वाचनसंस्कृती आणि आपण सारे

वाचनसंस्कृती आणि आपण सारे

रखरखत्या वाळवंटात भटकणाऱ्या काफ़िल्यासाठी मरुवनाचे (oasis) जे महत्त्व आहे तेच महत्त्व मनुष्याच्या जीवनात पुस्तकांचे/ वाचनाचे आहे.

हिजाब, बुरखा, नकाब आणि किताब
इन्शाअल्लाह
खुशियों के गुप्तचर : गीत चतुर्वेदी यांची कविता

एक सुफी कथा आहे. मोझेसचा गुरू खिद्र याने मानवाला एक भविष्यवाणी करून सतर्क केलं की, भविष्यात एका मुक्रर केलेल्या दिवशी पृथ्वीवरील सगळं पाणी आटून जाईल आणि त्या जागी नवं पाणी वाहू लागेल. पण जो कुणी हे नवं पाणी प्राशन करेल त्याला वेड लागेल. केवळ आता हे पाणी लुप्त होण्याआधी खास पद्धतीनं जतन करून ठेवलं तरच ते यातून सुरक्षित राहील.

खिद्रच्या भविष्यवाणीचा एक अली वगळता कुणाही मनुष्यावर काही परिणाम झाला नाही. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणंच पसंत केलं. अलीनं मात्र खिद्रची सूचना गांभीर्याने घेतली. त्यानं तत्काळ नदीकडे धाव घेतली. नदीतलं पाणी घेतलं आणि त्याचा एका सुरक्षित ठिकाणी साठा केला आणि पृथ्वीवरील पाण्याचं गुणधर्म बदलण्याची वाट पाहत राहिला.

खिद्रने भाकीत केलेला दिवस उजाडला तेव्हा पृथ्वीवरल्या साऱ्या नद्या वाहायच्या थांबल्या. आटून गेल्या. झरे लुप्त झाले. विहिरी आणि तलावांचे तळ दिसू लागले. हे पाहताच अलीने आपल्या सुरक्षित स्थळी धाव घेतली आणि त्याने जतन करून ठेवलेलं पाणी पिऊन घेतलं. आता पुढे काय घडतं हे पाहण्यासाठी तो एका डोंगराच्या सुळक्यावर जाऊन वाट पाहू लागला.

थोड्याच वेळात पुन्हा साऱ्या नद्या पूर्ववत वाहू लागल्या. झरे फुटू लागले. विहिरी-तलावांत पाणी दिसू लागलं. पण हे पाणी बदललेलं होतं. बेमालूमपणे त्याचे गुणधर्म बदलले गेले होते. हे नवं पाणी पिऊन हरेक मनुष्य आता निराळ्या प्रकारचं वर्तन करू लागला. विचित्र तऱ्हेचे विचार डोक्यात घेऊन वावरू लागला. त्यांच्या पूर्वीच्या व्यक्तित्वाच्या खुणा जणू गायब झाल्या. खिद्रची भविष्यवाणी खरी ठरू लागली. लोक विस्मृतीच्या शापाने इतके बदलले की खिद्रने वर्तविलेलं भाकीत आणि त्याची सूचना याचा त्यांना साफ विसर पडला. असंही खिद्रची सूचना त्यांनी गांभीर्याने घेतलीच नव्हती.

बदललेलं पाणी पिऊन सगळीच माणसं आता बदलली होती. अली मात्र त्याने खास जतन करून ठेवलेलं पाणी पीत राहिला. आपलं मुळपण सांभाळून राहिला. अलीचं व्यक्तित्व जुन्या पाण्यामुळे शाबूत राहिलं. त्याच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही. पण आता लोक अलीला वेडा समजू लागले. अलीच्या डोक्यात बिघाड झालाय अशी पक्की समजूत त्यांनी करून घेतली. त्याशिवाय असं विचित्र वर्तन अली कशाला करेल? असं ते विचारू लागले. लोक अलीला दया दाखवू लागले. अलीविषयी त्यांना करुणा वाटू लागली.

अली एकटा पडला. समूहापेक्षा निराळं वर्तन करण्याची किंमत त्याला चुकवावी लागत होती. वेड्यांच्या जगात एकटा शहानाच वेडा अशी त्याची स्थिती झाली. सभोवतालचं जग आणि त्याच्या स्वतः मध्ये कमालीचं अंतर निर्माण झालं होतं. त्याच्या वाट्याला आलेलं एकाकीपण अलीला सहन झालं नाही. तिरिमिरीत त्याने एका झऱ्याचं बदललेलं पाणी प्राशन केलं. नवं पाणी प्राशन करताच तत्काळ अलीला त्यानं जतन करून ठेवलेल्या पाण्याचा विसर पडला. क्षणातच अलीचं एका नव्या व्यक्तित्वाच्या रूपांतर झालं.  अलीचे विचार आणि त्याचं वर्तन आता इतर लोकांसारखंच झाले होते. आणि हा वेडा एका दिवसातच कसा शहाणा झाला म्हणून लोक आश्चर्य करू लागले.

——————-

धून-नून नावाच्या ईजिप्शियन दरविशानं हजार वर्षांपूर्वी सांगितलेली ही कथा आहे. धून-नून मलवती दरविश परंपरेतला थोर सुफी होता. सुफी परंपरेत ही कथा आजवर हजारो वेळा सांगितली गेली आहे.

ही कथा मला अनेक अर्थांनी मानवी जीवनावर  महत्त्वाचं भाष्य करणारी आहे असे वाटते. कदाचित खिद्रने आपल्यालाही बदलणाऱ्या पाण्याविषयी आधीच सतर्क केलं असावं. कदाचित आपल्या जन्माआधीपासूनच या पृथ्वीवरलं पाणी बेमालूमपणे बदललं गेलं असावं. कदाचित आपल्या वाट्याला कायमच बदललेलं पाणी आलं असावं. मूळ जतन करून ठेवलेल्या पाण्याचा आपल्याला गंधही नसावा.  त्याची स्मृती आता शिल्लक नसल्याने आपल्याला खात्रीलायक असं काहीच सांगता येत नाही.  ते बदललेलं पाणी काय असावं याचाही आपल्याला विसर पडलेला आहे. मात्र आपलं आजचं वर्तन हे बदललेलं पाणी पिण्यामुळेच झालं आहे हे कुणीही विचारी मनुष्य कबूल करेल.

चित्र - मिथिला जोशी

चित्र – मिथिला जोशी

मात्र ते जुनं पाणी काय असावं हे थोड्याशा विचाराने ध्यानी येणे कठीण नाही. बदललेलं पाणीच नेहमी आपल्या वाट्याला आलेलं असलं तरी आपल्याला जुनं पाणी पिण्याच्या संधीही उपलब्ध होत असतात ही त्यामानानं चांगली गोष्ट आहे. आपल्या नशिबानं म्हणा किंवा अपघाताने म्हणा पण या जुन्या साठवून ठेवलेल्या पाण्याकडे आपलं लक्ष जायला हवं. गेलं तरी ते हेरता यायला हवं. तिथलं पाणी आपलं वेड संपवून कदाचित आपल्याला पुन्हा शहाणपण बहाल करेल. या जुन्या पाण्याच्या स्रोताशी आपली गाठ जुन्या पुराण्या ग्रंथालयात पडते. घरातल्या फडताळात हारीने मांडून ठेवलेल्या पुस्तकांत पडते. रस्त्याकडेला जूनेरं अंथरून त्यावर मांडून ठेवलेल्या ग्रंथांत पडते आणि रद्दीच्या दुकानातही पडते. या ठिकाणांचा आपल्याला विसर पडलेला असला तरी त्यांच्याशी गाठ पडण्याचे प्रसंगही काही कमी नाहीत. तिकडे पुन्हापुन्हा वळण्यातच आपलं शहाणपण पुन्हा गवसण्याच्या शक्यता साठून राहिलेल्या आहेत. केवळ या स्रोताशी कायमचं सख्य राखणं एवढंच फारतर फार आपल्याला करावं लागणार आहे.

———

वाचनसंस्कृती अर्थात ग्रंथानंद ही बहुधा मानवी सभ्यतेने निर्माण केलेली सर्वात सुंदर गोष्ट असावी. रखरखत्या वाळवंटात भटकणाऱ्या काफ़िल्यासाठी मरुवनाचे (oasis) जे महत्त्व आहे तेच महत्त्व मनुष्याच्या जीवनात पुस्तकांचे/ वाचनाचे आहे. जीवनमार्गावर प्रवास करत असताना या मेरुवनातील जल आणि छाया मनुष्याला विश्राम देते. त्याचा श्रमपरिहार करते आणि पुढील प्रवासासाठी त्याला सज्ज करते. त्यामुळेच वाचन या गोष्टीकडे सुसंस्कृत समाजाने नेहमीच आदराने पाहिले आहे. लिन युतांग म्हणतो, “वाचनाची आवड नसलेला मनुष्य हा त्याच्या सभोवतालच्या स्थळकाळ सापेक्ष मर्यादित जगात बांधलेला असतो. त्याचा संवाद आणि त्याचे बंध मोजक्याच व्यक्तींशी निगडित असतात. पण ज्याक्षणी तो एखादे पुस्तक हातात घेतो, तो जणू एका दुसऱ्याच जादुई प्रदेशात प्रवेश करतो. आणि ते पुस्तक जर चांगले असेल तर तत्क्षणी जगातल्या सर्वोत्तम गप्पीष्ट माणसाशी त्याचे संभाषण सुरू होते. लेखक त्याचे बोट पकडून वाचकाला एका वेगळ्या जगात आणि वेगळ्या काळात घेऊन जातो ज्याची वाचकाने कल्पनाही केलेली नसते. “अर्थात ग्रंथांचे काम केवळ एक निराळे जग वाचकांपुढे उघडून सद्यस्थितीतून पलायनाचे मार्ग खुले करून देणे एवढेच नसते. वर्तमानाचे अधिक चांगले आकलन करण्यास ग्रंथ साहाय्यभूत होत असतात. मनुष्याचे माणूसपण टिकवून ठेवण्यास ग्रंथ मदत करत असतात.

पण आज वाचनसंस्कृतीला उद्योगसमूहाचे स्वरूप आले आहे. ज्या उदात्त प्रेरणेने प्राचीन तत्ववेत्त्यानी आणि कथाकारांनी ग्रंथ लिहिले आणि ज्या औचित्याने उत्तम मनुष्याने त्यांचे वाचन केले ते औचित्य आज हरवत चालले आहे. आज प्रामुख्याने कुठल्या प्रकारच्या ग्रंथांचे वाचन केले जाते याचा सर्व्हे केला तर काय आढळून येईल? कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात जा अथवा ग्रंथसंग्रहालयात जा, तिथे सर्वात जास्त मागणी कुठल्या प्रकारच्या पुस्तकांना असते? प्रेरणादायी पुस्तके. ही प्रेरणादायी अथवा ‘सेल्फ हेल्प’ प्रकारात मोडणारी पुस्तकं कशाची प्रेरणा वाचकांना देतात? तर निरनिराळ्या मार्गांनी पैसा कमावण्याची, आकर्षक व्यक्तिमत्व घडविण्याची, कामाच्या ठिकाणी यश संपादन करण्याची आणि स्वतःला नेहमी आकर्षणाचे केंद्र बनविण्याची. याच गोष्टी आयुष्यात केवळ महत्वाच्या आहेत अशी भावना निर्माण करण्यात हे ग्रंथ यशस्वी झाले आहेत. ग्रंथ अथवा वाचन या गोष्टीला ज्या कारणामुळे मानवी संस्कृतीने गौरविले आहे त्याचा मागमूसही अशा पुस्तकांतून आढळत नाही.

अर्थात ग्रंथव्यवहाराचे स्वरूप केवळ उदात्त काही शिकविणे इतपत मर्यादित  असू नये हे ओघाने आले. प्रगत समाजात ग्रंथवाचनाकडे निखळ मनोरंजनाचे एक साधन म्हणून पाहिले जाते. आणि ते सर्वथा योग्यही आहे. पण ज्या कोशात साहित्याने स्वतःला गुरफटून घेतले आहे त्यातून बाहेर येणे हे आपल्या सर्वांसाठीच श्रेयस्कर आहे. समाजाचा मोठा भाग जेव्हा वाचन संस्कृतीविषयी सजग असतो, विचक्षण असतो तेव्हाच हे शक्य होते हेही ध्यानात घ्यायला हवे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: