.

बघणं, पाहणं याबाबत मेंदू देखील फसू शकतो. ‘दिसत तसं नसतं’ याचा प्रत्यय देणारे आणि आपल्याला चकवणारे दृष्टीभ्रम यावर संशोधन करून आपल्या बघणं या कृतीकडे आणि तिच्यामुळे होणारी गुंतागुंत यावरील निष्कर्ष आपल्या धारणेला जबरदस्त धक्का देणारे आहेत.

डॅनियल सिमॉन आणि ख्रिस्तोफर सॅब्रिन या दोन मानसशास्त्रज्ञांनी ‘द इनव्हिजिबल गोरिला’ नावाचे एक पुस्तकं लिहिलं आहे. त्यांच्या संशोधनाची क्लिपिंग सुद्धा उपलब्ध आहे. त्याच्या या संशोधनातून आपल्या मेंदूबाबतची गंमतीची गोष्ट समजते की काही गोष्टींची नोंद आपला मेंदू घेतच नसतो. आपल्या आकलनशक्ती, निरीक्षणशक्ती याबद्दलच्या आत्मविश्वासाला जबरदस्त धक्का बसेल असे हे संशोधन आहे. आपल्या समोर बास्केटबॉल खेळणारे काही काळ्या आणि पांढऱ्या कपड्यातील खेळाडू एकमेकांकडे बॉल पास करत असतात. आपल्याला सांगितले जाते की पांढऱ्या कपड्यातील खेळाडू किती पासेस करतात ते मोजून सांगा. आपण पासेस मोजतो ते अचूकही सांगतो. पण त्या दरम्यान एक गोष्ट घडलेली असते. या खेळाच्या दरम्यान गोरिलाचे कपडे घातलेला एक माणूस खेळाडूंच्या मधून वाट काढत आपल्या स्क्रीनसमोर येऊन, छाती बदडून गेलेला असतो. आपण पासेस मोजण्यात इतके गर्क असतो की त्या गोरिलाचा वावर आपल्या नजरेला जाणवत नाही. आता ही गोष्ट ज्ञात झाल्यामुळे तो पुढच्या वेळी गोरिला नक्की दिसतो. पण पुढच्या क्लिपिंगमध्ये गोरिला आणि पासेसकडे लक्ष असताना अजून काही गोष्टी तिथे घडतात, त्या आपल्या नजरेतून सटकतात. आपण कितीही दावा केला की आपण सजगपणे बघतो तर तो मोडीत निघतो. म्हणजे आपल्याला हे सोयीचे असते तेच बघण्याकडे आपला कल असतो. आजूबाजूला घडत असलेल्या अनेक गोष्टीकडे आपण खरं तर बघतच नसतो. याला त्यांनी ‘दुर्लक्षामुळे आलेलं आंधळेपण’ असे शास्त्रीय नाव दिले आहे.

त्याचा अजून एक प्रयोग म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाला पत्ता विचारतो. तो माणूस रस्त्याबद्दल सांगत असताना, एक दरवाजा घेऊन दोन माणसं त्यांच्या मधून जातात व त्या दरम्यान पत्ता विचारणारा माणूस बदलला जातो तरी पत्ता सांगणाऱ्याच्या माणसाच्या लक्षात हा बदल येत नाही. याला त्यांनी ‘डोअर स्टडी’ नाव दिले आहे.

दुर्लक्षामुळे आलेलं आंधळेपणा असो, प्लेटोच्या गुहेतील प्रतिमा असो किंवा बाऊजीचे ‘आखों देखी’ असो या सर्वाचा आपल्या जगण्याशी निश्चित संबंध आहे. आपल्या समोर सोयीच्या प्रतिमांच्या सावल्या नाचवल्या जातात. जाहिराती, बातम्यांपासून, धर्म, राजकारण, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात अशा सावल्या आपल्याला दाखविल्या जातात आपण त्या सावल्यांनाच सत्य समजतो. एक आत्मग्लानी आपल्या मेंदूला चढवण्याचे काम या सावल्या करत असतात. एक आभासी जग आपल्या भोवती फेर धरून नाचत असते. त्यामुळे आपल्या मानसिकतेची फार मोठी अफरातफर होत असते. आपले लक्ष पांढऱ्या कपड्यातील खेळाडूमध्ये जसं गुंतून टाकलं गेलं आणि गोरिला दिसला नाही अगदी तसाच प्रकार आपल्याला दुसरीकडे गुंतवून महत्त्वाच्या घटनेकडे, परिस्थितीकडे आपले दुर्लक्ष होईल योजना केली जात असते.

म्हणून ‘आखों देखी’तल्या बाऊजीचा निर्णय नीट समजून घेणं आवश्यक आहे. तो सामाजिक स्तरावर जितका उपयोगी तितका वैयक्तिक जगण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे.

बाऊजी कळकळीने सांगतात की मी सांगतो आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका. माझ्यासाठी जे सत्य आहे ते तुमचं सत्य असू शकत नाही. प्रत्येकाचे सत्य हे वेगवेगळे असते. त्यामुळे आपल्या अनुभव आपण घ्यायला शिका. रेडिमेड अनुभव आपली दृष्टी खुजी करते.

एकदा बुद्धांकडे एका आंधळ्या माणसाला काही लोक घेऊन आले व म्हणाले, “हा आमचा मित्र आंधळा आहे. आमच्या गप्पाच्या ओघात त्याला प्रकाशाविषयी सांगितले तर हा माणूस म्हणतो की मला प्रकाशाला स्पर्श करू द्या. आता प्रकाशला स्पर्श कसा करून द्यायचा? तर हा माणूस म्हणतो की स्पर्श नाही तर मला कान आहेत ना! प्रकाशातून काही आवाज काढा मला तो ऐकायचा आहे. बरं ते राहील तर तर मला चव तरी द्या किंवा वास तरी घेऊन पहातो…  आता सांगा याला प्रकाश आहे हे कसे पटवून द्यायचे?”

त्यावर बुद्ध म्हणाले, “मी समजूत घालण्याची चूक करणार नाही. तुम्ही त्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन आला आहात. त्याला उपचाराची गरज आहे. त्याला वैद्याकडे घेऊन जा व त्याच्या डोळ्यावर उपचार करा. उपचारानंतर त्याला समजावून सांगण्याचा प्रश्नच राहणार नाही.” त्या लोकांना हे म्हणणे पटलं. काही महिन्यानंतर उपचाराने तो आंधळा बरा झाला. तो बुद्धा जवळ येऊन, त्यांची माफी मागत म्हणातो, “मला प्रकाश आहे, हे आता समजले. त्यावेळी माझी चुकी झाली.” त्यावर बुद्ध म्हणाले,“तू चुकत होतास हे खरे पण तू जिद्द दाखवलीस. मित्र म्हणाले म्हणून ती गोष्ट खरी असेल असा विश्वास तू ठेवला असता तर तुझा इलाज झाला नसता. जे लोक इतरांनी सांगितले म्हणून विश्वास ठेवतात त्यांची मजल विवेकापर्यत जाऊ शकत नाही. जे इतरांचे अनुभव, सल्ले निमूटपणे स्वीकारतात ते स्वतःच्या अनुभवापर्यत जाऊ शकत नाही. ते खरे आंधळे आहेत. जे स्वतःच्या अनुभवातून जगण्याकडे बघतात ते खरे डोळस!”

बाऊजीचा सजगतेचा डोळस प्रवास सुरू होतो. तेव्हा ते प्रत्येक गोष्ट निरखून, पारखून घेतात. पुजाऱ्याने दिलेला प्रसाद खाऊन, हा प्रसाद नसून हा कलाकंद नावाचा मिठाईचा प्रकार आहे. असे मत पुजाऱ्याकडे नमूद करतात. ऑफिसकडे जाणाऱ्या रोजच्या रस्त्याकडे अधिक उत्सुकतेने, जागृतेने बघतात. आतापर्यंत न जाणवणाऱ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीक्षेपात येतात. ऑफिसमध्ये चहा देणारा मुलगा, आपले सहकारी सुंदर, छान असल्याची जाणीव त्यांना होते. ही जाणीव देखील आपल्याला खूप शिकवून जाते. आपल्याला जे लोक सेवा देत असतात, त्याकडे नीटपणे बघण्याचे कष्ट देखील घेत नसतो. फारसा विचार न करता कितीतरी गोष्टी आपण आपोआप सवयीने करत असतो. नेहमीच्या दिनक्रमाची मेंदूला इतकी सवय लागते त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज भासत नाही. जगण्याची नजर जरा बदलली तरी रटाळ जगणं वेगळे भासू लागते.

असा बाऊजीचा स्वप्रत्ययकारी प्रवास आपल्या अंतर्मनाला धडका द्यायला सुरुवात करतो. बाऊजीसाठी जाणिवेचा हा डोह अतिशय खोल ठरतो. विचार करून अनुभव मिळत नसतो पण आलेल्या अनुभवांवर विचार मात्र करता येतो. तर काही अनुभव बाऊजी स्वतः ठरवून घेतात. आपल्याला ऐकिवात असलेल्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत का नाही? याचा शोध घेतात. जाणिवेने बघितल्याने जगण्यातला तकलादू भ्रम गळून पडतात. हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत असतो की ज्याद्वारे आपली दृष्टी स्वच्छ होईल आणि पडछाया व खऱ्या प्रतिमा यातील फरक आपल्याला उमजेल. ‘दुर्लक्षामुळे आलेलं आंधळेपण’ बुद्धांच्या गोष्टीसारखे दूर होईल. बाऊजीच्या रुपाने प्लेटोतील गुहेतला माणूस साजरे करत असलेल्या या सर्व चैतन्यमय डोळस उत्सवाचे वर्णन करणारे गाणं या पार्श्वभूमीवर ऐकू येत.

“हाथ लागी-लागी नई धूप

आज लागी- लागी नई धूप
कि दिखे धुली साफ़ मन की चादरीया
बिना दाग सारी डगरिया
दसो दिशा आज सावरिया, लिए नया रूप…”

देवयानी पेठकर या शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0