जेएनयू : पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक

जेएनयू : पोलिस कारवाईवरून विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : जवाहर लाल नेहरु विद्यापीठातील फीवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलिस लाठीमाराचा मुद्दा मंगळवारी ल

शामुआजोचा रॉबिन्सन क्रुजो – भाग २
इराणी कुटुंबियांचे गोव्यात हॉटेल नाही, बार परवाना नाहीः दिल्ली हायकोर्ट
झुंडशाहीला रोखण्यासाठी कायदा आणण्यास सरकार अनुत्सुक

नवी दिल्ली : जवाहर लाल नेहरु विद्यापीठातील फीवाढीविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलिस लाठीमाराचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत तृणमूल काँग्रेस, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी उपस्थित केला.

तृणमूल काँग्रेसचे सदस्य सौगत राय यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांच्यावर लाठीमार केल्याचा मुद्दा उपस्थित करत गरीबांना उच्चशिक्षण मिळावे व ते सरकारी खर्चातून व्हावे अशी व्यवस्था अनेक वर्षे सुरू असल्याचे सांगितले. त्यावर लोकसभा अध्यक्षांनी, ‘तुम्ही जेएनयूत किती फीवाढ झाली हे देशाला सांगा’ असे त्यांना उद्देशून विचारले. त्यावर भाजपच्या सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांचे समर्थन केले. काँग्रेसचे सदस्य टीएन प्रतापन यांनी शून्य प्रहरात जेएनयूचा मुद्दा उपस्थित करताना सरकार विद्यार्थ्यांचा आवाज दाबत असल्याचा आरोप करत या पोलिस लाठीमाराची चौकशी करावी अशी मागणी केली. प्रतापन यांनी जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ व अन्य विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे हक्क डावलले जात असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. बसपाच्या कुंवर दानिश अली यांनी शून्य प्रहरात जेएनयूचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला पण लोकसभा अध्यक्षांनी त्यांना परवानगी दिली नाही.

राज्यसभेत आपचे खासदार संजय सिंग यांनी पोलिस अत्याचाराचा निषेध केला. या देशात पहिल्यांदाच जेएनयूतील विद्यार्थ्यांना पोलिस अत्याचाराला सामोरे जावे लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दिल्ली पोलिसांना काही दिवसांपूर्वी वकिलांनी मारहाण केली होती. त्यावेळी आमच्या वर्दीवर डाग लागला अशी प्रतिक्रिया दिल्ली पोलिस देत होते पण आता निष्पाप, निर्दोष, अपंग विद्यार्थ्यांना हेच पोलिस मारहाण करत आहेत त्यांच्या वर्दीवर याने डाग पडले नाहीत का, असा सवाल त्यांनी केला.

संजय सिंग यांच्या या वक्तव्याचा आधार घेत माकपचे नेते डी. राजा यांनी पोलिसांचे असे वागणे अमानुष असल्याचा आरोप केला. जेएनयूतील विद्यार्थी केवळ आपल्यासाठी नव्हे तर भविष्यात या विद्यापीठात शिकणाऱ्या कैक पिढ्यांच्या हक्कासाठी लढत असून ते मोदी सरकार व जेएनयू प्रशासनाने समजून घ्यावे असा सल्ला डी. राजा यांनी दिला.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0