प्रवास खडतर असला तरीही मी आशावादी!

प्रवास खडतर असला तरीही मी आशावादी!

नुकताच ‘जागतिक सायलंस डे’ साजरा करण्यात आला. हा दिवस LGBTQ समुदायातील व्यक्ती भिन्न लैंगिक अग्रक्रमांच्या व्यक्तींबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठीअमेरिकेत साजरा करतात. त्यानिमित्ताने स्वतःच्या समलैंगिकतेचा स्वीकार करून आनंदी आयुष्य जगणाऱ्या समीर समुद्र यांच्याशी भिन्न लिंगी व्यक्तींचे प्रश्न, समस्या आणि समाजाचा दृष्टिकोन याविषयी झालेला विशेष संवाद!

ट्रम्प आणि ‘चौघीजणी’
तैवानी तिढा
अमेरिकेत व्हिएतनाम युद्धापेक्षा अधिक बळींची भीती

सुखवस्तू मराठीमध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाने उत्तम शिक्षण, भरगोस पगाराची नोकरी, वेळेत लग्न आणि वंशवृद्धी या गोष्टी क्रमाने करणं अपेक्षित असतं. यापलीकडे कुणी फारसा विचार करत नाही, तसं अपेक्षितही नसतं. पण जेव्हा ऐन तारुण्यात एखाद्याच्या लक्षातयेतं की मुलींपेक्षा मुलांचच आकर्षण वाटतंय (किंवा दुसर्‍या मुलींप्रती आकर्षण असल्याचे एखाद्या मुलीच्या लक्षात येतं) तेव्हा पायाखालची जमीन सरकते. नव्वदच्या दशकात तरुण झालेल्या माझ्या पिढीला आता इतकं एक्सपोजर नव्हतं. लैंगिकतेविषयी आज जितकं काही बोललं जातंय तितकंही बोलण्याची तेव्हा पद्धत नव्हती. हे सगळे विषय माध्यमांसाठी निषिद्ध होते. त्यामुळे समलैंगिकता हा विषय उघडपणे कानावर पडला आहे, समलिंगी व्यक्तींचा वावर आजूबाजूला आहे असं काहीही नसण्याच्या काळात माझे लैंगिक वेगळेपण मला जाणवलं होतं. त्यामुळे स्वतःचे वेगळे असणे मोकळेपणानं स्वीकारणं अशक्य होतं. सुरुवातीचा तो काळ फार कठीण होता. समाजाने, कुटूंबाने स्वीकारण्याआधी स्वतःने स्वीकारणं हीच मोठी कसोटी होती.आपण “नॉर्मल” नाहीत असे वाटायचे… आपण वेगळे आहोत म्हणजे वाईट आहोत का? आपल्यात काहीतरी न्यून आहे का? अशा प्रश्नांचा प्रचंड ताण मनावर यायचा. माझ्या पिढीतल्याएलजीबीटीक्यू समुदायातील सगळ्याच तरुणतरुणींवर तसे ताण होते.
पण २००० नंतर वातावरण हळूहळू बदलत गेलं. इंटरनेट आलं. समलैंगिक चळवळींची माहिती समजायला लागली. आपण वाईट नाही, वेगळे नाही, अनैसर्गिक नाही हे जसजसं समजायला लागलं, तसा आत्मविश्वास वाढत गेला.
याच काळात शिक्षण संपवून नोकरीच्या निमित्ताने मी अमेरिकेला गेलो. खरंतर अमेरिकेत गेल्यामुळे मला स्वतःला समजून घ्यायला खूप मदत झाली. समलिंगी व्यक्ती अगर जोडपी आनंदाने, सुखासमाधानाने जगू शकतात, नव्हेजगतात हे मी पहिल्यांदा अमेरिकेत बघितलं. कॉर्पोरेट कंपन्यांमधून मोठ्या पदांवर समलिंगी व्यक्तींना काम करताना बघितलं. एखाद्या व्यक्तीचा लैंगिक अग्रक्रम आणि त्याचं करियर, त्याची बुद्धिमत्ता, त्याची स्वप्न, महत्वाकांक्षा यांचा काहीही संबंध नसतो, ही गोष्ट जी मनातून मला ठाऊक होती ती प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर स्वतःविषयी आत्मविश्वास वाढला. अर्थात तरीही मी आयुष्यभर आनंदी आणि सुखी राहू शकतो का याबद्दल मला शंका होतीच. पण समाजाच्या, घरच्यांच्या दबावाला बळी पडून मुलीशी लग्न करायचं नाही हे मात्र मी पक्कं ठरवून टाकलं होतं. माझ्या वाट्याला आयुष्यभर एकटेपण येणार का या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळत नव्हतं. अर्थात एकटेपणा आलं तरी चालेल पण एका मुलीचं आयुष्य बरबाद करायचं नाही हे मी पक्कं ठरवलं होतं. हे आवर्जून सांगावंसं वाटतंय कारण आजही भिन्न लैंगिक अग्रक्रम असलेले तरुण-तरुणी समाजाच्या आणि कुटुंबाच्या दबावाला बळी पडून लग्न करतात. संसार थाटतात. पण त्यात ना ते स्वतः खुश असतात ना जोडीदाराला खुश ठेऊ शकतात. हे कुठेतरी थांबण्याची नितांत गरज आहे. निव्वळ समाज काय म्हणेल म्हणून आपल्याकडे अनेक आयुष्य बरबाद होत असतात.

अमित गोखले आणि समीर समुद्र

अमित गोखले आणि समीर समुद्र

आज मागे वळून बघताना आणि त्याविषयी बोलताना आता वाटणारी सहजता तेव्हा नक्कीच नव्हती. अमेरिकेत गेल्यामुळे समलैंगिकता आणि त्याच्याशी संबंधित विषयांची ओळख झाली खरी पण स्वप्रतिमेशी असलेला झगडा पूर्णपणे संपला नव्हता. आत्मविश्वास यायला लागला होता पण मन सतत अस्वस्थ असायचं. जीव नकोसा व्हायचा. आत्महत्येचा प्रयत्नही केला मी, पण मित्राने वाचवलं. जसे नावं ठेवणारे, चेष्टा करणारे मित्र होते तसेच आधार देणारे, समजून घेणारे आणि पाठीशी भक्कमपणे उभे राहणारेही होते. आहेत. मग एक दिवस मी ठरवलं, जे आहे ते आहे. मी समलिंगी आहे म्हणजे विकृत नाही.त्यात काही अनैसर्गिक नाही. मग घाबरून का राहायचं? का स्वतःला लपवायचं? समाजाला पचत नाही, पटत नाही याची शिक्षा मी का भोगायची? त्यानंतर मात्र मी लपण बंद केलं. मीच जर स्वतःचा स्वीकार केला नाही तर इतर लोक माझा स्वीकार करणार नाहीत हे तोवर लक्षात आलं होतं. हे सगळं प्रचंड मानसिक थकवा आणणारं असलं तरीही ते स्वीकारायचं असं मी ठरवून टाकलं होतं.
पुढे अमित गोखले भेटला आणि आमची आयुष्यंच बदलून गेली. २०१० मध्ये अमेरिकेत आम्ही रीतसर लग्न केलं. घरच्यांना काय आणि कसं सांगायचं हीच मोठी समस्या होती. हिम्मत करून आम्ही दोघांनी घरी सांगितलं. अर्थातच आमच्या मध्यमवर्गीय पालकांना तो धक्काच होता. आमच्या लग्नाला त्यांनी यावं असं वाटत होतं, पण माझे आईबाबा काही आले नाहीत. हे सगळं पचवणं त्यांनाही जड गेलं यात शंका नाहीच. आजही जड जातंय. अमेरिकेत आणि भारतात विशेषतः मला हा फरक जाणवतो. माझे आईबाबा अमेरिकेत असताना अगदी सहजतेने आमच्याबरोबर वावरत असतात. पण तेच इथे असताना एक न सांगता येणारं अवघडलेपण असतं. विशेषतः आम्ही बरोबर असताना इथे नातेवाईक भेटले, तर हे अवघडलेपण स्पष्ट जाणवून जातं. अमेरिकन समाजात भिन्न लिंगी व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित नाहीये. त्यात सहजता आहे. जी मुळातच आपल्या भारतीय समाजात नाही. याचा परिणाम त्यांच्याही वर्तनात होतोच. नातेवाईक काय म्हणतील, आपल्या मुलांबद्दल मागून काय बोलत असतील या सगळ्यातून हे अवघडलेपण येतं. सुरुवातीचा झगडा संपल्यावर, लग्न केल्यावर सुखी-समाधानी आयुष्य सुरु झालं पण आजही तसं बघायला गेलं तर आमचा लढा संपलेला नाही. हा झगडा समाजाने आम्हाला समजून घेण्यासाठी आहे. समाजात आदर मिळवण्यासाठी आहे. स्व-ओळखीसाठी आहे. नातेसंबंधांसाठी आहे. हक्कांसाठी आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात LGBTQ समुदायाला दिलासा देणारा निकाल लागला.निदान आम्ही गुन्हेगार तरी नाही!!! पण म्हणून प्रश्न संपले असं झालेलं नाही. मी महाराष्ट्रातल्या अनेक लहान गावांमधल्या तरुण तरुणीच्या संपर्कात आहे. कुटुंबातला संघर्ष आणि समाजातली अवहेलना त्यांना नको असते. समाज आजही मोकळा झालेला नाही हे वास्तव आहे. आता आमचंच उदाहरण घ्या, भारतात आमचं स्टेटस सिंगल आहे. घरासाठी एकत्र जोडपं म्हणून लोन घेता येत नाही. साधं भाड्याने घर मिळणंही कठीण जातं पुण्यासारख्या शहरात. जोडप्यासाठीच्या ज्या म्हणून सुविधावा फायदे असतात,ते आम्हाला काहीही मिळू शकत नाही. आजही आमच्याप्रती समाजाचा एक तुच्छ भाव असतो. समलिंगी व्यक्ती कसे जगतात याचं कुतूहल असणं मी समजू शकतो, पण कुत्सित आणि बोचरे शब्द यांचा वापर सर्रास होतो.
मेल वाइफ कशाला असायला हवं?
आजही आपल्या समाजाच्या मनात समलिंगी व्यक्तींबद्दल प्रचंड गोंधळ आहे. तुम्ही मुलींचे कपडे घालता का? तुमच्यात नवरा कोण आणि बायको कोण? असे प्रश्न सर्रास विचारले जातात. सगळ्यात त्रासदायक प्रश्न असतो तो तुमच्यात घरकाम कोण करतं? स्वयंपाक कोण करतं? दोघेही पुरुष असल्यावर घराच्या स्वच्छतेचं कोण बघतं? मग तुमच्यात जो बायकोच्या भूमिकेत असतो तो हे सगळ करतो का? लग्न आणि त्यानंतरचं आयुष्य याच्या चौकटी तर इतक्या भारीभक्कम तटबंदीच्या आहेत की वेगळा विचार, वेगळी जगण्याची पद्धत मान्यच होत नाही.आपण किती स्वतःला चौकटीत कोंबून टाकलेलं आहेहे यावरून उघड होतं. आपल्या समाजात स्त्रियांचं स्थान काय आहे, समाज त्यांच्याकडे काय दृष्टीने बघतो याची जाणीव असे प्रश्न ऐकले की होते. लग्नाच्या चौकटीत किंवा जोडीदारांमध्ये बाईने घराची स्वच्छता, स्वयंपाक, घरकाम करायचं हे किती गृहीत धरलेलं आहे. हे फार वाईट आहे.
मला आठवतंय, आम्ही दोघांनी जेव्हा आपापल्या घरी सांगितलं तेव्हा अमितची आई मला म्हणाली, तू आमचा जावई की सून?मी त्यांना म्हणालो, “मी अमितचा जोडीदार आहे. आपल्या नात्याला काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा.”समलिंगी व्यक्तींमध्ये ‘मेल वाइफ’ अशीही एक टर्म वापरली जाते. खरंतर अशा कुठल्याही शब्दाची गरज नसते. दोन माणसं एकत्र येतात तेव्हा ते फक्त जोडीदार असायला हवेत. स्त्री-पुरुषांच्या नात्यातही नवरा-बायको ही नावं आपणच देऊ केली आहेत. खरंतर ‘जोडीदार’ हाच शब्द योग्य आहे. त्यामुळे ‘मेल वाइफ’ शब्द वापरून पुन्हा आपण त्याच रूढ,जुन्या चौकटी आपल्याशा करतो असं वाटतं.
भविष्य काय?
एलजीबीटीक्यू व्यक्तींचं या देशात भवितव्य काय आहे असं मला नेहमी विचारलं जातं. मला प्रामाणिकपणे चित्र आशादायी वाटतं. प्रश्न पुष्कळ आहेत, समाज कर्मठ आहे तरीही हळूहळू बदल होत आहेत. माध्यमांमध्ये समलिंगी व्यक्तींना केंद्रस्थानी ठेऊन विषय मांडले जाऊ लागले आहेत. जे अतिशय सकारात्मक आहे. पण समलिंगी व्यक्तींना समाजात आदराचे आणि समानतेचे स्थान मिळवून द्यायचे असेल तर सगळ्या समाजाने त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. फक्त माध्यमांमध्ये विषय मांडून भागणार नाही. शिक्षक, डॉक्टर्स, वकील किंवा इतर सर्वच क्षेत्रातल्या व्यक्तींनी भिन्न लैंगिक अग्रक्रमांच्या व्यक्तींशी सुसंवाद केला पाहिजे. सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. स्वीकार केला पाहिजे. शाळा-कॉलेजात शिक्षकांचा स्वीकार असेल तर कितीतरी तरुण तरुणींना स्वतःची लैंगिक ओळख होणं, ती समजून घेणं, स्वीकारणं सोपं जाऊ शकेल. अनेक तृतीयपंथी व्यक्ती आता राजकारणात येत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. साकारात्मक गोष्ट आहे. कुठलाही लढा एका समुदायाचा नसतो. स्त्रियांच्या लढ्यात पुरुष हवेत त्याचप्रमाणे LGBTQ समुदायाच्या लढ्यात सारा समाज सहभागी झाला तर समानता, न्याय मिळणे नक्कीच सोपे जाईल.
एका रात्रीत कुठलेही बदल होत नाहीत. छोटी छोटी पावलेच मोठा बदल घडवून आणू शकतात. कालपर्यंत समलिंगी संबंध कायद्याने गुन्हा मानले जायचे, यावर्षी २६ जानेवारीला मला आणि अमितला झेंडा वंदनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.. हा मोठा बदल आहे असं मला वाटतं.
लपून राहण्याचे दिवस आता संपले आहेत. पुढे आले पाहिजे. स्वतःला स्वीकारायला हवे. कारण, स्वतःपासून सुरुवात केली तरच समाजपरिवर्तनाच्या दिशेने आपण सकारात्मक प्रवासाला सुरुवात करू शकतो. मी आशावादी आहे.

शब्दांकन: मुक्ता चैतन्य 

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: