सत्तांतर आणि कॅनव्हास यांचा गुजरात पॅटर्न

सत्तांतर आणि कॅनव्हास यांचा गुजरात पॅटर्न

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये पंढरपूर दौरा केला. ‘पंढरपूरसे मेरे खास रिश्ते है’ असे ते त्याप्रसंगी म्हणाले. काही आठवडे आधी मोदी पुण्याला देहूगावला येऊन गेले, त्यांनी संत तुकारामाचा वेष धारण केला. एखाद्या लहान गावातील देवस्थानाच्या उद्घाटनाला देशाचे पंतप्रधान येतात किंवा आमंत्रण दिले म्हणून ते आले इतके सहज हे घडलेले नाही. महाराष्ट्रातील पुढच्या नियोजित घटनांची बीजे त्यात दडली होती...

पत्रकार खशोगींची हत्या सलमान यांच्या आदेशानुसार  
हिंदू मंदिरावरील हल्ले; पाकिस्तानात अल्पसंख्याक भयभीत
‘एसईबीसी’ लाभार्थ्यांनाही ‘ईडब्ल्यूएस’चा लाभ

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सत्तास्थानावर विराजमान होताना एकनाथ शिंदे सत्यनारायणाची पूजा करायला निघतात, ती स्वतःच्या घरी नाही तर मंत्रालयात, ही बाब सर्व काही स्पष्ट करण्यास पुरेशी आहे.

माध्यमांतून चर्चा पसरते की पंढरपूर एकादशी रोजी विठ्ठलाच्या महापूजेचा प्रश्न सुटला. त्यास आणखी उजाळा देण्यासाठी मुख्यमंत्री म्हणतात, आधी दिल्लीवारी मग पंढरपूर वारी. आधी नरेंद्र मोदी यांची भेट नंतर विठ्ठलाची पूजा. ही बाब एकनाथ शिंदे यांच्या निष्ठेचे प्राधान्य क्रम सांगणारी आहे. महत्त्व कशाला अधिक आहे, कर्तव्य कोणते अधिक आहे हे ते जाहीरपणे सरळपणे सांगत आहेत. त्यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. कारण मोदीभक्त दिवसरात्र सांगत असतात की नरेंद्र मोदी हे विष्णूचा अवतार आहेत. पंढरपूरचा विठ्ठल हाही विष्णूचा अवतार आहे, त्यामुळे आधी दिल्लीवारी करणे हे भक्ती प्रथेत बसणारेच आहे.

सत्ता धारण करताच मुख्यमंत्री म्हणतात, की मागच्या अडीच वर्षात देवेंद्र फडणवीस यांना भेटायला वेषांतर करून जात असे. आमच्या नियमित भेटी सुरू होत्या. याचा अर्थ असाच आहे की एकनाथ शिंदे हे पहिल्या नसेल, पण दुसऱ्या टर्मला मुख्यमंत्री होणार हे ठरलेले होते. मुद्दा फक्त आधी कोण नंतर कोण हाच होता. सलग पाच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल ही बाब भाजपकडून आधीच मान्य झालेली असणे हे शक्य नव्हते. म्हणूनच अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर काही दिवस आधीच येऊन गेले तेव्हा २०१९ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेला कोणतेही वचन दिले नव्हते, असे म्हणाले. पण हेच वाक्य त्यांनी मागच्या दोन अडीच वर्षात एकदाही उच्चारलेले नाही.

छुपे भाजपप्रेम

उद्धव ठाकरे यांच्या घरी बंद खोलीत ती चर्चा मसलत झाली. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस म्हणत राहिले की, असे कोणतेही वचन दिलेले नव्हते. उद्धव ठाकरे म्हणत असत की तुम्ही अमित शहा यांना विचारा, त्यांनी मला वचन दिले आहे. याचा अर्थ इतकाच होतो, की एकूण शिवसेनेला भाजप सोबत युती करायची असतेच. नव्हे मागच्या ४० वर्षाचा इतिहास हेच सांगतो, की शिवसेनेला भाजप हा पक्ष खूप खूप आवडतो. भाजप सोबत कोणत्याच मुद्द्यावर त्यांचे कधीच मतभेद झालेले नाहीत. जागा वाटप असो की खाते वाटप असो शिवसेनेने भाजपला हवे ते दिलेले आहे. सत्तेतील वाटा देणे आणि घेणे यासाठी शिवसेना नेहमी हात पुढे करत आलेली आहे…

२०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना यांचे जागा वाटप दोन्ही पक्षांच्या मर्जीने झालेले होते. दोन्ही पक्षांना निवडणुकीत यश मिळावे याची जबाबदारी देवेंद्र फडवीस यांच्यावर दिलेली होती. २०१४ ची निवडणूक, सलग पाच वर्ष एकहाती सत्ता, त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा याबाबत सर्वाधिकार यामुळे व्यक्तिशः देवेंद्र फडणवीस यांचे हात अनेक अर्थाने मजबूत झालेले होते. अनेकांच्या लक्षात येत नाही की भाजपच्या दिल्ली हायकमांडकडे देवेंद्र यांचे वजन इतर कुणाही पेक्षा जास्त आहे. जी ख्याती शरद पवार यांची होती, तीच देवेंद्र यांची निर्माण झाली आहे. म्हणजे असे की दिल्लीत वजन, पक्षात वजन, सर्व विरोधी पक्षात उत्तम नेटवर्क, आमदारांशी खाजगीत घनिष्ठ मैत्री, मीडियाकर्मी त्यांच्या प्रेमात, त्यातही लोकप्रिय चॅनेल्स आणि नामांकित वृत्तपत्रांचे संपादक दररोजच्या भेटीतील मित्र, सरकारी यंत्रणेत सर्व स्तरात प्रशासनातील अधिकारी तत्पर. अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या शक्तीने भक्कम झालेले आहेत.

आपण इतरांपेक्षा ताकदवान आहोत हे त्यांच्याच लक्षात आल्यामुळे त्यांना हवे तसे सूत्र फिरवण्यासाठी दिल्लीकडून झुकते माप असल्याने त्यांनी आमदार मंडळींना हाताळणे सुरू ठेवले. आपल्याच पक्षातील महत्त्वाकांक्षी नेत्यांना बाजूला सारण्यात त्यांना सहज जमत गेले. त्यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणेतील कार्यपद्धतीचा योग्य उपयोग करून घेतला. 

कागदपत्रांचा खेळ

सिंचन घोटाळा जो गाजला तो अशाच जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारे. वाढीव अंदाजपत्रकाच्या कॉपीज सर्व संपर्क-सूत्रांकडून मिळवणे त्यांना अवघड गेले नाही. अशाच प्रकारे वेगवेगळे विषय, व्यवसाय, व्यवहार यांच्या बाबतीत डेटा कलेक्शन कसे करायचे हे त्यांना अवगत होतेच. त्यामुळे एकनाथ खडसे यांचे जमीन प्रकरण असो की पंकजा मुंडे यांचे चिक्की प्रकरण त्यांनी कागदांच्या आधारे तगड्या नेत्यांना जागेवर आणले. पण हे एकट्या देवेंद्र यांची कार्यपद्धती नाही. तो भाजपने अनेक वर्ष केलेल्या नांगरणी- पेरणीचा एक भाग आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर संबंध देश समाधानी होता. पण न झालेला भ्रष्टाचार त्यावेळेच्या कॅग यंत्रणेकडून उघड झाला. त्याला मीडियातून प्रचंड हवा देण्यात आली. त्याच धोरणाचा भाग म्हणून नरेंद्र मोदी म्हणाले, ‘न खुद खाऊंगा न किसीको खाने दुंगा.’ मीडियाने हे वाक्य आणि त्यांची प्रतिमा प्रचंड उंचावून ठेवली. भाजप २००९ च्या निवडणुकीमध्ये निव्वळ शांत वाटत होता. कारण २०१४ च्या निवडणुकीचे वादळ विणले जात होते. अंदाजे २०१२च्या आसपास सगळीकडच्या तपास यंत्रणांकडून विरोधक पक्ष आणि नेत्यांविषयी प्रचंड माहिती गोळा करण्यात आली. २०१४ च्या प्रचंड यशात आणि नंतरच्या सत्ता अधिकारात या माहितीचा मोठ्ठा हातभार लागलेला आहे. फक्त मोठ्या नव्हे तर देशातील, महाराष्ट्रातील तालुका पातळीपासून, शहर असो की खेडे असो, बँक असो की पतसंस्था असो, अधिकारी असो की आमदार असो, मंत्री असो की नेता असो, सगळ्या पक्षातील लोकांच्या आर्थिक व्यवहाराची प्रचंड माहिती पक्षाकडे वाहत राहिली. इन्कम टॅक्स, ईडी, ऑडिट, कॅग इत्यादींनी समांतरपणे कामे सुरू ठेवली होती. विजयसिंग मोहिते असो की चित्रा वाघ असो, संजय राऊत असो की उद्धव ठाकरे असो सगळ्यांना ईडी नोटिसा धाडण्यात आल्या, भाजपमध्ये प्रवेश करण्याची हूल उठली. 

पवारांशी संग- पवारांचा धडाका

त्याच वेळेला संपर्क मोहीम हाती घेण्यात आली. आमच्या पक्षात या, स्वतःच्या पक्षात राहून आमचे काम करा, स्वतःचा पक्ष फोडा आणि या, तुमच्या भागातील शेकडो कार्यकर्ते घ्या आणि पक्षात या. आक्रमक अशा या धडक मोहिमेमुळे शरद पवारसुद्धा त्रस्त झाले. त्यांचा पक्ष केव्हा फुटेल याचा नेम नव्हता. परंतु, भाजपने शरद पवार यांना कधीच थेट विरोध केलेला नाही. हा त्यांच्या राजकीय धोरणाचा भाग आहे.

त्या धोरणामुळेच २०१४च्या निवडणुकांचा निकाल पूर्ण हाती येण्याआधीच भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळावे, यासाठी न मागता, न सांगता बाहेरून जाहीर पाठिंबा शरद पवार यांनी दिला. त्यामागे वरील सर्व कारणे होती. तपास यंत्रणांच्या धाडी पडणार हे त्यांना आधीच समजले होते. त्यातच नरेंद्र मोदी करिष्मा इतका प्रचंड होता की भाजपमध्ये जाण्यासाठी स्पर्धाच लागणार, हे शरद पवार यांनी ओळखलेले होते. राष्ट्रवादीमधील नेत्यांनी काँग्रेसमध्ये जावे असे त्यांना कधी वाटलेले नाही. उलट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपमध्ये जायला हरकत नाही. अशी शरद पवार यांची न बोलता भूमिका राहिली आहे.

पक्ष बदलणाऱ्यांची संख्या तर वाढणारच. पण त्यातून गणित काय समोर येणार, हा प्रश्न जबडा वासून उभा होता. आज जशी उद्धव ठाकरे यांची अवस्था किमान वरून तरी दिसते आहे तशी शरद पवार यांची झाली असती. अनेक विश्वासू साथीदार, पक्ष नेते त्यांना सोडून जातच होते. तुमच्या नात्यातील लोकच तुम्हाला सोडून जात आहेत, हा प्रश्न एका तोतया पत्रकाराने त्यांना विचारला. तो त्यांच्या मनाला लागला. सोलापूर येथील अमित शहांच्या सभेत राष्ट्रवादीच्या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. त्यात राणा जगजितसिंग पाटील होते. त्या ठिकाणी अमित शहा यांनी शरद पवार आणि त्यांचे कुटुंब याबद्दल टोलेबाजी केली.

शरद पवार यांची खासियत अशी आहे की, वाऱ्याची चाहूल लागली की त्यांना त्याची दिशा आणि वेग पाहायचा असतो. त्यासाठी त्यांनी उस्मानाबाद येथे अचानक सभा लावली. त्या सभेला तरुणांनी प्रचंड गर्दी केली. शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत हल्ला सहन न होणारे लाखो तरुण महाराष्ट्रात आहेत. पण ते स्वतःहून राजकीय प्रतिसाद देतील का याचा अंदाज त्यांना घ्यायचा होता. त्यांना जशी अपेक्षा होती तसा उत्स्फूर्त पाठिंबा त्यांना तरुणांनी दिला. विना चेहरा, विना पद, विना अपेक्षा हा प्रतिसाद होता. शरद पवार यांनी ते बळ उचलले आणि पुढची निवडणूक त्यांनी एकट्याच्या खांद्यावर घेतली. शरद पवार जर उस्मानाबाद येथे आले नसते, त्यांना तरुणांचा अंदाज आला नसता तर २०१९ च्या निवडणुकीत भाजप हा एकटा सत्ताधारी राहिला असता. तरी भाजपने मैदान मारले.

भाजपचा डबलगेम

भाजपने मैदान सर करत असताना अंतर्गत एक खेळ केलेला होता. तो म्हणजे, शिवसेनेच्या जागा आणि काँग्रेसच्या जागा एकदम नगण्य करायच्या. म्हणजे तीस चाळीसच्या आतच. पुढे त्यातले फुटून जाण्यास सोपे होणार होते. ईडीची भीती आणि निवडणुकीतील दगा यामुळे उद्धव ठाकरे तेव्हाच अडचणीत आलेले होते. पण भाजपला एकहाती बहुमत आलेच नाही. तडजोड किंवा घासाघीस इत्यादी मार्गाने स्वतःचे आणि शिवसेनेचे अस्तित्व टिकवणे, हेच त्यांच्यासमोर आव्हान उभे राहिले. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना या तीनही पक्षात बंड होणार अशी चिन्हे दिसू लागली. त्याच काळात जसे नेहमी घडते तसे झाले. शरद पवार नियमित दौरा म्हणून दिल्लीला गेले. त्यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तोपर्यंत सरकार स्थापन कसे होणार याचे चित्र स्पष्ट नव्हते. इकडे हवा पसरली की राष्ट्रवादी भाजप सोबत जाणार आणि शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करणार. त्यात एक बारीक काडी पडली ती म्हणजे सुप्रिया सुळे यांना वरचे पद मिळणार अशी चर्चा सुरू झाली. पण वरचे म्हणजे कोणते? हे झाकली मूठ सव्वा लाखाची प्रकार घडला.

वरून आदेश आलेला असेल किंवा तसाच आदेश आहे असा ग्रह झाला असेल, पण अचानक पहाटे उठून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सरकार स्थापन केले. एकदा सरकार स्थापन झाले की आमदार गोळा करणे सोपेच होणार. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटणार हे स्पष्ट झाले. ही फूट टाळण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे सरसावले. प्रश्न होता, तो काँग्रेसचा. शिवसेनेला आणि शरद पवार यांना वाटत होते की काँग्रेस नाही म्हणेल आणि तसे झाले तर तीन पक्षाचे म्हणजे काँग्रेस सोडून बाकीचे अशी सत्ता स्थापन होऊ शकते. पण अनपेक्षितपणे सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास टाकला त्यांच्यावर समन्वय जबाबदारी सोपवली. 

फुटीवरचा अस्थिर उपाय

पण प्रश्न समोर आला की मुख्यमंत्री कोण होणार? कारण ठाकरे घराणे नेहमी सत्तेतून बाहेर राहून संघटनेमार्फत नियंत्रण ठेवत आलेले आहे. पण ही वेळ तशी नव्हती. फूट समीप आलेली होती. त्यांना मदत होईल अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार तर पाठिंबा. हा सगळा खेळ पक्षांतली फूट टाळण्यासाठी होता. उद्धव यांच्या पत्नीचे नाव त्यामुळेच पुढे आलेले होते. एकनाथ शिंदे हे सर्वात प्रबळ दावेदार होते. त्यांच्यामागे शक्ती तर आहेच, पण भाजपची ती पहिली पसंद होती. भाजपला अंदाज होता की उद्धव नाही म्हणणार आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार. तसे झाले असते, तर आज ज्या घडामोडी घटना घडल्या त्याच २०२० च्या आधी घडल्या असत्या. काही महिन्यात एकनाथ शिंदे काँग्रेसविरोधात आगपाखड करत हिंदुत्वाचा नारा देत बाहेर पडले असते. दुसऱ्याच दिवशी पुन्हा भाजप-शिवसेना सत्ता स्थापन झाली असती. पण त्याच वेळी राष्ट्रवादीत फूट अटळ होती, उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व संपले असते. उद्धव ठाकरे यांनी भला मोठा कार्यक्रम घेतला होता निष्ठा व्यक्त करण्याचा, त्याचे नाव होते, शिवबंधन. म्हणजे हातात गंडा बांधून स्वतःची निष्ठा व्यक्त करायची. अशी वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली कारण भाजपकडून फार पूर्वी सुरुंग पेरलेले होते. त्याचे पुरावे आता स्वतः एकनाथ शिंदे देत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मी रात्री गुपचूप भेटत होतो. पण खरे तर असे आहे की, दिवसासुद्धा गुपचूप भेटता येते. तेवढी उमज आणि पर्याय दोघांकडे आहेत. पण हे मुद्दाम सांगत आहेत, त्याचे कारण म्हणजे मी एकदम काही धोका दिलेला नाही. उलट मीच हिंदुत्वासाठी तत्पर आणि कार्यरत होतो. याचा अर्थ असा आहे की आज जे दिसत आहे ते दोन वर्ष आधीच घडून गेलेले आहे.

या कॅनव्हासवर देवेंद्र फडणवीस जवळपास दररोज म्हणत होते की, महाविकास आघाडीतील मोठे नेते आमच्या संपर्कात आहेत, सरकार केव्हाही कोसळू शकते. त्यामुळे संजय राऊत रोज एकदा तरी म्हणत आले की हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, त्यामुळे शरद पवार म्हणत की महाविकास आघाडी सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. पण हे होणार नाही दोन अडीच वर्षात गच्छंती होणार हे सगळ्यांना माहीत होते.

कारण, हा भाजप पॅटर्न सगळीकडे प्रचलित होताच. भाजपने आपले काम कधीही थांबवले नाही. सरकारवर दररोज एक हल्ला, शरद पवार यांच्यावर हल्ला, ईडीकडून एका मागून एक अटक, गृहखात्यातील केसेस, अनेक धाडी, शाहरुखच्या मुलाची केस, गोपीचंद पडळकर यांचा आक्रस्ताळेपणा, नवनीत राणा, रवीराणा यांची हनुमान चालीसा, केतकी चितळेकडून आलेली फेसबुक पोस्ट, त्यापूर्वी कंगनाकडून पाकिस्तानची तुलना अशा शेकडो चाली अडीच वर्षात भाजपने राज्यात खेळल्या. चोवीस तास नव्हे तर तासाचे साठ मिनिट सतत राजकारण हा भाजपचा फण्डा आहे. हा स्पेशल गुजरात पॅटर्न आहे. अवाढव्य सत्ता, सर्वंकष सत्ता हे त्याचे सूत्र आहे. देशाच्या आणि राज्याच्या नकाशावर सगळीकडे भाजपच दिसला पाहिजे हा दिल्लीतील दोन नेत्यांचा, त्यातही अमित शहांचा आदेश आहे.

लालूप्रसाद यादव जेव्हा प्रचंड आक्रमक झाले आणि त्यांची लोकप्रियता वाढली तेव्हा नितीशकुमार यांनी त्यांच्या सोबत युती केली. पुढे एक वर्ष होण्याच्या आतच भ्रष्टाचाराचे निमित्त करून त्यांनी लालूंसोबत युती तोडली आणि चोवीस तासात भाजप सोबत सरकार स्थापन केले. नितीशकुमार यांना माहीत नव्हते की चारा घोटाळा काय होता आणि आहे? मग त्यांनी का युती केली? कारण स्पष्ट होते, की तो भाजपचा खेळ होता. लोकप्रियता घटताना थोडेसे बाजूला व्हायचे आणि पुन्हा बंडाळी करून सत्ता हिसकावून घ्यायची. पुढच्या निवडणुकीत नितीशकुमार एकदम निम्म्या जागांवर येऊन आदळले. आता त्यांचा पक्ष नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. त्यांना भाजप शिवाय पर्याय नाही. ते फक्त त्यांच्या कुर्मी जातीमुळे भाजपला आवश्यक वाटतात. अगदी अशीच खेळी भाजपने महाराष्ट्रात वठवली आहे. त्यात सगळे सामील झाले. त्यात अपवाद कोणीच नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि बाकी लहानसहान पक्ष भाजपला हवे तसेच वागत आहेत.

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील लोक आणि बाहेरील जनता नाराज होती. त्यात शरद पवार यांनी सातारची सभा पावसात पूर्ण करून लोकप्रियतेची हवा टाइट केलेली. भाजपच्या जागा त्यामुळे घटणार होत्या. भाजपाला एकट्याला १५० जागा मिळतील हा विश्वास होता. पण तसे झाले नाही. त्यामुळे बिहार पॅटर्न खेळी करण्याचे ठरले. एकनाथ शिंदे हे नितीशकुमार होण्यास तयार झाले. म्हणजे असे, की शिवसेनेतील एकमेव नाव त्यांचेच होते, त्यांनी मुख्यमंत्री व्हायचे आणि नंतर अचानक टर्न घ्यायचा. पण तसे झाले नाही. उद्धव यांनी फूट टाळण्यासाठी महाविकास आघाडी केली. त्यामुळे भाजपचा प्लॅन बी सुरू झाला. अडीच वर्षानंतर तो अमलात आला. कोरोना नसता तर तो दीड वर्ष आधीच यशस्वी झाला असता.

नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येऊन संत तुकारामाचा वेष धारण करतात. कारण सत्ता हे कशाचेही रूपांतर कशातही करते. हाच तर गुजरात पॅटर्न आहे.

सुनील बडूरकर, समाज आणि राजकारणाचे अभ्यासक आहेत.

( १५ जुलै २०२२ रोजी प्रकाशित ‘मुक्त-संवाद’ नियतकालिकातून साभार)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: