नवी दिल्लीः महागाई, बेरोजगारी, जीएसटी यांच्याविरोधात शुक्रवारी संपूर्ण देशात काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू राजधानी नवी दिल्ली
नवी दिल्लीः महागाई, बेरोजगारी, जीएसटी यांच्याविरोधात शुक्रवारी संपूर्ण देशात काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनाचा मुख्य केंद्रबिंदू राजधानी नवी दिल्ली येथे होते. काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानापाशी धडकायचे होते व त्यासाठी सर्व कार्यकर्ते, नेते सकाळपासून राष्ट्रपती भवनाच्या परिसरात जमा होत होते. पण दिल्ली पोलिसांनी विजय चौकात जमावबंदीचे कलम लावून राहुल गांधी, प्रियंका गांधी, यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसने आपले आंदोलन आगळेवेगळे दिसावे व मूलतः सरकारच्या धोरणांच्या विरोधात, निषेध म्हणून काळे कपडे घालण्यास सर्वांना सांगितले होते. व ते चित्र दिसून येत होते. स्वतः राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी काळे कपडे घातले होते.
आंदोलन सुरू करण्याआधी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर व मीडियाच्या सरकारधार्जिण्या वृत्तांकनावर भर दिला. विरोधी पक्षाला संसदेत कोणत्याच मुद्द्यावर बोलू दिले जात नाही. देशातील लोकशाही संस्थांमुळे विरोधी पक्ष बळकट होत असतो पण या देशातील न्यायव्यवस्था, प्रसार माध्यमे, तपास यंत्रणा, निवडणूक आयोग, हे सर्व संघ परिवाराच्या ताब्यात गेले आहे, त्यामुळे विरोधी पक्ष जिंकूच शकत नाहीत असे महत्त्वाचे वक्तव्य त्यांनी केले. आमची लढाई राजकीय असती तर भाजपला सहज हरवू शकतो पण येथे सर्वच लोकशाही संस्था संघ परिवाराच्या हातात गेल्या आहेत. जर्मनीत हिटलरनेही सर्व संस्था ताब्यात घेऊन निवडणुका जिंकल्या होत्या, असे राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांच्या लक्षात आणून दिले.
काँग्रेसची लढाई गरीबांच्या हक्कांसाठी आहे, त्यासाठी आम्ही मोदी सरकारच्या कोणत्या दमनशक्तीविरोधात लढण्यास तयार आहोत. जेवढे आम्ही सत्य बोलतो तेवढा विरोध आम्हाला मोदी सरकारकडून केला जातो. लोकशाही वाचवणे हे काँग्रेसचे कर्तव्य आहे, आम्ही तेच करत आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी लोकसभेत आम्हा विरोधकांना बोलूनही दिले जात नाही, असे सांगितले. भ्रष्टाचार, बेरोजगारी, जीएसटी, चीनचे आक्रमण या विषयावर सरकारला प्रश्नही विचारून दिले जात नाहीत. भारतातील लोकशाही मरत चालल्याचे विदिर्ण चित्र दिसू लागत असून सरकारविरोधात कोणी बोलल्यास त्याच्यावर हल्ले केले जातात, तुरुंगात टाकले जाते, मारहाण केली जाते, असे राहुल गांधी म्हणाले. देशात लोकशाही नसून चार जणांची हुकुमशाही असल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.
संसदेचे कामकाज स्थगित
शुक्रवारी काँग्रेस सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याने संसदेतही कामकाज होऊ शकले नाही. सरकारने महागाईवर चर्चा करण्यास पुन्हा नकार दिला, त्यावर उपस्थित काँग्रेस खासदारांनी गोंधळ चालू केला, त्यामुळे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर अनेक खासदार विजय चौकाकडे गेले तेथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्रियंका गांधी यांना पोलिसांची धक्काबुक्की
प्रियंका गांधी या काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास उतरल्या. मुख्यालयाच्या परिसरात पोलिसांनी बॅरिकेड लावल्या होत्या. पण प्रियंका बॅरिकेडवर चढल्या व पलिकडे उतरल्या. नंतर त्या महिला खासदार व कार्यकर्त्यांसोबत ठिय्या मांडून बसल्या होत्या. त्यांना हटवण्यासाठी दिल्ली महिला पोलिसांनी आपले बळ लावले. त्यांच्यावर १४४ कलमाचा भंग केल्याचा आरोपही लावण्यात आला. प्रियंका गांधी यांना जबरदस्तीने एका पोलिस अधिकाऱ्याच्या गाडीत बसवण्यात आले. त्या दरम्यान महिला पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना धक्काबुक्की झालेली दिसून आली. आम्ही केवळ आंदोलन करतोय, त्याला सरकारचा विरोध असून सरकार आम्हाला घाबरत असल्याचा आरोप प्रियंका गांधी करत होत्या. काँग्रेस पक्ष गरीब, सर्वसामान्याच्या हक्कासाठी लढत, संघर्ष करत राहील असा पुनरुच्चार त्यांनी केला. मोदींना महागाई दिसत नाही, त्यांना आपल्या २-४ मित्रांचे भले दिसते आहे, या मित्रांनी देशातील संपत्ती लुटून नेली, या धनाढ्यांना देशातील महागाई दिसत नाही. पीठ, तांदूळ, गॅस सर्वच महागले आहेत, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान संध्याकाळी उशीरा या सर्व काँग्रेस नेत्यांना सोडून देण्यात आले.
मूळ वृत्त
COMMENTS