कामगार संघटनांचा कोहिनूर हिरा

कामगार संघटनांचा कोहिनूर हिरा

र. ग. कर्णिकांचे योगदान या देशांतील सरकारी कर्मचारी व कामगार वर्गाच्या प्रत्येक घटकांवर आहे. कामगार संघटनांचा हा कोहिनूर हिरा निखळला. एकजुटीची शिकवण देणारा असा नेता होणे नाही!

‘मोदींनी ठरवलीय पाक-चीनशी युद्धाची तारीख’
पाकिस्तानच्या पहिल्या सुरक्षा धोरणात भारतासोबत शांततेवर भर
भारत हे करोनाचे पुढील केंद्रस्थान : डॉ. लक्ष्मीनारायण

‘कामगार संघटना संयुक्त कृति समिति’ (महाराष्ट्र राज्य) ही महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी, मध्यमवर्गीय बँक विमा व सेवा क्षेत्रातील संघटना, केंद्र सरकारचे अंगीकृत व्यवसाय, संरक्षण, बीपीटी, रेल्वे, शिक्षक, प्राध्यापकपासून ते ग्राम पंचायतीपर्यंत व सर्व संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील सर्व संघटनाची प्रातिनिधिक शिखर संघटना आहे. सुमारे ४०-४५ वर्ष तरी काँ. र. ग. कर्णिक निमंत्रक पदावरून कामगार चळवळींला मार्गदर्शन करणारे हे अत्यंत शांत परंतु प्रभावी नेतृत्व होते. त्यांचे शनिवारी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते.

वयाच्या १५व्या वर्षांपासून स्वातंत्र्य चळवळीत वावरणाऱ्या तरूण कर्णिकांनी त्यांचे मामा भाई कोतवाल, साथी शांतीभाई पटेल, साथी डॉ. जी. जी. पारीख अशा अनेक समाजवादी व कामगार चळवळीत ज़्यांनी पायाभूत कामगिरी केली त्यांच्या बरोबर ४२च्या छोडो भारत आंदोलनात साथ, सोबत केली. देश स्वतंत्र झालेला पाहणे हे भाग्य त्यांना लाभले.
स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये त्यांनी आत्मसात केली. महात्मा गांधी , साने गुरूजी, सेनापती बापट यांच्या विचाराचा व महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा वारसा चालवणे हे त्यांनी आपले जीवित कार्य मानले होते.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचा सहभाग हा थोर नेते साथी एस. एम. जोशी, मधु दंडवते, मृणाल ताई गोरे, साथी एफ. एम. पिंटो यांच्याबरोबर होता. समाजवादावर आधारित स्वावलंबी, बलशाली भारत घडवण्याकडे त्यांचा प्रयत्न होता. निसर्ग संपत्तीचे संवर्धन, पर्यावरण स्नेही व मानवी संसाधन केंद्रीत रचनात्मक कामातून समाजाला पुढे नेणे हेच त्यांनी आपले उद्दिष्ट ठरवले होते.
त्यामुळेच कसेल त्याची जमीन आंदोलन, एक गाव, एक पाणवठा या सारख्या चळवळीत कर्णिकांनी झोकून दिले. पुढे सरकारी कर्मचार्यांची संघटना त्यांनी बांधली. त्यातून कर्मचार्यांचे सामाजिक भान व कर्तव्य याबद्दलची प्रात्यक्षिके दाखवली.

आज राज्यात १० लाख सरकारी कर्मचारी असलेल्या संघटनेत कर्णिकांचा कार्याचा वारसा सांगितला जातो. कष्टकरी वर्गाचे जगण्याचे प्रश्न सोडविणे, त्यासाठी जाणते पणाने आपण झटले पाहिजे ही कर्णिकांची शिकवण कर्मचारी संघटनेमध्ये रुजलेली दिसून येते.

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या नंतर सरकारी कर्मचारी संघटना त्यांनी अधिक बलशाली बनविली. अखिल भारतीय पातळी त्यांच्या कार्याचा दबदबा पसरला होता. विविध कर्मचारी संघटनांशी त्यांचे संबंध होते. कॉन्फेडरेशनचे प्रथम पदाधिकारी व पुढे दोन दशके त्यांनी अखिल भारतीय अध्यक्षपद समर्थपणे भूषविले. पे कमिशनमधील अनेक तंटे त्यांनी यशस्वीरित्या हाताळले.

महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी वर्गाचे आर्थिक फायदे निरंतर वाढले यांचे कारण र. ग. कर्णिकांचे समर्थ नेतृत्व. लढल्याशिवाय काहीच मिळू शकणार नाही हे त्यांनी आयुष्य भर लढे देऊन दाखवून दिले. त्यामुळे एक लढवय्या तसेच प्रामाणिक व बुद्धिमान नेता असा लौकिक त्यांना मिळवता आला.

१९७०च्या दशकांतील प्रदीर्घ काळ चाललेले लढे त्यांनी गाजविले. सत्तेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांबरोबर संवाद व संघर्ष करत ७ दशके र. ग. कर्णिक यांनी अनेक आदर्श निर्माण केले आहेत.
५२ दिवसाचा संप, शिवाजी पार्कवरील प्रचंड सभा, त्यामध्ये त्यांचे सर्व सहकारी तावून सुलाखून निघाले. र. ग. कर्णिक नेहमीच सभेचा शेवट करीत असतं. अत्यंत कठीण काळात सुद्धा त्यांचे १५ मिनिटांचे भाषण लोकांत चैतन्य निर्माण करणारे, आशावाद जागवणारे, लढण्याची प्रेरणा वाढवणारे, ताकद वृद्धिंगत करणारे होते.

त्यांच्या अशा भाषणांतून समाज प्रबोधन असायचे. भाषणांत आक्रस्ताळेपणा कधीच नसायचा, मात्र या संयमी नेत्यांचे सरकारला हादरविणारे इशारे कर्मचारी वर्गाला एकजुटीने पुढे नेण्याचा मंत्र देत असतं. त्यांची ‘हम सब एक है !’ ही अत्यंत साधी पण सर्वाधिक प्रभावी घोषणा संपूर्ण कामगार वर्गाची आहे.

कर्णिक हे अत्यंत साधेपणाने राहात. अगदी करोना कालखंडाच्या आधीपर्यंत युनियन कार्यालयात जायचे. जुन्या पिढीतील नेत्यांची ही कामगार वर्गावरील निष्ठा विचारांवर आधारीत होती. हल्ली ही बाब कमी दिसत असते.
गेली पाच वर्षे त्यांचा सार्वजनिक वावर कमी असला तरी सर्वांना त्यांचे नेतृत्व मान्य होते कारण या कर्तृत्ववान नेत्याने दोन पिढ्यातरी निश्चित घडविल्या.
समाज प्रबोधन चळवळीत त्यांनी महाराष्ट्र राज्यांतील शेकडो नेते व कार्यकर्त्यांच्या जडणघडणीला हातभार लावला आहे. आयटक, इंटक, सीटू, हिंद मजदूर सभा यांच्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता तसेच बँका, विमा व शिक्षक चळवळींशी ते जैव संबंध ठेवून होते.
आज या महान नेत्यांची उणीव नक्कीच जाणवेल. ते सर्व जनतेचे साथी होते आणि आमचे लाडके कॉमरेड होते. आमच्या सुख-दुःखांत साथ देणारे हे व्यक्तिमत्व होते.
र. ग. कर्णिकांचे योगदान या देशांतील सरकारी कर्मचारी व कामगार वर्गाच्या प्रत्येक घटकांवर आहे. कामगार संघटनांचा हा कोहिनूर हिरा निखळला. एकजुटीची शिकवण देणारा असा नेता होणे नाही!

विश्वास उटगी, बँकिंग तज्ज्ञ व बँक कर्मचाऱ्यांचे नेते आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0