बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष

बाबरी प्रकरणातील आरोपी महंत दास राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांना मंदिर बांधकाम समितीचे प्रमुख म्हणून निवडण्यात आले.

‘बाबरी मशीद प्रकरणी ३० सप्टेंबरपर्यंत निर्णय द्या’
रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी पूर्ण
बाबरी प्रकरणी मी निर्दोषः मुरली मनोहर जोशी

नवी दिल्ली:राम जन्मभूमी न्यास प्रमुख महंत नृत्य गोपाल दास आणि विश्व हिंदू परिषदेचे नेते चंपत राय यांना श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र या अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी स्थापण्यात आलेल्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि महासचिव म्हणून निवडण्यात आले. या दोघांवरही सीबीआयने बाबरी मशिद उद्ध्वस्त केल्याच्या प्रकरणी आरोप ठेवले आहेत.

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, ट्रस्टची पहिली बैठक वरिष्ठ वकील के. पराशरन यांच्या घरी पार पडली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्रा यांना ट्रस्टच्या मंदिर बांधकाम समितीचे मुख्य म्हणून निवडण्यात आले.

एका निवेदनानुसार, नृत्य गोपाल दास आणि चंपत राय यांना ट्रस्टचे सदस्य म्हणून एकमताने नियुक्त करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय विश्वस्त आणि महासचिव म्हणून निवडण्यात आले.

दास हे विश्व हिंदू परिषदेने मंदिराच्या बांधकामाकरिता स्थापन केलेली विश्वस्त संस्था राम जन्मभूमी न्यासचे प्रमुख आहेत. राय हे विहिंपचे उपाध्यक्ष आहेत.

विश्व हिंदू परिषदेने तयार केलेली  मंदिराची प्रतिकृती.

विश्व हिंदू परिषदेने तयार केलेली मंदिराची प्रतिकृती.

बातमीनुसार, केंद्रसरकारने या ट्रस्टच्या इतर सदस्यांची घोषणा करताना दोन जागा रिकाम्या ठेवल्या होत्या, जेणेकरून हे स्वायत्त मंडळ नंतर दास आणि राय यांची निवड करू शकेल. अयोध्येचे आमदार वेद प्रकाश गुप्ता यांनी अलिकडेच एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की दास यांनी राम जन्मभूमीसाठी चाललेल्या आंदोलनात केलेले काम लक्षवेधी होते आणि त्यांना ट्रस्टच्या सदस्यांमध्ये जागा न देणे अशक्य होते.

“जर सरकारने त्यांची नावे घोषित केली असती तर त्यातून काही समस्या उद्भवू शकल्या असत्या. काही लोक सर्वोच्च न्यायालयात गेले असते. त्यामुळे ट्रस्टची निर्मिती करण्याच्या कामात दोन-तीन महिने उशीर लागला असता. म्हणून ते टाळण्यात आले,” ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री यांनी याबाबत न्यासच्या प्रमुखांचे मन वळवले होते असेही त्यांनी सांगितले.

“स्थापन केलेला ट्रस्ट एक स्वायत्त संस्था असल्यामुळे, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र अध्यक्ष आणि सचिवांच्या नियुक्त्यांबाबत आपले निर्णय घेण्यास स्वतंत्र असेल,” असे ते रेडिफ शी बोलताना म्हणाले.

‘बांधकामाला एप्रिलमध्ये सुरुवात होऊ शकते’

बुधवारची बैठक कार्यपद्धती ठरवण्यासाठीआणि राममंदिराच्या बांधकामासाठीच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. बांधकाम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकेल आणि ते पूर्ण होण्यास तीन-चार वर्षे लागतील असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

“लोकांच्या भावनांचा मान राखून मंदिराचे बांधकाम लवकरच सुरू होईल,” असे दास यांनी बैठकीनंतर सांगितले. राम मंदिराचे मुख्य प्रारूप विहिंपच्या योजनेतील राममंदिरासारखेच असेल असेही ते म्हणाले. तसेच उंची आणि रुंदी वाढवण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे येथील स्वामी गोविंददेव गिरी यांना या बैठकीत ट्रस्टचे खजिनदार म्हणून नियुक्त करण्यात आले व उडुपी येथील पेजावर मठाच्या स्वामी विश्व प्रसन्नतीर्थ यांच्याद्वारे त्यांना पाच लाख रुपयांचा चेक देण्यात आला.प्रसन्नतीर्थ हेसुद्धा ट्रस्टचे एक सदस्य आहेत.

ट्रस्टच्या सदस्यांनी अयोध्येच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत राम मंदिराच्या बांधकामासाठी देणग्या गोळा करण्यासाठी खाते उघडण्याचा निर्णय घेतला असल्याचे राय यांनी सांगितले.

बैठकीमध्ये नऊ ठराव मंजूर करण्यात आले, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रसरकार आणि उत्तर प्रदेश सरकारचे त्यांच्या या संपूर्ण प्रक्रियेतील सक्रिय भूमिकेकरिता आभार मानणाराही एक ठराव होता.

विश्वस्तांनी मंदिरासाठी “प्राण अर्पण केलेल्या” लोकांचे स्मरण केले आणि त्यांच्या स्मृतीमध्येही एक ठराव मंजूर केला, असे राय यांनी सांगितले.

ट्रस्टच्या सर्व १५ सदस्यांनी बुधवारच्या बैठकीला हजेरी लावली. पुढची बैठक दोन आठवड्यांनंतर अयोध्या येथे होण्याची शक्यता आहे.

यापैकी नऊ सदस्यांची नावेसरकारने सुचवली होती, ज्यामध्ये जगद्गुरू शंकराचार्य, स्वामी वासुदेवानंद सरस्वती, प्रसन्नतीर्थ, युगपुरुष परमानंद, गोविंददेव गिरी, विमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा (अयोध्येच्या राजघराण्यातील), अनिल मिश्रा, कामेश्वर चौपाल (यांनी पहिली कोनशिला रचली आणि ते ट्रस्टमधील अनुसूचित जातीचे सदस्य आहेत), आणि निर्मोही आखाड्याचे महंत दिनेंद्र दास यांचा समावेश आहे.

यांच्या व्यतिरिक्त, गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ग्यानेश कुमार (केंद्रसरकारचे प्रतिनिधी), उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश अवस्थी (राज्यसरकारचे प्रतिनिधी) आणि अयोध्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अनुज कुमार झा हेसुद्धा ट्रस्टचे सदस्य आहेत.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: