पुन्हा ‘आधुनिकता’

पुन्हा ‘आधुनिकता’

उत्तर-आधुनिक वाळवंटात घट्ट पाय रोवून मकरंद साठे ज्या ‘आधुनिकतेचा’पुनरुच्चार करतात तिला एकाच वेळी ऐतिहासिकतेची आणि सार्वकलिकतेची, समकालीनतेची आणि वैश्विकतेची ओढ आहे. कारण तिच्या समोरचा काळ, त्यातली अपरिमित हिंसा ही एकीकडे ऐतिहासिकतेतून, आधुनिकतेच्या अंर्तद्वंद्वांतून उद्भवणारी असली तरीही आजमितीस ती अत्यंत नागवी, जणू नैसर्गिकच वाटावी अशी आहे.

बायडन यांचा प्रवास मांडणारे पुस्तक
इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर
वंशवाद आणि वंशद्वेष

‘गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी’ ही मकरंद साठ्यांची चौथी कादंबरी. त्यांच्या आजवरच्या बहुविध लेखनप्रपंचातील (नाटके, कादंबऱ्या, वैचारिक निबंध, मराठी नाटकाचा त्रिखंडात्मक सामाजिक-राजकीय इतिहास) आशयसूत्रांची संपृक्त अभिव्यक्ती म्हणून, तसेच त्यांच्या तीन दशकांहून अधिक लेखन प्रवासादरम्यान जाणीवपूर्वक कमावलेल्या व्यामिश्र, व्यापक जीवनदृष्टीचा निर्णायक टप्पा म्हणून साठ्यांच्या नव्या कादंबरीकडे,‘गार्डन ऑफ ईडन’ कडे,पाहता येईल. या निर्णायक टप्याचे नाव:‘आधुनिकता’,जिला साठे आपली नवी कादंबरी अर्पण करतात.

अर्पणपत्रिकेचा निर्णायक सूर तिच्याशी थांबायला भाग पाडतो, मनात अनेक प्रश्न उभे करतो. काहीशा academic वळणाच्या भाषेत शब्दबद्ध करायचे झाल्यास हे प्रश्न पुढीलप्रमाणे (जे वेगवेगळ्या वाचकांना त्यांच्या सवयीच्या भाषेत पडतील): उत्तर-आधुनिक म्हणून ज्याचे वर्णन करण्यात येते अशा सांप्रत काळी एखाद्या लेखकाने आधुनिकतेला आपली साहित्यकृती अर्पित करण्याची अनैतिहासिक जोखीम का बरे पत्करली असेल? मुळात आज आधुनिकता असं म्हणताना त्याला नक्की काय अभिप्रेत असेल? ज्याचा आरंभ ‘पश्चिमेत’ (‘त्यांच्या’कडे) साधारण पंधरा-सोळाव्या शतकापासून झाला असे मानले जाते ते आधुनिकता नावाचे नवयुग? का आधुनिक होण्याची ऐतिहासिक प्रक्रिया, म्हणजे आधुनिकीकरण, ज्यात ढोबळमानाने औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकशाहीकरण, निधर्मीकरण अशा प्रक्रियांचा समावेश होतो? का आधुनिकता नावाची समाजशास्त्रीय बृहदसंकल्पना (meta-concept) ज्याद्वारे ह्या प्रक्रियांच्या उगमाचा, त्यांच्या आंतरसंबंधांचा, यशापयशाचा अर्थ लावला जातो? का आधुनिकता नावाचे सर्वस्पर्शी बृहद्कथन (meta-narrative) ज्याद्वारे आजवरच्या मानवी उत्क्रांतीला सलगता आणि अर्थ प्राप्त होतो, वर्तमानाला उद्देश आणि भविष्याला दिशा मिळते? आणि ह्यातील कुठलाही अर्थ घेतला तरी सांप्रतकाळी, जिथे आधुनिकतेशी आपले नेमके नाते काय ह्याविषयी संभ्रमाचे वातावरण असताना तिला कलाकृती समर्पित करण्यामागचे प्रयोजन नेमके काय असावे? ह्या आणि अशा प्रश्नांसह आपण उत्सुकतेने कादंबरीत शिरतो आणि एखादे रहस्य उलगडत जावे तसा साठ्यांना अभिप्रेत असलेल्या ‘आधुनिकतेचा’ अर्थ कादंबरीतील विदारक वास्तवाच्या पटलावर उलगडू लागतो.

कादंबरीत साठेंचा तृतीयपुरुषी निवेदक ज्या विदारक वास्तवाचे चित्र उभे करतो तो आपला चालू वर्तमानकाळ. आपलं समकालीन वाळवंट. ज्यात जागतिकीकरणाच्या निमित्ताने जवळ आलेले अनेक काळ बथ्थड गोळ्या सारखे सतत एकमेकावर आदळत, कर्कश्य बधीरपणा आणतात. ज्यात विकासापोटी रूंदावणाऱ्या आर्थिक दऱ्या समाजाचे समाजपणच भंगवून टाकतात. ज्यात व्यक्तीच्या विखंडीत सामाजिक अस्मितांचे सैरभैर तुकडे कधी हिंसक झुन्डींचे तर कधी व्याकूळ करणाऱ्या एकुटवाणेपणाचे रूप घेतात. ज्यात आभासी आंतरजालावरील सामाजिक संपर्काच्या व्यसनातून आत्मकेंद्रितताच बळावते. ज्यात तंत्रज्ञानाच्या अफाट वेगापुढे मती कुंठीत होते आणि तथाकथित वास्तवापासून फारकत घेतलेले वर्धित वास्तव (Augmented Reality) अधिकाधिक स्वयंसिद्ध, सार्वभौम  होत जाते. अशा सगळ्याच दृष्टीने सुपीक वाळवंटात जातीवादाचे-जमातवादाचे-धर्मान्धतेचे-बहुसंख्यवादाचे-एकाधिकारशाहीचे जालीम विष राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक अशा सर्वप्रकारच्या वाहिन्यांमधून हरघडी पाझरत, मुरत, धगधगत, पेटत राहते. त्यातून दररोज हिंसेची अधिकाधिक क्रूर आणि नीचतम रूपे साकार होत राहतात. जी कॉंग्रेस गवतासारख्या पसरलेल्या संपर्क माध्यमांच्या जाळ्यातून रिसायकल होत पुन्हा आपल्यावरच आदळतात आणि आपल्या संवेदना आळीपाळीने भडकवत, बोथट करत राहतात.

तर अश्या ह्या सुन्न करणाऱ्या वाळवंटातील चमचमते, आकर्षक आणि पोकळ मृगजळ म्हणजे ‘गार्डन ऑफ ईडन उर्फ साई सोसायटी’. जिच्या सुजलेल्या आणि सुनसान आवारात ह्या कादंबरीतील काही मुख्य पात्रे काही काळ वावरतात. या आवारात कोणी आधुनिकतेविरुद्ध उथळ बंड पुकारतो आणि त्या सवंग आवेगात हिंसक होतो. तर कोणाचा वर्धित वास्तवाच्या स्वर्गात आकंठ बुडवून त्यातच बळी जातो. तर कोणी जवळच्या माणसांच्या अकस्मात मृत्यूने फाटून जाऊन ह्या मृगजळाच्या आश्रयाला येतो. तर कोणी वाट्याला आलेल्या खडतर आयुष्याची तमा न बाळगता थेट भवतालच्या वाळवंटाला विवेकाने डोळा भिडवत आणि अस्तित्वाच्या असंगताचा, नियतीचा, मृत्यूचा धीरोदात्तपणे स्वीकार करत आधुनिकतेचा नवा अर्थ लावण्यास सज्ज होतो.

पूर्वी साठ्यांच्या ‘चौक’ ह्या नाटकात जशी विविध सामाजिक-आर्थिक स्तरातील, विविध वयांची आणि वृतींची, विभिन्न वैयक्तिक इतिहास आणि विखंडीत सामाजिक ओळखींचा समुच्चय असलेली ‘प्रातिनिधिक’ पात्रे जशी योगायोगाने Traffic Jam मधे एकमेकांसमोर उभी ठाकली तशीच ह्या कादंबरीतील प्रमुख सहा पात्रे – सत्यकाम, अगस्ती, विभाकर,नर्सबेन, आयेशा आणि गणपती – योगायोगांच्या मालिकेतून वेगवेगळ्या वेळी एकमेकाकांना सामोरे जातात. किंबहुना कादंबरीची सुरवातच एका असंभाव्य वाटू शकेल अशा योगायोगातून होते. ह्या नाट्यपूर्ण योगायोगाच्या खुंट्याला वाचकाला अडकवून साठेंचा निवेदक एकेक करून ह्या सहा पात्रांचे वैयक्तिक इतिहास स्वातंत्र्योत्तर भारताच्या सामाजिक-राजकीय इतिहासाच्या व्यापक आणि हिंसक पटावर विस्तृतपणे उलगडून दाखवतो. एकमेकांपासून अगदी टोकाची भिन्न आयुष्ये जगलेल्या ह्या पात्रांना जोडणारा (आणि प्रसंगी तोडणारा) समान धागा म्हणजे सततचे दंगे, दंगली. जे त्यांच्या आयुष्यात एखाद्या विरामचिन्हांच्या सहजतेने आणि वारंवारतेने डोकवत राहतात. दंगलीत होरपळून सर्वस्व गमावलेल्या कोणा अल्पसंख्यांकाची ओळखच कायमची गोठते. तर बहुसंख्याकांमधला कोणी अनभिज्ञ बेसावधपणे दंगलीत फेकला जाऊन नेमकी चुकीची ओळख पांघरल्याने हकनाक प्राणाला मुकतो. दंगलीतून सरावाने सुटून वाचलेल्यांसमोर जगायचे कोणासाठी, कशासाठी, कशाच्या आधारे हा प्रश्न आहेच. ह्या अस्तित्वगामी प्रश्नांना भिडण्याची मानसिक, वैचारिक, आत्मिक ताकद ज्यांच्याकडे उरत नाही, त्यांच्यासमोर स्वतःला संपवणं हा एकच पर्याय उरतो? ज्या असंभाव्य योगायोगापासून कादंबरी सुरु होते त्यापाशी परत येत, त्याच्या विच्छिन्न परिणीतीकडे असहायपणे पाहत कादंबरी संपते. एक वर्तुळ संपते.

पण ज्या गर्तेत आपण सगळे अडकले आहोत तो चालू वर्तमान तर गरगरतच राहणार. त्याला सामोरे जाण्यावाचून पर्याय नाही. त्याला डोळसपणे आणि धीराने सामोरे जायचे असेल, व्यामिश्रतेची किंवा असंगताची (absurdity) ढाल पुढे न करता किंवा अभिनिवेशाचे चिलखत न पांघरता भूमिका घेण्याचीजोखीम पत्करायची असेल तर ‘आधुनिकतेला’ पर्याय नाही, असं साठे ह्या विदीर्ण करणाऱ्या कथनातून सुचवत राहतात.

मात्र इथवरच्या कथनातून हे स्पष्ट होत जाते की साठेंना जी ‘आधुनिकता’अभिप्रेत आहे ती म्हणजे केवळ (पुन्हा academic भाषेत मांडायचे झाल्यास) अनिवार्य, प्रगतीशील, एकरेषीय, चेहराविहीन ऐतिहासिक प्रक्रिया वा त्यायोगे जागतिक पटावर उद्भवलेली अभूतपूर्व अशी सामाजिक-राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक उलथापालथ नाही. तसेच ती केवळ ह्या उलथापालथीचे वस्तुनिष्ठ अर्थनिर्णयन करणारी, तिला ज्ञानव्यवहाराच्या, भाकितीय कक्षेत आणून तिचे नियमन करू पाहणारी समाजशास्त्रीय बृहदसंकल्पना देखील नाही. त्याचप्रमाणे ती केवळ मानवी इतिहासाला अर्थपूर्ण करणारे, त्याला एका अंतिम भोज्याकडे निर्देशित करणारे बृहदकथनदेखील नाही. किंबहुना या बृहदकथनाच्या पायाभूत गृहीतकांवरच समूळ प्रश्न उभे करणाऱ्या, त्यायोगे सार्वत्रिक गोंधळाचे, दिशाहीनतेचे गढूळ वातावरण निर्माण करणाऱ्या तथाकथित उत्तर-आधुनिकतेनंतरची ही ‘आधुनिकता’. उथळ Romanticism आणि पलायनवादी Nihilismशी प्रतिवाद करत, त्यांना पुरून उरणारी ही ‘आधुनिकता’, जी परंपरा-आधुनिकता, पौर्वात्य/‘आपली’-पाश्चिमात्य/‘परकी’, धर्म-विज्ञान, निसर्ग-संस्कृती, समाज-व्यक्ती, श्रद्धा-विवेक, संगती-असंगत अशा फसव्या द्वैतांत अडकणारी नाही.

ही ‘आधुनिकता’ आज आपल्यासमोर आ वासून उभ्या ठाकलेल्या, समकालीन निर्णायक प्रश्नांना स्थल-कालसापेक्षतेच्या बचावात्मक मापदंडांपलीकडे नेत सार्वत्रिकतेला भिडवू पाहते. Socrates प्रमाणे निरपेक्ष सत्याचा आग्रह धरते. ती मानवी जीवनाच्या सामाजिक-ऐतिहासिक-भौतिक पातळ्या कवेत घेत त्या पल्याडच्या ‘असण्याला’ स्पर्श करू पाहते. मात्र हे करताना ‘असण्याच्या’ मुळाशी असलेल्या असंगताच्या, अनिश्चिततेच्या, अटाळणीय मृत्यूच्या बौध्ददर्शनाने ती कोलमडून जात नाही. ‘असण्याच्या’ मुलभूत वैय्यर्थतेचा आत्मसन्मानाने स्वीकार आणि ह्या धीरोदात्त स्वीकारासहित स्वातंत्र्य-समता-बंधुता ह्या चिरंतन मूल्यत्रयीवर आधारित सामूहिक मानवी मुक्तीसाठीचा आर्ष, असीम, Sisyphean प्रयास म्हणजे ‘आधुनिकता’, अशी मांडणी ही कादंबरी सुचवते. ह्या Sisyphean प्रयासाला गूढवादी आत्मिकतेच्या निर्वात पोकळीतून खेचून बाहेर काढत भौतिक-ऐतिहासिक-सामाजिक वास्तवाला भिडवणे हे माझ्या मते ह्या कादंबरीचे मोठे यश.

उत्तर-आधुनिक वाळवंटात घट्ट पाय रोवून साठे ज्या ‘आधुनिकतेचा’पुनरुच्चार करतात तिला एकाच वेळी ऐतिहासिकतेची आणि सार्वकलिकतेची, समकालीनतेची आणि वैश्विकतेची ओढ आहे. कारण तिच्या समोरचा काळ, त्यातली अपरिमित हिंसा ही एकीकडे ऐतिहासिकतेतून, आधुनिकतेच्या अंर्तद्वंद्वांतून उद्भवणारी असली तरीही आजमितीस ती अत्यंत नागवी, जणू नैसर्गिकच वाटावी अशी आहे. ही नागवी-नैसर्गिक हिंसा ज्या इतिहास नावाच्या संरचनेच्या आधारे माणूस आपल्या माणूसपणाचा दावा करतो त्याच्या मुळावरच घाव घालणारी आहे. त्यामुळे आज इतिहास, संस्कृती, सभ्यता अशा नेहमीच्या बुरख्यांशिवाय माणसाचे विशुध्द, सार्वकालिक, वैश्विक माणूसपणम्हणून काही उरते का? असल्यास त्याचा आधार काय? हा खरा कसोटीचा प्रश्न आहे. म्हणूनच साठेंना अभिप्रेत असलेल्या आधुनिकतेसमोरचे समोरचे आव्हान निर्णायक आहे. आजचे आहे. ह्या समकालीन  वाळवंटाला भिडायचे कसे? ह्यात जगायचे कशासाठी? कशाच्या आधारे?सगळेच निरर्थक किंवा सगळेच निसर्ग-नियमांनी (म्हणजे जंगलच्या कायद्याने) बद्ध असेल तर माणूस म्हणून जगण्याला अर्थ काय? जैव-अस्तित्वाचीनश्वरता,असंगतता आणि माणूस म्हणून सामूहिक मुक्तीचाप्रयास या दोन ध्रुवांची सांगड घालायची कशी?तात्विक पातळीवरून वेध घेतला तर हे आव्हान आजचे नाही. मात्र तरीही आपली उत्तरं आपल्यालाच शोधावी लागणार. तीही इथे आणि आत्ता. या वाळवंटात. त्याच्या पासून सुटका नाही. ह्या निर्णायक आव्हानाची तीव्रपणे जाणीव करून देणं ही माझ्या दृष्टीने ह्या कादंबरीची खरी ताकद.

पुनर्प्रसिद्धी प्रिय रसिक, पॉप्युलर प्रकाशन यांच्या सौजन्याने.

वैभव आबनावे यांनी विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्या समग्र साहित्यावर आधारित ‘मौनराग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0