प्रियांकाला मिळाला जामीन

प्रियांकाला मिळाला जामीन

संपूर्ण व्यवस्था विरोधात गेली, तरी काही माणसे मदतीसाठी उभी राहिल्याने, अखेर प्रियांका मोगरेला जामीन मिळाला आणि ती तुरुंगाबाहेर आली.

निजामुद्दीन मरकज : ४४१ जण कोरोनाबाधित, ७ जणांचा मृत्यू
विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांना बंदी
दिल्ली पोलीस इतकी लाज का घालवत आहेत?

‘झोमॅटो गर्ल’ प्रियांका मोगरे हिची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर अखेर ७ ऑक्टोबरला ती भायखळा तुरुंगातून बाहेर आली. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातल्याने, ती १४ महिन्यांपासून तुरुंगात होती.

प्रियांकाने रागाच्या भरात पोलिसांना शिवीगाळ केली आणि पोलिसांचा ‘अहंकार’ दुखावल्याने, अतिशय किरकोळ, छोट्या गुन्ह्यासाठी तिला १४ महीने तुरुंगात राहावे लागले. टाटा इन्स्टिट्यूट सामाजिक विज्ञान संस्थेचा प्रकल्प असलेली ‘प्रयास’ संस्था, ‘कायद्याने वागा लोकचळवळ’ अशा संस्था आणि व्यक्ती पुढे आल्याने प्रियांका २५ हजार रुपयांची वैयक्तिक हमी जामीन देऊन भायखळा तुरुंगाबाहेर आली. सुशांत सिंग प्रकरणात ज्या दिवशी रिया चक्रवर्ती तुरुंगाबाहेर येणार होती, त्याचवेळी प्रियांकाला  घेण्यासाठी कार्यकर्ते भायखळा तुरुंगाबाहेर उभे होते.

प्रियांका १४ महिन्यांपासून तुरुंगात असल्याचे वृत्त ‘द वायर मराठी’ने २८ सप्टेंबरला दिले होते. संध्या गोखले यांनी या वृत्ताचे केलेले इंग्रजी भाषांतर ‘द वायर’वर ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाले. हे वृत्त फाउस्टो गायडीस (Fausto Giudice) या लेखक पत्रकाराने ५ ऑक्टोबरला फ्रेंच भाषेत आणि ६ ऑक्टोबरला इटालियन भाषेमध्ये हे वृत्त ‘ट्लाक्सकाला’ (Tlaxcala) या वेबपोर्टलवर प्रसिद्ध केले.

प्रियांकाच्या जामिनासाठी किती पैसे आवश्यक आहेत, याची विचारणा फाउस्टो गायडीस यांनी केली आणि कमी पडणारे पैसे युरोपातून उभे करण्याची तयारी दर्शवली. वसई येथील डॉ. कैलासनाथ कोपीकर यांनीही मदत देऊ केली. मात्र ‘प्रयास’ संस्था आणि ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी रक्कम उभी केली आणि ठाणे सत्र न्यायालयात भरल्यानंतर प्रियांका तुरुंगाबाहेर येऊ शकली.

रमा काळे, अॅड. भुजंग मोरे, अॅड. नीलेश मोहिते, अॅड. सूची काळे आणि ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर तसेच अॅड. स्वप्नील मोरे यांनी प्रियांका (मध्यभागी)चे स्वागत केले.

रमा काळे, अॅड. भुजंग मोरे, अॅड. नीलेश मोहिते, अॅड. सूची काळे आणि ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर तसेच अॅड. स्वप्नील मोरे यांनी प्रियांका (मध्यभागी)चे स्वागत केले.

दरम्यानच्या काळामध्ये वाशी न्यायालयामधून प्रियांकाच्या प्रकरणाची नोंद करून फाईल पुढे गेली नव्हती. ती फाईल ६ ऑक्टोबरला ठाणे न्यायालयात गेल्याचे समजते. ७ ऑक्टोबरला सकाळी ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंग मोरे यांनी न्यायालयात २५ हजार रुपयांची रोख रक्कम जामा केल्यानंतर प्रियांका तुरुंगातून बाहेर आली. ‘प्रयास’तर्फे रमा काळे, अॅड. भुजंग मोरे, अॅड. नीलेश मोहिते, अॅड. सूची काळे आणि ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर तसेच अॅड. स्वप्नील मोरे यांनी प्रियांकाचे स्वागत केले आणि तिला सानपाडा येथे तिला घरी सोडले. घरी मुलीला पाहिल्यावर प्रियांकाचे अश्रु अनावर झाले.

प्रियांकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. तीच्या घराचे भाडे भरलेले नाही. तिची नोकरीही गेलेली आहे. आता तिच्यापुढे पुन्हा आयुष्य उभे करण्याचे आव्हान आहे.

८ ऑगस्ट २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता वाशी येथील सेक्टर १७ मध्ये नो पार्कींग झोनमध्ये दुचाकी लावल्यावरून २७ वर्षांच्या प्रियांका मोगरे हिचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला होता. तिच्यावर सरकारी कामामध्ये अडथळा आणि दरोड्याचा प्रयत्न, शांततेचा भंग, धमकी देणे, अशी ३५३, २९४, ३९३, ५०६, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून केला आणि २० ऑगस्टला तिला अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून ती तुरुंगात होती.

सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या या तरुणीला अगोदर पोलिस कस्टडी आणि नंतर न्यायालयीन कस्टडी मिळाली. तिला जामीन मिळण्यासाठीचा पहिला अर्ज फेटाळण्यात आला. नंतर तिला सप्टेंबर २०१९ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. मात्र तिच्या जामीनासाठी २ व्यक्तीही पुढे आल्या नाहीत. त्यामुळे प्रियांका गेले १४ महीने भायखळा येथील तुरुंगात होती.

फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘प्रयास’ ही संस्था प्रियांकाच्या मदतीसाठी पुढे आली त्यांनी तिच्यावतीने जामिनासाठी प्रयत्न केले. ‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी जामिनासाठी या प्रकरणात लक्ष घातले.

अंडर ट्रायल कैद्यांसाठी ‘प्रयास’ ही संस्था मदत देण्याचे काम करते. ‘प्रयास’च्या कार्यकर्त्या रमा काळे यांनी प्रियांका बाहेर यावी यासाठी प्रयत्न सुरू केले. तिचे नातेवाईक शोधणे, त्यांना मदतीसाठी आवाहन करणे, असे काम त्यांनी सुरू केले. पण मध्येच कोरोनाची साथ आली आणि सगळ्याच गोष्टी बंद झाल्या.

दरम्यानच्या काळामध्ये पोलिस, वाशी येथील न्यायालय ते ठाण्याचे सत्र न्यायालय अशा अनेक चकरा रमा काळे यांना माराव्या लागल्या ‘प्रयास’तर्फे अॅड. भुजंग मोरे यांनी जामिनाचे रूपांतर रोख रकमेच्या स्वरूपात करण्यासाठी ठाण्याच्या सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज केला आणि या सप्टेंबर महिन्यात २१ तारखेला न्यायालयाने अर्ज मंजूर केला. २५ हजार रु. रोख रक्कम न्यायालयात जमा करण्याच्या अटीवर प्रियांकाला जामिनावर सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानंतरही बरेच दिवस गेले आणि अखेर ७ तारखेला प्रियांका तुरुंगाबाहेर आली.

अॅड. भुजंग मोरे म्हणाले, की न्यायालयाने प्रियांकाला १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्या कालावधीमध्ये २ जमीनदार द्यावे लागणार आहेत.

‘कायद्याने वागा लोकचळवळ’चे संस्थापक अध्यक्ष राज असरोंडकर यांनी या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणि महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणात दरोडा आणि सरकारी कामामध्ये अडथळा हे गुन्हे कसे लागू शकतात. वाशी न्यायालयातून ठाणे न्यायालयात आरोपपत्र पोहोचण्याची प्रक्रिया नेमकी काशी झाली आणि वेळेत अपडेट झाली का, वाहतूक पोलिस नियमावली काय आहे, पोलिसांचे अधिकार काय आहेत, याची चौकशी व्हावी अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.

राज असरोंडकर म्हणाले, की प्रियांकामुळे आपली व्यवस्था किती अपयशी ठरली आहे, हे उघड झाले आहे. पोलिसांचे अधिकार काय आहेत, न्यायालयात काय होते आणि कोणालाही अटक कशी होते, हे यानिमित्ताने पुढे आले आहे.

राज असरोंडकर म्हणाले, ”खरं तर कायद्याच्या चौकटीत शक्य असेल, तर प्रियांकाविरोधातला गुन्हा शासनाने न्यायालयाला विनंती करून मागे घेतला पाहिजे. ‘कायद्याने वागा लोकचळवळी’ची तरी हीच भूमिका आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घालून प्रियांकाला पुन्हा उभे करण्यात पालकत्वाची भूमिका निभावली पाहिजे.” प्रियांकाचे व्हीडीओ इंटरनेटवर कसे आले, पोलिसांनी सेल्फी फोटो काढलेले दिसत आहेत, त्याचीही चौकशी व्हायला हवी, असे असरोंडकर म्हणाले.

‘प्रयास’चे संचालक डॉ. विजय राघवन म्हणाले, “प्रियांका आयुष्यात पुन्हा उभे राहण्याचा आता प्रयत्न करेल. त्या प्रयत्नांना ‘प्रयास’तर्फे मदत केली जाईल.”

डॉ. राघवन म्हणाले, की ‘प्रयास’तर्फे नवी मुंबई, ठाणे, मुंबई आणि लातूर तसेच गुजरातेत भरूच आणि नर्मदा इथे काम चालते. अंडर ट्रायल कैद्यांसाठी न्याय सहाय्यक आणि सामाजिक मदत केली जाते. तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी मदत केली जाते. निवारा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन, माणसांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न केला जातो. ३० वर्षांपूर्वी १९९० मध्ये स्थापन झालेल्या ‘प्रयास’ने आत्तापर्यन्त सुमारे ४० हजार लोकांसाठी काम केले आहे.

मूळ लेख

इंग्रजी वृत्त

फ्रेंच वृत्त

इटालियन वृत्त 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0