झीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

झीरो बजेट नैसर्गिक शेतीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह

ZBNF (झीरो बजेट नॅचरल फार्मिंग) हे विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांनी विकसित केलेले तंत्र आहे. पिकाला मिळणारी ९८ ते ९८.५% पोषके ‘हवा, पाणी आणि सूर्याची ऊर्जा’ यांच्यामधून मिळत असतात असा त्यांचा दावा आहे.

व्हिलेज डायरी भाग ५ : मिलु बरबडा ते ऊस
व्हिलेज डायरी भाग ४ तिथून इथपर्यंत
शेती कायदाः रखवालदार म्हणून चोराची नेमणूक

नवी दिल्ली: कृषी संशोधकांच्या देशातील एका आघाडीच्या संस्थेने सरकारने झीरो बजेट नैसर्गिक शेतीचा करत असलेल्या पुरस्कारावर टीका केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार‘हे तंत्र सिद्ध झालेले नाही आणि शेतकऱ्यांना या तंत्राचा कोणताही लक्षणीय लाभ मिळेल असे वाटत नाही’ असे या कृषी संशोधकांचे मत आहे.

“सरकारने विनाकारण ZBNF चा पुरस्कार करण्यात भांडवल आणि मानवी श्रम वाया घालवू नयेत. आम्ही लिखित स्वरूपात आमच्या शिफारसी पंतप्रधानांकडे दिलेल्या आहेत आणि शास्त्रज्ञांच्या समुदायामध्ये याबाबत काय दृष्टिकोन आहे ते त्यामध्ये मांडले आहे,” असे नॅशनल ऍकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चरल सायन्सेस (NAAS) चे अध्यक्ष पंजाब सिंग इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले.

ZBNF (झीरो बजेट नॅचरल फार्मिंग) हे विदर्भातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाळेकर यांनी विकसित केलेले तंत्र आहे. पिकाला मिळणारी ९८ ते ९८.५% पोषके ‘हवा, पाणी आणि सूर्याची ऊर्जा’ यांच्यामधून मिळत असतात असा त्यांचा दावा आहे.

उर्वरित पोषके मातीमध्ये उपस्थित असतात आणि जर सूक्ष्म जीवांना त्यावर क्रिया करण्यास सक्षम केले तर ती उपयोगात आणता येतात, असेही पाळेकर यांचे मत आहे. सूक्ष्म जीवांना हे काम करणे शक्य व्हावे याकरिता शेतकऱ्यांनी खते आणि कीटकनाशके फवारू नयेत. त्याऐवजी, शेतकऱ्यांनी गायीचे शेण, गोमूत्र आणि कडुनिंब यांचा उपयोग खते, सुपीकता वाढवणारी द्रव्ये आणि कीटकनाशके म्हणून करावा असे पाळेकरांचे सूत्र आहे.

जुलै महिन्यात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या दुरवस्थेला उत्तर म्हणून तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा एक उपाय म्हणून पाळेकरांच्या पद्धतींचा पुरस्कार करण्याचा सरकारचा इरादा असल्याचे घोषित केले होते.

अजूनपर्यंत ज्याच्यावर कसलेही शास्त्रशुद्ध संशोधन झालेले नाही अशा ZBNF च्या परिणामकारकतेबद्दल अनेक विज्ञानविषयक संस्था आणि स्वतंत्र वैज्ञानिक यांनी शंका व्यक्त केल्या आहेत. त्या सूचीमध्ये आता NAAS ही सामील झाले आहे. ZBNF च्या परिणामकारकतेबद्दल कोणत्याही प्रकारचा डेटा, अभ्यास किंवा प्रयोगांचा अभाव असल्यामुळे तो व्यवहार्य तंत्रज्ञानात्मक पर्याय म्हणून विचारात घेण्याबाबत NAAS ला शंका आहेत.

ऑगस्टमध्ये द वायरमधीललेखानुसार नैसर्गिक शेतीबाबत आणि ती उत्पादनक्षमता, माती व रोपांचे आरोग्य आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर कसे परिणाम करते याबाबत कोणतेही ठोस संशोधन झालेले नाही.

सरकारच्या दाव्याप्रमाणे सर्व देशभर जर ZBNF चे पालन केले गेले तर या सर्व गोष्टींवर सकारात्मक परिणाम होईल. वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक अहवाल यांच्या अनुपस्थितीत, सरकारच्या या दाव्यांचा आधार काय हे स्पष्ट होत नाही.

आम्ही असेही नमूद केले होते की सरकारने “वेगवेगळ्या पिकांसाठी नैसर्गिक शेतीबद्दल शेतकऱ्यांचा परिप्रेक्ष्य आणि तिच्या अंमलबजावणीमुळे पिकांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न यावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी” नुकताच एक प्रकल्प सुरू केला आहे. द इंडियन कौन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रीसर्च (ICAR) आणि नॅशनल ऍकॅडमी ऑफ ऍग्रिकल्चरल रीसर्च मॅनेजमेंट (NAARM) या दोन संस्था यामध्ये एकत्र काम करत आहेत.

आम्ही या संस्थांबरोबर काम करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांबरोबर बोललो आणि यापैकी या प्रकल्पावर काम करणाऱ्या काही जणांच्या मते, चालू असलेल्या प्रकल्पालाही वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणतेही लक्षणीय मूल्य असणार नाही.

शास्त्रज्ञांच्या मते, सहा महिने हा अभ्यासाचा कालावधी नैसर्गिक शेतीच्या तंत्राचे परिणाम अभ्यासण्यासाठी पुरेसा नाही. उदाहरणार्थ, ZBNF हा शेतीच्या सध्याच्या तंत्रांपेक्षा वरिष्ठ दर्जाचा पर्याय आहे का हे निर्धारित करण्यासाठी, या पर्यायामध्ये विहीत करण्यात येणारे, खताऐवजी वापरण्यात येणारे ‘जीवामृत’– जे गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि डाळीचे पीठ यांच्यापासून बनवले जाते – हे मातीला तसेच रोपांना लागणारी विविध पोषके हव्या त्या प्रमाणात पुरवतात का याचे मूल्यांकन करणे अत्यावश्यक आहे.

अनेक शास्त्रज्ञांच्या मते, हे मूल्यांकन सहा महिन्यांमध्ये शक्य नाही आणि त्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी आवश्यक आहे. “परिणाम प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी योग्य विश्लेषण करण्याकरिता आम्हाला एकापेक्षा अधिक हंगामांमधील अनेक नमुने घ्यावे लागतील जेणेकरून आम्हाला पिकाच्या कापणीपूर्वी आणि नंतर पोषकांची पातळी काय आहे हे समजून घेता येईल. आम्हाला माती आणि रोपे यांच्यावर दीर्घ काळ देखरेख ठेवणे गरजेचे असेल,” माती आणि रोपांच्या विश्लेषणाच्या कामातील तज्ञ असलेल्या एका शास्त्रज्ञाने द वायरला सांगितले.

द प्रिंटनेही अलिकडेच ICAR आणि इंडियन ऍग्रिकल्चरल रीसर्च इन्स्टिट्यूट (IARI) मधील काही शास्त्रज्ञांची मुलाखत घेतली. इतक्या घाईघाईने ZBNF ची अंमलबजावणी करण्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घटच होण्याची शक्यता आहे असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.

“शेतीच्या दृष्टीने विविध प्रकारच्या वातावरणांमधील अभ्यासांशिवाय, आणि ZBNF च्या दीर्घकालीन परिणाम आणि व्यवहार्यतेची शास्त्रीय दृष्टिकोनातून पडताळणी केल्याशिवाय, त्याचे प्रमाण वाढवणे आणि देशभर त्याचा पुरस्कार करणे योग्य नाही. त्याचे परिणाम फार भयंकर होऊ शकतात,” असे अनामिक राहण्याच्या अटीवर एका शास्त्रज्ञाने सांगितले.

मात्र पाळेकर हे ZBNF तंत्राचे ठाम समर्थन करतात. “NAAS कडे माझ्या शेतीच्या पद्धतीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक ज्ञान नाही. ते कधीही माझ्याशी किंवा हे तंत्र वापरणाऱ्या लोकांशी बोललेले नाहीत,” असे त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: