‘रफाल’ आणि राजनय

‘रफाल’ आणि राजनय

‘रफाल’ भारतात दाखल होत असताना त्याच्या प्रवासमार्गावर केवळ भारत आणि इतर देशांमधील राजनयिक संबंधांचे प्रतिबिंबही उमटलेले दिसत आहे. तसेच येथून पुढील काळातही भारताच्या ‘हवाई राजनया’चा ‘रफाल’ एक भाग असणार आहे.

शेतकरी आंदोलन आणि वर्ग संघर्ष
नरेंद्र मोदी. छत्रपती शिवाजी. हिटलर.
साकीनाका घटना : फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

फ्रान्सकडून भारतीय हवाईदलासाठी अत्याधुनिक ३६ ‘रफाल’ लढाऊ विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तत्संबंधीचा करार दोन्ही देशांदरम्यान सप्टेंबर २०१६मध्ये झाला होता. त्यापैकी पहिली काही विमाने आज भारतात दाखल झाली आहेत. त्याआधी भारतीय हवाई दलाच्या गरजांनुरुप फ्रान्समध्येच घडवल्या गेलेल्या ‘रफाल’वर भारतीय लढाऊ वैमानिक, तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना आवश्यक ते संपूर्ण प्रशिक्षण दिले गेले आहे.

गेल्या दोन वर्षांपासून फ्रान्समधील सेंट डिझिएर येथील हवाईतळावर हे प्रशिक्षण दिले जात होते. भारतात येताना भारतीय लढाऊ वैमानिकच या विमानांचे सारथ्य करीत होते. पहिल्या टप्प्यात पाच ‘रफाल’ भारतात दाखल झाली असून ती सर्व विमाने ‘मोहिमेसाठी सज्ज’ असतील आणि त्यापैकी काही विमाने ‘रफाल बी’ आणि काही ‘रफाल सी’ प्रकारची असतील. ही विमाने भारताच्या दिशेने निघण्यापूर्वी वैमानिकांना आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतुकीसंबंधीच्या सर्व बाबींचीही माहिती करून दिली गेली आहे. कारण भारतात येताना या विमानांनी नागरी हवाई मार्गांचाच वापर केला आहे. भारताच्या दिशेने उड्डाण करताना भारतीय हवाई दलाचे मालवाहू विमान आणि फ्रेंच हवाई दलाचे इंधनवाहू विमान ‘रफाल’ विमानांसोबत होते. आंतरराष्ट्रीय नागरी हवाईमार्गांवरून जात असताना ‘रफाल’ विमानांवर कोणत्याही प्रकारचे शस्त्र  बसविलेली नव्हती कारण ती तशी बसवता येत नाही. या सर्व विमानांनी दक्षिण फ्रान्समधील बोर्दु-मेरिज्नाक विमानतळावरून २७ जुलै २०२० रोजी भारताच्या दिशेने उड्डाण केले होते.

भारतात येताना वाटेत या सर्व विमानांनी एकच थांबा घेतला. हा थांबा संयुक्त अरब अमिरातीतील अबु धाबीजवळच्या अल धाफ्रा हवाईतळावर घेतला. बोर्दु-मेरिज्नाकहून निघाल्यावर साधारणतः चार तासांनी ही विमाने अल धाफ्राला पोहचली. दरम्यानचा प्रवास विनाथांबा असल्यामुळे तसेच हे मध्यम पल्ल्याचे लढाऊ विमान असल्यामुळे या ताफ्यासोबत असलेल्या फ्रेंच इंधनवाहू विमानातून भारतीय ‘रफाल’मध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले. सुमारे साडेपाच हजार किलोमीटरचे उड्डाण करून अल धाफ्राला पोहचल्यावर हा भारतीय ताफा काही काळ तेथे थांबला. आशियातील आपल्या हितसंबंधांच्या संरक्षणाच्या उद्देशाने फ्रान्सने या हवाईतळावर आपली ‘रफाल’ विमाने तैनात केलेली आहेत. भारतीय ‘रफाल’ विमानांची या तळाला दिलेली ही भेट सामरिक तसेच राजनयिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. त्या भेटीला त्रिपक्षीय सामरिक संबंधांच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.

अल धाफ्राहून भारतीय भूमीच्या दिशेने निघाल्यावर वाटेत पुन्हा एकदा ‘रफाल’मध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले. मात्र यावेळी भारतीय हवाईदलाच्या ‘आयएल-78 एमकेआय’ इंधनवाहू विमानातून ‘रफाल’मध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरले गेले. भारतीय हवाईदलात ‘रफाल’ची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला येथील हवाईतळावर तैनात केली जात आहे. त्यामुळे अल धाफ्राहून निघालेली ‘रफाल’ थेट अंबालामध्येच दाखल झाली.

‘रफाल’चा ताफा भारतात येत असताना वाटेत ज्या-ज्या देशांच्या हवाई हद्दीतून त्याला जावे लागले , त्या-त्या देशांकडून विशेष परवानाही या ताफ्याला काढावा लागला आणि शुल्कही भरावे लागले. हे कोणत्याही विमानाला करावे लागतेच. आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक संघटनेने (आयसीएओ) तयार केलेल्या नियमावलीनुसार आणि संबंधित देशांच्या नियमांनुसार ही प्रक्रिया पार पडली. उड्डाण परवाने हे असे परवाने असतात, ज्याद्वारे परदेशाच्या विमानांना संबंधित देश आपल्या हवाई क्षेत्रातून जाण्याची, विमान आपल्या देशात उतरू देण्याची किंवा एखाद्या विमानाला आपल्या देशातील एखाद्या विमानतळावर तांत्रिक कारणांसाठी थांबण्याची रीतसर परवानगी दिली जात असते.

‘रफाल’ हे ४.५ पिढीचे म्हणजे पाचव्या पिढीच्या लढाऊ विमानाच्या जवळचे विमान आहे. भारतीय हवाईदलासाठी ‘रफाल’ची बांधणी केली जात असतानाच त्यावर भारताच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा जशा, इस्रायली बनावटीचे हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले, रडार वॉनिंग रिसिव्हर्स, लो बँड जॅमर्स, इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅकींग सिस्टीम इत्यादी बसवण्यात येत आहेत. ‘रफाल’ त्याच्या श्रेणीतील वैशिष्ट्यपूर्ण विमान आहे. हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ले करण्यासाठी, टेहळणीसाठी, आकाशात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी, जमिनीवरील आपल्या सैन्याला हवाई छत्र पुरवण्यासाठी, जहाजविरोधी, शत्रुच्या प्रदेशात दूरवर हल्ला करण्यासाठी आणि अण्वस्त्रवाहक म्हणूनही भूमिका ‘रफाल’ बजावू शकते. त्यामुळे या विमानावर मोहिमेच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्रे एकाचवेळी बसवता येऊ शकतात. या विमानात डायरेक्ट व्हॉईस इनपुट बसवण्यात आलेला आहे. त्याच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या यंत्रणांना (शस्त्रास्त्रे डागण्याची सोडून) तोंडी सूचना देऊनही कार्यान्वित करता येते. त्याबरोबर ‘एईएसए’ रडारच्या मदतीने ‘रफाल’ एकावेळी आकाशातील अनेक लक्ष्यांचा वेध घेऊन त्यांच्यावर हल्ला करू शकते. ‘एईएसए’ यंत्रणा भारतीय हवाई दलाच्या विमानांमध्ये पहिल्यांदाच बसवलेली असेल. उडत असताना विमानाचा तोल सांभाळण्यासाठी ‘रफाल’वर डिजीटल फ्लाय-बाय-वायर उड्डाण नियंत्रण यंत्रणा बसवलेली आहे. हवेत उडत असताना शत्रूच्या प्रदेशातील माहिती मिळवण्यासाठी यावर अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले आहेत. त्याची एकत्रित माहिती वैमानिकासमोर असलेल्या होलोग्राफीक हेड-अप डिस्प्ले यंत्रणेवर उपलब्ध होत असते.

‘रफाल’मध्ये ऑक्सिजन निर्मितीची यंत्रणा बसवलेली आहे. परिणामी ‘रफाल’चा उड्डाणाचा कालावधी वाढण्यास मदत झाली आहे. ‘रफाल’मधील ऑटोपायलट यंत्रणा वैमानिकावरील मोहिमेचा ताण हलका करते आणि आपत्कालीन परिस्थितीही सांभाळून घेते. या दोन्ही यंत्रणा भारतीय हवाई दलातील इतर लढाऊ विमानांमध्ये सध्या बसवल्या जात आहेत. ‘रफाल’वर बसवलेली ‘स्पेक्ट्रा’ स्वसंरक्षण यंत्रणा विमानाचे हवेतील आणि जमिनीवरील शत्रूपासून संरक्षण करते. ही यंत्रणा हे या विमानाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे.

लिबियामध्ये ‘नाटो’ने केलेल्या हवाई कारवायांच्यावेळी या यंत्रणेची बरीच मदत झाली होती. विविध प्रकारच्या यंत्रणांच्या मदतीने वैमानिकाला विमानाच्या आजूबाजूच्या परिस्थितीविषयीची माहिती सतत उपलब्ध होत राहते. मिळालेल्या सगळ्या माहितीचे विमानावरील ‘एमपीडीयू’ यंत्रणेकडून तातडीने विश्लेषण होते आणि ती माहिती जमिनीवरच्या आपल्या सैन्याला, आपल्या नियंत्रण कक्षाला आणि वैमानिकालाही लगेच उपलब्ध होऊ शकते. ‘रफाल’ आपल्याला मिळालेली लक्ष्यांची माहिती आसपास असलेल्या आपल्या इतर विमानांनाही पुरवू शकते. म्हणजेच ‘मिनी एवॅक्स’प्रमाणेही ‘रफाल’ काम करू शकते.

‘रफाल’वर १४ हार्ड पॉईन्ट्स आहेत. त्यावरून सुमारे ९ टन वजनाची शस्त्रास्त्रे वाहून नेता येतात. याच्यावरील ३० मिलिमीटरची स्वयंचलित तोफ मिनिटाला १२५ गोळ्यांचा मारा करू शकते. तसेच मॅजिक-2, मायका, मेटिओर ही हवेतून हवेतील लक्ष्ये भेदणारी विविध पल्ल्याची क्षेपणास्त्रे ‘रफाल’वर बसवलेली जाणार आहेत. यापैकी मेटिओर या मानवी दृष्टीच्या पलीकडचे लक्ष्य भेदू शकणाऱ्या क्षेपणास्त्राचा पल्ला १५० किलोमीटर आहे. भारत ‘रफाल’बरोबर ही क्षेपणास्त्रेही खरेदी करत आहे. तसेच या विमानासाठी ‘स्काल्प’ ही दीर्घपल्ल्याची क्रूझ क्षेपणास्त्रे आणि हवेतून जमिनीवरील लक्ष्य भेदणाऱ्या ‘हॅमर’ ही स्टँडऑफ क्षेपणास्त्रेही खरेदी करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मोहिमेच्या गरजेनुसार इंधनाचा अतिरिक्त साठा सोबत नेण्याची सोय (ड्रॉप टँक्स) या विमानात आहे. अशा तीन ड्रॉप टँक्सच्या मदतीने ‘रफाल’चा पल्ला ३,७०० किलोमीटरपर्यंत वाढवता येऊ शकतो. त्याबरोबरच यामध्ये हवेत उडत असतानाच इंधन भरण्याचीही सोय उपलब्ध आहे. याच्यावर बसवण्यात येणाऱ्या ‘बडी-रिफ्युलर’च्या मदतीने हवेत उडत असताना आणीबाणीच्या प्रसंगी एका ‘रफाल’मधून दुसऱ्या ‘रफाल’मध्ये इंधन भरणे शक्य होते.

‘रफाल’ भारतात दाखल होत असताना त्याच्या प्रवासमार्गावर केवळ भारत आणि इतर देशांमधील राजनयिक संबंधांचे प्रतिबिंबही उमटलेले दिसत आहे. तसेच येथून पुढील काळातही भारताच्या ‘हवाई राजनया’चा ‘रफाल’ एक भाग असणार आहे.

पराग पुरोहित, हे संरक्षण व रेल्वे अभ्यासक आहेत.

(‘रफाल’ भारतात दाखल झाल्यानंतर संपादन केलेला लेख )

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: