‘मोदींनी ठरवलीय पाक-चीनशी युद्धाची तारीख’

‘मोदींनी ठरवलीय पाक-चीनशी युद्धाची तारीख’

लखनौः चीन व पाकिस्तानविरोधात युद्ध करण्याची तारीख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केली आहे, असे वादग्रस्त वक्तव्य उ. प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी केले आहे. गेल्या शुक्रवारी त्यांनी हे विधान केले आहे. वास्तविक भारत व चीनच्या सीमेरेषेवर तणावाचे वातावरण असताना दोन्ही बाजूला लाखो सैनिक सीमेवर तैनात असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने असे विधान करणे हे सरकारला अडचणीत आणणारे आहे.

स्वतंत्र देव सिंह हे बलिया जिल्ह्यातील सिकंदरपूर येथे भाजपचे आमदार संजय यादव यांच्या घरी जमलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे बोलत होते.

त्यावेळी सिंह म्हणाले, राम मंदिर व कलम ३७० संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जसे निर्णय घेतले होते तसे त्यांनी पाकिस्तान व चीनशी युद्ध करण्याची तारीख निश्चित केली आहे. त्याची तिथी ठरली आहे, असे ते म्हणाले.

स्वतंत्र देव सिंह यांच्या या विधानाचा व्हीडिओ भाजप आमदार संजय यादव यांनी जाहीर केला. या व्हीडिओत समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी व काँग्रेस पक्षाचे नेते हे दहशतवादी असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर भाजपचे खासदार रवींद्र कुशवाहा यांनी प्रतिक्रिया देताना, सिंह यांनी कार्यकर्त्यांच्या मनात जोश आणण्य़ासाठी असे विधान केले, असा युक्तिवाद केला.

मूळ बातमी

COMMENTS