आता कोणी दुसरा कमाल खान जन्म घेणार नाही

आता कोणी दुसरा कमाल खान जन्म घेणार नाही

कमाल खान यांच्या अयोध्येवर प्रदर्शित झालेल्या शेकडो रिपोर्ट्सना एकत्र ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की अख्ख्या उत्तर प्रदेशात कमाल खान यांच्या नजरेतून एक वेगळी अयोध्या दिसत होती. त्या अयोध्येबाबत गर्वाच्या नावाखाली तिरस्काराच्या आगीत होरपळणाऱ्या देशाशी ते किती सहजपणे आणि सुंदर बोलू शकत होते. देशात उकळणारा तिरस्काराचा लाव्हा ते शांतवत होते.

पीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा
गोव्यात ७८ टक्के, उत्तराखंडमध्ये ६० टक्के मतदान
जेएनपीटीतील कंटेनर टर्मिनलचे खासगीकरण !

ते फक्त पत्रकारांचे प्रतिनिधी नव्हते, पत्रकारितेतल्या संवेदना आणि भाषेचे प्रतिनिधी नव्हते तर आपल्या बातमीदारीच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं शहर असलेलं लखनौ आणि आपला देश भारत यांचंही यथार्थ प्रतिनिधित्व केलं. कमाल हे त्याच जुन्या लखनौचं मूर्तीमंत प्रतीक होते, ज्या लखनौचं रूप धर्माच्या नावाखाली चाललेल्या तिरस्काराच्या वादळाने पूर्णपणे बदलून टाकलंय. तिथल्या सत्ताधीशांची भाषा बदललीय. संवैधानिक पदांवर बसलेले लोक आता इतरांना मारहाण करण्याची किंवा गोळ्यांनी उडवून टाकण्याची भाषा बोलू लागलेत. त्या बदलत्या अनिश्चित काळातही कमाल खान तिथल्या इमामवाड्यासारखे पाय रोवून उभे राहिले. या इमामवाड्यांशिवाय लखनौचं अस्तित्व, त्याचा चेहरा अपूर्ण राहतो. काहीतरी चुकल्यासारखं वाटत राहतं.

कमाल खान यांना लखनौपासून वेगळं काढता येणार नाही. लखनौशिवाय त्यांना समजूनही घेता येणार नाही. कमाल खान यांच्यासारखा पत्रकार फक्त त्याच्या कामामुळे ओळखला गेला. परंतु आजच्या लखनौमध्ये त्यांची ओळख त्यांच्या धर्माशी जोडली गेली. सत्तेत बसलेल्या कमकुवत मनाच्या लोकांनी त्यांना दूर लोटलं. कमाल यांनी या गोष्टीच्या आपल्याला होणाऱ्या वेदना लखनऊच्या तहजीबीसारख्या सावरल्या. या वेदना त्यांनी फार व्यक्तही केल्या नाहीत आणि दाखवल्याही नाहीत. खूप काही बोलताना एखाद्याच वाक्यात या वेदना व्यक्त व्हायच्या – तुम्हाला तर माहीतच आहे. मी विचारलं तर म्हणतील की मुसलमान आहे. एका पत्रकाराला त्याच्या धार्मिक ओळखीत ढकलण्याच्या प्रयत्नांमध्ये हा पत्रकार स्वतःला जनतेकडे ढकलत राहिला. त्यांची प्रत्येक बातमी या गोष्टीची साक्षीदार आहे.

कमाल खान यांची स्मृती जागवताना आज सामान्य प्रेक्षकदेखील त्यांच्या कामाच्या आठवणी मनात जागवत आहेत हेच त्यांच्या आयुष्याचं फलित आहे. अशा परिस्थितीत स्मृती जागवणं खूपच औपचारिक असतं. पण आज ज्या प्रकारे लोक त्यांच्या कामाची आठवण काढत आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या पीस टू कॅमेरा आणि रिपोर्टच्या लिंक्स देत आहेत त्यावरूनच दिसतं की कमाल खान यांनी आपल्या प्रेक्षकांना स्मरणात राहण्याजोगं बरंच काही दिलंय. मी ट्विटरवर बघत होतो. त्यांच्या कितीतरी बातम्यांचे भाग लोक प्रदर्शित करत आहेत. हेच आहे कमाल खान यांचं जीवन. हीच त्यांच्याप्रति खरी श्रद्धांजली आहे की लोक त्यांच्या कामाची आठवण नुसती ठेवत नाहीत तर जगासमोर आणत आहेत.

हे काम करताना आम्ही एका कमाल खान यांना पाहिलंय आणि ऐकलंही आहे. त्यांना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण कुणी अहमद फराज आणि हबीब जालिब यांचे शेर ऐकले म्हणजे ती व्यक्ती कमाल खान झाली असं नाही, हेही लोकांना कळलं पाहिजे. दोन मिनिटांचा रिपोर्ट लिहिण्यासाठीही ते दिवसभर चिंतन मनन करायचे. दिवसभर वाचन करायचे आणि लेखन करायचे. त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांना हे माहीत होतं की कमालभाईंचं काम असंच आहे. आपलं काम इतक्या आदराने आणि मनापासून करणं यापेक्षा जास्त चांगलं काय असू शकतं? अयोध्येवर त्यांच्या प्रदर्शित झालेल्या शेकडो रिपोर्ट्सना एकत्र ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की अख्ख्या उत्तर प्रदेशात कमाल खान यांच्या नजरेतून एक वेगळी अयोध्या दिसत होती. त्या अयोध्येबाबत गर्वाच्या नावाखाली तिरस्काराच्या आगीत होरपळणाऱ्या देशाशी ते किती सहजपणे आणि सुंदर बोलू शकत होते. देशात उकळणारा तिरस्काराचा लाव्हा ते शांतवत होते. ते तुलसी रामायणही मनापासून वाचायचे आणि गीतेतही समरस व्हायचे. कुठूनही एकदोन ओळी चोरून आपल्या रिपोर्टमध्ये जीव ओतणारे पत्रकार ते नव्हते. त्यांना माहीत होतं की यूपीमधला समाज धर्माच्या चिखलात बुडालेला आहे. समाजाच्या या भाबडेपणाला सत्ता तिरस्काराच्या वादळात रूपांतरित करते आहे. त्या समाजाशी संवाद साधण्यासाठी कमाल यांनी कितीतरी धार्मिक ग्रंथांचं सखोल वाचन केलं असेल, चिंतन केलं असेल. त्यामुळे कमाल खान बोलायचे तेव्हा ऐकणाराही क्षणभर थबकायचा, त्यांचं म्हणणं ऐकायचा.

कारण कमाल खान त्याच्या नजरेतून हृदयात उतरायचे आणि त्याच्या अंतरात्म्याला आपल्या मृदू शब्दांनी खडबडून जागं करायचे. त्याला स्मरण करून द्यायचे की या सगळ्याचा अर्थ प्रेम आणि बंधुभाव नाही तर नक्की काय आहे. आणि हेच तर धर्म आणि यूपीच्या मातीतले ज्येष्ठ जाणकार सांगून गेलेत. कमाल खान ज्या अधिकारवाणीने राम आणि कृष्णाशी संबंधित वादविवादांचं रिपोर्टिंग करू शकत होते तेवढ्या मृदूपणे क्वचितच कोणी करू शकत असेल. याचं कारण म्हणजे त्यांचा गाढा अभ्यास. त्यासाठी ते प्रचंड वाचन, मनन करायचे. बनारसला जायचे तेव्हा खूप पुस्तकं खरेदी करायचे. गुगल येण्यापूर्वीच्या काळात कमाल खान रिपोर्टिंग करायला बाहेर पडायचे तेव्हा त्या मुद्द्याशी संबंधित पुस्तकं घेऊन निघत असत.

ते स्वभावाने आडमुठे होते कारण ते शिस्तबद्ध होते. त्यामुळे त्यांना नाही म्हणता येत होतं. ते प्रत्येक मुद्द्याला हो ला हो मिळवणारे पत्रकार नव्हते. कमाल खान यांनी होकार देण्याचा अर्थ होता की न्यूजरूममध्ये कोणीतरी सुटकेचा निःश्वास सोडलाय. ते विनाकारण किंवा दुराग्रहामुळे नकार देत नव्हते तर एखाद्या स्टोरीला नकार देण्याचं कारण ते समजावून सांगत असत. हे सांगत असताना कमाल खान आपल्या सोबतच्या लोकांना नैतिक मूल्यांची आठवण करून द्यायचे, ही मूल्यं प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग ते संपादक असोत किंवा नवीन रिपोर्टर. रिपोर्टर आपले तर्क लावून जितक्यांदा नाही म्हणतो तितकं त्यांच्या संस्थेसाठी चांगलं असतं कारण हे करताना तो आपल्या संस्थेलाही चुकीचा आणि कमकुवत रिपोर्ट दाखवण्यापासून वाचवत असतो.

आता नवीन कमाल खान जन्माला येणार नाही. कारण ज्या प्रक्रियेतून कमाल खान निर्माण झाला ती प्रक्रिया नव्याने करण्याचे नैतिक अधिष्ठान या देशाकडे राहिलेले नाही. या मातीत आता इतके कमकुवत लोक आहेत की त्यांच्या पाठीचा कणा आपापल्या संस्थेत कमाल खान निर्माण करण्याची शक्ती गमावून बसलेला आहे. अन्यथा, ज्या कमाल खान यांच्या भाषेवर जवळपास प्रत्येक चॅनलवर दाद दिली जात होती त्या सर्व चॅनल्सवर कुणी ना कुणीतरी नक्कीच कमाल खान असतं. कमाल खान एनडीटीव्हीचा चंद्र होते. त्यांच्या शब्दांत ताऱ्यांची चमक होती आणि वाणीत चंद्राची शीतलता.

मूळ लेख

अनुवादः कोमल कुंभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: