राहुल गांधी स्पायवेअरच्या संभाव्य लक्ष्यस्थानी

राहुल गांधी स्पायवेअरच्या संभाव्य लक्ष्यस्थानी

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याद्वारे वापरली जाणारी किमान दोन मोबाइल क्रमांक खाती पाळत ठेवण्यासाठी लक्ष्य करण्यात आलेल्या क्रमांकांच्या

निलंबित खासदारांच्या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर
कर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी
आयातबंदी मागे घेण्याचा निर्णय पाकिस्तानकडून मागे

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याद्वारे वापरली जाणारी किमान दोन मोबाइल क्रमांक खाती पाळत ठेवण्यासाठी लक्ष्य करण्यात आलेल्या क्रमांकांच्या यादीत आहेत, अशी पक्की माहिती द वायर आणि पिगॅसस प्रोजेक्टमधील त्यांच्या माध्यम सहकाऱ्यांकडे आहे. एनएसओ ग्रुप या इझ्रायलमधील सर्व्हीलन्स टेक्नोलॉजी व्हेंडरला अधिकृत भारतीय क्लाएंटद्वारे पाळत ठेवण्यासाठी पुरवण्यात आलेल्या ३०० भारतीय क्रमांकांमध्ये राहुल गांधी यांच्या दोन मोबाइल क्रमांकाचा समावेश आहे. त्यामुळे विरोधी पक्षांबद्दलची माहिती गोळा करण्यासाठी पाळतीचे अतिक्रमी (इंट्रुजिव) तंत्रज्ञान तैनात केले जात असावे अशी दाट शंका निर्माण झाली आहे. केवळ राहुल यांचेच नव्हे, तर त्यांच्या पाच संबंधितांचे क्रमांकही संभाव्य लक्ष्ययादीत आहेत. या पाचापैकी कोणीही राजकारणात किंवा सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नाही.

एनएसओ ग्रुपच्या क्लाएंट्सनी मिळवलेल्या व नंतर फुटलेल्या मोठ्या डेटाबेसमध्ये राहुल यांच्या या दोन मोबाइल क्रमांकांचा समावेश आहे. हे क्रमांक आता राहुल वापरत नाहीत. फोरबिडन स्टोरीज या फ्रान्समधील ना नफा तत्त्वावरील माध्यमसंस्थेने ‘द वायर’सह १६ वृत्तविषयक संस्थांसोबत हा फुटलेला डेटा शेअर केला आहे. यांत द गार्डियन, वॉशिंग्टन पोस्ट, ल मॉन्दे आणि हारेत्झ आदींचा समावेश आहे.

अॅम्नेस्टी इंटरनॅशनल्स टेक्निकल लॅबने या यादीतील फोन क्रमांकाची तपासणी केली असून, यातील ३७ क्रमांकांच्या उपकरणांमध्ये पिगॅसस स्पायवेअर घुसवण्यात आल्याचा निष्कर्षही काढला आहे. यापैकी १० उपकरणे भारतातील आहेत. राहुल ज्या हॅण्डसेट्सवरून हे क्रमांक वापरत होते, ते आता त्यांच्याकडे नसल्याने, त्यांची तपासणी होऊ शकली नाही. मात्र, हे क्रमांक २०१८ ते २०१९ या काळात लक्ष्य करण्यात आले असावेत असा अंदाज आहे. राहुल यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी पिगॅसस तैनात करण्यात आले होते की नाही हे सिद्ध करणे हॅण्डसेट्स उपलब्ध नसल्याने शक्य नाही. मात्र, त्यांच्या वर्तुळातील किमान नऊ क्रमांक या यादीत असल्याचे पिगॅसस प्रोजेक्टने ओळखल्यामुळे फुटलेल्या डेटाबेसमध्ये राहुल यांचे फोन क्रमांक आढळणे हा निव्वळ योगायोग नाही हे निश्चित आहे.

आपल्या फोनवर काही संशयास्पद मेसेजेस आल्याचे राहुल यांनी ‘द वायर’ला सांगितले. अशा मेसेजेसद्वारेच स्पायवेअर्स उपकरणांमध्ये सोडली जातात. संशयास्पद मेसेजेस आल्यामुळे वारंवार क्रमांक व उपकरणे बदलत राहिल्याचेही राहुल यांनी नमूद केले.

आपण केवळ सरकारांना स्पायवेअर विकत असल्याचे एनएसओ ग्रुपचे म्हणणे आहे. कंपनी ग्राहकांची ओळख उघड करणार नसली, तरी पिगॅसस प्रोजेक्टमध्ये प्राप्त झालेल्या  न्यायशास्त्रीय पुराव्यावरून असे दिसून येते की, स्मार्टफोन्स हॅक करण्यासाठी एक किंवा त्याहून अधिक अधिकृत यंत्रणा या स्पायवेअरचा वापर करत होत्या. भारत सरकार पिगॅसस स्पायवेअरचा वापर करत आहे का, या प्रश्नाचे उत्तर देण्यास मोदी सरकारने अनेकदा नकार दिल्यामुळे याबद्दलची शंका दाट झाली आहे.

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष असताना व २०१९ सालात लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचे नेतृत्व करत असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जाणे हे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभे करणारे आहे. अमेरिकेत १९७२ सालच्या राष्ट्राद्यक्षपदाच्या निवडणुकांदरम्यान, विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिकाऱ्यांवर पाळत ठेवल्याने उद्भवलेल्या वॉटरगेट स्कॅण्डलमुळे, रिचर्ड निक्सन यांना पद सोडावे लागले होते.

राहुल गांधी याबद्दल म्हणाले, “तुम्ही म्हणताय त्या प्रकारची लक्ष्यीकृत पाळत, मग ती माझ्यावर किंवा कोणाही नागरिकावर ठेवली गेलेली असो, भारतात बेकायदा आणि शोचनीय आहे. तुमची माहिती अचूक असेल तर हे व्यक्तीच्या खासगी आयुष्यावरील अतिक्रमण आहे. देशाच्या लोकशाही तत्त्वांवर हा हल्ला आहे. याचा सखोल तपास व्हायला हवा व दोषींना शिक्षा व्हायला हवी.”

राहुल यांचे दोन निकटवर्तीय अलंकार सवाई व सचिन राव यांचे क्रमांकही फुटलेल्या डेटाबेसमध्ये आहेत. राव हे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि पक्षकार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सध्या त्यांच्यावर आहे. सवाई राहुल यांच्या कार्यालयाशी जोडलेले आहेत आणि कामाच्या बहुतेक दिवशी ते राहुल यांच्यासोबत असतात. सवाई यांचा हॅण्डसेट २०१९ मध्ये चोरीला गेल्यामुळे फोरेंसिक तपासणीसाठी उपलब्ध नव्हता. तर राव यांचा त्या काळातील फोन बिघडला असून स्विच ऑन होत नसल्याचे त्यांनी सांगितले.  डेटाबेसमध्ये ज्यांचे क्रमांक आढळले आहेत अशा राहुल यांच्या पाच मित्रांपैकी तिघांनी या मुद्दयावर चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली, तर दोघांनी असमर्थता व्यक्त केली. चर्चा करण्यास तयारी दर्शवलेल्या तिघांपैकी दोन स्त्रिया आहेत व त्या स्पायवेअरच्या संभाव्य हल्ल्यामुळे चिंतेत आहेत. तिघांपैकी दोघे त्यावेळची हॅण्डसेट आता वापरत नाहीत. त्या काळातील हॅण्डसेट वापरत असलेल्या व्यक्तीनेही तो फोरेंसिक तपासणीसाठी देण्यापेक्षा नवीन हॅण्डसेट वापरण्यास प्राधान्य देऊ असे सांगितले. या पाचापैकी कोणीही सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय नसल्याने त्यांची नावे उघड करण्यात आलेली नाहीत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: