अॅलोपॅथी खरंच ‘स्टुपिड’ आहे का?

अॅलोपॅथी खरंच ‘स्टुपिड’ आहे का?

योगगुरु रामदेव बाबा यांनी आधुनिक वैद्यक शास्त्राला ‘मूर्ख’ (स्टुपिड) म्हटले आहे. त्यांच्या विधानावर इंडियन मेडिकल असो.ने तीव्र आक्षेप घेत रामदेवबाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. रामदेव बाबांच्या अशा विधानाने कोविड महासाथीच्या या काळात भरून न निघणारे मोठे नुकसान होणार आहे.

कोरोनो : रेल्वेत ब्लँकेट मिळणार नाहीत, पडदेही हटवले
ब्रेक दि चेन निर्बंधः आपल्या मनातील प्रश्नांना उत्तरे
महानगरांत महिलांचे लसीकरण कमी

अॅलोपॅथी (Allopathy) स्टुपिड आहे’ – असे योगगुरू रामदेवबाबा यांचे विधान आहे. आणि ते त्यांनी जबाबदारीने केलेले आहे कारण त्यापूर्वी ते म्हणतात की “मै अब गंभीर बात कहने जा रहा हुँ “ . आणि पुढे ते म्हणतात की, “रुग्ण एलोपथीच्या औषधोपचारामुळेच मरत आहेत.”

आयएमएने अर्थातच रामदेव बाबा यांच्या विधानाची गंभीर दखल घेऊन याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. याचे पुढे काय होते हे समजेलच पण …

पण …

या विधानामुळे होणारे नुकसान होऊन गेले आहे जे भरून येणार नाही.

रामदेव बाबांचे अनुयायी तर लाखो आहेतच पण ही बातमी मीडियाद्वारे देखील सर्वत्र पसरवली जात आहे.

एक साथरोग तज्ज्ञ म्हणून या विधानाचे अतिशय गंभीर आणि दूरगामी परिणाम दिसत आहेत. कोरोनाची ही साथ आटोक्यामध्ये आणण्याच्या आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला याने नक्कीच खीळ लागणार आहे. आता देखील लोक वेळेत तपासणी करत नाहीत, वेळेत रुग्णालयामध्ये येत नाहीत आणि वेळेत म्हणजे विविध अवयवांना ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे इजा पोचण्यापूर्वी हालचाल न करता रुग्णाला घरी ठेऊन वाट बघत आहेत. मृत्यूंची संख्या कमी होण्यात यामुळे अडचण निर्माण होत आहे.

अशा वैश्विक महामारीच्या वेळी अशी फसवी, चुकीची, गोंधळ माजवणारी आणि संभ्रम निर्माण करणारी विधाने एखाद्या खेड्यातील डॉक्टरने देखील करू नयेत. कारण शंका पसरत राहते आणि पसरताना वाढत राहते. एखादी गोष्ट चुकीची असेल पण दहा जणांनी सांगितली की, विश्वास डळमळीत होणारच. काही जण तरी आता allopathyकडे पाठ फिरवतील आणि प्राणाला मुकु शकतील.

allopathyचे योग्य नाव आहे “आधुनिक वैद्यक शास्त्र (Modern Medicine)”. याच्या नावावरून लक्षात येईल की, हे अद्ययावत आहे व काळासोबत चालणारे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाला आपलेसे करून माणसाचे जीवन सुखकर बनवणारे आहे.

मात्र अनेक लोकांच्या मनामध्ये या शास्त्राविषयी कितीतरी गैरसमज दिसून येतात. यातील मुख्य आक्षेप असतो तो “औषधांचा साईड इफेक्ट” . याची एवढी भीती आहे लोकांच्या मनामध्ये की आजार गंभीर रूप घेईपर्यंत ते आधुनिक वैद्यकाकडे फिरकत नाहीत. आजार गंभीर झाला की मग आधुनिक उपचार सुरू करतात आणि त्यातून त्यांना म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही.

जर एखादे वैद्यकशास्त्र तुम्हाला सांगत असेल की, आमच्या औषधाचा काहीच साईड इफेक्ट नसतो, तर हे शास्त्रीयदृष्ट्या असंभव आहे.

याचे कारण म्हणजे प्रत्येक औषध म्हणजे एखादे रसायनच (केमिकल ) असते. तुम्ही म्हणाल छे..छे , आमची औषधे नैसर्गिक असतात. अहो पण नैसर्गिक जडी-बुटी जरी सेवन केली तरी देखील त्यातील केमिकल म्हणजे  औषधी रसायनच तुमच्या शरीरावर परिणाम करणार आहे.

आपल्या साध्या हळदीचे उदाहरण घ्या. सोबत फोटो जोडला आहे. Curcumin नावाचे रसायन हळदीमध्ये असते ज्यामुळे त्याचे औषधी गुण दिसून येतात. म्हणजे आपल्याला वाटते की आपण निसर्गातील हळद घेत आहोत पण शेवटी ते एक नैसर्गिक पदार्थामध्ये सापडणारे रसायनच आहे.

पेनिसिलीनचे औषध सर्वांना माहीत आहे. कितीतरी इन्फेक्शन विरुद्ध याचा वापर होतो. पण हे सापडले एका बुरशीमध्ये, म्हणजे निसर्गामध्ये. आणि त्यानंतर त्याची कारखान्यामध्ये निर्मिती सुरू झाली.

आपले मानवी शरीर देखील केमिकल्सचे भांडार आहे. मानवी शरीरामध्ये ७०% पाणी आहे हे आपण जाणतो. उरलेल्या ३०% मध्ये कितीतरी रासायनिक घटक असतात.

आपल्याला दिसते, ऐकू येते, आपण हात हलवतो, विचार करतो, आनंदी होतो अशा प्रत्येक कृतीमागे निरनिराळ्या रासायनिक संयुगांचा प्रभाव असतो. म्हणून तर मेंदूमध्ये “केमिकल लोचा” झाला की मानसिक स्वास्थ्य हरवते.

शरीरातील सर्व कोडी सोडवणे अजून या शास्त्राला जमलेले नाही. पण मानवी शरीर हे कसे रसायनांचे बनलेले आहे याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर पुढील लिंक्सना जरूर भेट द्या.

https://tinyurl.com/yz7hk8eo

https://tinyurl.com/yflhoq9s

(यामध्ये कोणत्या अन्नातून विविध घटक मिळतात ही बोनस माहिती देखील मिळेल)

जेव्हा शरीर आजारी पडते तेव्हा प्रत्येक पॅथी एखादे न् एखादे केमिकल तुम्हाला देते जेणे करून आजाराचा प्रभाव कमी होईल अथवा जंतूंचा नाश होईल.

जेव्हा ते केमिकल तुम्ही वनस्पतीजन्य पदार्थांमधून घेता तेव्हा तो आयुर्वेद होतो आणि जेव्हा कंपनीमधील गोळ्या खाऊन घेता तेव्हा ते आधुनिक वैद्यक असते.

उदा. कोविड प्रतिबंधासाठी ‘व्हिटामिन सी’ घेण्यास सांगितले जाते, कारण त्याने इम्युनिटीसाठी फायदा होतो. साधारण ५०० mgची गोळी रोज घ्यायला सांगितले जाते. आयुर्वेदामध्येही च्यवनप्राश खाल्ल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते असे सांगितले जाते, ज्यातील एक महत्त्वाचा घटक आवळा आहे आणि आवळ्यामध्ये ‘व्हिटामिन सी’च असते. मात्र जर ५०० mg ‘व्हिटामिन सी’ खायचे असेल तर अनेक चमचे च्यवनप्राश खावे लागेल किंवा साधारण १००-१५० mg आवळे खावे लागतील. (मला तरी एक गोळी चोखून खाणे सोपे वाटते, कारण नक्की किती प्रमाणात औषध शरीरामध्ये गेले हे मला समजू शकते.)

आधुनिक औषधशास्त्राचा उदय १९व्या शतकामध्ये युरोपियन देशांमध्ये झाला आणि यामध्ये विविध शास्त्रज्ञांचा हातभार लागला आहे. मात्र १८४९ मध्ये लंडनमध्ये कॉलरा (पटकी)ची साथ आली. कॉलराची साथ  नक्की कशामुळे आली आहे, हा आजार कशामुळे होतो हे देखील कोणाला माहीत नव्हते. अशावेळी निरीक्षणाने आणि रोगपरिस्थितीविज्ञान (epidemiology) तंत्राच्या वापराने जॉन स्नो याने ही साथ यशस्वीपणे थांबवली. नकाशावर रुग्णाचे घर नोंदवून त्याने कॉलरा पसरण्याचे कारण शोधले.

आणि मग आजाराचे नियंत्रण औषधांशिवाय देखील करता येते हे सर्वांनी जाणले. भारतामध्येही आधुनिक वैद्यक हे इंग्रजांमुळे २०व्या शतकामध्ये आले. आणि त्यानंतर इतर सर्व पॅथीचा वापर कमी होऊन आधुनिक विज्ञान मुख्य प्रवाहामध्ये राहिले.

आधुनिक विज्ञान ‘स्टुपिड’ आहे की शहाणे आहे हे केवळ एका फोटोने ओळखता येईल. हा भारतातील नागरिकांचा आयुष्यमानाचा म्हणजे Life expectancy चा १८०० ते २०००पर्यंतचा आलेख (graph) बघा.

जेव्हा आधुनिक वैद्यक नव्हते आणि केवळ पारंपरिक शास्त्रे होती तेव्हा आयुष्यमान वाढले नाही, मात्र जेव्हा आपण विज्ञानाची आणि आधुनिकतेची कास धरली तेव्हा भारतीयांचे आयुष्यमान अगदी झटपट वाढले. कारण –

आधुनिक वैद्यक शास्त्र म्हणजे तुमची allopathy –

  • डोळस आहे
  • आंधळा विश्वास ठेवत नाही, प्रयोगशील आहे.
  • स्वतःच्या निर्णयांची चिकित्सा करते.
  • निरीक्षणांनी आणि संख्या शास्त्राच्या सुयोग्य वापराने अधिकाधिक उत्तम ते स्वीकारते.
  • प्रयोग करते आणि त्या विषयी इतरांना माहिती देते, ज्ञान प्रसाराला महत्त्व देते.
  • जे औषध दिले आहे ते नक्की काय आहे हे औषधाच्या पाकिटावर लिहिलेले असते. ते शरीरामध्ये नक्की कसे काम करते, कोणत्या अवयवामधून शरीराबाहेर पडते वगैरे सर्व अभ्यास केलेला असतो.
  • औषध कोणाला चालणार नाही याचीही माहिती निर्माण करते.
  • काही दुष्परिणाम असतील ते देखील उघडपणे सांगते व त्यावर उपाय सांगते.

थोडक्यात आधुनिक वैद्यक हे पारदर्शक आहे आणि पुरावाजन्य- ‘एव्हिडन्स बेस्ड’ – आहे.

भारतामध्ये काही प्रमाणात एकसूत्रता नाही म्हणून संपूर्ण आधुनिक वैद्यक म्हणजे allopathy चुकीची आहे असे एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने महामारीच्या काळामध्ये म्हणणे अतिशय दुर्दैवी आहे.

कोविड हा विषाणूजन्य आजार आहे आणि त्यामुळे जवळपास ८०% रुग्ण काहीही न करता देखील बरे होतात. तसेच सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णांना केवळ विश्रांतीची गरज असते. असे रुग्ण जेव्हा allopathy खेरीज इतर औषधे घेतात तेव्हा अर्थातच श्रेय त्या औषधांना मिळते. यातील काही रुग्ण जेव्हा गंभीर होऊ लागतात अशावेळी जीवरक्षक ऑक्सिजन आणि औषधे घेण्यासाठी allopathy कडे पाठवले जातात . मात्र जेव्हा असे काही अतिगंभीर रुग्ण किंवा उशिरा दवाखान्यामध्ये आलेले रुग्ण दगावतात तेव्हा मात्र मृत्यूचा दोष allopathyच्या औषधांना लावला जातो. जनतेला हा फरक समजत नाही आणि मग जनता कोविड तपासणी आणि कोविड उपचार यासाठी उत्सुक नसते तसेच निर्देशांचे पालनही करीत नाही.

आधुनिक वैद्यक सर्वोत्तम आहे असा कधीच कोणाचा दावा नव्हता. यामध्ये व्यक्तिसापेक्षता नाही. औषधे व डोस हे गटासाठी सारखी असतात कारण त्यांची निर्मिती ही आता कारखान्यामध्ये होते. मात्र वयानुसार आणि वजनानुसार त्यांचे डोस प्रयोगांती नियमित केले जातात. मानवी शरीर हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे आणि अजूनही आपण त्यातील बारकावे शिकत आहोत. त्यामुळे काही आजारांवर सुयोग्य उपचार अजून उपलब्ध नाहीत .

अशावेळी प्रत्येक पॅथीमधील उत्तम ते घेऊन सर्वंकष उपचारपद्धती हे आपले ध्येय असायला हवे.

माझी सर्वांना विनंती आहे की अशा विधानांमुळे घाबरून न जाता जीवरक्षक allopathic औषधांकडे पाठ फिरवू नये. योग्य वेळी तपासणी आणि योग्य वेळी रुग्णालयामध्ये दाखल होणे व जीवरक्षक औषधे घेणे तुमचा प्राण वाचवू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी महत्त्वाचे आहात.

जाता जाता,

असे म्हटले जाते की एखादे औषध जर “परिणाम” करत असेल तरच त्याचा थोडा दुष्परिणाम दिसणार ना! नेमबाजीमध्ये जसा कधीतरी नेम चुकतो तसेच आहे हे. म्हणून नेमबाज लगेच ‘स्टुपिड’ होत नाही. मात्र जो नेमबाज म्हणतो की माझा नेम कधी चुकू शकतच नाही तर त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

डॉ. प्रिया प्रभू (देशपांडे) एम. डी. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे जन औषध वैद्यक शास्त्राच्या सहयोगी प्राध्यापक असून, त्या सांगली जिल्हा कोविड टास्क फोर्स सदस्य आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: