मोकळे गवताळ प्रदेश की गर्द झाडी – पुण्यातल्या टेकड्यांचे भविष्य काय?

मोकळे गवताळ प्रदेश की गर्द झाडी – पुण्यातल्या टेकड्यांचे भविष्य काय?

वेगाने विस्तारणाऱ्या शहराच्या मध्यात असणाऱ्या या जागा नियमितपणे चालायला, पळायला येणाऱ्या लोकांसाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाची आणि जिथे सहज जाता येईल अशी ठिकाणे बनली आहेत.

मुंबई येथील विल्सन कॉलेजचे वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक मोझेस इझिकेल यांनी १९१७ मध्ये लिहिले आहे, “पुण्याच्या जवळ आणि सभोवती असलेल्या, ट्रॅप खडकांपासून बनलेल्या, चढायला सोप्या असलेल्या या टेकड्यांवर वनस्पतीचा संग्रह आणि वर्गीकरण करणाऱ्या लोकांनी जितके परिश्रम केले आहेत, आणि त्यांच्याकडे जितके लक्ष दिले आहे तितके बाँबे प्रेसिडेन्सीमधल्या अन्य कुठल्याच प्रदेशाकडे दिलेले नाही.”

ट्रॅप खडकांपासून बनलेल्या या टेकड्या म्हणजे वेताळ आणि पर्वतीच्या टेकड्या. वेगाने विस्तारणाऱ्या शहराच्या मध्यात असणाऱ्या या जागा नियमितपणे चालायला, पळायला येणाऱ्या लोकांसाठी तसेच निसर्गप्रेमींसाठी महत्त्वाची आणि जिथे सहज जाता येईल अशी ठिकाणे बनली आहेत. नागरिकांच्या या गटांमध्ये टेकड्यांबद्दल इतका अभिमान आणि आस्था आहे, की ते या टेकड्यांचे वर्तमान आणि भविष्य यावरील निर्णयांवर मोठा प्रभाव टाकू शकतात.

उदाहरणार्थ, यातल्या एका टेकडीवरून जाणाऱ्या पौड-बालभारती यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या विरोधात जोरदार प्रचार करून या गटांनी पुणे महानगरपालिकेला त्या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडले. तसेच या टेकड्यांवर स्वतःची हद्द निश्चित करण्यासाठी आणि टेकड्यांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी मोठ्या काँक्रीट भिंती बांधण्याच्या वन विभागाच्या योजनेलाही जोरदार विरोध केला गेला. मर्यादित प्रवेश, टेकड्यांवरील पर्यावरण आणि जैवविविधतेचा विनाश तसेच जागरूक नागरिकांच्या हरित सेनेद्वारे हाती घेतले जाणारे वनीकरणाचे विविध उपक्रम हे या संघर्षाचे काही महत्त्वाचे मुद्दे होते.

पुण्याच्या टेकड्यांवरील वनीकरणाचा इतिहास

टेकड्यांवरचे वनीकरणाचे प्रयत्न फार पूर्वीपासून झाले आहेत. बाँबे प्रेसिडेन्सीचे विभागीय वन अधिकारी ई. ए. गारलँड आणि मुंबई शासनाचे आर्थिक वनस्पतीतज्ञ डब्ल्यू बर्न्स यांच्यातील पत्रसंवादात लिहिलेले आहे, “या प्रदेशात (भांबुर्डा-वेताळ टेकडी) १८७९ मध्ये वनीकरण झाले… मधून मधून साग किंवा चंदन असे वृक्ष लावण्याचेही प्रयत्न झाले असावेत, पण अशा कामाच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत, तसेच सध्या असलेल्या वनस्पती पाहता अशा प्रयत्नांना फारसे यशही मिळालेले दिसत नाही.”

या अयशस्वी प्रयत्नांची जागा १९५० च्या दशकात वन विभागाने सरसकट एकाच प्रकारची झाडे लावून केलेल्या वनीकरणाने घेतली. १९६४ पर्यंत वेताळ टेकडीवर ग्लिरिसिडिया सेपियम या विदेशी वृक्षाची गर्द झाडी तयार झाल्याची नोंद केली गेली. पर्वती टेकडीवर १९७३ मध्ये वनविभागाने काही विदेशी आणि काही देशी झाडे लावल्याची नोंद आहे.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला पूर्वीच्या व्यावसायिक कारणाकरिता झाडे लावण्याऐवजी सावलीची आणि जमिनीचा पोत सुधारेल तसेच इंधन आणि चारा देतील अशी झाडे लावण्याकडे कल वाढलेला दिसतो. १९७० मध्ये त्यात वनांची वैशिष्ट्ये दिसतील अशी झाडे लावणे आणि नागरिकांसाठी मनोरंजनाच्या जागा म्हणून उपयोगी पडतील अशी वन-उद्याने तयार करणे असा आणखी बदल झालेला दिसतो.

सुरुवातीच्या काळातील प्रकाशनांमध्ये वनस्पतीशास्त्रज्ञ आणि उद्यानतज्ञ याच्याकडे यशोगाथा म्हणून पाहत होते. “आधीच्या उजाड टेकडीचे आता सुंदर नैसर्गिक उद्यानात रुपांतर झाले आहे” यासारखी विधाने याची साक्ष देतात.

पण या हस्तक्षेपांपूर्वी या टेकड्यांचे ‘मूळ’ रूप काय होते याबद्दल आपल्याला किती माहिती आहे? असे दिसते की बऱ्यापैकी माहिती आहे.

एकल लागवड पद्धतीपूर्वीचा काळ

मोझेस इझिकेल यांनी १९१७ मध्ये नोंदवले आहे की टेकडीवरील वनस्पती तुरळक आणि कमी पाण्यावर, कोरड्या हवामानात वाढणाऱ्या प्रकारांमधल्या होत्या (xerophytic). त्यांनी निवडुंगासारखी झुडुपे (stem succulents), पानगळी झुडुपे आणि झाडे, गवतांचे प्रकार आणि हंगामी छोट्या वनस्पती असल्याचे नोंदवले आहे. भांबुर्डा-वेताळ टेकडीच्या संदर्भात बर्न्स यांनी १९३१ मध्ये लिहिले, “इथे झाडे एकमेकांपासून बऱ्याच अंतरावर आहेत, त्यामुळे मधल्या जागेत भरघोस गवत वाढते.”

सर्वात सामान्यपणे दिसणारी झाडे होती धुपाळी (Boswellia serrata), धवरा (Anogeissus latifolia), शिमटी (Lannea coromandelica), ऐन (Terminalia tomentosa), गणेरी (Cochlospermum religiosum) आणि असन (Pterocarpus marsupium).

वरील छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसते की या वनस्पतींमध्ये लांब लांब अंतरावर खुरटी झाडे आणि झुडुपे आहेत आणि त्यांच्या खाली गवत पसरलेले आहे.

आपल्याला आता माहीत आहे की ही एक नमुनेदार गवताळ प्रदेशाची (savannah) इकोसिस्टिम आहे, जिथे एका सलग गवताळ प्रदेशात मधून मधून झाडे आणि झुडुपे असतात आणि ती गर्द मंडप तयार करत नाहीत. हा प्रदेश जंगलांपेक्षा वेगळा असतो.

या व्यतिरिक्त, आणखी काही सांस्कृतिक पुरावेसुद्धा याकडे बोट दाखवतात की पूर्वीच्या काळी या टेकड्या म्हणजे अधिक खुल्या, गवताचेच वर्चस्व असलेल्या पर्यावरणीय व्यवस्था होत्या. भटके पशुपालक समुदाय असलेल्या धनगरांशी निगडित असलेली दगडी हत्यारे या भागात सापडली आहेत. मागच्या २०००-३००० वर्षांमध्ये या टेकड्यांचा वापर धनगर लोक गुरे-मेंढरे चारण्यासाठी करत होते हे यातून निर्देशित होते. शिवाय वेताळ आणि आजूबाजूच्या टेकड्यांवर म्हातोबा, खंडोबा, वेताळ यांची देवळे आहेत. याही मुख्यतः पशुपालक समुदायांच्याच देवता आहेत. त्यामुळे त्यातूनही हा संबंध स्पष्ट होतो.

आता, वसाहती काळात वनाधिकाऱ्यांना गवतापेक्षा झाडांचे महत्त्व अधिक होते. त्यामुळे गुरे-मेंढरे चरण्यामुळे त्यांच्या वनांशी संबंधित कामांमध्ये अडथळा येतो असे त्यांना वाटत असे. नैसर्गिकरित्या खुल्या, तुरळक झाडे असलेल्या इकोसिस्टिमपेक्षा घनदाट वृक्ष असलेल्या प्रदेशांचे मूल्य अधिक आहे असा समज आजही आपल्या नोकरशाहीमध्ये घट्ट रुजला आहे.

मात्र, हा विचार केवळ वन खात्यातच आहे असे नाही; अलिकडे तो आणखी व्यापक प्रमाणात पसरला आहे. हल्लीच्या काळातल्या पर्यावरणविषयक चळवळींचा गाभाच वृक्ष लागवड हा आहे. विशेषतः हवामानात होणारे टोकाचे बदल रोखण्यासाठी हाच उपाय मानला जातो!

‘हिरवाई’चे ध्येय

मागच्या दशकामध्ये, एनजीओ आणि नागरिकांचे गट यांच्यामध्ये वनीकरणाच्या उपक्रमांची जी लाट आली आहे तिने पुण्याच्या टेकड्यांवरही आपला ठसा उमटवला आहे. (पहा येथे, येथे आणि येथे). अशा एका गटाने या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या सामान्य प्रजातींच्या नावांची यादी दिली आहे. यामध्ये काही भारतातील देशी प्रजाती आहेत तर काही ग्लिरिसिडिया (Gliricidia sepium) आणि सुबाभूळ (Leucaena leucocephala) अशा परदेशीही आहेत. सुबाभूळ ही जगातील सर्वात आक्रमक वनस्पतींपैकी एक मानली जाते.

थोडक्यात विश्लेषण केले असता तीन गोष्टी दिसतात:

  • अशा उपक्रमांचे तातडीचे ध्येय टेकड्या हिरव्यागार करणे हे असते,
  • वृक्षारोपणाच्या कामासाठी निधी उपलब्ध होण्याचे अनेक मार्ग आहेत आणि या कामावर ठाम विश्वास असणाऱ्या नेक, उत्साही लोकांकडूनही त्याला चांगला पाठिंबा मिळतो. आणि
  • जरी देशी प्रजाती वापरणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले असले ही माहिती बऱ्यापैकी आहे असे दिसले तरीही सध्या या टेकड्यांवर जी झाडे लावली जातात त्यांचे त्या टेकड्यांवर नोंद केलेल्या the नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या प्रजातींशी काहीही साधर्म्य नाही.

या उपक्रमांमुळे इकोसिस्टिमचे मूलभूत स्वरूप बदलत आहे. म्हणजेच अधिक खुल्या, झाडे आणि गवतांच्या मिश्र व्यवस्थेच्या ऐवजी तिथे जंगल तयार होत आहे आणि हे बदल हळूहळू तिथली विद्यमान, स्थानिक जैवविविधता संपवून टाकतील. उदाहरणार्थ, १९०१ आणि १९९७ च्या दरम्यान या टेकडीवरील वनस्पतींच्या तुलनात्मक सर्वेक्षणांचा एक अभ्यास ७२ स्थानिक प्रजाती नष्ट झाल्याचे नोंदवतो. त्यामध्ये मुख्यतः कंदमूळ प्रकारातील वनस्पती (Dipcadi montanum, Ceropegia bulbosa, Habenaria longicalcarata इ.) आणि काही पानगळी वृक्ष (Schrebera swietenioides, Garuga pinnata, Buchanania lanzan इ.) आहेत.

आपल्याला हेसुद्धा माहीत आहे की वर नमूद केलेल्या काही प्रजाती सावलीमध्ये चांगल्या वाढत नाहीत त्यांना चांगले ऊन आवश्यक असते. शिवाय चर खणणे वगैरे कामांमुळे मातीच्या वरच्या थराचे जे नुकसान होते त्यामुळे जमिनीत फार खोलवर न जाणाऱ्या वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होऊ शकतात (कंदमुळे, गवत इ.) आणि त्याबरोबर तिथे असलेला बिबियाणांचा मूल्यवान साठाही नष्ट होऊ शकतो, ज्यावर तिथल्या वृक्षवनस्पतींचे भविष्य अवलंबून आहे.

पुण्याच्या टेकड्यांचे भविष्य

आज टेकड्यांचे रंगरूप सुधारण्यासाठी जे मार्ग अवलंबले जात आहेत ते बहुधा याच समजुतीवर आधारलेले आहेत की खुल्या, कमी झाडे असलेल्या पर्यावरणीय व्यवस्था या ‘कमी दर्जाच्या’ आणि उजाड आहेत. ती काही अरण्ये नाहीत. मात्र मागच्या काही शतकांमधले ऐतिहासिक पुरावे सांगतात की या टेकड्यांवर खरोखरच अशा खुल्या पर्यावरणीय व्यवस्था होत्या, विशेषतः कोरड्या हवामानात आणि मातीच्या पातळ थरामध्ये येणाऱ्या वनस्पतीच होत्या.

कोरडे, पानगळीचे वृक्षांची पाने कोरड्या हंगामात गळून पडतात आणि गवत सुकून जाते. टेकड्या नैसर्गिकरित्या वर्षभर हिरव्यागार दिसत नाहीत. ते या व्यवस्थेचे जीवशास्त्रीय स्वरूप आहे! टेकड्या हिरव्यागार करण्याच्या नादात आपण अशा प्रदेशांचे वैशिष्ट्य असणाऱ्या वृक्षवनस्पती आणि त्यावर अवलंबून असणारी अन्य जैवविविधताही हळूहळू गमावून बसू!

नागरिक म्हणून आपण टेकड्यांवरील झाडझाडोऱ्यामध्ये किती हस्तक्षेप करायचा त्याबाबत गंभीर चर्चा सुरू केल्या पाहिजेत. जमिनीच्या समृद्ध पर्यावरणीय आणि सांस्कृतिक इतिहासाची आपण जाणीव ठेवली पाहिजे. टेकड्यांवरील मूळ वनस्पती काय होत्या हे सांगणारी संसाधने आपल्याला उपलब्ध आहेत. वृक्षारोपण करणे गरजेचेच असेल तर लावता येतील अशा काही वनस्पतींची नावे आम्ही दिली आहेत.

(लक्षात ठेवा: यापैकी अनेक सावकाश वाढणाऱ्या प्रजाती आहेत आणि ही झाडे वाढलेली पाहायची असतील तर संयम आवश्यक आहे. झाडे फार जवळजवळ लावू नयेत, म्हणजेच दोन लगतच्या रोपांमध्ये किमान १५-२० मीटर अंतर असले पाहिजे.)

प्रियांका रुणवाल या पुण्यात वाढल्या आणि आता नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगळुरू येथे संशोधक आहेत. त्या शुष्क गवताळ जमीन (arid grassland) आणि गवताळ प्रदेश (savanna landscapes) यांचे समाज-पर्यावरण या विषयावर काम करतात.

आशिष नेर्लेकर हे पुण्यातील वनस्पतीतज्ञ आणि पर्यावरण तज्ञ आहेत आणि गवताळ प्रदेशातील पर्यावरणीय व्यवस्थांच्या अभ्यासात त्यांना रुची आहे. त्यांनी पुण्यातील टेकड्यांवर आढळणाऱ्या किर्कुंडी (Jatropha nana) या दुर्मिळ वनस्पतीचा अभ्यास केला आहे.

मूळ लेख येथे वाचावा.

COMMENTS