बलात्कार आरोपी चिन्मयानंदला एनसीसीची सलामी

बलात्कार आरोपी चिन्मयानंदला एनसीसीची सलामी

शाहजहांपूर : कायदा शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याप्रकरणात तुरुंगात असलेले भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना जामी

गांधी का मरत नाही : गांधींवरची कोळीष्टकं दूर करण्याचा प्रयत्न
डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य
जुन्या वस्तू विकताय? सावधान!

शाहजहांपूर : कायदा शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर बलात्कार केल्याप्रकरणात तुरुंगात असलेले भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री चिन्मयानंद यांना जामीन मिळाल्यानंतर त्यांना एनसीसीच्या कॅडेटनी सलामी दिल्याची घटना बुधवारी घडली. ही सलामी देण्याअगोदर चिन्मयानंद यांना त्यांच्या मुमुक्षु आश्रमात आणण्यात आले. तेथे एक पूजा आयोजित करण्यात आली. या पूजेचा प्रसाद म्हणून शेकडो जणांना जेवण देण्यात आले. या दरम्यान एनसीसीच्या कॅडेटकडून त्यांना सलामी देण्यात आली.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी चिन्मयानंद यांना जामीन मंजूर केल्यानंतर तुरुंगाबाहेर त्यांचे शेकडो समर्थक जमले होते. या समर्थकांच्या सोबत चिन्मयानंद आपल्या मुमुक्षु आश्रमात पोहचले. तेथे त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. चिन्मयानंद हे बळीचा बकरा असून त्यांना बलात्काराच्या कटात फसवले असल्याचा आरोप चिन्मयानंदचे खासगी प्रवक्ते ओम सिंह यांनी केला. चिन्मयानंद हे निर्दोष आहेत, असाही दावा त्यांनी केला.

गुरुवारी सकाळी चिन्मयानंद यांनी शहरातील दोन महाविद्यालयांत फेरफटका मारला, तेथील व्यवस्थापनाविषयी चौकशी केली व नंतर ते मुमुक्षु आश्रमात गेले. त्यांनी आश्रमाचीही पाहणी केली.

दरम्यान या प्रकरणातील पीडित महिलेला व तिच्या कुटुंबियाना पोलिस संरक्षण दिल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख दिनेश त्रिपाठी यांनी दिली.

नेमके प्रकरण काय होते?

शाहजहांपूर येथील स्वामी शुकदेवानंद विधी महाविद्यालयात एलएलएम शाखेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने २३ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओत तिने चिन्मयानंद याच्याकडून अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले जात असून अनेक मुलींचे आयुष्य त्यांनी बरबाद केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर चिन्मयानंद यांच्यामुळे पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांनाही धोका असल्याचे तिने म्हटले होते. हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ती पीडित विद्यार्थीनी काही दिवस बेपत्ता होती. पण ती राजस्थानमध्ये आढळून आली. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली उच्च न्यायालयात तिला आणण्यात आले व नंतर हे प्रकरण एसआयटीकडे सोपवण्यात आले.

या घटनेवर देशभर गदारोळ माजल्यानंतर २० सप्टेंबरला चिन्मयानंद यांना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी करणाऱ्या एसआयटीने चिन्मयानंद यांनी सर्व गुन्हे मान्य केल्याचेही सांगितले होते. पण २५ सप्टेंबरला पीडित विद्यार्थीनी ब्लॅकमेल करत असून ती पाच कोटी रु.ची खंडणी मागत असल्याचा ठपका पोलिसांनी तिच्यावर ठेवला व तिला अटक करण्यात आली होती.

या प्रकरणाची सुनावणी आता लखनौ उच्च न्यायालयात सुरू होणार आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0