“…..चे तत्त्वज्ञान”

“…..चे तत्त्वज्ञान”

बर्ट्रंड रसेल दर्शन भाग १० - पाच तात्त्विक संकल्पना आणि त्यांच्या अनुषंगाने बनलेले पाच प्रश्न, यांनी मिळून बनलेला 'तत्त्वज्ञानाचा विहंगम नकाशा' हे तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे प्रमुख तत्त्व आहे. आता, आपण तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे आणखी एक खूपच प्रसिद्ध तत्त्व पाहू. हे तत्त्व तत्त्वज्ञानाच्या नव्या ज्ञानशाखांची निर्मिती करतेच, पण लोकमानसाच्या दृष्टिकोनातून व्यक्त होणाऱ्या तत्त्वचिंतनाची देखील निर्मिती करते.

बर्ट्रंड रसेलची तत्त्वज्ञानात्मक लेखनशैली
बर्ट्रंड रसेलचा लेखनसंसार
तत्त्वचिंतन : उपयोग (Use) की उपयोजन (Application)

सत्ता, ज्ञान, तर्क, नीति आणि सौंदर्य या संकल्पनांच्या आधारे निर्माण होणाऱ्या सत्ताशास्त्र, ज्ञानशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र अन सौंदर्यशास्त्र या तत्त्वज्ञानाच्या ज्ञानशाखा कोणत्याही ज्ञानाच्या वर्गीकरणाचे सूत्र बनतात. त्यातून नवे वेगळ्या प्रकारचे वर्गीकृत तत्त्वज्ञान निर्माण होते. तत्त्वज्ञानाच्या वर्गीकरणाचे आणखी एक सूत्र म्हणजे “ ‘…चे तत्त्वज्ञान’”  (“Philosophy ‘Of’ ….’)”. “कोणाचे/कशाचे तरी तत्त्वज्ञान”. उदाहरणार्थ प्लेटोचे तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान, चार्वाकाचे तत्त्वज्ञान, बुद्धाचे तत्त्वज्ञान, गांधींचे तत्त्वज्ञान, टिळकांचे तत्त्वज्ञान, सावरकरांचे तत्त्वज्ञान, समाजवादाचे तत्त्वज्ञान, हिंदुत्ववादाचे तत्त्वज्ञान, बुद्धिवादाचे तत्त्वज्ञान, अनुभववादाचे तत्त्वज्ञान. या सज्ञांमध्ये शब्दांमध्ये उपयोजनात आणला गेलेला किंवा आणला जाणारा शब्दप्रयोग आहे “…चे तत्त्वज्ञान”.  

‘…चे’ चे दोन अर्थ 

“…चे” या उपपदाचे साधारणतः चे दोन अर्थ होतात. पहिला सामान्य भाषेतील अर्थ अन दुसरा तात्त्विक अर्थ.   

‘…चे’ : सामान्य भाषिक अर्थ

“….चे” चा सामान्य भाषिक अर्थ “अमुकतमुकचा असणारा, ….च्याशी संबंधित, एखाद्या व्यक्ती /घटनेचा//वस्तुस्थितीचा भाग’, असा होतो. त्याचप्रमाणे अमुकतमुक व्यक्तीने तयार केलेला, तिच्या मालकीचा, तिच्या ताब्यात असणारा’ असे गृहीत धरले जाते. किंवा ‘एखाद्या लोकगटा’ चा असेही गृहीत धरले जाते. त्यामुळेच आपण ‘अमुकतमुकचा’/…‘ची’ /…..‘चे’ असे शब्दप्रयोग केले जातात. सामान्य भाषेचा हा व्याकरणीय अर्थ मानता येईल.

सामान्य माणूस तत्त्वज्ञानाविषयी बोलताना ‘हे माझे तत्त्वज्ञान आहे’ , ‘आपले एक तत्त्वज्ञान असे असे आहे’ असे शब्द वापरतो. आपण साधारण असे गृहीत धरतो की, जी व्यक्ति अथवा समाजगट ‘हे माझे तत्त्वज्ञान’ किंवा ‘आमचे तत्त्वज्ञान’ म्हणते तेव्हा ते त्या व्यक्तीचे जीवन जगण्याचे तत्त्व असते, तेच ती व्यक्ति सांगत असते. त्या व्यक्तीविषयी बोलताना दुसरा माणूस ‘त्याचे/तिचे तत्त्वज्ञान’ असे उल्लेख करतो. तेच समूहाला लागू असते. तत्त्व, सूत्र म्हणजे जगाकडे पहाण्याचा दृष्टिकोन आणि आपली त्या जगाशी वागायचे कसे, याची तयार होणारी जीवनदृष्टी.

पण ‘सामान्य माणसांचे तत्त्वज्ञान’, ‘गरीबांचे/मध्यमवर्गीयांचे/श्रीमंतांचे तत्वज्ञान’ या शब्दप्रयोगात नेमके काय सूचित केले जाते? ‘….चे तत्त्वज्ञान’ या शब्दप्रयोगाचा अर्थ ‘गरीब/श्रीमंत/इत्यादींनी निर्मिलेले, स्वतंत्रपणे मांडलेले तत्त्वज्ञान’ असा होईल की ‘गरीबांनी/मध्यमवर्गीयांनी/श्रीमंतांनी (आधीच आयते उपलब्ध असलेले कोणते तरी) स्वीकारलेले तत्त्वज्ञान आहे, असा अर्थ घ्यावयाचा ?

‘…चे’ : तात्त्विक अर्थ

तात्त्विक अर्थाने पाहाताअमुकतमुकचे तत्त्वज्ञान’ असे म्हणत असताना मुळात ‘त्या अमुकतमुक’ कडे ‘तत्त्ववेत्ता’ म्हणून पहावे का, असा प्रश्न उपस्थित करणे, योग्य ठरेल. या प्रश्नाची चिकित्सा होणे आवश्यक असते. एखादा माणूस काटेकोर अर्थाने तत्त्ववेत्ती नसला तरी माणसाने व्यक्तीने अथवा समाजगटाने स्वीकारलेले तत्वज्ञान कोणते आहे? उदाहरणार्थ क्रांतीचे तत्त्वज्ञान, लोकशाहीचे तत्त्वज्ञान, समाजवादाचे तत्त्वज्ञान, इहवादाचे तत्त्वज्ञान किंवा हिंदुत्ववादाचे तत्त्वज्ञान असे शब्दप्रयोग काय सूचित करतात? उदाहरणार्थ क्रांतीचे तत्त्वज्ञान, लोकशाहीचे तत्त्वज्ञान, समाजवादाचे तत्त्वज्ञान, इहवादाचे तत्त्वज्ञान किंवा हिंदुत्ववादाचे तत्त्वज्ञान असे शब्दप्रयोग करताना या विचारसरणींनी  आधीच आयते तयार तत्त्वज्ञान स्वीकारले आहे की नव्याने काही रचले आहे, हे प्रश्न उपस्थित करणे, सामाजिक आणि तात्विक दृष्टीनेही महत्त्वाचा ठरतात. कारण साधारणतः समाजाने ‘आदर्श’ म्हणून स्वीकारलेल्या विचारसरणीचा व्यक्तिगत पातळीवर आणि समूह पातळीवर प्रभाव पडत असतो, विचारसरणी स्वीकारली जाते. अशा वेळी या ‘आदर्शानी’ स्वीकारलेले तत्वज्ञान कोणते होते,  ते समजून घेणे व त्याची तात्त्विक व मूल्यात्मक चिकित्सा करणे, आवश्यक ठरते. एका व्यापक अर्थाने ती सामाजिक चिकित्सा असते. अशी सामाजिक, सांस्कृतिक चिकित्सा होत राहाणे जिवंत असा तत्त्वज्ञानात्मक व्यापार आहे. तत्त्वज्ञानात्मक निःसंदिग्धीकरणासाठी आणि व्यक्तीच्या आणि समाजाच्या ‘तत्त्वज्ञानात्मक आरोग्यासाठी’ (Philosophical Health)  ही चिकित्सा नितांत अनिवार्य असतात. येथेच दुसरा अर्थ सुरु होतो.

अर्थाची संदिग्धता

तथापि तात्त्विक दृष्टीने पाहाता ‘..चे तत्त्वज्ञान’ (Philosophy ‘ Of ‘ ….) ही बहुअर्थी संदिग्धता आहे. उदाहरणार्थ ‘मनाचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Mind मध्ये ‘अन्वेषण’ (a field of inquiry) असा अर्थ होतो तर Spinoza’s Philosophy of Mind मध्ये ‘सिद्धांत’  (a theory) असा होतो.

तार्किक संबंधक

त्याचा खरा तात्त्विक अर्थ अन्वेषण, चिकित्सा, तपासणी किंवा सिद्धांत असा होतो. ‘कशाचे/कोणाचे (तरी) तत्त्वज्ञान’ या शब्दप्रयोगातील ‘…चे’ (Philosophy ‘ Of ‘….) हे उपपद किंवा शब्दयोगी अव्यय अर्थाच्या दृष्टीने आणि व्याकरणीय दृष्टीने अतिशय संदिग्ध आहे. कारण ‘…चे’ (‘ Of ‘ ….) हे उपपद केवळ शब्दयोगी अव्यय नाही, तर ती एक ‘तार्किक संकल्पना’  (Logical Concept) आहे. तिच्या वाक्यात होणाऱ्या उपयोगाने तिचा अर्थ निश्चित होतो आणि संदर्भानुसार त्या निश्चितीला समर्थनीय पुष्टी मिळते. ‘…चे (‘ Of ‘ ….) तार्किक संबंधक/संयोजक (Logical Connective) आहे. एखाद्या विषयाचा इतर विषयाशी कोणत्या रीतीचा तर्कशास्त्रीय संबंध आहे, याचे सविस्तर वर्णन आणि विश्लेषण देणारे ते उभयान्वयी अव्यय आहे.

अन्वेषण, चिकित्सा, तपासणी किंवा सिद्धांत हे अर्थ स्वीकारता “…..चे तत्त्वज्ञान” (“Philosophy of”) ही एखाद्या विषयाशी संबधित असलेल्या  तत्त्वज्ञानातील पाच प्रश्न व पाच संकल्पना यांच्याशी; पर्यायाने त्या विषयाच्या मूळ रचनेशी आणि त्याच्या अभ्यासासाठी-चिंतनासाठी कोणकोणत्या गृहीततत्त्वांची गरज आहे, याच्याशी निगडीत उपयोजन आहे. पुढे जाऊन नवी गृहीतके शोधली गेली तर त्यांच्या आधारे त्या ज्ञानशाखेच्या  मूळ रचनेवर कोणते परिणाम होतील, याचाही शोध घेणे हे येथे अपेक्षित आहे. कारण, त्या ज्ञानशाखेचे तत्त्वज्ञानच त्यामुळे बदलले तर त्या ज्ञानशाखेची निष्पत्तिही बदलू शकते. उदाहरणार्थ, सामाजिक विज्ञानातील ‘इतिहास’ हा विषय पाहू.

“इतिहासलेखन म्हणजे काय? (‘ज्ञान म्हणजे काय?’- इतिहासाचे ज्ञानशास्त्र), इतिहासलेखन कसे करावे? (‘तर्क म्हणजे काय? इतिहासाचे तर्कशास्त्र), म्हणजेच ‘इतिहास कसा लिहावा?” या प्रश्नाचा विचार करता, इतिहासविषयक तत्त्वे कोणती, हे शोधता येते. त्यातून ‘इतिहासलेखन पद्धती’ (Historiography) आकाराला येते.

समजा, इतिहास युद्धकेन्द्री लिहिला तर त्यामुळे ‘युद्ध’ हाच भर देण्याचा मुद्दा होईल (महाभारत, ट्रोजन युद्ध, पहिले-दुसरे महायुद्ध, व्हियेतनाम युद्ध); जर “थोर इतिहास पुरुष” केंद्री इतिहास लिहिला तर त्या इतिहासाचा अर्थ बदलेल (रामायण, नेपोलियन, शिवाजी महाराज, बाजीराव पेशवा), किंवा मार्क्सवादी दृष्टिकोन अंगिकारला तर इतिहास वेगळाच होईल किंवा संपत्ती निर्माण करणारे चक्र म्हणून भांडवलशाही दृष्टिकोनातून इतिहास लिहिला तर त्याचे निष्कर्ष वेगळेच मिळतील. किंवा विद्यमानकाळात ‘कुडमुडी/ साटेलोटे भांडवलशाही’ (Crony capitalism) दृष्टी स्वीकारली तोही इतिहास वरीलपेक्षा वेगळा होईल. तेच ‘धर्मवादी- पुनरुज्जीवनवादी दृष्टी’  स्वीकारून लिहिला तर पुन्हा वेगळाच इतिहास समोर येईल. साहजिकच त्यात्या स्वरूपानुसार इतिहासचे आकलन बदलेल. म्हणजे Philosophy of History मध्ये वृत्तांत कथन केला जातो, किंवा विशिष्ट कालखंडात घडलेल्या घटनांचा क्रम स्पष्ट केला जातो. येथे Philosophy of History चा अर्थ ‘ऐतिहासिकतेची लेखनपद्धती’ असा होतो.

दुसरे उदाहरण दुसऱ्या प्रकारच्या इतिहासलेखनाचे पाहू. मानवी इतिहासाप्रमाणे निसर्गाला, पृथ्वीला किंवा ब्रह्मांडालाही इतिहास आहे. निसर्ग विज्ञानातील ‘समरूपतातत्त्ववाद’ (uniformitarianism) आणि उत्पातवाद (catastrophism) ही पृथ्वीवरील परिवर्तनाची तत्त्वज्ञाने मानली जातात.  ‘निसर्ग सर्वत्र समान आहे’ आणि ‘निसर्गातील बदल विशिष्ट नियमानुसार आणि संथगतीने घडत असतात’, हे निसर्गातील  समरूपतातत्त्वाचे गृहीततत्त्व आहे. तर; निसर्गातील बदल अचानकपणे, क्षणार्धात आणि उत्पात माजवणारे असतात, ते विश्वनिर्मितीशी निगडीत आहेत आणि प्रचंड प्रलय, पूर, भूकंप इत्यादी स्वरूपाचे असतात, हे उत्पातवादाचे गृहीततत्त्व आहे. विश्व अतिप्राचीन आहे, हा समरूपतातत्त्वाचा निष्कर्ष आहे, तर विश्व अतिशय तरुण आहे, हा उत्पातवादाचा निष्कर्ष आहे. पृथ्वीचा अथवा निसर्गाचा इतिहास लिहिताना कोणता दृष्टिकोन स्वीकारला जातो, त्यानुसार ‘निसर्ग इतिहासाचे तत्त्वज्ञान’ बदलते. याचा अर्थ असा होतो की एखाद्या ज्ञानशाखेची रचना बदलली किंवा त्याचे तत्त्वज्ञान बदलले की त्याचा निष्कर्ष बदलतो. पण दोन्ही ठिकाणी एकच वस्तुस्थितीचा वापर उदाहरण म्हणून केला जातो. येथेही Philosophy of History of Earth चा अर्थ ‘पृथ्वीविषयक ऐतिहासिकतेची पद्धती’ (Historiography) असा होतो.

सर्वात जास्त गोंधळ ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Religion) या शब्दप्रयोगात होतो. ‘आपापल्या धर्मात सांगितलेली विविध तत्त्वे, नियम, कर्मकांड, धार्मिक कठोरता, पाप-पुण्य, पुनर्जन्म, वर्णजात, ईश्वरपूजा, धर्माज्ञा धर्मसंसदेचे नियम, धर्मगुरूंच्या आज्ञा इत्यादींचे कठोर पालन करणे,’ असा अर्थ होतो. पण तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ‘धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ (Logical and Philosophical criticism of Religion) म्हणजे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ असा अर्थ होतो.

पहिला अर्थाचे ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ चा हा अतिशय सामान्य लोकांना अतिशय प्रिय आणि राजकारण्यांना, राज्यकर्त्यांना सोयीचे असते. सामान्य लोकांना-ईश्वरवादी, भक्तिवादी मंडळीना पहिला अर्थ आवडतो. बुद्धिवादीजनांना ‘धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हा दुसरा अर्थ अभिप्रेत असतो. पहिल्या अर्थाच्या ‘धर्माचे तत्त्वज्ञान’ मधून अन्य धर्माबाबतचे राजकारण सुरु होते. त्यांच्याविषयी प्रेम, सहभाव, समता की तिरस्कार हे अस्पष्ट राखले जाते.

यातील Philosophy of Religion चा दुसरा अर्थच, ‘धर्माची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हाच तात्त्विक अर्थ आहे. तोच सामान्य लोकांना मान्य असणे अपेक्षित असते. सामान्य जनतेला धर्म संकल्पनांचे ‘अर्थ’ उमजणे, त्याप्रमाणे त्यांनी वर्तन करणे अपेक्षित असते.

असाच अर्थ ‘कायद्याचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Law) बाबत आहे. त्याचा पहिला अर्थ, ‘न्याय संकल्पनेविषयक नैतिकदृष्ट्या समर्थनीय सिद्धांतावर आधारलेल्या वैधानिक न्यायतत्त्वांची संहिता’ असा होतो, आणि ‘प्रचलित कायदे आणि कायदा व्यवस्थाविषयक सिद्धांताची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हा दुसरा अर्थ होतो. येथेही ‘कायद्याचे तत्त्वज्ञान’ (Philosophy of Law) म्हणजे ‘कायद्याची तर्कशास्त्रीय आणि तात्त्विक चिकित्सा’ हा दुसरा अर्थच अभिप्रेत आहे. तोच सामान्य लोकांना मान्य असणे अपेक्षित असते, कारण त्यामुळे कायदेसंहिता संकल्पनांचे अर्थ त्यांना कळणे अपेक्षित असते.

प्रस्तुतची ही ‘…चे’ (‘ Of ‘ ….) ची अर्थविषयक तार्किक व तात्त्विक संदिग्धता लक्षात घेता, ‘….चे  तत्त्वज्ञान’ निर्माण करणे, ही बौद्धिकदृष्ट्या मोठी जोखीम असते. ती साहजिकच अनुभवसंपन्न तज्ज्ञांनीच रचावी, अशी गोष्ट असते. आणि शक्य झाल्यास योग्य असलेली अर्थहानी न होता, तो अर्थ सामान्यजनांपर्यंत झिरपेल असेही पाहाणे, त्यांच्याकडून अपेक्षित असते.

पाश्चात्य तत्त्वज्ञानातील “….चे तत्त्वज्ञान” 

जेव्हा “…..चे तत्त्वज्ञान” असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा ‘तत्त्ववेत्त्याने मांडलेले किंवा एखाद्या वैचारिक परंपरेने मांडलेले तत्त्वज्ञान’ असा अर्थ अभिप्रेत असतो. Philosophy of Plato, Philosophy of Kant, Philosophy of Russell, Philosophy of Science, Philosophy of the Natural Sciences, Philosophy of Physics, Philosophy of Biology, Philosophy of the Social Sciences, Philosophy of Sociology, Philosophy of Art Philosophy of Economics, Philosophy of Politics,  Philosophy of History, Philosophy of Law, Philosophy of Religion, Philosophy of Sex, Philosophy of Counselling, Philosophy of Food…..अशी कितीतरी तत्त्वज्ञाने किंवा तत्त्वज्ञानाच्या उपशाखा निर्माण होतात.

‘पाश्चात्य तत्त्वज्ञान’ नावाच्या विचारविश्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ तत्त्ववेत्तेच नव्हे तर अनेक कवी, वैज्ञानिक,लेखक,साहित्यिक,समीक्षक, चळवळकर्ते, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते यांनीही निर्माण केले आहे. मध्ययुगीन तत्त्वज्ञान निर्माण करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांमध्ये कान्ट या जर्मन तत्त्ववेत्त्याचा अपवाद वगळता बहुतेक तत्त्ववेत्ते वेगवेगळे तत्त्वज्ञानेतर व्यवसाय करणारे होते. ‘तत्त्वज्ञान निर्मिती करणे व त्याचे वितरण करणे’, म्हणजेच ‘तत्त्वज्ञानाची प्राध्यापकी’ हा काही त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय नव्हता.

विसाव्या शतकात म्हणजे समकालीन तत्त्वज्ञानाच्या निर्मिती, विकास, पुनर्रचना, अर्थनिर्णयन इत्यादी प्रक्रियांमध्ये मात्र अनेक व्यावसायिक तत्त्ववेत्त्यांचा (तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांचा) सहभाग आहे. शिवाय अनेक प्राचीन-अर्वाचीन संस्कृती, सभ्यता, परंपरा, संकेत यांचा तसेच विविध राजकीय, सामाजिक संघटनांचाही सहभाग आहे.त्यातून ‘त्यांचे तत्त्वज्ञान’ विकसित झाले, ज्यात ‘रसेलचे तत्त्वज्ञान’ समाविष्ट आहे. पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञान चिद्वाद, जडवाद,प्रज्ञावाद, अनुभववाद, नव अनुभववाद असे विचारनिष्ठ आणि “प्लेटोचे तत्त्वज्ञान, कान्टचे/हेगेलचे/नीत्शेचे/रसेलचे/फुकोचे/कामुचे/देरिदाचे/जॉन रॉल्सचे/नॉम चोम्स्कीचे/केन विल्बुरचे /सायमन ब्लॅकबर्नचे तत्त्वज्ञान….. “असे विचारवंतनिष्ठ तत्त्वज्ञान मांडले जाते.

भारतीय तत्त्वज्ञान ‘दर्शन’ निष्ठ तर पाश्चात्य-युरोपीय तत्त्वज्ञान विचारनिष्ठ आणि विचारवंतनिष्ठ अशा दुहेरी साच्याचे आहे. अद्वैताचे तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान, जैन तत्त्वज्ञान, चार्वाक तत्त्वज्ञान अशी परंपरानिष्ठ मांडणी आजपर्यंत होत आली. गेल्या काही वर्षात अशी व्यक्तीनिष्ठ मांडणी भारतीय तत्त्ववेत्यांच्या बाबतीत होत आहे. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान, तुकोबांचे तत्त्वज्ञान, तसेच धर्मानंद कोसंबी यांचे तत्त्वज्ञान, शरद पाटील यांचे तत्त्वज्ञान, देबीप्रसाद चट्टोपाध्याय यांचे तत्त्वज्ञान, दयाकृष्ण यांचे तत्त्वज्ञान, टी. एम. पी. महादेवन यांचे तत्त्वज्ञान, के. सच्चिदानंद मूर्ती यांचे तत्त्वज्ञान, राजेन्द्रप्रसाद यांचे तत्त्वज्ञान, विश्वनाथ नरवणे यांचे तत्त्वज्ञान, जितेंद्रनाथ मोहन्ती यांचे तत्त्वज्ञान, जी आर. मलकानी यांचे तत्त्वज्ञान,  सुरेंद्र बारलिंगे यांचे तत्त्वज्ञान, दि. य. देशपांडे यांचे तत्त्वज्ञान,  मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान, नरहर कुरुंदकर यांचे तत्त्वज्ञान. त्याचप्रमाणे म. फुले यांचे तत्त्वज्ञान, शाहू महाराज यांचे तत्त्वज्ञान, म. गांधी यांचे तत्त्वज्ञान, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्त्वज्ञान अशी समाजपुरुषांच्या वैचारिकतेची मांडणी पुढे येत आहे.

‘….चे तत्त्वज्ञान’ : आंतरविद्याशाखीय ज्ञानरचना

‘प्रत्येक विषय  व ज्ञानशाखा (यां)”….चे तत्त्वज्ञान” निर्माण करणे अतिशय कठीण आहे. याचे मुख्य कारण “त्या त्या विषयाचे तत्त्वज्ञान” निर्माण करण्यासाठी ‘त्या त्या विषयाचे तज्ज्ञ’ आणि ‘तत्त्वज्ञान’ या विषयातील तज्ज्ञ यांची गरज असते, म्हणजेच ‘एखाद्या विषयाचे तत्त्वज्ञान’ निर्माण करणे ही आंतरविद्याशाखीय ज्ञानरचना आहे. ती दीर्घकाळ चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे. तिची प्रात्यक्षिके मिळणे महाकठीण असते. हे विविध तज्ज्ञ आणि ‘तत्त्वज्ञान’ या विषयातील तज्ज्ञ यांच्यातील सुसंवाद साधला जाणे, हेही बऱ्यापैकी अबघड काम आहे. त्यात एकमेकांना ‘तज्ज्ञ’ म्हणून ‘जाणले जाणे’, तशी मान्यता देणे, नवी ज्ञानशाखा निर्माण करण्याची उभयपक्षी तीव्र इच्छा असणे, संवादासाठी पुढाकार घेणे, चर्चापीठ निर्माण करणे, इत्यादीमध्ये व्यक्तिगत स्वभावदोष व गुण यांचा प्रभाव आढळतो. प्रखर ज्ञानलालसा असणारी तज्ज्ञ मंडळी एकत्र येऊन हे काम करण्याची मुबलक उदाहरणे पाश्चात्य-युरोपीय परंपरेत आढळतात. पण ….

जिज्ञासूला व्यक्तिला किंवा विद्यार्थ्याला त्याच्या चिंतनविषयाचे, तो विषय ज्या ज्ञानशाखेचा -विज्ञान/कला/वाणिज्य/अभियांत्रिकी/वैद्यक इत्यादी ज्ञानशाखेचा आहे, त्या ज्ञानशाखेची पद्धती, कार्यप्रणाली, मूलविधाने (presuppositions), मूलाधार (axioms) सुव्यस्थितरीत्या समजली तर आणि तरच तिला अधिक उत्तम रीतीने मूल्यमापन करण्याच्या आणि चिकित्सा करण्याच्या पातळीवर येता येणे शक्य होऊ शकते.

“एखाद्या विषयाचे तत्त्वज्ञान” निर्माण करणे, हे विशेष करून भारतात अतिशय अडचणीचे काम आहे. त्याची विविध कारणे आहेत, त्यांची विस्तारभयास्तव मांडणी करणे शक्य नाही. नमुन्यादाखल उदाहरणार्थ, प्राथमिक उच्च पदवी शिक्षणाची रचना अतिशय बंदिस्त आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेत विषय एकदुसऱ्याच्या शाखेतील अन्य विषय निवडीला वावच नाही. जसे की ‘तत्त्वज्ञान’ हा विषय येथील विद्यापीठीय रचनेत केवळ ‘कला’ शाखेतच आहे. विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी तो घेऊ शकत नाही. दुसरीकडे विज्ञानाचा स्फोट होऊनही ‘गणित-विज्ञान नको’ वालेच कला शाखेत येत ‘तत्त्वज्ञान’ विषयातील पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्याला विज्ञानाचे सखोल ज्ञान असू शकत नाहीच नाही. कला शाखेतील सर्वच विषय संबंधित विद्यार्थ्याला  आवडतील, भावतील आणि तो त्यांचा सखोल अभ्यास करेल, याचीही शाश्वती नसते. मुळात शिक्षणाचा हेतूच ज्ञानप्राप्ती नसून रोजगारप्राप्ती असल्याने त्या गरजेपुरतेच ज्ञान (म्हणजे माहिती) मिळविली जाते.

‘गणित-विज्ञान नको’ वालेच कला शाखेत येत असल्याने विज्ञानाची आवड, वैज्ञानिक वृत्ती आणि वैज्ञानिक पद्धतीविषयी तळमळ असणारे तत्त्वज्ञानाचे जिज्ञासू अभ्यासक तत्त्वज्ञानाच्या चिंतन क्षेत्रात निर्माण होतील, याची शाश्वती नाही, काही सन्माननीय अपवाद वगळता (उदाहरणार्थ मी श्रीनिवास हेमाडे !).

तत्त्वज्ञानाचा विशेषाधिकार

तत्त्वज्ञान हा जगातील एकमेवाद्वितीय असा विषय आहे की, किंवा त्यांचे स्वरूपच असे आहे की त्यावर कोणताही अतिशय प्रशिक्षित माणूस जसा अधिकारवाणीने बोलू शकतो तसा कोणताही अतिशय अशिक्षित माणूसही अधिकारवाणीने बोलू शकतो. त्याचे मुख्य कारण तत्त्वज्ञान हा अतिव्याप्त विषय आहे, याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीचे म्हणून स्वतःचे असे एक वैशिष्ट्यपूर्ण तत्त्वज्ञान असू शकते.

‘तत्त्वज्ञान’ हा शब्द अर्थाच्या दृष्टीने अतिशय सैलसर असल्याने कोणत्याही व्यक्तिला तिची व्यक्तिगत मते व्यक्त करण्याचा अधिकार ‘तत्त्वज्ञान’ बहाल करते. लोकांच्या कथनातून एक रेखीव, नीटसं, तार्किक बांधणीचे; पुढील भावी विचाराला उपयुक्त ठरू शकतील, अशी स्फुल्लिंगे लाभू शकत असतात, हा त्या व्यक्तिचा विशेषाधिकार असतो. त्या वैचारिक स्फुलिंगाचा यथार्थ उपयोग करूनच तत्त्ववेत्ते ‘एखाद्या विषयाचे शिस्तबद्ध तत्त्वज्ञान’ रचू शकतात, हे आपल्याला सॉक्रेटीसच्या ‘संवाद शैली’ तून अनुभवाला येते. सॉक्रेटीसचे रस्त्यावर घडणारे साधे संवाद नंतर प्लेटोने नेटक्या तात्त्विक भाषेत मांडले, ही मोठी मानवी मिळकत आहे.

वक्त्यांचे तीन प्रमुख प्रकार

इथे एक आवर्जून नमूद केली पाहिजे, ती अशी की कोणतीही अकेडेमिक चर्चा घडत असताना, किंवा एखाद्या चर्चेलाच अकेडेमिक स्वरूप मिळू लागले की वक्त्यांचे तीन प्रकार घडत जातात :

(१) पहिला प्रकार असा की ज्या वक्त्याला मूळ पाच संकल्पना आणि पाच प्रश्नांची, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या तत्त्वज्ञानाच्या पाच शाखांची ‘यथार्थ जाण’ असते, किंवा अभ्यास-मनन-चिंतन केल्याने साक्षात परिचय असतो, तो वक्ता अतिशय गांभीर्याने त्यांचा संदर्भ घेऊन या प्रकारची प्रस्तुत असलेल्या विषयाची चर्चा करतो.

(२) दुसरा प्रकार, ज्यांना या साऱ्या तात्त्विक साधनांपैकी कोणत्यातरी एका अथवा अधिक संकल्पनांची व त्यांच्याशी निगडीत तत्त्वज्ञानाच्या शाखेची थोडीफार (खरे तर फारच थोडी!) माहिती असते, पण येनकेन कारणे त्यांना अभ्यास-मनन-चिंतन या द्वारे अधिक ज्ञान मिळवण्याची इच्छाशक्ती नसते, पण केवळ ऐकीव माहितीवर “आपल्याला, पर्यायाने ‘मला’ यथार्थ जाण आहे’ ” असे ज्यांना केवळ ‘वाटत असते’ असा वक्ताही वरील संकल्पना, प्रश्न व ज्ञानशाखा यांचे उल्लेख करतात. पण त्यांची सचोटी अशी असते की ते जे काही बोलत असतात, त्याचवेळेस ‘आपण जे काही मांडत आहोत, त्याविषयी तो वक्ता सजग आणि सावध असतो.

(३) तिसरा प्रकार म्हणजे ‘अशा चर्चांमधून तयार झालेले’ पण वरील दोन्ही प्रकारच्या वक्त्यांकडे असलेले कोणत्याही ज्ञानविषयक सद्गुणाचा अभाव असलेले असतात. पण चर्चा करत असताना त्यांना अधेमध्ये आठवण आली की, किंवा आपला दबदबा वाढवा या हेतूने श्रोत्यांच्या माहितीचा अंदाज घेऊन ते वरील संकल्पना, प्रश्न व ज्ञानशाखा यांचे उल्लेख करत राहातात. आणि हे तिसऱ्या तऱ्हेचे लोक जास्त धोकादायक असतात.

या तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा लोकांच्या जीवनविषयक धारणांमधून “त्यांचे असे खास तत्त्वज्ञान” निर्माण होते. तेच सामान्य माणसाचे तत्त्वज्ञान असते, पण ते तात्त्विक अर्थाने तत्त्वज्ञान नसते हे उघडच आहे; असे तत्त्वज्ञान विविध प्रकारच्या भावना, इच्छा इत्यादींनी ग्रस्त असते. आणि अशा तिसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये विविध विषयांच्या तज्ञांचाही समावेश असू शकतो!

या तिसऱ्या प्रकारच्या लोकांचा धोका जाणवूनच त्यांच्यासाठी म्हणजेच सामान्य लोकांसाठी तत्त्वज्ञान जाणीवपूर्वक उपलब्ध झाले पाहिजे, असे मला वाटते. केम्ब्रिजचे तत्त्ववेत्ते सायमन ब्लॅकबर्न यांच्या मते, ‘तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध झाले पाहिजेच. पण ते त्यांच्या भाषेत न देता त्यांना काहीएक प्रशिक्षण देवून उपलब्ध केले पाहिजे. त्यांच्या मते, ‘तत्त्वज्ञान लोकांना उपलब्ध करून देणे म्हणजे लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे. त्याचाच अर्थ तत्त्वज्ञान ज्या रीतींनी विचार करते, त्या रीतींनी विचार करण्यास सामान्य लोकांना उत्तेजन देणे.’

सायमन ब्लॅकबर्न काही प्रश्न उपस्थित करतात, प्लेटोपासून विसाव्या शतकातील अनेकांच्या तत्त्वज्ञानामागील हेतू खरेच लोकाभिमुख होते का? त्यांचे लेखन खरेच लोकसुलभ होते का? ब्लॅकबर्न पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासंदर्भात तीन निरीक्षणे नोंदवितात.

पहिले, ‘पाश्चात्त्य तत्त्वज्ञान म्हणजे कांट, हेगेलपासूनच्या तत्त्ववेत्त्यांची पल्लेदार विधानांची मुक्त पखरण आणि व्याकरणीय नियमांची गुंतागुंत असलेली भाषाशैली’, जिने तत्त्वज्ञान कठीण बनले. दुसरे, ‘त्या काळात इंग्लिश ही जनभाषा असताना लेखन प्रतिष्ठित व अभिजात समजल्या जाणाऱ्या जर्मन भाषेत करणे’. ज्याचा परिणाम म्हणून तत्त्वज्ञान सामान्यांपासून दूर गेले. तिसरे निरीक्षण म्हणजे ‘हे सारे काही हेतुपूर्वक घडलेले नाही, सहजपणे ‘तत्त्वज्ञानाचे अवघडीकरण’ केले गेले!’

याचा अर्थ असा की, लोकभाषा हे व्यापक माध्यम पूर्ण ताकदीने वापरले गेले नाही. नंतर विविध कारणांमुळे एकोणिसाव्या शतकात इंग्लिश ही ज्ञानवहनाची आणि म्हणून ज्ञानउत्पादकांची भाषा बनली; म्हणजेच इंग्लिशला ‘विश्वभाषा’ हा दर्जा मिळाला तेव्हापासून ग्रीक-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना उपलब्ध झाले. भाषेचा प्रश्न मिटला, पण परिभाषेचा मात्र मिटला नाही. सर्वत्र पुन्हा अतिशय तांत्रिक भाषेत तत्त्वज्ञान मांडले गेले, त्या परिभाषेपासून सामान्य लोकांना दूर ठेवले गेले. तेही चुकीचे ठरले. त्यामुळे ‘सामान्य भाषेत तत्त्वचिंतन सोपे करता येते’, असा आशय मांडणारी भाषिक विश्लेषणाची चळवळही रुजली. रसेलचा मित्र आणि सहकारी जॉर्ज एडवर्ड मूरने तत्त्वज्ञानासाठी सामान्य भाषा चळवळ रुजवण्याचा आग्रह धरला.

अर्थात सारेच तत्त्वज्ञान सामान्य भाषेतून तत्त्वज्ञान मांडले जावे, हे मत रसेलला मान्य नव्हते. त्याच्या मते, तत्त्वज्ञानाचा काही हिस्सा तत्त्वज्ञानाच्याच परिभाषेत मांडला गेला पाहिजे. हे त्याचे मत ब्लॅकबर्न यांच्या  “लोकांना तत्त्वज्ञानाच्या शैलीचा परिचय करून देणे” या मताशी जुळते. म्हणूनच रसेलचे तत्त्वज्ञान व विचार समजून घेताना ‘तत्त्वज्ञानाच्या मूलभूत पाच संकल्पना, पाच प्रश्न आणि पाच ज्ञानशाखा यांची माहिती घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे ‘….चे तत्त्वज्ञान’ ही अधिकची संकल्पनाही समजून घेणे आवश्यक ठरली.

या वैचारिक उपकरणरुपी ऐवजाच्या आधारे आपण ‘बर्ट्रांड रसेलचे तत्त्वज्ञान’ समजून उमजून घेणार आहोत. त्याचे ज्ञानशास्त्र, सत्ताशास्त्र, तर्कशास्त्र, नीतिशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र यांचे स्वरूप आपण पाहू शकू.  यात त्याचे मुख्य सिद्धांत, त्याचे महत्वाचे ग्रंथ, काही संकल्पना यांचा अर्थहानी न होणारा संक्षिप्त परिचय आणि काही अनुभव यांचा समावेश असेल. ही सारी पूर्वपीठीका असेल. त्यापुढील अध्ययन, चिंतन आणि त्यात वृद्धी व समृद्धी ही नैतिक व वैचारिक जबाबदारी जिज्ञासूला सहर्ष व उत्फुल्ल मनाने स्वीकारता येईल.

परिभाषेची ओळख

रसेलचे सिद्धांत, त्याची मते किंबहुना त्याचे समग्र तत्त्वज्ञान सांगणे, हा या लेखमालेचा हेतू नव्हता, तर त्यांची यथार्थ ओळख करून देणे, त्यातील काही महत्वाच्या मूलभूत संकल्पनांची ओळख करून देणे, त्यांच्या आकलन सुलभतेसाठी ज्या परिभाषेची गरज आहे, तिचीही ओळख करून देणे एव्हढाच मर्यादित हेतू आहे. रसेलचे समग्र तत्त्वज्ञान सांगणे, त्याची चर्चा व चिकित्सा करणे, हा व्यावसायिक तत्त्वज्ञानाचा ‘व्यवसाय’ आहे; म्हणजे ‘तत्त्वज्ञान’ हा विषय पदवी इत्यादीसाठी अभ्यासणाऱ्या विद्यार्थी व जिज्ञासू व्यक्तीचा व्यवसाय आहे. वर्गात बसून शिकण्याचा आणि शिकवण्याचा तो विषय आहे.  सामान्य वाचकाला वर्गात बसून शिकायचे नसते, त्याची उत्सुकता समाधान पावेल, त्याला अधिक अभ्यास व चिंतनाची ओढ लागेल, हे गृहीत धरून हे लेखन आयोजिलेले आहे.

श्रीनिवास हेमाडे, तत्त्वज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आणि  व्यावसायिक तत्त्ववेत्ते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0