रत्नाकर मतकरी यांची गूढकथा

रत्नाकर मतकरी यांची गूढकथा

रत्नाकर मतकरी यांनी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध प्रांतात मुशाफिरी केली. या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा उल्लेख जेव्हा-जेव्हा होतो, तेव्हा, बरेचदा, सर्वप्रथम मनामध्ये उमटणारा शब्द, ‘गूढकथा’ हा असतो.

डब्ल्यूटीओचा मत्स्यव्यवसाय अनुदान करार धोकादायक
अखेर काबूलचाही पाडाव, अध्यक्ष परागंदा
सुभाष चंद्रा यांचा पराभव

सुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ, सातत्यपूर्ण लेखन करत दोनशेहून अधिक गूढकथा रत्नाकर मतकरी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारल्या आहेत. ‘गूढकथा’ आणि ‘भयकथा’ या दोन्ही पूर्णपणे भिन्न स्वरूपाच्या कथाप्रकारांना, एकाच पारड्यात टाकलं जाण्याची चूक मराठी साहित्यात अनेकदा केली जाते, असं ‘अंतर्बाह्य’ कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत रत्नाकर मतकरी सरांनी नमूद करून ठेवले आहे.

भयकथेमध्ये भयाची निर्मिती करण्याकरता, भयोत्पादक गोष्टींचा वापर केला जातो. ‘भय’ हेच प्रमुख तत्व त्यात असते. गूढकथेचा परीघ मात्र, भयकथेच्या मानाने मोठा असतो. गूढकथेमध्ये ‘भय’ या तत्वाचा अंतर्भाव तर केला जातोच; पण या व्यतिरिक्त इतर असंख्य घटक-तत्त्वे हा प्रकार हाताळताना वापरली जातात. वरवर पाहता साध्याशाच दिसणाऱ्या काही सवयी, रोजच्याच जीवनाचा भाग असणाऱ्या काही गोष्टी, अनपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टी, संदिग्धता, अतर्क्य घटना, मानवी जाणिवेपलीकडील सूक्ष्म संवेदन, भय का वाटते, याचा शोध घेताना उमजलेली काही आश्चर्यकारक अथवा धक्कादायक सत्ये, मानवी स्वभावातले वैचित्र्य, मनोव्यापारातील काही गुंतागुंतीच्या गोष्टी इत्यादी अनेक प्रमुख तत्वांचा समावेश ‘गूढकथा’ या कथाप्रकारात केला जातो.

गूढकथेची मांडणी तर्कसुसंगत असणे अतिशय महत्वाचे असते. भयकथेत मात्र हा नियम अनेकदा शिथील केला जातो. गूढकथेचा प्रमुख हेतू, वाचकांना केवळ धक्का देणे, फक्त घाबरवणे हा नसून, तर्कसुसंगत मांडणीद्वारा वाचकांचे बौद्धिकदृष्ट्या समाधान करायचा शक्य तितका प्रयत्न करणे, त्यांच्या जाणीव तसेच नेणीवेपर्यंत पोहोचणे, हा असतो.

‘भय’ या घटक तत्त्वापेक्षा ‘गूढ’ तत्त्वांचा अधिक मात्रेत अंतर्भाव असणे, वरवर अगम्य भासणाऱ्या, मानवी आकलनापल्याडच्या काही संज्ञांचा माग काढणे, तो संदिग्ध मार्ग निश्चित रूप देत आखत जात असतानाच, दुसरीकडे वाचकांच्या विचारांना चालना व विवक्षित दिशा प्राप्त करून देणारा दुसरा समांतर मार्गही आखणे आणि त्या एकंदर प्रक्रियेचे स्थान, तात्विक व तार्किकदृष्ट्या फार वरच्या पातळीवरचे असणे, ही गूढकथेची वैशिष्ट्ये मानता येतील.

भय व गूढकथांकडे मूल्यमापनदृष्ट्या फारसे गांभीर्याने कधीही पाहिले गेले नाही. रत्नाकर मतकरी यांच्या अमूल्य अशा योगदानामुळे यात बऱ्याच प्रमाणात बदल घडत गेला. मराठी साहित्यातल्या भय व गूढकथा या अधिककरून अनुवादित असतात. अशा प्रकारात मोडणाऱ्या पूर्णतः स्वतंत्र (ओरिजिनल, कशावरही न-आधारलेल्या या अर्थी) आणि दर्जेदार कथांचे प्रमाण हे अजूनही अत्यल्प आहे. हा दृष्टीकोण विचारात घेतला, तर मतकरींनी मोठ्या संख्येने निर्मिलेल्या गूढकथांची महती अधिकच स्पष्टपणे ध्यानात येईल. मतकरींच्या कथेत आशयाला कायमच महत्वाचे स्थान राहिले आहे. गूढ / भयकथेला इतर कथा प्रकारांच्या तुलनेत व एकूणच साहित्य व्यवहारात काहीसे दुय्यम स्थान दिले जात असतानाही, महत्वाचा विषय-आशय असणाऱ्या, स्वतंत्र ताकदवान व नाविन्यपूर्ण गूढ कथांचा निर्मितीयज्ञ सुरू ठेवण्याचे, अतिशय आव्हानात्मक असे कार्य मतकरींनी पन्नास वर्षांहून अधिक काळ अथकपणे केले. गूढकथेला नवी परिमाणे प्राप्त करून दिली. रचनाबंध, आशय-विषय, सामाजिक जाणीव, परिप्रेक्ष्य इत्यादी गोष्टींचा समग्र विचार करून निर्मिलेल्या त्यांच्या कथा, या रसिक वाचक व समीक्षकांकरिता कायमच औत्सुक्याचा व कौतुकाचा विषय ठरल्या.

कमीतकमी शब्द, आकर्षक रचनाबंध व छोट्या छोट्या वाक्यांमधून कमीतकमी वेळात जबरदस्त परिणामाची निर्मिती करणे, हा त्यांच्या कथांमधे अनुभवास येणारा अत्यंत महत्त्वाचा गुण होता. त्यांच्या कथांमधे असणारी वर्णने कधीही अकारण, पसरट, अघळपघळ अथवा पाल्हाळीक वाटत नाहीत. न-दिसणाऱ्या, कधी जाणीवेला तर कधी नेणीवेला उमगणाऱ्या भीतीचे दर्शन त्यांच्या कथांमधून अनेकदा होत राहते. कथांचे वाचन करत असताना ही अदृश्य भीती आपल्या मेंदूत नेमकी कोणत्या क्षणी शिरते आणि कधी आपला ताबा घेते तेच कळेनासे होते.

या कथा आपल्या मनात प्रदीर्घ कालावधीकरता रेंगाळतात. एकदा वाचून कथा संपली आणि काही दिवसांनी विसरली, असे मतकरींच्या कथांबाबत सहजासहजी होत नाही. वास्तव घटना, प्रसंग व आठवणींच्या सभोवती अत्यंत काळजीपूर्वकपणे गुंफलेलं कल्पित, हा या कथांचा अतिशय महत्वाचा गुणधर्म असतो. वास्तव आणि कल्पिताचा मिलाफ इतक्या बेमालूमपणे, इतका सहजी फारच क्वचित घडून येतो. ‘भय’ आणि ‘गूढ’ या संकल्पना निरनिराळ्या स्वरूपात, प्रकारात वाचकांच्या भेटीस येतात. या भावनांची गुंतागुंत, मानवी वास्तव जीवनाची या भावनांशी घातलेली सांगड, काही जागी मुद्दामहून निर्माण केलेली संभ्रमात टाकणारी मांडणी आपल्याला थक्क करून सोडते. निरनिराळ्या पातळ्यांवर आणि निरनिराळ्या प्रतलामधून विचार करून उभा केलेला कथांमधला चकवासदृश सुदृढ रचनाबंध, वाचकाला हमखास बुचकळ्यात पाडतो.

मतकरींची कथा कितीही वर्षे जुनी असली तरीही, आजच्या काळाशी, आजच्या घटनांशी ती मिळतीजुळती असणे, हा एक अतिशय महत्वाचा गुणविशेष आहे. ‘निर्मनुष्य’ या २००३ मध्ये लिहिलेल्या कथेतील वर्णन आपण भारतीय सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या कर्फ्यूदरम्यान अनुभवतो आहोत. सध्याच्या दिवसांत ही कथा अक्षरश: जिवंत होऊन सामोरी येते आहे. आदिवासींच्या उठावाकडे अंगुलीनिर्देश करणारी, ‘किडे’ ही १९७८ सालची कथा आजही महत्वाची वाटते. आजच्या काळातही ही समस्या आस्तित्वात आहे. गरिबांबद्दल कणव असणाऱ्या पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीच्या घरावर झोपडपट्टीतील माणसे हळूहळू कब्जा करतात, ती ‘नाइटमेअर’ नावाची गोष्ट आजही भेडसावते. केवळ वैचारिक अथवा शाब्दिक पातळीवर असणारा आदर्शवाद आणि वास्तवातला संघर्ष अतिशय बारकाईने, गांभीर्याने व तपशीलवार पद्धतीने टिपणारी, सुरवातीला साधीसरळ वाटणारी ही कथा, कधी भयकथेचे रूप घेते, तेच वाचकाला कळत नाही. अनेक कंगोरे असणारा मानवी स्वभाव, दांभिकपणा, वास्तव जगात असणाऱ्या खऱ्याखुऱ्या समस्या व केवळ वैचारिक पातळीपुरताच सीमित राहणारा आदर्शवाद, यावर ही कथा प्रखर, टोकदार भाष्य करते. अनेक सूक्ष्म प्रतिके व घटना यांच्या सहाय्याने विणलेली अप्रतिम चित्रमयता धारण करणारी ‘पान्देगा’ ही कथा देखील दीर्घकाळ स्मरणात राहणारी. या गोष्टीत मांडलेली आदिवासींची प्राचीन तत्वांवर आधारीत धारणा आणि व्यथाही अशीच खोलवर टोचणी लावणारी. महत्वाच्या सामाजिक समस्येचा वापर, भयाच्या उत्पत्तीकरता केली जाण्याची अशी उदाहरणे केवळ हाताच्या बोटांवर मोजली जाण्याइतकी किरकोळ असावीत. ‘पर्जन्य’ ही अप्रतिम कथा वाचतानाही त्यातल्या गूढतत्त्वावर कारुण्य मात करतं आणि त्यात मांडलेली व्यथा, संवेदनशील प्रकृतीच्या वाचकाला मेंदूला ‘टोक-टोक पक्षा’सारखी पोखरतच राहते.

इतक्या विपुल प्रमाणावर भय व गूढकथांचे लेखन करूनही, त्यांच्या लेखनात तोचतोपणा जाणवत नाही. कथाबीजात पेरलेला सकस, सशक्त आशय, हे त्यांच्या कथांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. आशयानुरूप वेगवेगळ्या धाटणीची संरचना असणाऱ्या त्यांच्या कथा कायमच प्रवाही, रंजक व चित्ताकर्षक असतात. एकाच लेखकाने, इतक्या मुबलक प्रमाणावर केलेल्या आपल्या लेखनात इतक्या प्रचंड प्रमाणात वैविध्य व रंजकता राखणे हा विशेष गुण अतिशय दुर्मीळ स्वरूपाचा आहे. गूढकथांच्या काळ्या, निबीड अरण्यात, सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले रत्नाकर मतकरी कलात्मक शक्यतांचा, या आधी हाताळल्या न-गेलेल्या बहुविध आयामांचा शोध सातत्याने व चिकाटीने घेत राहिले. लहान मुलांच्या अत्यंत नाजुक अशा भावविश्वातही गडद, विषारी, विक्षिप्त स्वरूपाच्या असंख्य अगम्य धाग्यांची गुंफण असू शकते, हे सरांच्या काही कथा वाचताना आपल्याला अगदी जवळून कळतं. ‘लपाछपी’, ‘बाळ अंधार पडला’ ‘मला विक्रम दिसतो’ यांसारख्या कथांची नुसती नावे घेतली तरी अंगावर काटा फुलतो. ‘निमाची निमा’ या कथेतही असं नाजूक पण गुंतागुंतीचं भावविश्व साकारलेलं दिसतं. चिमुकल्या भावविश्वातल्या गंभीर समस्या आणि गुंतागुंतीच्या व्यामिश्र भावनांमधून निर्माण होणारे गंड, बालवयात आढळणाऱ्या न्यूरॉसिससारख्या समस्यांवर परिणामकारकरित्या भाष्य करणारी ही कथा आहे. ‘कोळसा’ या कथेमधून चितारलेलं उपेक्षित वर्गातल्या पौगंडावस्थेतल्या मुलाचं भावविश्वदेखील मनाला चटका लावणारं. बाल-लैंगिक शोषणाच्या अतिशय भीषण समस्येवरचं हे भाष्य अंगावर सरसरून काटा आणतं.

गूढ/भयाच्या जाणिवेबरोबरच, महत्वाच्या प्रश्नांवर भाष्य करण्याचा रत्नाकर मतकरी अनेकदा प्रयत्न करत. टेलिपथीसारख्या गूढ आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यास अवघड असणाऱ्या संकल्पनेवर आधारित असणारी ‘अशब्द’ ही गोष्टही वेगळ्याच परिणामाची निर्मिती करणारी. अनामिक,अतर्क्य, अगम्य अशा भीतीला मूर्त रूप देणाऱ्या ‘तुमची गोष्ट’, ‘पोरखेळ’सारख्या कथाही सहजी विसरल्या जात नाहीत. गूढ गोष्टींचं आपल्या दैनंदीन जीवनाभोवती नकळत असणारं वलय, ‘हडळ’ आणि ‘पोरखेळ’ सारखी कथा अधोरेखित करते. या कथांच्या शेवटी, रहस्य उलगडताना बसणारा धक्का तर निव्वळ अविस्मरणीय!

गूढ, भय या संकल्पनांसह मानवी क्रौर्य व न्यायाची भावना ठसठशीतपणे दर्शवणारी ‘खेकडा’ ही गोष्टही सदाबहार आहे. काही गोष्टी या तर्कापलीकडच्या असतात. अशीच गोष्ट ‘कळकीच्या बाळा’ची. अफलातून शब्दसामर्थ्याचा पुरेपूर वापर या कथेत केलेला आढळून येतो. कथा वाचताना तो संपूर्ण परिसर, ती पात्रे, ते प्रसंग, पूर्ण व मूर्त रूपात वाचकांच्या मनात साकार होतात. एव्हढेच नव्हे, तर ती कथा वाचताना, आपण त्या कथेचा भाग आहोत असे वाटते. ‘जेवणावळ’, ‘पान्देगा’, ‘जंगल’ या ‘मेक-बिलीव्ह लॉजिक’चा वापर मुक्तहस्ते करणाऱ्या अफलातून कथा देखील, सशक्त दृश्यात्मकतेचा रसरशीत, जिवंत अनुभव देणाऱ्या आहेत. निसर्गाचं आक्रंदन अतिशय समर्थपणे मांडणारी हॉरर फँटसीच्या वळणाने जाणारी ‘जंगल’ ही कथा वाचून अनेक वर्षे झाली तरीही स्मरणात राहते.

परिकथेच्या वळणाने लिहिलेल्या त्यांच्या कथा, हा प्रयोगही आवर्जून दखल घेण्याजोगा. लहान वयोगटाकरता ‘भूत’, ‘गूढ’ व ’भय’ या संकल्पनांची तोंडओळख करून देणारा त्यांचा कथासंग्रह ‘भूत-अद्भुत’ देखील वेगळा ठरतो. यातल्या छोटेखानी सहा कथा लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन रचल्या गेल्या असल्या, तरीही त्यांची रंजकता अजिबातच कमी नाही. लहान मुलांबरोबरच मोठ्या वयाच्या व्यक्तीदेखील याच्या वाचनात रंगतात.

मानवी मन आणि जीवनाच्या गूढतेची प्रचिती वाचकांना त्यांच्या कथांमधून कायमच येते. ‘सुचेता चक्रपाणि व तिचा कोकीळकंठ’ ही फँटसीच्या वळणाने जाणारी कथा म्हणजे एक स्तुत्य प्रयोग आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या गायिकेला तिचा अत्यंत सुरेल असणारा कंठ सोडून जातो आणि मग काय होते, हा कथेचा अतिशय वेगळा असा विषय यातून मांडला जातो. ‘काळ्या मांजराचं स्वप्न’ ही गुंतागुंतीची कथा आजही एक मोठं कोडं वाटते. ‘रिऍलिटी-शो’ या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित असणारी ‘हॉन्टेड हाऊस’ ही कथा, सरांचा सातत्याने नवं काहीतरी देण्याकरता असणारा आग्रह दर्शवते. भाषाशैली व रचनेमध्ये आशय-विषयाला अनुसरून जाणीवपूर्वक बदल करण्याची मतकरी यांची खासियत आपल्याला ‘मृत्युंजयी’सारख्या कथेत प्रत्ययास येते. ‘मृत्युंजयी’ कथेतला जुना काळ त्यातल्या एरवीपेक्षा वेगळ्या घाटाच्या भाषासौंदर्यानं अधिकच खुलतो. भय अथवा गूढकथांच्या पूर्वापार प्रचलित असणाऱ्या ठराविक साच्यांचा व दंतकथांचा, ‘वारस’, ‘ऐक टोले पडताहेत’, ‘ड्रॅक्युला’ आणि ‘म्हातारीची तरुण मुलगी’ यासारख्या कथांतून केलेला वापर अत्यंत समर्पक वाटतो. ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या संकल्पनांसमवेत केलेले जबरदस्त प्रयोग, आदिम भावनांची व्यामिश्रता, मानसशास्त्राधारित संरचना इत्यादी मिश्र घटकततत्वे असणाऱ्या मतकरींच्या कथा खूपदा प्रेडिक्ट करता येत नाहीत. त्या मुळापासून धक्का देतात. अंतर्बाह्य हादरवून सोडतात. मतकरी वाचकाचा हात धरून एका गूढरम्य सफरीवर घेऊन जातात. रंजक, भीतीदायक, भेडसावणारी, दचकवणारी, तरीही हवीहवीशी वाटणारी अशी ही सफर असते.

रत्नाकर मतकरी यांच्या कथांमधली भुते आपला मूलभूत मानवी स्वभाव पूर्णपणे विसरत नाहीत. ती भुते, त्यांचे व्यवहार आणि वास्तव सृष्टीशी आणि पारलौकिकाची जवळीक दाखवणाऱ्या त्या कथा अगदी खऱ्याखुऱ्या भासतात. आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. पाऊस, आकाशात दाटून आलेले काळे ढग, संध्याकाळी वातावरणात असलेली एक प्रकारची उदासी, किंचित भेडसावणारा अंधार, कडाडणाऱ्या विजा, सुप्त भयाची भावना, या सगळ्याचं एक अतूट नातं आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते. या कथेला म्हटलं, तर एक निश्चित शेवट आहे आणि म्हटलं, तर अंतच नाही. ‘फळाच्या फाकेसारखी अरुंद, काळवंडलेली जुनाट चाळ’ असं अगदी मोजक्या शब्दांत मतकरी सर या चाळीचं वर्णन उभं करतात. केवळ सहा शब्दांमधून वाचकाच्या मनात चाळीचं चित्र उभं राहतं. त्या जागेचा कोंदटपणा, जुनकटपणा आणि एकंदरीत जीर्ण पोत अगदी नेमकेपणानं ध्यानी येतो. या कथेच्या रचनेत गंमत आहे. तिचा सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग हा जवळपास सारखा आहे. परंतु शेवटच्या वाक्यातल्या त्याच शब्दांचा अर्थ शेवटी बदलतो.  एखाद्या प्रेमकथेसदृश वाटणाऱ्या ‘सेटअप’चा वापर करून , कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त वर्णन करत, फारसं काहीही भयंकर, भेडसावणारं, विकृती दर्शवणारं लिखाण न करताही, अतिशय परिणामकारक अशी वातावरणनिर्मिती व प्रभावी दृश्यात्मकतानिर्माण करत, भयकथेची निर्मिती करणं, हा त्यांनी केलेला प्रयोग वाखणण्याजोगा आहे. या कथेतलं गूढतत्त्व हळूहळू गती पकडतं, आकार धारण करत जातं आणि एका परमोच्च बिंदूला पोहोचून, वाचकाला एक जबरदस्त धक्का देतं. या ठिकाणी भयाची निर्मिती होते. वाचकाला धक्का बसतो.

रहस्य, अंतर्ज्ञान, भीती, वैचित्र्यपूर्ण अनुभव, स्वप्नानुभव, उत्कट भावना, त्यांचं प्रकटीकरण, योगायोग, वास्तव, कल्पित, गुंतागुंतीचे मनोव्यापार, अज्ञाताचं भय इत्यादी तत्वांचं रंजक मिश्रण असणारी मतकरींची गूढकथा वाचकांना नेहमीच आगळ्यावेगळ्या स्वरूपाची अनुभूती देते. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्याश्याच घटनांचा आशयानुरूप केलेला सुयोग्य वापर, परिणामकारक वातावरणनिर्मिती, साधी-सोपी पण प्रवाही भाषा, धक्कातंत्र आणि या कथेचं आपल्या जगण्याशी जवळीक साधणं, कायम स्मरणात राहणं ही त्यांच्या कथांची प्रमुख वैशिष्ट्ये होत.वाचकांना दरवेळी नवं काहीतरी देण्याचा प्रामाणिक ध्यास उराशी बाळगून, प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषात लिहिणं, केवळ प्रांतभाषेत न लिहिता बोलीभाषा वापरणं, डायरी सारखी रचना करणं, नाटकासारखी रचना करणं, कधी संवाद पेरणं, तर कधी पात्र आणि वाचकाचा थेट संवाद सुरू असल्यासारखी रचना करणं, तर कधी विविध पात्रांच्या भूमिकेतून घटना साकारणं यासारखे असंख्य प्रयोग सर त्यांच्या कथेतून न-थकता करत राहिले.

विविध विषयांवरील अनेक प्रकारचे कथाप्रकार, नाटक, चित्रपट, टीव्ही सिरियल्ससारख्या अनेकविध क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करून देखील, माझ्या फक्त गूढकथाच लक्षात ठेवल्या गेल्या ते का ? अशी खंत, ‘अंतर्बाह्य’ ह्या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या कथा संग्रहाच्या प्रस्तावनेत मतकरी यांनी लिहून ठेवलेली आढळून येते. असे असले, तरीही, ‘गूढकथा’ व ‘भयकथा’ हे प्रकार रत्नाकर मतकरी यांनी अतिशय समर्थरित्या हाताळले; असंख्य शक्यतांचा व नवनव्या तंत्रांचा विचारपूर्वक वापर करत, एकूण मराठी साहित्यात, गूढकथा व भयकथांना, झळाळणाऱ्या तेज:पुंज वलयासह मानाचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं, हे कुणालाही नाकारता येणार नाही. १७ मे २०२० रोजी, रत्नाकर मतकरी, हे मराठी चित्रपट-नाट्य व साहित्यविश्वातलं बहुआयामी व्यक्तिमत्व, काळाच्या पडद्याआड निघून गेलं, या अतिशय वाईट बातमीवर अजूनही विश्वास बसायला तयार नाही. विपुल प्रमाणावर निर्मिलेल्या त्यांच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घेताना, हजारो रसिक चाहत्यांना त्यांची उणीव कायमच भासत राहील हे मात्र नक्की.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0