राममंदिर भूमीपूजन भावनात्मक क्षणः अडवाणी

राममंदिर भूमीपूजन भावनात्मक क्षणः अडवाणी

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे होत असलेले भूमीपूजन हा केवळ माझ्याच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी भावनात्मक क्षण

मिशन शक्ती भाषण – आचारसंहितेचे उल्लंघन?
राहुल गांधींचा आर्थिक सर्जिकल स्ट्राईक
६३ काय अन् ५६ काय !

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे होत असलेले भूमीपूजन हा केवळ माझ्याच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी भावनात्मक क्षण व ऐतिहासिक दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी दिली. राममंदिराच्या मोहिमेत आपण सामील होतो, रथयात्रेच्या निमित्ताने नियतीने हे काम करून घेतले हा क्षण महत्त्वाचा असून हे राममंदिर भारताला सशक्त, समृद्ध करण्याबरोबर सर्वांना न्याय देणारे, देशात सामंजस्यत्व रुजवणारे  असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राम मंदिर उभे झाल्यानंतर रामाच्या व्यक्तिमत्वात असलेले सद्गगुण सर्वांना प्रेरक राहतील, असेही अडवाणी म्हणाले.

प्रकृतीच्या व कोविड-१९ महासाथीच्या कारणावरून अडवाणी व मुरली मनोहर जोशी या भाजपच्या दोन नेत्यांना राम मंदिराच्या भूमीपूजनाला आमंत्रण देण्यात आले नव्हते. या कार्यक्रमाला १७५ जणांना आमंत्रण देण्यात आले असून महत्त्वाच्या पाच जणांच्या हस्ते राम मंदिराचे भूमीपूजन केले जाणार आहे. या पाच जणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हे महत्त्वाचे नेते आहेत.

राम जन्मभूमी आंदोलनात अडवाणी यांचा महत्त्वाचा भाग होता. त्यांनीच सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढून अयोध्येत कारसेवकांना जाण्यात उद्युक्त केले होते. देशभरातून जमा झालेल्या हजारो कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडली. ही घटना घडल्यानंतर ६ डिसेंबर १९९२ हा माझ्या आयुष्यातला सर्वात दुःखद दिवस असल्याचे विधान अडवाणी यांनी केले होते.

बाबरी मशीद पाडल्याप्रकरणात अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, उमा भारती या प्रमुख भाजपच्या नेत्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते आणि या खटल्याची सुनावणी अजूनही सुरू आहे.

गेल्याच आठवड्यात विशेष सीबीआय न्यायालयासमोर जबाब देताना अडवाणी यांनी बाबरी मशीद पाडण्यात आपला सहभाग नव्हता, आपण मशीद पाडण्याचे कटकारस्थान केले नव्हते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात निर्दोष असल्याचा दावा न्यायालयात केला होता.

२००८मध्ये ‘माय कंट्री, माय लाइफ’ या आपल्या आत्मचरित्रात अडवाणी यांनी राम मंदिराचे आंदोलन केवळ राम मंदिर बांधण्यापुरते मर्यादित नव्हते तर तो सच्च्या व छद्म धर्मनिरपेक्षवाद्यांमधील संघर्ष होता, असे म्हटले होते.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: