मोदींच्या दबावाचा आरोप करणाऱ्या प्रमुखाचा राजीनामा

मोदींच्या दबावाचा आरोप करणाऱ्या प्रमुखाचा राजीनामा

नवी दिल्लीः श्रीलंकेतील ५०० मेगावॉट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प भारतीय उद्योग समूह अदानी ग्रुपला द्यावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट

हिपटायटीस ‘सी’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल
६० टक्के लोकांच्या हातात पैसे द्या : अभिजीत बॅनर्जी
नाविका कुमार यांना अटकेपासून सुप्रीम कोर्टाकडून तूर्त संरक्षण

नवी दिल्लीः श्रीलंकेतील ५०० मेगावॉट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प भारतीय उद्योग समूह अदानी ग्रुपला द्यावा यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्यावर दबाव आणल्याचा खळबळजनक खुलासा करणारे सिलोन वीज प्राधिकरणाचे प्रमुख एमएमसी फर्डिनेंडो यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी श्रीलंकेतील एक पवन ऊर्जा प्रकल्प अदानी ग्रुपला द्यावा असा दबाव मोदींनी आणल्याचा खुलासा फर्डिनेंडो यांनी संसदीय समितीपुढे केला होता. या खुलाशावर श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात राजकीय गदारोळ उडाला होता. पण फर्डिनेंडो यांचा खुलासा राजपक्षे यांनी फेटाळल्यानंतर रविवारी फर्डिनेंडो यांनी आपल्या खुलाशावर माघारी घेत भावनेच्या भरात आपण खोटं बोललो असे जाहीर केले होते.

सोमवारी फर्डिनेंडो यांनी राजीनामा दिल्याचे श्रीलंकेच्या वीज व ऊर्जा खात्याचे मंत्री कांचना विजेसेकरा यांनी ट्विट करून सांगितले. फर्डिनेंडो यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्या रिक्त जागी वीज आयोगाच्या उपाध्यक्षांशी नियुक्ती केली गेल्याचे विजेसेकरा यांनी सांगितले.

श्रीलंकेच्या द म़ॉर्निंग या वृत्तपत्राने फर्डिनेंडो यांनी व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे वृत्त दिले आहे.

श्रीलंकेतील एक वृत्तवाहिनी न्यूजफर्स्टने फर्डिनेंडो यांच्या साक्षीचा व्हीडिओ प्रसिद्ध केला. त्यानंतर गदारोळ उडाला होता.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेच्या सार्वजनिक उद्योगांच्या संसदीय समितीपुढे सुनावणी झाली होती. या सुनावणीत फर्डिनेंडो यांनी श्रीलंकेच्या उत्तर भागातला ५०० मेगावॉट क्षमतेचा एक पवन ऊर्जा प्रकल्प अदानी ग्रुपकडे द्यावा यासाठी नरेंद्र मोदी यांच्याकडून राजपक्षे यांच्यावर दबाव आणला जात होता. या संदर्भातले एक पत्र आपण राजपक्षे यांच्या निर्देशानुसार अर्थ सचिवांकडे पाठवले होते व त्यांना हा सौदा दोन देशांदरम्यान आहे व त्यावर कारवाई करावी असे पत्रात नमूद केले होते. हा सौदा जरी दोन देशांदरम्यानच्या असला तरी कायद्याच्या चौकटीनुसार कमी बोलीच्या निविदानुसार सौदा व्हावा अशी माझी मागणी होती. त्यात हे प्रकरण वीज प्राधिकरणाच्या अखत्यारित येत नसून ते गुंतवणूक खात्याच्या अखत्यारित येते असे आपले मत राजपक्षेंना आपण कळवले होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर २०२१मध्ये राजपक्षे यांनी आपल्याला बोलावले व अदानी ग्रुपला पवन ऊर्जा प्रकल्प द्यावा असा मोदींचा आपल्यावर दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगितल्याचे फर्डिनेंडो यांनी समितीपुढील चौकशीत सांगितले होते.

फर्डिनेंडो यांचा हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर राजपक्षे यांनी तत्काळ हा आरोप फेटाळत मी कोणताही प्रकल्प कुणा विशिष्ट व्यक्तीला द्यावा असे बोललो नव्हतो असे राजपक्षे यांनी स्पष्ट केले.

राजपक्षे यांच्या खुलाशानंतर फर्डिनेंडो यांनी न्यूजफर्स्टला एक प्रतिक्रिया देत आपण चूक केली, भावनेच्या भरात खोटे बोललो असे सांगितले.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0