‘मोदींमुळे श्रीमंत व गरीब असे दोन भारत जन्मले’

‘मोदींमुळे श्रीमंत व गरीब असे दोन भारत जन्मले’

नवी दिल्लीः सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर हल्ला चढवला. या सरकारने एक नव्हे तर

बंगाल विधानसभाही नागरिकत्व कायद्याच्या विरोधात
‘रेनेसाँ स्टेट’: नवउदारमतवादी भांडवलशाहीचा चकवा
भाजपचे राज्यपालांना पत्र

नवी दिल्लीः सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा मोदी सरकारवर हल्ला चढवला. या सरकारने एक नव्हे तर दोन भारत जन्माला घातले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. पहिला भारत श्रीमंत, धनाढ्यांचा आहे ज्यांच्या कडे पैशाची ताकद असून दुसरा भारत ज्यांच्याकडे नोकरी नाही, वीज, पाणी नाही, अशा गरीब लोकांचा आहे. हेच गरीब लोक देशाची खरी आर्थिक ताकद आहे. यांना मोदी सरकार दीर्घकाळ चूप करू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर थेट हल्ला करत राहुल गांधी यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल राष्ट्रपतींच्या भाषणात एकही शब्द नसल्याचा आरोप केला. उ. प्रदेश, बिहार व देशाच्या सर्वच राज्यात बेरोजगारी वाढली आहे. बिहार, उत्तर प्रदेशात रेल्वे परीक्षेवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन उसळले होते, त्याची दखलही भाषणात घेतली जात नाही, याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

देशात गेल्या वर्षांत ३ कोटी युवकांचे रोजगार गेले. गेल्या ५० वर्षांतील सर्वाधिक बेकारी आज दिसत आहे. यूपीएच्या काळात २३ कोटी लोकसंख्येला दारिद्र्याच्या रेषेवर आणले गेले होते. ती सर्व २३ कोटी लोकसंख्या मोदी सरकारने गेल्या ७ वर्षांत पुन्हा गरीबीत ढकल्याचा आरोप त्यांनी केला. देशातील संपत्तीचे विषम वाटप झाले आहे. देशातल्या १०० जणांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५५ टक्के संपत्ती तर १० टक्के जणांकडे ४० टक्के संपत्ती आहे. ही सर्व संपत्ती मोदी सरकारची देन असून सरकारने गरीब व श्रीमंत भारताला जोडण्याचे काम करावे अन्यथा गरीब हिंदुस्थान शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

राहुल गांधी यांनी अदानी व अंबानी या देशातल्या बड्या उद्योगपतींची नावे आपल्या भाषणात घेतली. मोदी सरकारने देशातील रेल्वे, पेट्रोलियम उद्योग, बंदरे, विमानतळे, विविध उद्योग या दोघांकडे दिले. अनेक उद्योगाची मक्तेदारी या उद्योगपतींकडे दिली. त्या बदल्यात या उद्योगपतींकडून मोदींना टीव्ही, फेसबुक, सोशल मीडियावर प्रचार करायला मिळाला, असा टोलाही त्यांनी मारला.

सरकारने नोटबंदी, जीएसटीची चुकीची अमलबजावणी व कोरोना काळात लघु व मध्यम उद्योगांना मदत केली नाही. हे उद्योग अदानी, अंबानीपेक्षा अधिक रोजगार निर्माण करतात. सरकारने या उद्योगांना मदत केल्यासच मेड इन इंडियाचे स्वप्न साकार होऊ शकते. त्या शिवाय मेड इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, न्यू इंडिया वगैरे काही बनणार नाही, असाही शेरा त्यांनी सरकारच्या कामगिरीवर मारला.

‘चीन-पाकिस्तानचा एकत्रित धोका’

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणाचाही खरपूस समाचार घेतला. या सरकारच्या परराष्ट्र धोरणात मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याने चीन व पाकिस्तान एकत्र आले आहेत व देश चोहोबाजूनी एकाकी पडल्याचा आरोप केला. या दोघांना एकत्र येऊ न देणे ही रणनीती आवश्यक आहे पण तसे झालेले नाही. आपण चोहोबाजूनी एकटे पडत चालले आहोत, या मुळे या प्रजासत्ताक दिनी एकाही देशाचा अध्यक्ष पाहुणा म्हणून आला नाही. त्याची कारणे सरकारने स्वतःला विचारावीत असा टोलाही त्यांनी मारला. चीन हा धोका असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी चीनने डोकलाम, लडाखमध्ये घुसखोरी केली. त्यांच्यासमोर त्यांची योजना स्पष्ट आहे. ते शस्त्रास्त्रे खरेदी करत आहेत, ते कुणाशी चर्चा करतात ते पाहा. ते त्या दिशेने प्रयत्न करत असल्याचाही धोका स्पष्ट केला.

मोदी सरकारने जम्मू-काश्मीर प्रश्नातही ३७० कलम रद्द करून घोडचूक करून चीन-पाकिस्तानला एकत्रित यायला संधी दिली असा आरोप केला. आपल्याला आज ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, त्याचा धोका कमी लेखू नका, भारतासाठी हा एक गंभीर धोका असून हे मी आता संसदेत सांगत असल्याचे ते म्हणाले. देशाला जेवढा बाहेरून धोका आहे, तेवढा आतूनही असून देश कमकुवत झाला आहे. देशातील संस्थांवर हल्ले केले जात आहेत. राज्यांवर दबाव आणला जात आहे, सरकारला इतिहासाचे ज्ञान नाही. देशातील संवाद खुंटला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. पिगॅसस प्रकरणाचाही त्यांनी मुद्दा उपस्थित करताना मोदी इस्रायला गेले व तेथून पिगॅसस घेऊन आले. आता सरकार पिगॅससमार्फत लोकांवर हेरगिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आपण आणीबाणीवरही बोलू, बोलण्याची आपणाला भीती वाटत नाही. काँग्रेसने १९४७ साली राजेशाहीतून देश मुक्त केला होता. आता तीच परंपरा परत आली आहे. एक राजा परत आला आहे. हिंदुस्तानवर एक शहंशाह राज्य करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: