रिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ

रिऍलिटी शो : वास्तवाचे मृगजळ

रिऍलिटी शोच्या झटपट प्रसिद्धीच्या प्रकाशझोतातून वास्तवतेकडे येणे खूप जणांना जड जाते. जेव्हा जाग येते तोपर्यंत हातातून खूप काही सटकून गेलं असत. अशी उद्ध्वस्त आयुष्य समोर आल्यावर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे कोण काय करू शकतं?

व्हॉट्सअप-केंद्र सरकारमध्ये वाद चिघळला
दिल्ली निकालावरून काँग्रेसमध्ये परस्परविरोधी मते
कर्नाटकातील घोडे बाजार

मायकलअँजेलो जेव्हा सिस्टाईन चॅपेलचे छत रंगवत होता तेव्हा ‘लास्ट सपर’ या प्रसंगात ज्याने येशूवर विषप्रयोग केला, त्या जुडास या व्यक्तिरेखेसाठी योग्य चेहरा त्याच्या डोळ्यासमोर येत नव्हता. कित्येक दिवस त्यासाठी काम खोळंबले होते. एके दिवशी त्याला एका बकाल वस्तीतल्या दारूच्या गुत्त्या बाहेर पोक असलेला, गबाळा, सारखा थुंकूत असलेला एक भिकारी दिसला. त्याच्या डोळ्यात विचित्र चमक मायकलअँजेलोला जाणवली. आणि त्याक्षणी त्याला जुडास सापडला. मायकलअँजेलोने त्याला पैसे देऊन, मॉडेल म्हणून स्टुडिओत बोलविले. तो लालची माणूस सारखे पैसे वाढवून मागत होता आणि मायकलअँजेलो ते शांतपणे देत राहिला.

एक दिवस लवकर आलेल्या त्या माणसाला राहवले गेले नाही, त्याने मायकलअँजेलो नेमकं काय काम करतोय, ते बघायला सुरवात केली. बघत असताना त्याला मायकलअँजेलोची जुनी रेखाटने असलेली वही दिसली. ती वही त्याने चाळली तेव्हा छोट्या येशू ख्रिस्ताच्या एका रेखाटनांकडे त्याचे लक्ष गेले. खूप वेळ तो त्या चित्राकडे बघत राहिला. त्याने मायकलअँजेलोला विचारले, “समजा तो छोटा येशू तुझ्या समोर आला तर तू त्याला कसे ओळ्खशील? मायकलअँजेलो म्हणाला, “कसं शक्य आहे? इतक्या वर्षात तो मुलगा किती बदललेला असेल.” त्यावर तो माणसाने विचारले, “असं कसं? तू त्या मुलाला मॉडेल म्हणून बसवून निरीक्षण करताना, काही तरी वेगळं टिपलं असशील ना?”

मायकलअँजेलोला आठवलं की त्या मुलाच्या हातावर ‘मर्सोलोनी’ अशी अक्षर गोंदवलेली होती. आपल्या शर्टाची बाही वरती करत तो माणूस म्हणाला, “ज्या माणसाला तू जुडास म्हणून आता रंगवतो आहेस, तोच मी कधी काळी तुझ्यासाठी बाल येशू ख्रिस्त होतो…”

अंगावर काटा आणणारी ही गोष्ट आठवायचे कारण असेच एक निरागसतेचा अंत झालेले दुर्दैवी आयुष्य समोर आले. इंडियन आयडॉल सिझन -11च्या ऑडिशनसाठी एक हडकुळा मुलगा स्टेजवर आला. त्याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होतं. थोड्या वेळाने त्या मुलाबाबत खुलासा झाला. तो ‘सारेगामा’ या कार्यक्रमाचा विजेता अजमत हुसेन हा होता. जेव्हा तो विजेता झाला,तेव्हा तो केवळ ११ वर्षाचा गोंडस चेहऱ्याचा निरागस मुलगा होता. चहुबाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. त्यानंतर आठ वर्षाने तो दिसला इंडियन आयडॉलच्या ऑडिशनला. त्यावेळी त्याने जे सांगितले ते सुन्न करणारे होते. डोक्यात यशाची हवा गेल्याने, मिळालेली प्रसिद्धी त्याला नीट हाताळता आली नाही. काही मित्रांच्या नादी लागून हा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला. मिळालेल्या पैशाची बरबादी होऊन, सध्या कंगाल अवस्थेत जगतोय. कुपोषित शरीर आणि साधं बोलतांनाही त्याला होणारा त्रास बघून हाच तो निरागस चेहऱ्याचा अजमत का? असा डोकं गरगरवणारा प्रश्न पडला. त्याच्या या दुर्दशेचे भांडवल टीआरपी वाढविण्यासाठी केले गेले. पुढील काही राऊंड त्याला स्पर्धेत ठेवले. त्याच्या प्रत्येक गाण्याआधी त्याच्या बरबादीच्या कहाणीची क्लिपिंग दाखविण्यात येत होती. त्याचा स्टेजवर वावरही अतिशय केविलवाणा होता. टीआरपीच्या हव्यासापोटी त्याचे पार खेळणं करून टाकलं होतं.

असाच प्रकार एका मराठी गुणी गायकाच्याबाबत घडला. एका गाण्याच्या रिऍलिटी शो मध्ये आत्मविश्वास गमावलेल्या त्या गायकाला बघून रसिकमनाला धक्का बसला होता. परीक्षकाच्या खुर्चीवर बसलेली गायिका एकेकाळीची त्यांची प्रतिस्पर्धी होती. त्या म्युझिक रियलिटी शोमध्ये ती गायिका अगदी सुरवातीच्या फेरीतच स्पर्धेतून बाद झाली होती. तर हा गायक पहिल्या पाचात होता. आज ती परीक्षक होती तर स्पर्धक म्हणून हा गायक स्वतःला परत आजमावत होता.

मधल्या काळात करियर उतरणीला लागलेलं होत. नुसता चेहराच नाही तर एकूणच त्या गायकाचे व्यक्तिमत्त्व नैराश्यग्रस्त दिसत होतं. प्रेक्षकांच्या भावनिक चढ- उताराची अचूक जाण असलेल्या क्रिएटिव्ह टीमला टीआरपीसाठी सॉलिड मस्त खाद्य मिळाले होते. त्या गायकाच्या आईला समोर बसवले गेले आणि तो गायक गाणं गात होता.

जग से हारा नही मैं ख़ुद से हारा हूँ माँ
इक दिन चमकूँगा लेकिन, तेरा सितारा हूँ माँ
माई रेमाई रे
मुझसे ही रूठी मेरी परछाईं..

रिऍलिटी शोच्या झटपट प्रसिद्धीच्या प्रकाशझोतातून वास्तवतेकडे येणे खूप जणांना जड जाते. जेव्हा जाग येते तोपर्यंत हातातून खूप काही सटकून गेलं असत. अशी उद्ध्वस्त आयुष्य समोर आल्यावर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे कोण काय करू शकत? ही सर्व उदाहरणे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. लहान मुलांचे कार्यक्रम हा विषय अधिक गंभीर असल्याने, तो तर स्वतंत्र मांडणे आवश्यक आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चा विजेता सुशीलकुमारने या कार्यक्रमानंतर आपल्या आयुष्याची कशी वाताहत झाली. या बद्दलची कहाणी नुकतीच जगासमोर मांडली. तेव्हा या सर्व गोष्टींवर परत एकदा विचार व्हायला हवा, हे प्रकर्षाने जाणवलं. त्याच्या मनोगतातील एक वाक्य ठळकपणे विचार करण्यासारखे आहे. तो म्हणाला, “मी व्यवसायानिमित्ताने दिल्लीला प्रवास करायचो त्यावेळी काही विद्यार्थ्यांसोबत ओळख झाली. त्यांच्याशी बोलल्यानंतर आपण या सर्वांपेक्षा किती कमी आहोत हे समजले.”

गरिबी, बेकारी, बाहेरच्या जगाचा झगमगाट, यशाचे दडपण यामुळे असे कार्यक्रम म्हणजे झटपट यशप्राप्तीची नामी संधी तरुणाईला वाटते. पालकही या जुगारी भुलाव्याला बळी पडतात.

आजकाल रिऍलिटी शोचा भडिमार प्रेक्षकांवर केला जातो आहे. त्या रिऍलिटी शोची कल्पना १९४६ साली एलन फाँट या अमेरिकन व्यक्तीच्या डोक्यात प्रथम आली आणि त्याने ‘कँडिड कॅमेरा’ नावाचा अमेरिकेत अत्यंत गाजलेला आणि दीर्घकाळ चालणारा प्रोग्राम केला. पुढे त्याच्या या एका कल्पनेतून अनेकांना नवनवीन कल्पना सुचल्या आणि रिऍलिटी शोचा मनोरंजन क्षेत्रांत शिरकाव झाला.

१९९३ ‘अंताक्षरी’ हा पहिला रिऍलिटी शो भारतात सुरू झाला आणि त्यानंतर १९९५ ला ‘सारेगामा’ हा गाण्याचा, तर ‘बुगी वुगी’ हा डान्स शो सुरू झाले. त्यावेळी या कार्यक्रमांचे स्वरूप साधं सरळ असे होते. अनेक दिग्गज लोक मार्गदर्शन करण्यासाठी शो मध्ये येत असे. त्यांचे कार्यक्रमातील अस्तित्व हे कार्यक्रमाचा दर्जा वाढवणारे, खुलवणारे असायचे. त्यांनी केलेल्या सूचना, कौतुक हे संयमित स्वरूपाचे असायचे. कुठलाही बडेजाव नसलेलं,  हलके फुलके हे वातावरण अगदी आपल्या परिसरातील गणपती उत्सवातील कार्यक्रमांसारखे घरगुती आणि आपलेसे वाटत असे. २००० साली ‘कौन बनेगा करोडपती’ आलं. आणि रिऍलिटी शोच्या झगमगाटाला सुरवात झाली.

विष्णूने भस्मासुराला मारण्यासाठी मोहिनी रूप धारण केले होते. इथे मात्र भलतेच झाले एका मोहिनी रुपाचे भस्मासुरात रूपांतर झाले. ज्याने कलेबाबतचा निकोप दृष्टीकोन भस्म करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी प्रेक्षकांच्या मानसिकतेचे ‘वाणिज्यकरण’ व्हायला लागले आणि स्पर्धकांचे आयुष्य सापशिडीच्या खेळासारखे  खेळले जाऊ लागले. याचा परिणाम असा झाला की समाज तात्पुरते आणि शाश्वत यश यातील फरक करण्याची सारासार विचारशक्ती गमावून बसला.

काही लोकांनी या तात्पुरत्या प्रसिद्धीचा योग्य वापर करून आपले आयुष्य अधिक चांगले केले. पण हजारो लोकांपैकी अगदी मोजक्या लोकांचे हे प्रगती पुस्तक म्हणता येईल. पण त्याच्या प्रगती पुस्तकांत आपल्या यशाची कुंडली तरुणाई शोधत राहते. दुर्दैवाने समाजात यश, पैसा व प्रसिद्धी हे म्हणजेच प्रतिष्ठेचे मापदंड समजले जाते. त्यामुळे जगण्याला स्पर्धेचे स्वरूप प्राप्त झालं आहे. एकदा का मनाला स्पर्धा करण्याचे व्यसन लागले की मग अनावश्यक ठिकाणी देखील नकळत स्पर्धा सुरू होते. हेच ‘अनावश्यक महत्त्व’ सामाजिक, सांस्कृतिक अधःपतनाचे कारण आहे. यशासाठी लागणारी मेहनत, संयम, चिकाटी, प्रसंगी माघारी येण्याची तयारी या गुणांची वानवा असेल तर नैराश्य हे येणारच.

पं. सुरेश वाडकर यांनी कलेचे सादरीकरण यावर फार गंभीर वक्तव्य केले आहे.

“सादरीकरण ही रोज खोदायची विहीर आहे. आदल्या दिवशी खोदलेल्या विहिरीचे पाणी आज पिता येत नाही. रोज पहिल्यापासून विहीर खणायची, तेव्हा कुठे ओंजळीभर पाणी तुमच्या हाती लागते.”

कलेला लोकमान्यतेची जोड हवी असते, हे जरी खरं असलं तरी पण लोकमान्यतेला प्राधान्य व कलेला दुय्यम ठेवून जी निर्मिती केली जाते तिचा दर्जा हा सकस असू शकत नाही!

अभिरुची संपन्न कार्यक्रमांशी टीआरपीचे विळा-भोपळ्याचे नाते आहे. काही शोसाठी तर ज्याला आपण अवगुण समजतो, तेच सहभागी होण्यासाठीची गुणवत्ता ठरतात. त्या शोच्यामध्ये प्रवेश मिळविण्यासाठी स्पर्धकांच्या अंगात भडकपणा, उथळपणा, आरडाओरडी करण्याचे कौशल्ये, विक्षिप्तपणा, भांडण उकरून काढण्याचे कसब, शिव्या देणे, प्रसंगी हाणामारी करण्याचा जोश अशी विविध प्रकारचे इब्लिस गुण असावे लागते. ‘बदनाम हुये तो क्या मशहूर हो गये हम’, अशी घमेंड असलेले जिगरबाज लोक अशा कार्यक्रमाचे चमकते तारे असतात. मग खेळात नवरसाची उधळण केली जाते. सहभागी व्यक्तींच्या करवी भावनांचा बाजार मांडला जातो. एकमेकांचे खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणले जाते. रिऍलिटीच्या नावाखाली भडक अतिरंजकता दाखवली जाते. जी लोकांना हवीशी वाटते.

ही अतिरंजकता का दाखवली जाते? कारण अशा अतिरंजित गोष्टीबाबत लोकांच्यात उत्सुकता असते. त्यामुळे आपोआप चर्चा होऊन प्रसिद्धी मिळते. अगदी माहितीपटाचे महर्षी म्हणून ओळखले जाणारे लुई ब्युनेल यांना सुद्धा हा मोह आवरता आला नव्हता. ‘लँड विदाउट ब्रेड’ हा वादग्रस्त त्यांनी माहितीपट केला. स्पेनच्या एका टोकाला असलेल्या दारिद्र्यग्रस्त, बकाल अशा हरडीट भागातील भूकबळी, उपासमारीचे भीषण चित्रीकरण त्यांनी केले. त्यातील दृश्ये ही ढवळून टाकणारी होती. तेथील करुणामय, दयनीय अवस्था शहरातल्या सुखवस्तू समाजाला अधिक तीव्र वाटण्यासाठी काही न घडलेल्या घटना त्यात घातल्या गेल्या. वस्तुस्थितीचे टोकाचे चित्रीकरण केले गेले. या अतिरंजकतेच्या फोडणीमुळे त्याच्या ‘वास्तववादी’ माहितीपटाला अभूतपूर्व यश, प्रसिद्धी मिळाली. लुई ब्युनेलच्या कामाबद्दल सर्वत्र वाहवा झाली. पण तेथील गावकऱ्यांनी मात्र या सत्याच्या विपर्यासाबद्दल आपली तीव्र नाराजगी व्यक्त केली. पण लुई ब्युनेला त्यांचे फारसे काही वाटले नाही. कारण त्याचे काम झालं होतं.

अगदी हे असेच रिऍलिटी शो मध्ये होत असते. ही अतिरंजकता लोकांना का हवी असते? आठवडाभर कार्यमग्न असलेल्या खूप जणांना घर बसल्या काही विरंगुळा हवा असतो. नाहीतर त्यांना ही सुट्टी पोकळ भासू लागते. मानसशास्त्रज्ञ व्हिक्टर फ्रँकेल त्याला ‘संडे न्यूरोसिस’ म्हणतो. बुद्धीला, शरीराला आलेला थकवा घालविण्यासाठी, आलेली पोकळी भरून काढण्यासाठी लोक मग अशा वरवरच्या उथळ जगात रस घेतात. कारण त्यासाठी त्यांना कोणती शक्ती, श्रम खर्च करावे लागत नाही. कोणताही निर्णय व त्याची जबाबदारी घ्यायची सक्ती नसते. त्यामुळे अशा चटपटीत, भडक कार्यक्रमातून त्यांची तात्पुरती सहज करमणूक होत असते. बरं अशा काही हृदयद्रावक कथा ऐकल्या, बघितल्यावर त्या स्पर्धकाला मत देऊन सामाजिक बांधिलकी जपल्याचे समाधान घर बसल्या बोनस स्वरूपात मिळते. नीट लक्षात घ्या, असे कार्यक्रम अधिक प्रमाणात शनिवार-रविवार किंवा रात्री उशिरा प्रसारित होतात.

या सर्वांची गोळाबेरीज केली जाते व नंतर मृगजळाच्या मागे उर फुटेपर्यंतची स्पर्धकांची शर्यत लावली जाते. औट घटकेच्या खेळातून हे गडी बाद झाले की नवे गडी त्यांची जागा घ्यायला उतावीळ असतात.

‘डॅडी’ नावाच्या चित्रपटात एका प्रसिद्ध गायकाची व्यसनामुळे झालेली दैना दाखवली आहे. पुढे मुलीच्या प्रेमाखातर आपलं आयुष्य सावरायचे तो ठरवतो. तिच्या व स्वतःच्या आत्मसन्मानासाठी एका गाण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. त्या गाण्यातील शब्द रिऍलिटी शोमुळे झालेली स्पर्धकांची फरफट जणू व्यक्त करत आहे.

आईना मुझसे मेरी पहली सी सूरत माँगे

मेरे अपने मेरे होने के निशानी माँगे

मेरा फन फिर मुझे बाज़ार मे ले आया है

ये वो जा है के जहा मेहरो वफ़ा बिकते है

बाप बिकते है और लाफ़्ते जिगर बिकते है

कोख बिकती है, दिल बिकते है, सर बिकते है

इस बदलती हुई दुनिया का खुदा कोई नही

सस्ते दामो मे हर रोज खुदा बिकते है..

(‘मायकलअँजेलो’ – गुलजार लिखित ‘रावीपार ‘लघुकथा पुस्तकांतून)

देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म दिग्दर्शिका आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0