पंजाबात शीख-मुस्लिम मैत्रीचे उल्लेखनीय उदाहरण

पंजाबात शीख-मुस्लिम मैत्रीचे उल्लेखनीय उदाहरण

जालंधरः धर्मांधता व ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे समाजामध्ये एकीकडे अस्वस्थता पसरत असताना पंजाबमधील मलेरकोटला व मोगा जिल्ह्यात मात्र शीख व मुस्लिम धर्मि

राज्यपालांकडून राष्ट्रवादीला निमंत्रण
१५ दिवसांत चांदणी चौकातील वाहतूक समस्या दूर होणार
महिला अत्याचार सर्वाधिक प्रकरणे भाजप खासदारांच्या विरुद्ध

जालंधरः धर्मांधता व ध्रुवीकरणाच्या राजकारणामुळे समाजामध्ये एकीकडे अस्वस्थता पसरत असताना पंजाबमधील मलेरकोटला व मोगा जिल्ह्यात मात्र शीख व मुस्लिम धर्मियांनी आपापल्यात एकोपा व सद्भवान राहावी म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत.

मुस्लिम बहुल मलेरकोटला हा जिल्हा नव्याने स्थापन झाला आहे. या जिल्ह्यात एका शीख व्यक्तीने सात मुस्लिम कुटुंबियांना प्रार्थनेसाठी मशीद हवी म्हणून आपली वारसा हक्काने आलेली जमीन दान दिली आहे. तर मोगा जिल्ह्यात मुस्लिमांच्या मशिदीची स्थापना होण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासाठी शीख समुदायाने आपला गुरुद्वारा त्यांच्या कार्यक्रमासाठी खुला करून दिला आहे.

या संदर्भात मोगा जिल्ह्यातील भालूर गावाचे सरपंच पाला सिंग यांच्याशी द वायरने संपर्क साधला. ते म्हणाले, गावातील जीर्ण अवस्थेतील मशीद नव्याने बांधण्यासाठी काही मुस्लिम नागरिक प्रयत्न करत होते. सुमारे दीड एकर जागेत त्यांना नवी मशीद बांधायची होती, त्यासाठी १३ जून रोजी काही मुस्लिम नागरिकांनी मशीद बांधण्यास सुरुवात केली. त्या निमित्त आयोजित कार्यक्रम एका गुरुद्वारात घेण्यात आला व तशी परवानगी गुरुद्वारा श्री सत्संग साहिब व्यवस्थापनाने दिली. एकदा परवानगी मिळाल्यानंतर काही वेळातच मुस्लिम नागरिक जमले व त्यांनी लंगरची व्यवस्थाही केली. नंतर या नागरिकांनी सुमारे २ लाख रु.चा फंडही उभा केला.

ही मशीद भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान उध्वस्त झाली होती व कित्येक वर्षे जीर्ण व्यवस्थेत होती. त्याच ठिकाणी अनेक वर्षे तेथे नमाज केला जायचा. फाळणीत हिंदू-मुस्लिम-शीख समुदायाच्या लाखो कुटुंबांना झळ बसली. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. घरे-दारे उध्वस्त झाली. या धर्मांची प्रार्थनास्थळेही जाळपोळीत नष्ट झाली होती. फाळणीमुळे प्रत्येक धर्मांमध्ये कडवटपणा, एकमेकांविषयी असूया, मत्सर, संशय निर्माण झाला होता. आता कालांतराने एकोप्याने राहण्याचे महत्त्व प्रत्येकाला समजू लागले आहे. जर अल्पसंख्याकांचे आपण संरक्षण करत नसू तर पाकिस्तान व भारतामध्ये काय फरक राहिला असा सवाल पाला सिंग यांनी केला.

गावातल्या मुस्लिमेतर समाजाला मुस्लिमांच्या प्रार्थना करण्याच्या हक्काविषयी तक्रार नाही. तो प्रत्येकाचा अधिकार आहे, असे गावकर्यांना वाटते, असेही पाला सिंग म्हणाले.

याबाबत ग्रामस्थ अन्वर खान म्हणाले, या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या बहुतांश नागरिकांना फाळणीचा व मोहम्मदी मशिदीचा इतिहास माहिती नाही. २००८ सालापासून मशिदीची डागडुजी करण्याचे किंवा ती नव्याने बांधायचे आमचे प्रयत्न आहेत. पण ते होऊ शकले नाही. ही जागा अशीच रिकामी पडून होती. निधीची कमतरता होती. आता ग्रामस्थांनी वर्गणी काढून थोडा पैसा उभा केला आहे, यातून मशीद बांधली जाईल.

मुस्लिमांकडून लंगर

या घडामोडीत एक महत्त्वाची बाब अशी मलेरकोटलामधील अनेक मुस्लिमांकडून शेतकरी आंदोलनात सामील झालेल्या शेतकर्यांसाठी लंगर चालवला जात आहे. २६ नोव्हेंबर २०२० रोजी शेतकर्यांचे आंदोलन दिल्लीच्या वेशीवर सिंधू बॉर्डरवर सुरू झाले, तेव्हा या आंदोलनात सामील होण्यासाठी पंजाब, हरयाणा व दिल्लीतील अनेक मुस्लिम शेतकरी गेले होते. २६ जानेवारीला दिल्लीत आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीतही मुस्लिम शेतकरी मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.

नागरिकत्व दुरुस्ती कायदाच्याविरोधात २०१९ व २०२० मध्ये मलेरकोटला येथे मुस्लिम समुदायाने आंदोलन केले होते. या वेळी आंदोलकांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त प्रशासनाची भेट घेऊन त्यांच्याकडून पाठिंबा मागितला होता. त्या भेटीदरम्यान मुस्लिमांना नमाजासाठी सुवर्ण मंदिर प्लाझाची जागा देण्यात आली व या सद्भभावनेची छायाचित्रे सोशल मीडियात पसरली होती. शीख-मुस्लिम एकोपा व सद्भवानेचे हे क्षण समाजात एकतेचे, समतेचा संदेश देणारे होते.

मलेरकोटला जिल्हा हा मुस्लिम बहुल असून या जिल्ह्यातल्या जितवाल कलन गावातल्या जगमेल सिंग यांनी आपली वारसा हक्काने आलेली ६ गुंठे जमीन गावातील ७ मुस्लिम कुटुंबियांना मशीद बांधण्यासाठी भेट दिली आहे. जगमेल यांचे कुटुंब रोशन खान कुटुंबासोबत अनेक वर्ष मैत्रीपूर्ण संबंध ठेवून राहात आहे. आमचे सर्वांचे एकच कुटुंब आहे, असे जगमेल सिंग यांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षीच मशिदीसाठी जमीन भेट देण्याचा निर्णय घेतला गेला होता. पण लॉकडाऊनमुळे विलंब झाला. आता लवकरच जमीन मुस्लिम कुटुंबांना देण्यात येईल, असे जगमेल सिंग यांनी सांगितले. माझ्या या निर्णयाची जेव्हा बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा मला अनेक ठिकाणाहून अभिनंदनाचे, कौतुक करणारे फोन आले. माझ्या कुटुंबाचेही लोक कौतुक करत होते, मानवतेसाठी असे प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया समाजाकडून येत असल्याचे जगमेल सिंग म्हणाले.

जगमेल सिंग यांचे मित्र रोशन खान म्हणाले, गेली कित्येक वर्षे आम्ही नजीकच्या रोडिवाल गावात नमाजासाठी जात होतो आता नवी मशीद झाल्याचा फायदा होईल. हिंदु-मुस्लिम-शीख एकोपा, परस्पर संवाद हा महत्त्वाचा आहे. माझे सर्वधर्मातील मित्र आहेत. आपापसात भांडून काही उपयोग नाही. धर्माने अगोदर एकमेकांमध्ये फूट पाडली आहे, आपण सहचर्य पाळायला हवे, असे खान म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात मलेरकोटला गावातल्या मुस्लिम शेतकर्यांनी सुवर्ण मंदिर व्यवस्थापनाला सुमारे ३३० क्विंटल धान्याची मदत केली होती. या भागातल्या समझौता फाउंडेशनने लॉकडाऊनमध्ये रोजगार गेलेल्या अनेकांना धान्य व अन्य स्वरुपाची मदत केली आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0