खासगी कंपन्यांना पेट्रोल व डिझेल विक्रीत नुकसान

खासगी कंपन्यांना पेट्रोल व डिझेल विक्रीत नुकसान

नवी दिल्लीः आंतरराष्ट्रीय तेलबाजारात कच्च्या तेलाचे दर वाढूनही देशात इंधनजन्य पदार्थांची किरकोळ विक्री करणाऱ्या जियो-बीपी, नायरा एनर्जी या सारख्या खासगी कंपन्यांना डिझेलवर प्रतिलीटर २० ते २५ रुपये व पेट्रोलवर १४ ते १८ रुपयाचे नुकसान सोसावे लागत आहे. या नुकसानीची भरपाई करावी यासाठी या कंपन्यांनी केंद्रीय पेट्रोलियम खात्याला एक पत्र लिहिले आहे. १० जूनला हे पत्र फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्री (एफआयपीआय)ने लिहिले असून पेट्रोल व डिझेलच्या विक्रीत मोठे नुकसान सोसावे लागत असल्याने किरकोळ बाजारातील गुंतवणुकीवर त्याचा गंभीर परिणाम होऊन ही गुंतवणूक कमी होत असल्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

एफआयपीआयमध्ये खासगी क्षेत्रातील कंपन्यांबरोबर आयओसी, बीपीसीएल, एचपीसीएल या सरकारी कंपन्याही समाविष्ट आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चे तेल व त्यावरील उत्पादनांच्या किमती अनेक दशके महाग आहेत. पण सरकारने किरकोळ विक्रेत्यांकडे असलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या आहेत. सरकारी कंपन्यांचा किरकोळ क्षेत्रातील उलाढालीत ९० टक्के हिस्सा आहे. पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ विक्री मूल्यात नोव्हेंबर २०२१ पासून २१ मार्च २०२२ पर्यंत कोणतीही वाढ झाली नाही. या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत बरीच वाढ झाली आहे. सरकारने २२ मार्च २०२२ पासून १४ वेळा इंधन दरात प्रति लीटर ८० पैशाने वाढ केली आहे, त्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या प्रती लिटर दरात १० रुपयांची वाढ झाली होती. २२ मार्च ते ६ एप्रिल २०२२ या काळात ही दरवाढ झाली होती.

उ. प्रदेश, पंजाब व अन्य तीन राज्यांत विधानसभा निवडणूका असल्याने ४ नोव्हेंबर २०२१ पासून सरकारने इंधन दरात वाढ केली नव्हती. या निवडणुका आटोपल्यानंतर केंद्राने २२ मार्चपासून किमती वाढवण्यास सुरूवात केली होती.

मूळ वृत्त

COMMENTS