प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप काँग्रेसला पर्याय देऊ शकतो का?

प्रमुख विरोधी पक्ष म्हणून आप काँग्रेसला पर्याय देऊ शकतो का?

एक आकर्षक नेतृत्व, 'पर्यायी शासना'चे धोरण आणि ऑनलाइन युगातील निवडणूक प्रचाराचं अचूक भान यामुळे आम आदमी पक्षाने भारताचा राष्ट्रीय विरोधी पक्ष म्हणून प्रस्थापित होण्यास वेग घेतला आहे.

केजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद
पंजाब मंत्रिमंडळः ७ मंत्र्यांवर गुन्ह्यांची नोंद, ९ कोट्यधीश
भरकटलेला ‘आप’ उजव्या वाटेवर

पंजाबमधील दणदणीत विजयाने आम आदमी पार्टीला (आप) केवळ एक गौरवशाली नगरपालिकेवर राज्य करणार्‍या पक्षापासून आपल्या मूळ राज्याच्या पलीकडे विस्तार करणारा आणि दुसरे राज्य जिंकण्यात यशस्वी ठरलेला पाचवा भारतीय पक्ष बनवले आहे. काँग्रेसप्रमाणेच दोन राज्यांवर आता ‘आप’चीही सत्ता आहे.

सलग दोन राष्ट्रीय निवडणुकांमध्ये पत्करावा लागलेला पराभव आणि २०१४ पासून ५० पैकी केवळ पाच विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर कॉंग्रेस आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नाकडेच लक्ष देत असताना, ‘आप’ला आणखी एका राज्यात नेतृत्व मिळवण्यात यश आल्यामुळे मुख्य प्रवाहात ‘आप’ कॉंग्रेसचा संभाव्य ‘राष्ट्रीय आणि नैसर्गिक पर्याय’ असल्याची कुजबुज सुरू झाली आहे.

गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि त्यापलीकडेही काँग्रेसच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेला हा पक्ष कॉंग्रेसची राष्ट्रीय विरोधी पक्ष म्हणून असलेली जागा घेऊ शकतो याची पाच कारणे आहेत.

मतदारांच्या अपेक्षा ओळखणारे ‘पर्यायी शासनाचे’ धोेरण

भारतीय राज्य हे स्थिर असले तरीही आर्थिक वाढ आणि रोजगार निर्मिती करण्यात, उपासमार, कुपोषण आणि दारिद्र्य कमी करण्यात मागे पडले आहे. शिवाय आरोग्य सेवा आणि शिक्षण प्रदान करण्यात, शहरी प्रशासन, लैंगिक समानता आणि सामाजिक विषमता कमी करण्यासाठी आणि तत्सम गोष्टींविषयीही विशेष प्रयत्न करताना दिसत नाही.

अशा अपयशांमुळे या गंभीर समस्यांच्या संदर्भात होणार्‍या सुधारणांना विलक्षण वाव मिळतो आणि त्याद्वारे एखाद्या पक्षासाठी नवीन मतदारांही तयार होतात.

तरीही कोणताही विद्यमान पक्ष, विशेषत: काँग्रेस, एक पर्यायी प्रतिमान सादर करण्यात अपयशी ठरले. म्हणूनच आम्ही, भारताचे नागरिक, जास्त लोकसंख्या असल्याने एक उत्कृष्ट शासनास प्रतिकूल नसण्याच्या रूपकावर समाधानी झालो. यामुळे बहुतेक सार्वजनिक धोरणात्मक समस्यांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन निराशाजनक स्थितीवादाच्या भावनेने आणि कल्पनाशक्तीच्या अभावाने तयार झालेला होता.

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार काँग्रेस सरकारपेक्षा फारसे वेगळे नाही, विशेषत: राज्यांच्या संदर्भात, असे मत ज्यांना नेहमीच उद्धृत केले जाते त्या अरुण शौरी यांचे आहे. ते असेही म्हणतात की ” भाजप म्हणजे काँग्रेस अधिक गाय.”

जुन्या संरचना आणि कायद्यांचे रक्षण करत, प्रशासनाप्रती कालबाह्य दृष्टिकोनापासून स्वत:ला मुक्त न करू शकल्याने काँग्रेस स्वत:च्याच वारशाचा कैदी बनली आहे. आपल्या अधिकाराच्या भावनेवर खात्री ठेवून आणि विरोधी पक्ष म्हणून केवळ आपल्या वेळीची वाट बघत, एका अंतिम अँटी-इन्कम्बन्सीमुळे होणार्‍या मतदानातून सत्तेत येण्याचे स्वप्न बघत आहे. ही अधिकार आणि आत्मसंतुष्टताच काँग्रेसकडे ‘आप’चे दिल्ली मॉडेल आणि भाजपचे गुजरात मॉडेल यांच्याप्रमाणे राज्यांसाठी प्रशासनाचे कोणतेही बाजारात सादर करण्याजोगे मॉडेल नसण्याचे कारण आहे.

अशा पोकळीत, ‘आप’ प्रशासनाचा एक पर्याय प्रदान करते. आप आपल्या मॉडेलमधून राहणीमानाचा खर्च कमी करण्यावर आणि कल्याणकारी योजनांद्वारे सर्व सामान्य लोकांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देते. उत्तम सार्वजनिक आरोग्य सेवा, वंचितांसाठी शिक्षण व चांगल्या जगण्याच्या संधी उपलब्ध करण्याचे आश्वासन देते. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरातून सार्वजनिक सेवा अधिक सुकर करणे. मुबलक पाणीपुरवठा व सांडपाण्याची विल्हेवाट अशा मुद्द्यांना आपल्या राजकीय कार्यक्रमात स्थान देते.

या सुधारणांच्या माध्यमातूनच या पक्षाने मतदारांच्या दुर्लक्षित गरजा चतुराईने ओळखल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले आहे आणि त्याद्वारेच जुन्या मतदार विभाजनांच्या पलीकडे जाऊन एक टिकाऊ मतदार आधार तयार केला आहे. हा टिकाऊ आधारच स्पष्ट करतो की, ‘आप’ने एखाद्या राज्यात आपले पाय रोवल्यानंतर त्या आणि इतर राज्यांमध्येही कॉंग्रेसला उतरती कळा लागते.

भाजपच्या राष्ट्रवादी आणि ‘हिंदुत्ववादी’ आवाहनाच्या प्रश्नाची सोडवणूक

मोदी विरुद्ध काँग्रेसच्या लढाईत कॉंग्रेसची ‘हिंदूविरोधी’ आणि ‘राष्ट्रद्रोही’ अशी व्याख्या करण्यात भाजपला यश मिळाल्यामुळे मतदारांच्या एका महत्त्वाच्या वर्गासाठी काँग्रेस जणू काही बहिष्कृत बनली आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक रचना सतत ढवळून काढत आणि ‘राष्ट्र आणि हिंदू हिताचा रक्षक’ या उक्तीचा गैरवापर करून भाजप या मतदारांना एकत्र ठेवतो. हिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या भावनिक आवाहनाचा परिणाम म्हणून भाजपने मतदारांशी एक नाते निर्माण केले आहे, हे नाते भाजपच्या प्रशासनातील अपयशापासून मुक्त असलेले नाते आहे.

मंदिर भेटी, हुतात्म्यांना एक कोटी मानधन देणे, तिरंगा यात्रा आणि तीर्थ यात्रा योजना करणे अशा निरुपद्रवी प्रतीकात्मकतेने ‘आप’ने या क्षेत्रातही यशस्वीपणे मार्गक्रमण केले आहे. तसेच राज्यव्यवस्थेचे लक्ष प्रशासकीय मुद्द्यांऐवजी सांस्कृतिक भेदांवर केंद्रित ठेवणाऱ्या सांस्कृतिक व धार्मिक वादविवादात अडकणेही या पक्षाने काळजीपूर्वक टाळले आहे.

भाजपकडून ज्या प्रकारच्या धार्मिक आणि राष्ट्रवादी प्रतीकात्मकतेचा वापर केला जातो अगदी तसाच वापर लोकांच्या भावनिक गरजा भागविण्यासाठी ‘आप’कडूनही केला जात असल्याच्या अनेक टीका होत असल्या तरीही या टीकेत हे दुर्लक्षित केले जाते की, जिथे अशा प्रकारच्या विभाजनवादी मुद्द्यांवर समाजाचे ध्रुवीकरण झाले आहे तिथे या राजकीय वादविवादांचा लगेचच निपटारा शक्य नाही. अशा वादांमुळे आपण अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखले जातो, ज्यामुळे आपण एकजूट होऊ शकतो आणि उदारमतवादी लोक मतदारांच्या एका महत्त्वाच्या वर्गापासून दुरावतात.

म्हणून, ‘आप’ने असा समतोल साधला आहे ज्यात भाजपने हिंदूंमध्ये काळजीपूर्वक पाळलेल्या बळीपणाच्या भावनेला निष्प्रभ करून या दुरावलेल्या हिंदूना त्यांच्या भावना जाहीरपणे मान्य करत त्यांचा आदर करून उदारमतवादी पक्षात परत आणले जाते आणि त्याद्वारे मग प्रशासनाच्या मुद्द्यांवर निवडणुका लढल्या जातात.

एक करिश्माई, सक्षम नेतृत्व

नेत्यांच्या प्रतिमेची तुलना करताना ‘आप’ने काँग्रेसविरुद्ध आणखी एक गुण मिळविला आहे; अरविंद केजरीवाल विरुद्ध राहुल गांधी.

गांधी हे कोणत्या पदावरही नव्हते आणि आपल्या राज्यकारभाराच्या क्षमतेबद्दलही ते मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यास असमर्थ आहेत, तर केजरीवाल हे तीनवेळा मुख्यमंत्री राहिले असून त्यांच्या प्रशासन कामगिरीच्या आधारे ते पुन्हा निवडून आले आहेत.

केजरीवाल अधिक सामर्थ्याने विविध संस्था निर्माण करू शकतात आणि अधिक ते उत्तम सार्वजनिक वक्ते देखील आहेत. शिवाय, राहुल गांधींची पद्धतशीरपणे प्रतिमा मलिन करण्यात आल्याने, सामान्य माणसाच्या आकांक्षांना धक्का पोहोचवणार्‍या भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला जबाबदार असलेल्या एका ढासळत्या भ्रष्ट घराण्याचे अकार्यक्षम प्रतिनिधी म्हणून त्यांना व्यापकपणे ओळखले जाते, ज्यामुळे, मतदारांमध्ये मोदींना पर्यायांचा अभाव असल्याची भावना निर्माण झाली आहे.

याउलट, आयआयटी झालेले आणि नागरी सेवा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेले केजरीवाल हे स्वयंभू व्यक्ती मानले जातात. सामाजिक सेवांसाठी मॅगसेसे पुरस्कार जिंकणारे केजरीवाल एक प्रसिद्ध भ्रष्टाचारविरोधी योद्धा म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. यामुळे विरोधी पक्षांचा एक असा चेहरा ज्याच्या मागे जनता एकजूट होऊ शकते आणि विश्वासार्हपणे मोदींना आव्हान देऊ शकते म्हणून उदयास येण्यासाठी त्यांना अधिक मदत झाली.

‘नव्या-युगातील निवडणूक प्रचारची’ कौशल्यपूर्णता

राष्ट्रीय विरोधी पक्ष बनण्याच्या स्पर्धेत ‘आप’ने आणखी एक टक्का पटकावला आहे- नव्या युगातील निवडणूक प्रचारावरील प्रभुत्व.

विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘आप’ची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती आहे, वरवर पाहता अल्गोरिदमची अधिक चांगली समज आहे, अधिक निष्ठावान ऑनलाइन स्वयंसेवक आहेत आणि एक नाविन्यपूर्ण मल्टी-मीडिया मेसेजिंग यंत्रणा आहे जी ऑनलाइन – आणि त्यानंतर, ऑफलाइन पातळीवर ‘आप’चे आख्यान ( नरेटीव्ह) असमानपणे निर्माण करण्यास मदत करते. हे एक असे कार्य आहे जिथे कॉंग्रेस बर्‍याचदा संघर्ष करीत असल्याचे आढळते.

खरे तर, कल्याणकारी राजकारणाचा मूळ ‘गॉडफादर’ आणि भारताच्या १९९१ च्या सुधारणांमागे असलेल्या या काँग्रेस पक्षाला भाजपच्या उत्कृष्ट कथनामुळे वरीलपैकी एकाही आख्यानावर मालकी हक्क सांगता येत नाही.

ध्येयासह युद्धपातळीवर तयार असलेला पक्ष

काँग्रेसकडे निराश, निर्विकार नेते आणि स्वयंसेवक आहेत जे लोकांच्या अपेक्षांशी सुसंगत नाहीत. आपल्या नेत्यांनी स्वत:ला समृद्ध करूनही हा पक्ष गरीब झाला आहे. नवीन सक्षम आणि कौशल्यपूर्ण लोकांना आकर्षित करण्यात ते अपयशी ठरले आहेत तर त्याचे स्वत:चे नेते स्वत:चेच पक्ष स्थापित करण्यासाठी किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामील होण्यासाठी पक्ष सोडून जातात.

या उलट ‘आप’कडे तरुण, निष्ठावान, समर्पित स्वयंसेवकांची फौज आहे, ज्यांचा पक्षाच्या ध्येयावर पूर्ण विश्वास आहे. यातून आकलनाच्या पातळीवरील लढाई जिंकण्यास ‘आप’ला मदत होते.

‘आप’चा उदयही धक्के खाल्ल्याशिवाय झाला नाही. २०१४ च्या लोकसभा पराभवानंतर, त्यानंतर पुन्हा २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत पंजाबमध्ये निराशाजनक निकालानंतर आणि शेवटी, २०१९ च्या लोकसभा पराभवानंतरही, जिथे त्यांनी फक्त एक जागा जिंकली होती तेथे ते जगण्याची लढाई लढत होते. तरीही, परत परत बाहेर फेकले गेल्यावरही, स्वत: ला पुनरुज्जीवित केले. एवढेच नव्हे तर नवीन मतदारांना आवाहन करत, आपली सर्व शक्ती पणाला लावून आणि प्रतिभेच्या लढाईत अधिक चांगल्या प्रकारे काम करणार्‍या प्रतिस्पर्धींना घाबरून न जाता एका दुर्दम्य लढाऊ वृत्तीच्या बळावर, ‘आप’ हा प्रत्येक पराभवानंतर राखेतून फिनिक्ससारखा उभा राहिलेला पक्ष आहे.

लढत राहण्याची, संघर्ष करत राहण्याची ही भावना शेवटी ‘आप’ला थकलेल्या, खचलेल्या आणि कुजलेल्या कॉंग्रेसला दूर करण्यास मदत करू शकते, अशी कॉंग्रेस जी राज्यांमध्ये तिसर्‍या स्थानावर ढकलली गेल्यावर बर्‍याचदा स्वत:चा मरणपंथाला पोहोचते आणि याच लढाऊ भावनेमुळे ‘आप’चा एक आघाडीचा प्रतिस्पर्धी म्हणून उदय होण्यापासून भाजप सावध होऊ शकतो आणि काँग्रेसला सहजपणे संपवण्याच्या स्वप्नालाही पूर्णविराम लागू शकतो.

आप गर्जना करत सर्वांसमोर आल्यामुळे विरोधकांना आता आवाज सापडू लागला आहे. विरोधी पक्षांच्या मतदारांना खिळवून ठेवणारा हा नवा आयाम ‘आप’कडे अधिक आकृष्ट करणारा आहे.

प्रणित पाठक आयएमटीचे विद्यार्थी असून भारतीय लोकशाहीचे अभ्यासक आहेत.

मूळ लेख

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: