पुष्कर धामी, सावंत, बीरेन सिंग यांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद

पुष्कर धामी, सावंत, बीरेन सिंग यांच्याकडे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद

उत्तराखंड व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याच्या अटकळी अखेर सोमवारी संपुष्टात आल्या. भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी व गोव्

भाजपसाठी स्त्रियांचे हक्क पुरूषधार्जिणेच!
अर्णबवरील फिर्याद रद्द करण्यास नकार
कोणाचा ‘फटका’ कोणाला?

उत्तराखंड व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याच्या अटकळी अखेर सोमवारी संपुष्टात आल्या. भाजपने उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी पुष्कर सिंग धामी व गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. धामी यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असे अंदाज लावले जात होते. धामी यांच्याविरोधात पक्षात काही असंतुष्ट गट कार्यरत असल्याचीही चर्चा सुरू होती. पण भाजपने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह व मीनाक्षी लेखी या दोघांकडे उत्तराखंडमधील सत्ता समीकरणाची सूत्रे दिली. या दोघांनी धामी यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. येत्या २३ मार्चला धामी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

धामी यांच्या नेतृत्वाखाली भाजप उत्तराखंडमध्ये निवडणुकांस सामोरा गेला होता. भाजपला अँटि एन्कम्बसीचा फटका बसेल अशा शक्यता सांगितल्या जात होत्या. प्रत्यक्षात पक्षाने ७० विधानसभा जागांपैकी ४७ जागा जिंकून बहुमत मिळवले. पण या निवडणुकांत खुद्ध धामी यांना पराभव पत्करावा लागला होता. या पराभवामुळे मुख्यमंत्रीपदासाठी अन्य उमेदवार शोधला जाईल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

धामी यांचा पराभव झाला असला तरी त्यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राज्यात पुन्हा सत्ता मिळाली, ते अन्य राज्यात प्रचाराला जात असल्याने त्यांना स्वतःच्या मतदारसंघात प्रचारास वेळ मिळाला नाही, अन्यथा ते निवडून आले असते, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल बलुनी यांनी केले. धामी यांच्या मागे बहुसंख्य आमदारांचा गट आहे, शिवाय पक्षाच्या केंद्रीय निरीक्षक समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बलुनी यांनी सांगितले.

दुसरीकडे गोव्यातही भाजपने पक्षातील मतभेद संपवत मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. सोमवारी राज्य संसदीय दलाने प्रमोद सावंत हेच आपले नेते असल्याचा ठराव संमत केला. विश्वजीत राणे यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाचे अनुमोदन केले व सरकार स्थापन करण्याचे तसे पत्र राज्यपालांना सादर केले. आपली मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्याबद्दल प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. गोव्याच्या विकासासाठी आपल्याला पुन्हा ५ वर्षे काम करण्याची संधी दिली, त्यासाठी आपण सर्व ते प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

भाजपला गोव्यात पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी एक जागा कमी पडत होती पण त्यांना महाराष्ट्र गोमंतक पार्टीचे दोन आमदार व तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने त्यांच्या सरकारला विधानसभेत बहुमत आहे. ४० विधानसभा जागांपैकी २० जागा भाजपला मिळाल्या आहेत.

मणिपूरमध्ये रविवारीच एन. बीरेन सिंह हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले होते. बीरेन सिंह यांनी एक ट्विट करून पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानले होते. त्यानंतर सोमवारी राज्यपाल गणेशन यांनी बीरेन सिंह यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले. बीरेन सिंह यांना राज्य भाजपच्या ३२ आमदारांचा पाठिंबा आहे. तर जेडीयूचे ६ आमदार, कुकी पीपल्स अलायन्सचे २ आमदार व एका अपक्षाने बीरेन सिंह यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ६० जागा असलेल्या मणिपूर विधानसभेत भाजपची सदस्य संख्या ४१ झाली असून त्यांना दोन तृतीयांश बहुमत मिळाले आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0